09 August 2020

News Flash

वाहिन्यांचे ऑनलाइन शिलेदार

अरे तो व्हिडीओ पाहिलास का? ‘कानाला खडा’मध्ये अरविंद सावंत आलेत म्हणे.

|| दीपेश वेदक

अरे तो व्हिडीओ पाहिलास का? ‘कानाला खडा’मध्ये अरविंद सावंत आलेत म्हणे. काय रे? ‘तुला पाहते रे’ मालिका संपतेय असं ऐकलं. ‘चला हवा येऊ  द्या’चा सिम्बा स्पेशल एपिसोड पुन्हा एकदा बघायचं म्हणतोय. ‘गठबंधन’चा उद्या महाएपिसोड आहे ना?, या गप्पा तुम्हाला घरोघरी ऐकू येतात. टीव्हीवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवर नेमकं काय चाललं आहे, हे पाहण्यासाठी आता तुम्हाला घरी जाऊन टीव्ही लावावा लागत नाही. वाहिनीच्या सोशल मीडियावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतात. आणि या वाहिन्यांसाठी सोशल मीडियाची जबाबदारी सांभाळणारे चेहरे हे तरुण आहेत. तरुणाई नेमकं कसं आणि कोणत्या पद्धतीने हे काम हाताळते ते त्यांच्याशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न..

एखाद्या वाहिनीवर चालणाऱ्या वेगवेगळ्या मालिका, सिनेमा यांच्याबद्दलची माहिती अनेकदा आपल्याला त्या त्या वाहिनीच्या सोशल मीडियावर मिळते. एखाद्या मालिकेच्या नव्या भागात काय पाहता येईल? हे अनेकदा आपल्याला तिथूनच कळतं. आपल्या आवडत्या मालिकेतील, सिनेमातील कलाकार या पावसाळ्यात काय करत आहेत? ते कुठे फिरायला जात आहेत? त्यांची सेटवरची धमाल, त्यांचे मजेदार किस्से, त्यांचे वाढदिवस, आदी गोष्टी या ठिकाणी तुम्हाला अगदी सहज कळतात. त्यामुळे मालिका पाहणारे अनेक जण वाहिन्यांना सोशल मीडियावरही फॉलो करतात.

वाहिन्यांचा सोशल मीडियावरील हा सहभाग पाहण्याची जबाबदारी या वाहिन्यांनी मुंबईतल्या काही तरुणांच्या खांद्यावर सोपवली आहे. ही मंडळी वर्षांतल्या सर्व महत्त्वाच्या दिवसांची एक यादी बनवतात. त्यातले कोणते दिवस वाहिनीसाठी महत्त्वाचे आहेत? कोणत्या दिवशी कोणत्या कलाकाराचा वाढदिवस आहे? मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील कोणत्या खास गोष्टी कोणत्या दिवशी घडल्या? यांचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातो. त्या दिवशी सोशल मीडियावर कोणत्या स्पर्धा घेता येतील? या दिवशी काही खास कार्यक्रम, शुभेच्छा, एखाद्या मालिकेचा ‘महाएपिसोड’ वाहिनीवर आहे का? ही सगळी माहिती लोकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे कशी पोहोचवता येईल? हे प्रामुख्याने पाहणं त्यांचं काम असतं. ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात एखाद्या सिनेमाबद्दल उत्सुकता वाढवण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा, कलाकारांशी गप्पा, त्या सिनेमाच्या सेटवरील गमतीजमती प्रेक्षकांशी सोशल मीडियावरून शेअर करतो. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या सिनेमाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायला आवडते’, असं एका मराठी वाहिनीचा सोशल मीडिया सांभाळणारा भूषण कदम म्हणतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक क्रिएटिव्ह गोष्टी तुम्हाला करता येतात. एखाद्या मराठी वाहिनीसाठी सोशल मीडिया सांभाळताना एक मोठा प्रेक्षकवर्ग तुमच्या या क्रिएटिव्हिटीला दाद देत असतो, असेही तो म्हणतो.

एखाद्या वाहिनीवरील मालिका तयार करत असताना सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्याशी ती कशाप्रकारे संबंधित असेल, हेही पाहिले जाते. त्याप्रमाणेच वाहिन्यांचा सोशल मीडिया सांभाळतानाही हा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो. वाहिन्यांचा सोशल मीडिया सांभाळताना सध्या सोशल मीडियावर आणि दैनंदिन आयुष्यात चर्चेत असलेले विषय क्रिएटिव्ह पद्धतीने हाताळावे लागतात. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत पोचणं सहज शक्य होतं. ‘सध्या वर्ल्ड कप आणि पाऊस हे दोन विषय दैनंदिन आयुष्यात आणि मालिकांमध्ये चर्चेत दिसतात. अशा वेळी हे विषय घेऊन सोशल मीडियावर आम्ही अनेक गोष्टी लोकांपुढे आणतो. प्रेक्षकांचे लाडके कलाकार कोणत्या टीमचे फॅन आहेत. ते या पावसाळ्यात कोणत्या अ‍ॅक्टिव्हिटिज करत आहेत, हे आम्ही सोशल मीडियावर देतो. प्रेक्षकांनाही या गोष्टींबद्दल प्रचंड कुतूहल असते,’ असं एका मराठी वाहिनीचा सोशल मीडिया सांभाळणारी प्राची आंधळकर म्हणते. ‘शिवाय अमुक एका मालिकेच्या उद्याच्या भागात प्रेक्षकांना काय पाहता येईल, हे आम्ही सोशल मीडियावर त्यांना देतो. एखाद्या मालिकेचा एखादा भाग पाहायचा राहून गेला असेल, तरी त्या भागात काय झालं, हे त्यांना सोशल मीडियावर कळतं. राहून गेलेला भाग कुठे पाहता येईल, याची माहिती मिळते. त्यामुळे प्रेक्षक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आवडत्या मालिकेशी आणि लाडक्या कलाकारांशी कनेक्ट राहतात,’ असंही तिने सांगितलं.

वाहिन्यांमध्ये असलेली टीआरपीची स्पर्धा आता त्यांच्या सोशल मीडियावरही अनेकदा पाहायला मिळते. प्रेक्षक मालिका पाहतानाच सोशल मीडियावरील वाहिन्यांच्या वावरावरही लक्ष ठेवून असतात. अशा वेळी सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी चर्चेत आहेत, हे पाहतानाच कोणत्या वाहिनीने कोणती नवी गोष्ट सोशल मीडियावर आणली आहे, हेही पाहिले जाते. शिवाय वाहिनीवर दिसणारे कलाकार प्रेक्षकांना आपल्या अभिनयातून भुरळ पाडतात. त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे, हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. अशा वेळी ते सोशल मीडियावर काय नवीन टाकत आहेत, हे सतत पाहावं लागतं. ‘मालिकांमध्ये दिसणारे कलाकार हे वाहिनीचा एक मोठा भाग असतात. प्रेक्षकांना सर्वाधिक कुतूहल त्यांच्या आयुष्याबद्दल असतं. त्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावर काय नवीन येतं आहे, याकडेही लक्ष द्यावं लागतं,’ असं ‘कलर्स मराठी’चा सोशल मीडिया सांभाळणारी विधात्री कीर्तने-नेवाळकर म्हणते. ‘एखादा नवीन कार्यक्रम वाहिनीवर येत असेल, तर त्यांचा सोशल मीडियावर प्रचार कसा केला जाईल, हे आधीच ठरवलं जातं. त्यानुसार मोहीम आखून सोशल मीडियासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी तयार करून घेतल्या जातात. यासाठी संपूर्ण टीम कार्यरत असते,’ अशी माहिती विधात्रीने दिली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहिन्यांना थेट प्रेक्षकांशी संवाद साधता येतो. मालिकेतील भूमिका, मालिकेतील घडामोडी यांची सांगड प्रेक्षकांशी घालत त्यांना वेगवेगळ्या स्पर्धा, विनोद, व्हिडीओ आदींच्या साहाय्याने सोशल मीडियावर बोलतं केलं जातं. त्यांची आवड समजून घेतली जाते. त्यांना आवडणाऱ्या, त्यांना त्यांच्या मित्रांना पाठवाव्या वाटतील अशा गोष्टी तयार केल्या जातात. त्यांना मालिकांचा आणि दैनंदिन आयुष्याचा आधार दिला जातो. त्यामुळे प्रेक्षक त्या एकमेकांना पाठवतात आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचता येते. ‘वाहिनीचा सोशल मीडिया सांभाळताना प्रेक्षकांची चव महत्त्वाची ठरते. त्यांच्या आवडीचा विचार केला तर आपण सोशल मीडियावर टाकलेल्या गोष्टींवर ते लगेच संवाद साधतात आणि एकमेकांना पाठवतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य होतं. शिवाय आपण केलेली कोणती गोष्ट लोकांना आवडतेय आणि कोणती नाही, हेही कळतं,’ असं एका मराठी वाहिनीचा सोशल मीडिया सांभाळणारा तेजस राणे म्हणतो. ‘सोशल मीडियावर काहीही टाकताना लोकांची वेळ पाळणंदेखील महत्त्वाचं असतं. प्रेक्षक कोणत्या वेळात सोशल मीडियाचा वापर करतात, हे पाहून त्यानुसार वाहिनीच्या सोशल मीडियाला उपयोगात आणलं जातं. त्यामुळे प्रेक्षकांच्या चवीबरोबरच त्यांच्या वेळेचाही विचार केला जातो,’ असं तेजसने सांगितलं.

प्रेक्षकांची आवडनिवड लक्षात घेऊन सोशल मीडियावर आलेल्या मराठी वाहिन्यांना लाखो प्रेक्षक फॉलो करताना दिसतात. त्यांना सोशल मीडियावर खिळवून ठेवण्याची, त्यांना बोलतं करण्याची जबाबदारी या तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यानिमित्ताने प्रेक्षक, कलाकार आणि वाहिनी यांच्यातील दुवा म्हणून सोशल मीडिया सर्वाच्याच आवडीचा ठरला आहे. मात्र त्यासाठी आपल्यासारख्याच तरुणांची कल्पकता, त्यांचा विचार-नियोजन कौशल्य कारणीभूत ठरते आहे हे चित्र नक्कीच सुखावणारे आहे!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2019 12:10 am

Web Title: watch tv shows online mpg 94
Next Stories
1 ‘फास्ट’ फॅशन?
2 नटबोल्टकडून फोटोशूटकडे
3 मोबाइल कॅमेऱ्याची गोष्ट
Just Now!
X