11 December 2017

News Flash

वेटिंग फॉर व्हॅलेन्टाइन्स डे…

अवघ्या आठवडय़ावर आता व्हॅलेन्टाइन्स डे आलाय. मनातील गोष्ट त्याला किंवा तिला सांगण्याचा एक ऑफिशियल

मुंबई | Updated: February 8, 2013 6:49 AM

अवघ्या आठवडय़ावर आता व्हॅलेन्टाइन्स डे आलाय. मनातील गोष्ट त्याला किंवा तिला सांगण्याचा एक ऑफिशियल दिवस. म्हणूनच तरूण तरूणी आतुरतेने या दिवसाची वाट पाहात असतात. तसं बघायला गेलं तर वर्षांतला कुठलाही दिवस हा प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य असतो. पण थोडं सेलिब्रेशन करायचं असेल तर व्हॅलेन्टाइन डे असेल तर अधिकच उत्तम. प्रत्येक व्यक्तिगणिक प्रेमाच्या व्याख्या या बदलत जातात. नवीन लग्न झालेली अनेक कपल्स हा दिवस आजही एकमेकांसोबत साजरा करतात. किंवा वेळ न मिळाल्यास काहीतरी प्लॅनिंग नंतर का होईना करतातच. खास या दिवसाचे प्लॅन्स जाणून घेऊयात आपल्या लाडक्या सेलिब्रिटींकडून.

आलिया भट्ट
माझ्यासाठी व्हॅलेन्टाइन डे अजून थोडा दूर आहे. पण मी. माझी पिढी या ‘प्रेमदिवसा’चा बेसब्री से इंतजार करतो. त्यात गैर काय? आपण एकूणच अनेक बाबतीत प्रगत होत चाललोय, मोबाइल, इंटरनेट या माध्यमातून जगातील असंख्य गोष्टी आपल्यासमोर आहेत. भविष्यात व्हॅलेन्टाइन डे आपल्या संस्कृतीचा एक भाग होऊन जाईल. शुभेच्छा, भेटवस्तू, पार्टीज यांची या दिवशी होणारी मनसोक्त लयलूट एक प्रकारचे टॉनिकच! स्टुडन्ट्स ऑफ दी इयर या माझ्या पहिल्या प्रेमपटाने ‘प्रेम म्हणजे काय असते’ याची थोडी ओळख दिली. तो अभिनयाचा एक भाग असला तरी प्रेमात अभिनय चालत नाही, ते मात्र खरे असते. व्हॅलेन्टाइन डे म्हणजे त्याच खरेपणाला व्यक्त करण्याची संधी.. इश्कवाला लव्ह म्हणतात ते हेच.

अतुला दुगल
माझा कोणी व्हॅलेंटाइन नाही, पण त्या दिवसाचे दिलखुलास वातावरण व त्या निमित्तानाच्या भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे यांची खरेदी या गोष्टी मात्र मला खूप आवडतात. मी माझ्यासाठीही अशा गोष्टींची खरेदी करते. खरंतर ‘एकच दिवस प्रेमाचा’ असे नसते, ती भावना रोजच हळूहळू मनात रुजत असते, पण मुंबई-पुण्याच्या रोजच्या वेगवान आयुष्यात ‘एक दिवस काढू या प्रेमाचा’ हे खूप आनंददायक ठरते. हे अमेरिकन संस्कृतीचे फळ असले तरी एव्हाना आपल्या एकूणच जीवनशैलीत अमेरिकन संस्कृतीच्या केवढय़ा तरी गोष्टींची सहजी ‘मिलावट’ झाली आहे, तर मग फक्त याच ‘प्रेम दिवसा’ला विरोध का बरे करता? या दिवसाचे ‘निमित्त’ साधून एखादा ‘प्रेमवीर’ आपले एकतर्फी प्रेम व्यक्त करतो हे मात्र खूप गंभीर आहे, त्यातही तो कोणत्याही स्तराला जातो हे तर भयानक आहे. अशाने ‘प्रेमाचा दिवस’ उगीचच बदनाम होतो.

सोनाली कुलकर्णी
माझे ‘तसे काही नाही’ म्हणून मी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी काय करणार, हा प्रश्नच येत नाही. जेव्हा मी प्रेमात पडेन तेव्हाचा माझा रोमांच, माझे कुतूहल काही वेगळे असेलच, तेव्हा नक्की सांगेन, पण व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी कोणी काय करायचे, प्रेम कसे व्यक्त करावे, प्रेमाचा स्वीकार कसा करायचा हा खूपच व्यक्तिगत विषय आहे, असे साजरे करणे योग्य की अयोग्य, या प्रश्नावर मी तटस्थ राहणे पसंत करीन. पाश्चात्त्य देशांकडून मदर डे, फादर डे यांच्यासह हा व्हॅलेंटाइन डे आला, पण तिकडच्या काही चांगल्या गोष्टीदेखील येऊ देत. आपल्याकडच्या प्रेमपटातून वर्षांनुवर्षे खरेच प्रेम वाहतेय, त्यात मला यश चोप्रा यांचे ‘चांदनी’, ‘लम्हें’ ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे प्रेमपट जास्तच आवडतात. खऱ्या प्रेमाचा ते अस्सल रुपेरी आविष्कार आहेत. मराठीत मला ‘अजिंठा’ ही माझीच आवडती प्रेमकथा विशेष वाटते. त्यात दोन भिन्न देशांचे, संस्कृतीचे, धर्माचे, भाषेचे प्रेमिक एकमेकांवर खरे प्रेम करतात. खऱ्या प्रेमाच्या आड असे काहीही येत नाही. त्यात उत्कटता, असोशी महत्त्वाची असते हे ‘अजिंठा’ दाखवतो.

सागरिका घाटगे
प्रेम म्हणजे एकाच वेळी खूप नाजूक व अवघड विषय आहे हे ‘प्रेमाची गोष्ट’ चित्रपटातून भूमिका साकारताना माझ्या चांगलेच लक्षात आले. एखादी ‘भूमिका’ तुम्हाला काहीतरी देऊन जाणारी ठरते, त्यामुळे मग अशा ‘व्हॅलेंटाइन डे’कडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ‘प्रेम करा खुश्शाल’ पण त्यात परिपक्वता व संयम असू देत. उथळपणे व घाईघाईत करण्याची ही गोष्ट नाही. माझे व्हॅलेंटाइन डेचे प्लॅन तसे खासगी राहू देत, या दिवशी ‘प्रेमाची गोष्ट’ भरभरून करा, अशीच शुभेच्छा!

अश्विनी भावे
कसा योगायोग आहे बघा, व्हॅलेंटाइन डेच्या आदल्याच दिवशी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी माझ्या नवऱ्याचा वाढदिवस असतो, त्यामुळे सेलिब्रेशनचा डबल धमाका करतो. अमेरिकेतील आमच्या सॅनफ्रान्सिस्को शहरातील एखाद्या उंची हॉटेलमध्ये आम्ही मस्त पार्टी करतो. ‘आजचा दिवस माझा’च्या पूर्वप्रसिद्धीसाठीचे माझे मुंबईतले काम होताच मी अमेरिकेला चालले आहे. व्हॅलेंटाइन डे तेथून आपल्याकडे आला असे आपण म्हणतो, पण त्यांच्याकडून घेण्यासारख्या खूप चांगल्या गोष्टी आहेत. विशेषत: वक्तशीरपणा व कोणतीही लहान गोष्ट करण्याची तयारी. त्या गोष्टींनादेखील आपण स्वीकारायला हवे.

प्रिया बापट
मी व उमेश एकमेकांना आठ वर्षे चांगलेच ओळखत असल्याने आमच्यासाठी पुन्हा व्हॅलेंटाइन डे तो वेगळा कसला? ‘प्रेमासाठी एक दिवस काढावा’ ही गोष्ट मला पटत नाही, तरी प्रत्येक वयाचे-काळाचे काही फंडे असतात, त्यामुळे सध्याच्या व्हॅलेंटाइन डेच्या एकूणच उत्साहाला स्वीकारावे. मला व उमेशला आता प्रेमासाठी आपापल्या कामात बिझी राहिल्याचेही चालते. तो त्याच्या चित्रीकरणात असतो, मी माझ्या कामात असते. प्रेमाचा उत्तम रंगढंग दाखविणाऱ्या माझ्या आवडत्या चित्रपटात ‘हम आपके हैं कौन’ व ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ यांचा समावेश होतो. ते कितीही वेळा पाहिले तरी अजिबात कंटाळा येत नाही. मला वाटते, इतरांचेही तेच खूप आवडते प्रेमपट असावेत. माझा स्वभाव खूप मोकळा असल्याने व अनेकांशी माझे पहिल्या भेटीतच सूर जुळत असल्याने खूप छान व प्रसन्न वाटते. हादेखील एक वेगळ्या प्रेमाचा प्रकार आहे.

आदिनाथ कोठारे
माझ्या लग्नानंतरचा हा दुसरा व्हॅलेन्टाइन डे. पण नेमक्या त्याच दिवशी माझी पत्नी ऊर्मिला दक्षिण भारतात तेलगू चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. ‘मला आई व्हायचंय’ या तिच्याच चित्रपटाचा दिग्दर्शक संगीतम श्रीनिवास राव तेलगू भाषेत रिमेक करीत असून ऊर्मिलाला तिची भूमिका पुन्हा साकारायला मिळाली आहे. पण मोबाइलद्वारे आमचा त्या दिवशी प्रेमसंवाद होईलच. पण प्रेम करण्यासाठी, व्यक्त करण्यासाठी वेगळा मुहूर्त काढावा लागत नाही. माझ्या-ऊर्मिलाच्याही ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. व्हॅलेन्टाइन डे म्हणजे पाश्चात्त्य संस्कृतीचे आक्रमण वगैरे वाटत नाही. विविध माध्यमांनी एकूणच जग खूप जवळ आल्याने सामाजिक-सांस्कृतिक ‘सरमिसळ’ होणे स्वाभाविक आहे. आपल्या मूळ संस्कृतीला कायम ठेवूनच नव्या गोष्टींचे स्वागत करायलाच हवे. व्हॅलेन्टाइन डे प्रेमिकांना उत्साही ठेवतो, उमेद वाढवतो, तर त्यात गैर ते काय? माझा आवडता प्रेमपट सांगायचा तर तो ‘एक दूजे के लिए’ आहे. त्यात केवढी गंमत, उत्कटता व कारुण्य यांची रेलचेल आहे.

First Published on February 8, 2013 6:49 am

Web Title: waiting for valentine day