हिवाळ्यासारखा श्रीमंत ऋतू साद घालतो निरोगी आणि नितळ वर्णाला, उत्तम रेखलेल्या डोळ्यांना आणि बोल्ड ओठांना. गुलाबी रंगाची छटा असलेले ओठ, साठच्या दशकाप्रमाणे रेखलेले डोळे आणि उत्तम आकार दिलेल्या भुवया हे या हिवाळ्यातल्या मेकअपमधले काही ट्रेण्डस् आहेत. हॉलीवूड तसेच बॉलीवूडच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या रूपगर्वतिांमध्ये हाच मेकअप ट्रेण्ड दिसून येतो. यामागची संकल्पना काय तर.. कमीत कमी मेकअप आणि त्वचा नितळ राखणे.
यंदाच्या हिवाळ्यामध्ये क्रीम बेस्ड किंवा मिनरल मेकअप उत्पादने वापरावीत. त्यामुळे तुमच्या एकंदरीत लुकला झळाळी मिळेल. पावडर बेस्ड फाऊंडेशन वापरणे टाळावे कारण त्यामुळे तुमची त्वचा अतिशय कोरडी किंवा निस्तेज दिसेल. गेल्या वर्षी हिवाळ्यात दविबदूसारखा ओलावा असलेल्या त्वचेचा बोलबाला होता पण यंदाच्या हिवाळ्यात चच्रेत आहे चंद्राच्या मंद प्रकाशाप्रमाणे झळाळी असलेली मखमली त्वचा.
पातळ काळ्या आयलायनरपासून ठसठशीत कॅट आयलायनर्सपर्यंत, यंदाच्या मोसमात चर्चा आहे ती ठळकपणे अधोरेखित करण्याला. गडदपणे रेखलेल्या काळ्याशार लायनर्सचा वापर केलेल्या डोळ्यांपासून लाइट स्मज्ड डोळ्यांपर्यंतचा हा ट्रेण्ड यंदाचा हिवाळा गाजवणार आणि तो अधिक नाटय़मय बनवणार यात शंकाच नाही. गडद, स्मज्ड आणि स्मोकी डोळ्यांचा ट्रेण्ड परत येतोय, ज्यात मेटॅलिक आणि चकचकीत आयशेड्सचा वापर करण्यात आला आहे.
डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या कडांना काजळाने रेखा आणि डोळ्यांना सोनेरी, ब्राँझ, मेटॅलिक शिमर्स लावा. मेटॅलिक इंडिगो पिगमेण्टचाही वापर करता येतो शिवाय डोळ्याच्या बाहेरच्या कडांना गडद तपकिरी किंवा काळा आयश्ॉडो वापरून डोळ्यांना स्मोकी इफेक्ट देता येईल. मेटॅलिक टोन्स आवडत नसल्यास त्या वापरू नका. यंदाच्या मोसमात डोळ्यांच्या मेकअपमध्ये मेटॅलिकव्यतिरिक्त जांभळा आणि तजेलदार निळा हे दोन रंग चलतीत आहेत. डोळ्यांसाठी ही रंगसंगती साधल्यास ओठांना बेरी कलर किंवा गुलाबी रंगांच्या उजळ छटाही वापरता येतील. या लुकला पूर्णत्व येण्यासाठी भरपूर मस्काराही लावावा.
ओठांसाठी मॅट रंगांऐवजी यंदा रेड वाइन रंगांच्या छटा आणि गुलाबी सेमी-स्टेण्ड छटांचा बोलबाला आहे. सर्वप्रथम लिप कलरच्या रंगाच्या लिप लायनरने ओठांना योग्य आकार द्यावा. ओठांच्या मेकअपला अधिक उठाव द्यायचा असल्यास चेहऱ्याला कमीतकमी मेकअप करावा. ओठांना हे रंग लावणार असाल तर ग्लॉस किंवा शाइनचा अजिबात वापर करू नका. मूळ लिप कलरलाच झळकण्याचे काम करू द्या. ज्यांना ओठांसाठी लाल रंग आवडत नाही ते डार्क मजेण्टा कलर वापरू शकतील. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात उजळ रंगांच्या विविध पर्यायांची सद्दी असेल हे उघड आहे.

क्विक टिप्स
* चेहऱ्याला कमीतकमी मेकअप करणार असाल तर ओठांना गडद बेरी लिप कलर लावावा आणि न्यूड पर्ल आय श्ॉडो लावावी. हा लुक पूर्ण करण्यासाठी हलकासा मस्कारा लावावा, गालांना थोडा उठाव द्यावा आणि आयलायनरची पातळ रेघ किंवा तेही नसल्यास चालेल.
* डोळ्यांच्या आतल्या कडांना काजळ आणि ओठांना आवडता गुलाबी लिप कलर हे कॉम्बिनेशनही करता येईल. ओठांना हलका रंग लावल्यास तेही चालेल.
* गारठत्या थंडीसाठी आणखी एक लुक परफेक्ट ठरेल- काळ्या मांजरीप्रमाणे (कॅट आईज) डोळे रेखून त्यांची बाहेरची टोके आणखी पुढे आणणे ज्यात भरपूर गडद आयलायनर वापरले असेल, ओठांना हलकासा रंग आणि गालांना हलका ब्राँझ रंग.
* हिवाळ्यातल्या कोरडय़ा वाऱ्यांमध्ये केस बांधलेलेच बरे. पण ते फॅशनेबल दिसण्यासाठी कल्पकतेने गुंफता येतील किंवा वेगवेगळ्या आकारांचे बन बांधता येतील. फिशटेल वेणी, वेव्ही केस, कर्ल्स, साइड पोनी टेल्स, बाजूचे भांग, साइड विस्पी बँग्ज असे विविध प्रयोग केसांवर करून पाहता येतील.
सौजन्य –  आकृती कोचर (ओरिफ्लेम इंडिया)