‘हासरा-नाचरा, जरासा लाजरा, सुंदर साजिरा, श्रावण आला..’ हा श्रावण म्हणजे नेमकं काय? श्रावणाचं वर्णन तरी कसं करावं? कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या शब्दांत सांगायचं झालं, तर ‘समुद्र बिलोरी ऐना.. सृष्टीला पाचवा महिना..’ असं ज्याचं वर्णन केलंय तो ‘श्रावण’.. ‘पाचवा’ या शब्दाचे अर्थही अनेक. ‘श्रावण’ हा बारा महिन्यांतला पाचवा महिना. त्यानं अवघी सृष्टी पाचूसारखी हिरवी करून टाकलेली.. वगरे वगरे. सर्जनशील मनाला मोहवणारा, श्रवणीय गोष्टी सांगणारा, धार्मिक गोष्टींनी युक्त असणारा, खादाडांना हवेसे वाटणारे उपास करायला लावणारा, व्हेज-नॉनव्हेजवाल्यांच्या चर्चाना खमंग रसद पुरवणारा तो श्रावण.. असंख्य निसर्गप्रेमींना पुन:पुन्हा खुणावणारा, आपल्या हिरव्या श्रीमंतीनं सगळ्यांचे डोळे निववणारा, पर्यावरणस्नेहाचं मोल अधोरेखित करणारा तो श्रावण.. ‘श्रावण’ शब्दाला लगटून येणारे सारे कंगोरे शब्दांच्या चिमटीत पकडणं केवळ अशक्यच.. कारण तो आहे, ‘ऋतू हिरवा.. ऋतू बरवा..’ श्रावणाविषयी आपल्या मनीचं गूज काही जणींनी ‘व्हिवा’शी शेअर केलंय.    

योजना नकर
श्रावण म्हणजे निसर्गाचं दान. भटकंती करायची ती निसर्गानं भरूभरून दिलेलं लेणं न्याहाळण्यासाठी. मला टिपिकल ठिकाणांपेक्षा अनवट ठिकाणी जाऊन तिथला निसर्ग मनात साठवावासा वाटतो. दरवेळी बाहेर जाणं नाहीच जमलं, तर खुद्द मुंबईतही काही जुनी देवळंरावळं, निवांत ठिकाणं आहेतच. निसर्गानुसार आपल्या सणांचा विचार केला गेलाय. अगदी तेवढंच नाही तरी श्रावणातले उपास नि नित्यर्कम आम्ही जमेल तितकी पाळण्याचा प्रयत्न करतो. कारण सध्याच्या बिझी शेडय़ुलमुळे प्रत्येक वेळी ते शक्य होतंच असं नाही. पण या सणवारांपेक्षाही श्रावण म्हटलं की डोळ्यांसमोर उमटतो तो हिरवाईनं नटलेला निसर्ग. या निसर्गानं माझ्या कलावंत मनाला साद न घातली तरच नवल. मग फिरस्ती करताना मी त्याला कधी कॅमेऱ्यात टिपते, कधी स्केचमध्ये रेखाटते, कधी ट्रेकिंग किंवा ट्रेल करीत त्याच्या संगतीत मनमुराद भटकते. सोबतीला असते श्रावणातली रिमझिम..  

Loksatta vyaktivedh Roberto Cavalli Italian fashion design Stretch denim British designer
व्यक्तिवेध: रॉबेर्तो कावाली
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!

धनश्री भागवत-दीक्षित
मुळातच लाडक्या असणाऱ्या श्रावणाचा आनंद-उत्साह द्विगुणित झाला तो लग्नानंतरच्या श्रावणातल्याच व्रतवैकल्यांनी. सोमवारी वाहिलेली शिवामूठ, मनोभावे पुजलेली मंगळागौर आदींचं महत्त्व वेळोवेळी कळलं. मी फारसे उपास करीत नाही. कारण त्यानं फारसं काही साध्य होत नाही. त्यापेक्षा प्रमाणात खाणं केव्हाही चांगलंच. श्रावणातले सणवार नि प्रथा-परंपरा आपल्या पूर्वजांनी काही विचारांती ठरवल्यात. मात्र सध्याच्या काळात ते तसेच्या तसेच फॉलो करणं शक्य होणार नाही. मात्र जुनं ते सगळंच टाकून न देता नव्या-जुन्याचा मध्य साधून ते जपणं योग्य ठरतं. कधी वृक्षारोपण करून तर कधी ‘हॅप्पी थॉट्स’सारख्या विविध सामाजिक संस्थांना मदतीचा हात देऊन. श्रावणातल्या निसर्गसौंदर्याचा कुटुंबीयांसोबत मन:पूर्वक आस्वाद घेताना वाटतं की, ‘आला श्रावण श्रावण, होई मनही स्वच्छंद, सर्वाच्या मनी दरवळे, प्रेमाचा सुगंध.’

स्वाती कर्वे
मराठी महिन्यातला श्रावण हा माझा आवडता महिना. तो पावसाळ्यात येतो नि श्रावणसरी अनुभवताना सगळी टेन्शन्स दूर पळतात. मला मंगळागौरीच्या पूजेची आरास पाहायला नि सगळे खेळ खेळून रात्र जागवायला फार आवडतं. आणखी एक आवडणारी गोष्ट म्हणजे उपास नि कांदा-लसूण न खाणं. माझ्या घरात हा संपूर्ण महिना कांदा-लसूण खात नाहीत. दर सोमवारी धान्यफराळ असतो नि त्यामुळे उपास केला जातो. रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही सगळे भाऊ-बहिणी वेळात वेळ काढून कोणतीही सबब न सांगता एकत्र जमतो. या ना त्या कारणानं श्रावण महिना सगळ्यांचाच आवडता ठरतो. त्यात मी गायिका असल्यानं श्रावणातल्या पावसासोबत सतत रियाज करीत बसावासा वाटतो. मग आपसूकच ओळी आठवू लागतात, ‘श्रावणमासी हर्ष मानसी..’

प्रज्ञा माने
श्रावण नि श्रवण या शब्दांची मला नेहमी गंमत वाटते. ‘ऐकणं’ नि ‘श्रवण’ करणं यात फरक आहे. ‘श्रवण’ करण्यात एक मानसिक, भावनिक, वैचारिक जाणीव असते, ती फक्त ‘ऐकण्या’त नसते. म्हणून निसर्ग काय सांगतोय, ते ‘श्रवण’ करण्यासाठीचा सुयोग्य काळ म्हणजे श्रावणमास. निसर्ग म्हणजे केवळ पाऊस, वारा, वृक्ष, डोंगर नव्हे तर आपण स्वत:ही. अनेक गोष्टी ज्या स्वत:च स्वत:ला सांगितलेल्या नसतात त्या व्यक्त करण्यासाठी असतो श्रावण. श्रावण सेलिब्रेट करण्याचा हा माझा फंडा. मी कलाकार नि ट्रेकर असल्यानं सतत काहीतरी नवीन उमगतं नि नवीन काही शोधण्याचा, थ्रील अनुभवण्याचा विचार मी करते नि ‘श्रावणमासी हर्ष मानसी..’ ही ओळ दरवर्षी नव्यानं पटते. श्रावणातले सणवार नि त्यानिमित्तानं केले जाणारे पदार्थ या महिन्याची मजा वाढवतात. श्रावण ही एक साद आहे निसर्गानं माणसाला घातलेली नि माणसानं सेलिब्रेट करावी अशी!

समृद्धी रुमडे
श्रावण म्हटलं की आठवतो तो रुपारेलचा कॅम्पस. ती हिरवळ.. तो रिमझिमणारा पाऊस नि पाण्यातून वाट काढत लेक्चर्सना चाललेल्या आम्ही मत्रिणी.. श्रावणात मी उपास वगरे करीत नसले तरी घरातले श्रावण पाळतात. गोडाधोडाचे सुग्रास पदार्थ केले जातात. आमच्याकडे साग्रसंगीत नागपंचमीची पूजा केली जाते. रक्षाबंधनाला तर मज्जाच मज्जा. दादालोकांना लुटायची नामी संधी कोण सोडणार? दहीहंडीचा माहोलही छान एन्जॉय करता येतो. गोकुळाष्टमीच्या दिवशी आमच्या संस्कृतच्या बाईंकडे आम्ही सगळे विद्यार्थी जमतो. रात्रभर श्लोकांचं वाचन, कीर्तन, जागरण होतं. तेव्हा कृष्णाचा पाळणा तसंच मूर्ती नि घर सजवताना खूपच मस्त वाटतं. एका वर्षी आमच्याकडे आलेल्या परदेशी पाहुणीला आम्ही दहीहंडी दाखवत होतो. आपली संस्कृती तिच्यापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आमच्यावर होती. टिपिकल नाही नि मॉडर्नही नाही असा दोन्हींची सरमिसळ असणारा असा छान असतो श्रावण!

सुमन पाल
सर्व देवांमध्ये श्रेष्ठ मानल्या गेलेल्या भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी जणू श्रावण महिना आहे. म्हणूनच प्रत्येक श्रावणी सोमवारी आमच्याकडे उपास केला जातो. गेली दोन र्वष मीही हा उपास करते आहे. गोडधोड खाऊन हा उपास सोडला जातो. आमच्या घरी शंकराची पूजाअर्चा केली जाते. वेळ असेल तसं शंकराच्या देवळात दर्शनालाही आम्ही जातो. श्रावणातल्या सणांपकी रक्षाबंधनाचं सेलिब्रेशन आम्ही सगळी भावंडं एकत्र जमून करतो. श्रावणातल्या ऊन-पावसाचा खेळ नि ती हिरवाई अनुभवण्याच्या निमित्तानं मी ट्रेकिंगलाही जाते. त्या डोंगरदऱ्या न्याहाळताना मन रमून जातं. मग मी माझी आवडती जुनी गाणी गुणगुणायला लागते. ‘सावन का महिना, पवन करें सोर..’ हे सगळ्यात आवडतं गाणं मनात अलगदपणं रुंजी घालतं..
हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.