vn14एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. कॉलेज प्रेझेंटेशनमध्ये, इंटरव्ह्य़ूमध्ये किंवा हायफाय पार्टीमध्ये इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

भारतीय स्वयंपाकघर जसजसं आधुनिक होऊ लागलं, तसतसं अधिकाधिक यंत्रांचा वापर करू लागलं. अनेक इंग्रजी नावांनी स्वयंपाकघरात प्रवेश केला. शीतकपाट, धुलाईयंत्र यांची इंग्रजी नावंच आपल्या मुखी रुळली. या सर्व यंत्रांच्या जोडीने आजच्या स्त्री वर्गाचा अगदी खास दोस्त झाला तो ‘अवन’. कुठलाही आकार, उकार, जोडाक्षर मी विसरले नाहीय. ‘अवन’ हाच या यंत्राचा अचूक उच्चार आहे.
अगदी टीव्ही शोपासून ते पाककृतीच्या पुस्तकापर्यंत ज्याचा ओवन किंवा ओव्हन असा उच्चार आपण ऐकत आलो आहोत तो ब्रिटिश आणि अमेरिकन या दोन्ही इंग्रजीत अगदी शंभर टक्के उच्चारला जातो ‘अवन’ म्हणूनच.
आपले पुण्यातील वाचक रत्नाकर ओक यांनी या शब्दाच्या उच्चाराबाबत आपल्याला लिहून कळवलं होतं. शब्दांच्या उच्चाराबाबतीत दोन शक्यता नेहमी संभवतात. एक आपल्याला उच्चार माहीतच नसतो किंवा माहीत असून तो आपण इतरांचे अनुकरण करत बिनदिक्कत चुकीचा उच्चारतो. अवनच्या बाबतीत काय होतं? तर मुळात हे यंत्रच गेल्या काही वर्षांत आपल्या स्वयंपाकघरात प्रवेशलं आहे. आधुनिक स्वयंपाकघरात अवन हवाच. रुखवताच्या भांडय़ांत अवनने मान मिळवून घरादाराला आधुनिक केलं. त्याचं स्वयंपाकघरातलं स्थान आता बळकट झालंय. अगदी फ्रिजइतकं नाही, पण तरी त्याचं महत्त्व बरंच वाढलंय. मात्र त्या जोडीने त्याच्या नेमक्या उच्चाराकडे कुणी लक्ष दिलं नाही. कुठल्याही पाककृतीच्या पुस्तकात, खाण्याशी निगडित लेखात ‘अवन’ असा उच्चार वाचल्याचं आठवतं का हो? बहुतांश वेळा नाहीच. खरं पाहता, अवन हा ६५०० र्वष जुना प्रकार आहे. पदार्थ गरम करणे, बेकिंग किंवा वाळवणे या करता अवन्सचा वापर नवा नाही. पूर्वीच्या अवन्सबद्दल बोलायचं तर घरामागे खड्डा खणलेला असायचा. एखाद्या पदार्थाला छान बेक किंवा रोस्ट करायचं असेल तर तो पानात गुंडाळून त्या खड्डय़ात ठेवला जाई आणि त्यावर मग निखारे ठेवले जात. काळाप्रमाणे मातीच्या अवन्सनी लाकडी, धातूचे, कोळशाचे, गॅसचे, इलेक्ट्रिक आणि आता मायक्रोवेव्ह अशी प्रगती केली; पण विशेष म्हणजे याचा फॉर्म इतका बदलत आला तरी नाव मात्र तेच राहिलं- अवन. आपल्या भारतात ही अवनची परंपरा तितकीच जुनी आहे, मात्र त्याचे अवन हे नामकरण झालं नव्हतं. नंतर अत्याधुनिक यंत्ररूपी अवनची क्रांती झाली. आपल्या देशातही या अवन्सचा वापर वाढला आणि उल्लेखही. सध्या अगदी बेसिक स्वरूपाचे अवन्स साध्या सँडविचवाल्याकडेसुद्धा आढळतात. फक्त भारतीयांसाठी ते असतात ओवन किंवा अगदी ओव्हन. व चा व्ह का आणि कसा झाला असेल बुवा? विचार करून थकले, पण उत्तर नाही मिळाले.
अवनच्या या सगळ्या प्रवासाचा मागोवा घेताना या यंत्राशी निगडित एक वाक्प्रचार आढळला. आपल्या मराठीत स्वयंपाकघराशी निगडित कित्ती तरी म्हणी आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘ताकाला जाऊन भांडं लपवणं’, तसाच इंग्रजी भाषेतील वाक्प्रचार म्हणजे to have something in oven. अर्थ स्त्रीचं गर्भार राहणं असा आहे. मला गंमत वाटली ती अशी की, स्वयंपाकघराशी निगडित गोष्ट जुनी असो वा नवी, तिचा म्हणीत किंवा वाक्प्रचारात उपयोग व्हायला वेळ लागत नाही, मग ती भारतीय चूल असो वा पाश्चिमात्यांकडून आलेला अवन.
रश्मी वारंग -viva.loksatta@gmail.com