कोमल आचरेकर

आज जे आपल्याला मिळालं आहे, ज्याचा आनंद आपण आज घेतोय ते उद्यासुद्धा आपल्याकडे राहील किंवा उद्याही आपण त्याचा तितकाच आनंद घेऊ  असं नाही आहे. आपल्याला कायमच एक भीती असते आपल्याजवळ जे आहे ते गमावण्याची आणि ते गमावल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो तो म्हणजे हू मूव्ह्ड माय..

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला बदलांना सामोरं जावं लागत असतं. काही वेळा ठरवून तर काही वेळा अनपेक्षितपणे बदल आपल्यासमोर उभे ठाकतात. सो ज्या वेळी तुम्हाला वाटेल की आपल्याला जे हवंय ते मिळत नाही आहे, प्रयत्न करूनही यश हाती लागत नाही आहे, हातातलं काहीतरी गमावलंय त्या वेळी आपल्याला दिशा देण्याचं काम करणारं केवळ एक पुस्तक नाही तर व्यवस्थापनाचं शास्त्र छोटय़ाशा गोष्टीतून उलगडून सांगणारं मार्गदर्शक म्हणजे डॉ. स्पेन्सर जॉन्सन यांचं ‘हू मूव्ह्ड माय चीज?’ हे पुस्तक. स्पेन्सर जॉन्सन यांनी मॅनेजमेंटबाबत आजवर अनेक बेस्टसेलर पुस्तकं वाचकांना दिली आहेत. पुस्तकांच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या या पुस्तकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही करण्यात आला आहे. गुंतागुंतीच्या विषयांची अगदी सहज, सोप्या पद्धतीने उकल करणारी अशी त्यांच्या पुस्तकाची मांडणी असते. विशेष म्हणजे १९९८ मध्ये लिहिलेलं ‘हू मूव्ह्ड माय चीज?’ हे पुस्तक आजही काळाशी सुसंगत ठरतं आणि आजही तितक्याच ताकदीनं तुमचं हरवलेलं चीज शोधायला मदत करतं. आणि म्हणूनच जीवनातील कोणत्याही बदलांना प्रतिसाद देताना परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग हे पुस्तक दाखवतं.

हे पुस्तक तीन भागांत विभागलं गेलंय. पहिल्या भागात शाळेतील जुन्या मित्रमैत्रीणींची रियुनियन असते. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या बदलांविषयी त्यांच्या गप्पा होतात. मित्रांबद्दल मांडलेली गृहीतकं किंवा वरकरणी बांधलेले अंदाज आणि काही वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या बदलांवर या रियुनियनमध्ये चर्चा होते. आणि त्यातूनच या विषयावर आधारित एक गोष्ट त्यांच्यातील एक मित्र सांगू लागतो. तिथे पुस्तकाचा दुसरा भाग सुरू होतो.

हा दुसरा भाग म्हणजे या पुस्तकाचा गाभा आहे. ज्यात एक साधी-सोपी बोधकथा सांगितली आहे. एका भूलभुलैयात राहणाऱ्या चार पात्रांची ही गोष्ट आहे. यात स्किफ आणि स्करी नावाचे दोन उंदीर आहेत आणि माणसांसारखीच दिसणारी, वागणारी पण उंदरांच्याच आकाराची हेम आणि हॉ नावाची दोन छोटी माणसं आहेत. मात्र ही पात्रं वय, लिंग, जातपात अशा कोणत्याच भेदात अडकत नाहीत. आपल्यामध्ये, आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांमध्ये दिसणारी, कधी सोपी तर कधी गुंतागुतीची वाटणारी अशी ही पात्रं आहेत.

या पुस्तकात चीज हे रूपक म्हणून वापरण्यात आलंय. आपल्या आयुष्यात हव्या असणाऱ्या चांगल्या नोकरीचं, चांगल्या रिलेशनशिपचं, पैसा, गाडी, बंगला, आरोग्य किंवा अगदी मन:शांतीचं. तर भूलभुलैया म्हणजे आपल्याला जे हवंय, जे शोधत असतो ती जागा, सुरक्षित अशी आपली जागा. मग ते आपलं घर, कुटुंब, आपण काम करतो ती संस्था किंवा मग आपण वावरतो तो समाज याचं ते रूपक आहे.

स्किफ, स्करी, हेम आणि हॉ हे चीजच्या शोधात भूलभुलैयात वावरत असतात. मात्र स्थिरस्थावर झाल्यावर त्यांच्यासमोर जेव्हा पेचप्रसंग उभा राहतो, त्यांना अनपेक्षित बदलांना सामोरं जावं लागतं, त्या वेळी त्या पेचप्रसंगाला ते चौघेजण कसे सामोरे जातात याची ही गोष्ट आहे. त्यांच्यातला एकजण या पेचप्रसंगाला तोंड देतो, आणि या अनुभवातून तो जे शिकला ते भूलभुलैयाच्या भिंतीवर लिहितो. ‘नव्या दिशेने वाटचाल केली की चीज शोधण्यास मदत होते’, ‘चीजशिवाय राहण्यापेक्षा ते शोधण्यात जास्त सुज्ञपणा आहे’, अशा आशयाच्या ओळी आपल्याला त्याच्या हस्तलिखितातून वाचायला मिळतात. जेव्हा आपण त्याने लिहिलेली भिंतीवरील हस्तलिखितं वाचतो तेव्हा बदलांना कसं तोंड द्यायचं हे आपल्याला थोडक्यात सांगण्यात आलंय.  जेणेकरून त्या तात्पर्यातून आपल्या कामातला आणि एकंदरच जीवनातला ताण कमी करण्याचा आणि त्यातून यशाचा मार्ग कसा शोधता येईल हे सांगण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे.

यानंतर पुस्तकाचा तिसरा भाग येतो, ज्यात ही गोष्ट ऐकल्यानंतर मित्रांमध्ये पुन्हा चर्चा होते. या गोष्टीतील तात्पर्याची चर्चा आणि या गोष्टीचा आपण आयुष्यात कसा वापर करू शकतो यावर ते चर्चा करतात. पुस्तक वाचताना दुसऱ्या भागानंतर आपल्याला त्यातून काय घ्यायचं आहे, गोष्टीतला मथितार्थ नेमका काय आहे ते उमगलेलं असतं. पण ही तिसऱ्या भागातली चर्चा आपल्या विचारांना चालना देणारी ठरते. त्यातून आपण काय बदल करावेत, परिस्थितीला कसं तोंड द्यावं हे लक्षात आलेलं असतं.

पण या पुस्तकाबाबत एक सांगायचं म्हणजे दरवेळी जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो तेव्हा काहीतरी नवीन, फायद्याचा, सकारात्मक दृष्टिकोन देणारा मुद्दा सापडतोच. आणि हा मुद्दा गवसल्यानंतर बदल हाताळण्याची एक नवी ऊर्जा मिळते. एक नवा मार्ग सापडतो किंवा ती शोधण्यासाठी योग्य दिशा आपण धुंडाळायला लागतो.

शेवटी कसं आहे.. आयुष्य म्हणजे सरळमार्गी रस्ता नाही, ज्यावरून आपल्याला मोकळेपणाने न थांबता चालता येईल, तर ते गल्लीबोळ्यांचा एक भूलभुलैया आहे. आणि इथे आपला मार्ग आपल्याला शोधावा लागतो. बऱ्याचदा आपण अडखळतो, भरकटतो, भांबावतो आणि काही वेळा थांबतो. पण आपण जर विश्वासाने चालत राहिलो, तर आपल्याला एक दिवस नक्की तो मार्ग सापडेल. कदाचित हा मार्ग आपल्याला हवा तो नसेल, पण आपल्या भल्यासाठी असेल हे नक्की. आणि असा मार्ग शोधायला लावणारं आणि आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर साथ देणारं, तुमचं हरवलेलं चीज स्वत:लाच शोधायला मदत करणारं असं हे एक प्रभावी पुस्तक आहे यात शंका नाही.

viva@expressindia.com