मी २३ वर्षांची असून माझी उंची ४.९ फूट आहे. माझा रंग जरा सावळा आहे. कधी कधी मला खूप प्रश्न पडतो. काय घालावं आणि काय घालू नये याविषयी.. मला काय शोभून दिसेल? – शीतल, पुणे
प्रिय शीतल,
जगभरातल्या सगळ्या स्त्रियांना पडणारा कॉमन प्रश्न आहे – काय घालू? काय छान दिसेल? बऱ्याचदा असं होतं की, असा विचार करूनही आपण नेमकं नको ते घालतो आणि मग वाईट दिसत नसेल ना.. असे नकारात्मक विचार मनात येतात. त्यामुळे मग आत्मविश्वास आणखी डळमळतो. सर्वप्रथम एक गोष्ट करायला हवी – स्वत:बद्दल कॉन्फिडन्स हवा आणि मनात सकारात्मक विचार हवेत. मग तुम्ही अक्षरश: कुठल्याही प्रकारचे कपडे छान कॅरी करू शकता. काहीही घालू शकता.
आता तू दिलेल्या वर्णनाकडे वळू. तू तुझ्या उंचीचा विशेष उल्लेख केला आहेस. तुझी उंची अ‍ॅव्हरेज हाईटपेक्षा कमी आहे. त्यामुळे उंचीचा भ्रम निर्माण करू शकतील, असे कपडे तुझ्या कपाटात असले पाहिजेत. उभ्या लाइन्स असणारे किंवा व्हर्टिकल प्रिंट्स असलेले कपडे तुझ्याकरता हवेत. योकलाइन असलेले कपडेसुद्धा तुझी उंची अधिक असल्याचा आभास निर्माण करतील. थेट दोन भाग दर्शवणारे कपडे शक्यतो टाळ. कारण त्यामुळे उंची कमी दिसते. तिरक्या लाइन्स असणारे किंवा प्रिंट्स असणारे, कट्स असणारे ड्रेसही तुला चालतील. शक्यतो बंद गळ्याचे, कॉलरचे ड्रेस वापरू नकोस, त्याऐवजी मोकळ्या गळ्याचे वापर. लांब बाह्य़ांचे ड्रेसही तुला विशेष चांगले दिसणार नाहीत. बेसिक हाफ स्लीव्हज किंवा मेगा स्लिव्हज वापर. तू कंफर्टेबल असशील तर स्लीव्हलेस वापरायला हरकत नाही. जीन्स वापरत असशील तर निमुळत्या होत जाणाऱ्या जीन्स वापर. त्यात तू जरा उंच दिसशील. सलवार-कुर्ता वापरत असशील तर शॉर्ट कुर्ता आणि लेगिंग्ज घाल. लाँग कुडते तुझी उंची कमी असल्याचे दाखवतील. साडी नेसणार असशील तर बारीक काठाची साडी नेस. जाड किंवा मोठय़ा काठाच्या साडय़ा कमी उंचीच्या मुलींना चांगल्या दिसत नाहीत. पायात हिल्स घातल्यास तर उंची कमी असल्याचे जाणवणार नाही. रंग कोणता चांगला दिसेल असा प्रश्न असेल तर न्यूट्रल कलर्स म्हणजे – काळा, कॉफी ब्राऊन, बेज, क्रीम, रॉयल ब्लू, ऑलिव्ह, डीप ब्लू, इंग्लिश ग्रीन, रोझ पिंक, पीच, एमरेल्ड ग्रीन, फिका सोनेरी, लाल आणि असे अनेक रंग तुला शोभून दिसतील.
तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com