X

व्हिवा वॉल : महिला दिन

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.

मार्च महिना उगवता उगवताच जागतिक महिला दिनाचे वारे वाहू लागतात नि समस्त स्त्री-पुरुष या संदर्भातली आपापली मतं मांडू लागतात. नेहमीच्या प्रथेप्रमाणं ठिकठिकाणी होणारे कार्यक्रम, कर्तृत्ववान महिलांचे आदर-सत्कार, मनोरंजनपर कार्यक्रम, नाटक-सिनेमांचे पासेस वाटप, सहलींचं आयोजन, विविध प्रकारचे सेल लागणं या सगळ्या गोष्टी घडतात. त्यात आता निवडणुकांच्या मतलई वाऱ्यांची भर पडल्यानं महिला कार्यकर्त्यांचे मेळावे, वस्तू वाटप, तुफानी भाषणबाजी, चार-दोन कायदे-विधेयकांचे प्रस्ताव आणि आश्वासनांची खैरात यांचीही भर पडणार आहे.

केवळ एक दिवस म्हणून या संकल्पनेला महत्त्व द्यायचं की त्यामागच्या जाणिवांचा, विचारांचा अंगीकार करायचा.. त्या स्वीकारायच्या.. की बरोब्बर त्याउलट वागून ते विचार पायदळी तुडवून चुरगळून टाकायचे.. स्त्री-पुरुष एकमेकांना पूरक असावे, या विचाराचा सगळ्यांना विसर पडलेला दिसतोय. त्यामुळं केवळ स्त्रीचं स्थानच नव्हे तर स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ पाहतोय. झपाटय़ानं बदलणाऱ्या सामाजिक, आíथक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीनुसार स्त्रियांचे प्रश्नही बदलताहेत. अत्याधुनिक तंत्रक्रांतीचा दुहेरी उपयोग केला जातोय. आज स्त्रियांचे प्रश्न केवळ हुंडाबळी, अत्याचार, छेडछाड एवढय़ाचपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. या सगळ्याच प्रश्नांशी दोन हात करायची वेळ आली आहे.. त्यासाठी स्त्रीनं स्वत:ला बदलावं.. स्वत:सोबत पुरुषाला बदलण्याची जबाबदारीही तिलाच पार पाडावी लागणार आहे. आपलं ‘माणूसपण’ जपण्याची तारेवरची कसरत तिला करावी लागणार आहे. संघटितपणे केलेले हे प्रयत्न यशस्वी झाल्यास तर मग कदाचित ‘महिला दिन’ साजरा करायची गरजच भासणार नाही. तोपर्यंत ‘जागतिक महिला दिना’च्या शुभेच्छा.

उद्याच्या जागतिक महिला दिनानिमित्त काहीजणांनी आपली मतं ‘व्हिवा’शी शेअर केली आहेत. त्यातील फक्त मुलांची प्रातिनिधिक मतं संकलित करून मुद्दाम देत आहोत.

अमेय मराठे

जागतिक महिला दिन हा नव्यानं रूढ झालेल्या ‘दिन’ संस्कृतीचा एक भाग आहे. असे ‘दिन’ साजरे करताना त्याचा एकंदरीत समाजावर कसा आणि किती परिणाम साधला जातो हे महत्त्वाचं. महिला दिनाचे कार्यक्रम हे केवळ उत्सवी आणि दिखावेबाज असण्यापेक्षा त्यातून महिलांमध्ये ‘स्त्रीत्वाच्या’ सुप्त शक्तींचं पुनरुत्थान झालं पहिजे. असं घडलं तर महिला जास्त सुरक्षित आणि सन्मानानं समाजात वावरतील आणि समाजही महिलांचा आदर करू लागेल.

अक्षय गव्हाणे

एका बाजूला स्त्रियांवर होणारे वाढते अत्याचार आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या बरोबरीनं कदाचित थोडा पुढंच जाणारा स्त्रीवर्ग अशा दुहेरी परिस्थितीत आपण राहतोय. मुळात स्त्रियांच्या सक्षमीकरणाला सलाम करून या वाढत्या अत्याचारांना विरोध करण्यासाठी या दिवसाचा उपयोग व्हायला हवा. आज जरी मोठय़ा प्रमाणात या दिवसाचं कमíशलायझेशन झालं असलं तरीसुद्धा यामागची मूळ भावना नक्कीच कायम आहे नि ती म्हणजे स्त्रियांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची.

संकेत पवार

महिलांच्या विविध प्रश्नांविषयी समाजात जागृती घडवणं नि महिलांच्या कार्यकर्तृत्वाची गाथा मांडण्यासाठी ‘जागतिक महिला दिना’हून चांगलं व्यासपीठ नाही. पण याची व्याप्ती केवळ शहरी भागापुरतीच मर्यादित राहता कामा नये. शक्य होईल तेवढं गावपातळी आणि अतिदुर्गम भागांत पोहोचून तिथल्या जगण्यासाठी झगडणाऱ्या स्त्रियांचं सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे. त्यामुळं त्या ठिकाणच्या स्त्रीभ्रूण हत्या, बलात्कार, हुंडाबळी या आणि इतर अनेक समस्यांना वाचा फुटेल. त्याविरोधात आवाज उठवायला हवा. त्यामुळं केवळ तेथील स्त्रियांच्या सक्षमीकरणासच बळकटी येईल असं नव्हे, तर या स्त्रियांना शिक्षण, आरोग्य आदी मूलभूत गोष्टींचं महत्त्व समजून उमजून त्यांच्याही जीवनात प्रकाश येईल.

ओमकार वैद्य

फक्तएक दिवस महिला दिनाचं सेलिब्रेशन करून काय होणार आहे? स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि त्यांची छळवणूक, छेडछाड या गोष्टी बंद व्हायला हव्यात. तसे झाल्यास स्त्रिया सुरक्षितपणे जगू शकतील नि तोच खरा महिला दिन असेल.

अमित उनवणे

८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून पूर्ण जगभर साजरा करण्यात येतो, याचा मला अभिमान आहे. आज महिला सर्व क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीनं काम करताहेत. पण काही नराधम पुरुष त्यांच्यावर अत्याचार करतात. त्यांना कमी लेखतात. मुलगा-मुलगी भेदभाव करतात. विवाहितांना हुंडय़ासाठी छळतात. हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे. त्यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई झाली पाहिजे. स्त्रियांना संरक्षण देणं ही प्रत्येक पुरुषाची जबाबदारी आहे. आपण महिलांना आदर दिला पाहिजे, असं मनापासून वाटतं. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा.

अतुल वैद्य

आजची भोवतालची परिस्थिती लक्षात घेता स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कडक कायदा झाला पाहिजे. अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली तर त्या दबावाखाली किंवा घाबरून तरी माणसं नीट वागतील. प्रेमानं समजावून सांगण्याच्या पलीकडं गोष्टी गेल्या असल्यानं त्यांना शिक्षा झाल्यावर दयेचा अर्ज वगरे करू देऊ नये. स्त्रियांबद्दलची आपल्याकडची मानसिकता लक्षात घेण्यासाठी खोलवर जाऊन विचार करायला हवा. मुलीच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्याला पेलेल का, तिला हुंडा देता येईल का, या नि अशा गोष्टींचा विचार लोक करत असतील नि त्यातून स्त्रीभ्रूण हत्या घडत असतील. याविषयी तातडीनं पावलं उचलली गेल्यास ही मानसिकता बदलू शकेल. केवळ या दिवसापुरता स्त्रियांचा उदोउदो करून, तेवढय़ापुरती भाषणं ठोकण्याचा उपयोग नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन ठोसपणं काही पावलं उचलायला हवीत.

  • Tags: viva-wall, women, women-day, youth,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain