vv13नृत्यकलेचा एक नवीन आयाम सध्या अनेकांच्या लक्षात आलाय.. कॅलरी बर्निगसाठीचा. सध्या जमाना आहे फिटनेस डान्सचा. काय आहे हा फंडा? कुठले डान्स यामध्ये येतात? प्रसिद्ध अभिनेते आणि नृत्यप्रशिक्षक नकुल घाणेकर सांगताहेत डान्स आणि फिटनेसचं गणित..
२००२ साली एला लॅटिन अमेरिकन पण आता अमेरिकेचा नागरीक असलेल्या माणसाशी बोलताना माझ्या डेस्क वरच्या वृत्तपत्राच्या घडीकडे माझे लक्ष गेलं. त्यावेळी मुंबईत कुणालाच फारशी परिचयात नसलेल्या नृत्यशैलीचे म्हणजेच सालसाचे क्लासेस नुकतेच बांद्रामध्ये सुरू झाले होते. त्याच डान्स स्कूलच्या पेपरात आलेल्या जाहिरातीवर अशी माजी नजर पडली. कानांवर त्या परप्रांतियाचे स्पॅनिश मिश्रित इंग्लिश पडच असतानाच त्याच्याच देशाकडून भारताकडे आलेल्या ‘सालसा’ नृत्याच्या त्या जाहीरातीबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण होत होते. त्या माणसांसाठी मात्र मी मुंबईत बसलेला कोणी कॉलसेंटर एक्झिक्युटिव्ह नसून त्याच्या देशातला एक ऑफिसर होतो आणि त्याच्या अकाऊंट संबंधी माहिती अस्खलित U.S. accent  मध्ये त्याला देत होतो. कॉलसेंटरच्या माझ्या त्या नोकरीत तसं आम्हाला शिकवलं गेलं होते.
मात्र साता समुद्र पलिकडून माझ्याशी फोनवर संवाद साधणाऱ्या त्या माणसाच्या अनोळखी आवाजात एक गोडवा होता. तो गोडवा बहुदा त्याच्या लॅटिन जीन्समुळे किंवा त्याच्या भूमातेतील लोकप्रिय सालसा संगीतमुळे त्याला वारसा म्हणून मिळाला असावा. ‘सालसा’ ही तीन अक्षरं वाचल्यावर माझ्यातल्या नृत्याविद्यार्थ्यांमध्ये एक उत्स्फूर्त कुतूहल निर्माण झाले होते. ‘सालसा’ नावाच्या त्या खोल सागरात २००२ मध्ये जी उडी मी घेतली आजपर्यंत त्या सागराचा तळ काही गाठू शकलो नाही.
गेल्या १० वर्षांत माझ्यासारखे अनेक भारतीय या शैलीकडे नुसत्या नावातल्या गमतीमुळेच आकर्षित झाले नाहीत; या नृत्यशैलीकडे असे चुम्बकीय गुणच आहेत ज्यामुळे अनेक लोक आज सालसाला स्वत:चं पॅशन म्हणून ‘फॉलो’ करतायत. दोन ‘सां’ ना एका ‘ल’नी जोडून ‘सालसा’ शब्द निर्माण झालाय. मला असा युक्तिवाद करायला आवडेल की दोन ‘सा’ म्हणजे दोन ‘सामान्य व्यक्ती’ एका ‘ल’ने म्हणजेच सालसा संगीतातील लयीने एकत्र नृत्यात बांधले जातात तेव्हा त्या दोघांमध्ये एक ‘असामान्य’ कनेक्शन तयार होतं. ते अद्भूत कनेक्शन म्हणजेच ‘सालसा’ असं मला वाटतं. याच कनेक्शनमध्ये एक लीड आणि फॉलो असतो. त्यांच्यातले उस्फूर्त Give-and-take म्हणजेच ‘सालसा’.
या नृत्याला वयाचं बंधन नाही आणि स्त्रीपुरुष असंही बंधन नाही किंवा नसावं. दोन स्त्रीया किंवा दोन पुरुष देखील सालसा करू शकतात. सालसासारख्या अनेक पाश्चात्य नृत्यशैलींना भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे ती टी. व्ही. डान्स रिएलिटी शोज, बॉलीवूड चित्रपट, अॅवॉर्ड सेरेमनीज आणि हल्लीच्या ”’Events” च्या ट्रेन्ड मुळेच  स्ट्रेसबस्टर म्हणून या नृत्यशैलीने आघाडीचं स्थान मिळवलं आहे. त्याला काही महत्वाची कारणं आहेत. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ही मुळात एक परफॉर्मन्स स्टाईल नसून एक सोशियल डान्सिंग स्टाईल आहे. म्हणजे या नृत्यप्रकारांमधून होणारी रसनिर्मिती त्याला रंगमंचावर बघण्यापेक्षाही प्रत्यक्षात एखाद्या सोशल नाईटमध्ये बघताना जास्त परिणामकारक ठरते.
दुसरं कारण म्हणजे त्यातला सोपेपणा आणि त्यातली सहजता. कथ्थकसारख्या शास्त्रीय नृत्यशैलीपेक्षा किंवा Hip-Hop सारख्या भरपूर उडय़ा आणि अवघड नृत्यप्रदर्शन असलेल्या शैलींसमोर सालसाला ठेवल्यास त्यातली सहजता सोपेपणा भावतो. कोणत्याही वयाची अट नसलेल्या काही शैलींपैकी ही एक आहे. सालसामध्ये Given-&-take म्हणजे Lead  ची एक्शन आणि follow ची रिएक्शन आहे. त्यामुळे आपसूकच एक उत्स्फूर्तता या शैलीला लाभलीए.
आता माझ्या सालसा क्लासची वेळ झाली आहे. मी या लेखाचा दुसरा भाग नंतर लिहीन. अजून बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या आहेत. अनेक गैरसमजूती आहेत त्यावर प्रकाश पाडायचा आहे. भेटूच.
सालसा बद्दलच्या/ गैरसमजूती
१) सालसा अवघड आहे! मी आधी इ’’८६ िशिकून घेते!!
२) सालसा शिकण्यासाठी स्र्ं१३ल्ली१ हवाच!!
३) सालसा स्पेन या राष्ट्रातून येणारे नृत्य आहे. ना?
४) सालसा गोव्याचे नृत्य आहे!!
५) सालसा फक्त तरुण वर्ग शिकू शकतात!!
६) ‘सालसा’ हे अतिशय उथळ आणि चावट नृत्य आहे!!
७) ‘सालसा’ नृत्य हे खूप अवघड आहे, आणि त्यासाठी शरीराची लवचिकता लागते!!
याविषयी वाचूया पुढच्या लेखात..
नकुल घाणेकर –viva.loksatta@gmail.com