16 October 2019

News Flash

वसुंधरेचे शिलेदार

२२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून ओळखला जातो.

|| मितेश जोशी

२२ एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून ओळखला जातो. आपल्या मातीचा अभ्यास करणारे, पृथ्वीवर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पर्यावरणीय समस्यांचा माग घेत, संतुलित वसुंधरेसाठी कार्यरत असलेले अनेक तरुण शिलेदार आपल्या आजूबाजूला आहेत. यानिमित्ताने त्यांच्याशी बोलून ते करत असलेले अभ्यास-संशोधन कार्य समजून घेण्याचा हा प्रयत्न..

१९७० पासून २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून जगभरातील १९३ देशांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक देशामध्ये काही वार्षिक कार्यक्रम, चर्चासत्रं आयोजित केली जातात. महाराष्ट्रात दुष्काळाची समस्या वर्षांनुवर्षे अधिक बिकट होत चालली आहे. संपूर्ण जगभरात पिण्याच्या पाण्याची समस्या वाढते आहे. गेल्या काही वर्षांत, पाण्याचा अभाव आणि दुष्काळ यामुळे मराठवाडय़ासारख्या काही भागांत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग निवडला. म्हणूनच पीएचडीचा अभ्यास करताना वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून समाजामधील ही परिस्थिती बदलण्यात खारीचा वाटा उचलण्याच्या ध्येयाने पुण्यातल्या स्नेहा कुलकर्णीने याच समस्यांना तिच्या संशोधनाचा विषय बनवले आहे.

दुष्काळाची कारणे, मानवी हस्तक्षेपांमुळे वाढणारी दुष्काळाची तीव्रता, शाश्वत विकासासाठी अमलात आणण्याजोगी दुष्काळ निवारण उपाययोजना या आणि अशा अनेक मुद्दय़ांवर ती सध्या काम करते आहे. स.प. महाविद्यालयातून भूगोल विषयात पदवी आणि नंतर पुणे विद्यापीठातून याच विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या स्नेहाने नेदरलँड सरकारच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती मिळवून नेदरलँडमध्ये ‘जिओ-इन्फॉर्मेटिक्स’ या भूगोल विषयातील एका वेगळ्या शाखेचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती आयआयटी-पवई, मुंबई येथे ‘मराठवाडा दुष्काळ’ या विषयात आपले पीएचडीचे संशोधन करते आहे. स्नेहा सांगते की, आवड म्हणून पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना पाणी, दुष्काळ या जागतिक पातळीवरच्या समस्यांशी तिची ओळख झाली. नंतर ‘प्रोजेक्ट मेघदूत’ या गटासोबत काम करताना माण, मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधताना या प्रश्नांची तीव्रता अधिक जाणवायला लागली; पण नुसतंच दु:ख व्यक्त करत तिला थांबायचं नव्हतं, म्हणून याच विषयाला वैज्ञानिक उत्तरं शोधायचं तिने ठरवलं. भूगोल विषयासारखी वेगळी वाट निवडत, जागतिक स्तरावरच्या दुष्काळ आणि हवामानबदलाच्या समस्या निवारण्यासाठी स्नेहा प्रयत्नशील आहे. यापुढेही अशाच पर्यावरणीय आणि सामाजिक प्रश्नांना विज्ञानाची जोड देत संशोधनात योगदान देण्याचा तिचा मानस आहे.

पुण्यातील डॉ. श्रीकांत गबाले हा तरुण भौगोलिक माहिती प्रणाली मार्फत भूक्षेत्रीय आणि सांख्यिकी माहितीचे विश्लेषण करून संशोधन व नियोजनाकरिता काम करतोय. या क्षेत्रात श्रीकांत २०११ पासून कार्यरत असून ‘जीआयएस’चा उपयोग क रत ‘शहरीकरणामुळे शहरातील भूशास्त्रीय बदल व भौगोलिक घटकांवरील परिणाम’ या विषयावर त्याने पीएच.डी. केली आहे. सुरुवातीला महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘यशदा’ येथे काही वर्षे त्याने काम केले, त्यानंतर महेश पाठक यांच्याबरोबर ‘युनिटी जीओस्पेशल एलएलपी’ ही कंपनी त्याने सुरू केली. या कंपनीअंतर्गत देशभरात स्मार्ट सिटी, फ्लीट मॅनेजमेंट, भूशास्त्रीय अभ्यास, जलव्यवस्थापन, नगररचना नियोजन, पर्यावरणावर होणारा परिणाम, पीक व्यवस्थापन, सिंचन व्यवस्था या आणि अशा अनेक घटकांवर त्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने ड्रोनद्वारे प्रतिमा घेऊन भौगोलिक बाबींचे विश्लेषण व नकाशे बनविण्यावर भर असतो, याचे प्रशिक्षण इस्रोच्या ठएरअउ येथून श्रीकांतने घेतले आहे. ‘जाणीव या युवा संस्थेमार्फ त मी पर्यावरणाकरिता कार्यरत असतो. भविष्यात मला जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे ए.आय. व मशीन लर्निगचा वापर करून पर्यावरण आणि मनुष्य यांच्यावर येणाऱ्या आपत्तीचे व्यवस्थापन करणाऱ्या तंत्रज्ञानाची निर्मिती करायची आहे,’ असे डॉ. श्रीकांत सांगतो.

आपल्या देशात बारा महिन्यांपैकी केवळ चार महिने पाऊस पडतो. या चार महिन्यांत आपण जर हे पावसाचे पाणी नीट साठवू शकलो, तर बाकीचे महिने आपण त्या पाण्याचा वापर योग्यपणे करू शकतो; परंतु आपल्याकडचा पाऊसदेखील लहरी आहे. कधी खूप पाऊस, तर कधी अपेक्षेपेक्षा फार कमी पाऊस पडतो; परंतु ‘सर्व देव नमस्कारं केशवम प्रतिगच्छति’ या न्यायाने जमिनीवरील पाणी शेवटी भूगर्भात जातं. भूगर्भातील पाणी हा एक कुतूहलाचा आणि तेवढाच गूढ विषय आहे. अशाच भू-गर्भीय जलशास्त्र या विषयात मुंबईची अपूर्वा मेहता ही तरुणी सध्या संशोधन करून पीएच.डी. पूर्ण करते आहे. अपूर्वा म्हणते, ‘भूगर्भातील पाणी म्हणजे आपल्याला कायम उपलब्ध असलेला साठा आहे. या पाण्याची पातळी आणि गुणवत्ता कायम राहावी यासाठी सर्वानी प्रयत्न करायला हवेत. समुद्रातील पाणी जेव्हा भूगर्भात जातं तेव्हा ते पाणी खारट होतं. त्याचं प्रमाण जास्त झाल्यास ते पिण्यायोग्य राहत नाही. समुद्रातील पाण्याजवळ राहणारे लोक तेथील जवळपासच्या विहिरीतील पाणी कायम पीत राहिले तर त्याचे दूरगामी परिणाम ना केवळ त्यांच्यावर परंतु पुढच्या पिढय़ांवरसुद्धा होतात.’ हे समुद्राचं पाणी भूगर्भात शिरूच नये यासाठी उपाययोजना करणे, शिरल्यास ते पिण्यायोग्य करण्यासाठी त्याची ट्रीटमेंट करणे, भविष्यातील धोका ओळखून ते पाणी किती वर्षांनी सभोवतालच्या विहिरींमध्ये जाईल याचा अंदाज बांधणे या सगळ्याचा अभ्यास सध्या अपूर्वा करते आहे. त्यासाठी गणितीय पद्धतीने सगळ्या शक्यता पडताळून पाहून भूगर्भातील खारट पाण्याची पातळी तपासणे आणि त्याच्याविषयी भविष्य व्यक्त करणे किंवा अंदाज लावणे हा तिच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश आहे.

सूर्यावर विविध संशोधन करणारे तरुण अधिक आहेत, पण पुण्याची डॉ. सरगम मुळे ही तरुणी सगळ्यांपेक्षा आपला वेगळा ठसा उमटवताना दिसते आहे. इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठात तिने नुकताच आपला सूर्यविषयक प्रबंध सादर केला. या प्रबंधात अल्ट्राव्हॉयलेट आणि एक्स रे लहरींद्वारे सूर्यावरील जेट या ज्वालांचा अभ्यास सरगमने केला. यात नासा आणि जपानमधील उपग्रहांचा उपयोग करून सूर्याच्या वातावरणातील विविध थरांचे आणि तेथील तापमानाचे सखोल निरीक्षण करण्यात आले आहे. डोळ्याला न दिसणाऱ्या सूर्याच्या पृष्ठभागाखालील थरातील चुंबकीय क्षेत्रात बदल झाल्याने पृष्ठभागावर सौरडाग निर्माण होतो. या सौरडागांमुळे सौर ज्वाळा (सोलार फ्लेअर) जेट निर्माण होतात. ‘जेट’ या ज्वाळा ‘आयफेल टॉवर’सारख्या दिसतात. सूर्याच्या वातावरणातील प्रत्येक थरात त्याचे तापमान वेगवेगळे असते. सूर्याच्या बाहेरील करोनामध्ये जेटचे तापमान १० लाख डिग्री केल्विनपर्यंत जाऊ शकते. तसेच जेटमधून येणारे एनर्जेटिकल पार्टिकल्स जास्त वेगात पृथ्वीपर्यंत येऊ शकतात, याची निरीक्षणे रेडिओ लहरींद्वारे घेऊन सरगमने अभ्यासली. सध्या सरगम पुण्यातील ‘आयुका’ या संशोधन केंद्रात तिचे सूर्यावरील पुढील संशोधन करते आहे. उपग्रहातून मिळालेल्या माहितीवरून आणि संगणकाद्वारे सिम्युलेशन्स करून सूर्याच्या वातावरणाचा सखोल अभ्यास करण्याचा तिचा मानस आहे. सरगम म्हणते, ‘आपल्या ग्रंथात लिहिलेल्या स्तोत्रांचा शास्त्रीयदृष्टय़ा खूप मोठा व्यापक अर्थ आहे. प्रत्येक श्लोकातील प्रत्येक शब्दाचा जर सखोल अभ्यास केला तर शास्त्र कळते. वैद्य गणेश शिंदे यांच्या सहकार्याने महाभारत, ब्रह्मपुराण आणि वराहपुराण या ग्रंथांचा अभ्यास करून सूर्याविषयक अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सूर्यअष्टक, सूर्यस्तुती अशा प्रकारच्या स्तोत्रांचा उपग्रहाद्वारे केलेल्या निरीक्षणांशी कसा संबंध आहे हे जाणून घेण्याची माझी इच्छा आहे.’ तिच्या अभ्यासाचा विषय अधिक समजावून देण्यासाठी तिने सूर्यअष्टकातील श्लोकाचे उदाहरण दिले.

‘‘सप्ताश्वरथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजम
लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहम्।’’

या ओळींचा अर्थ असा होतो की, सूर्य देवता एका रथावर आरूढ झालेली आहे. हा रथ लोखंडाचा बनलेला असून सात घोडे त्याचे वाहन करीत आहेत. याचा अर्थ मॉडर्न सायन्सप्रमाणे असा लावता येईल, ज्याप्रमाणे सूर्यकिरणांचे इंद्रधनुष्याच्या सात रंगांत विभाजन होते त्याचप्रमाणे ही सात अश्वं आहेत. तसेच उपग्रहांनुसार मिळालेल्या माहितीनुसार सूर्याच्या पृष्ठभागावर आणि वातावरणात लोखंडाचे (लोह घटक- आयरन एलिमेंट) प्रमाण आढळले आहे. अशा प्रकारे उपग्रहांच्या निरीक्षणातून आणि ग्रंथातील माहितीवरून सूर्याच्या ‘करोना’ या थराचे तापमान १० लाख डिग्री केलविनपर्यंत कसे पोहोचले यावरही संशोधन करण्याचा मानस सरगमने व्यक्त केला.

शेती क्षेत्रात आता अर्बन अ‍ॅग्रिकल्चर किंवा गार्डन क्षेत्रात व्हर्टिकल गार्डन असे शब्द ऐकू येऊ लागले आहेत. मातीविरहित शेती असेही त्यास म्हणता येईल. पारंपरिक शेतीत जितके पाणी वापरले जाते त्याच्या फक्त ५ ते १० टक्के पाणी या व्हर्टिकल गार्डनसाठी वापरले जाते. आपल्याला ठिबक सिंचनाची जुजबी माहिती असतेच. ठिबक सिंचनाची निर्मिती इस्रायलने आपल्या वाळवंटात शेती फुलवण्यासाठी काही दशकांपूर्वी यशस्वीपणे करून शेती क्षेत्रात मोठीच क्रांती केली होती. आजही शेतीचा हा इस्रायल पॅटर्न जागतिक स्तरावर आदर्श म्हणून समजला जातो. पाणीवापराच्या बाबतीत हाच पॅटर्न आणखी गणितीय मॉडेल्सच्या आधाराने पुढे नेण्याचा प्रयत्न उभ्या शेतीत केला जातो आहे आणि याच क्षेत्रात दिव्येश देव या तरुणाने स्टार्टअप सुरू केले आहे. दिव्येश या अर्बन अ‍ॅग्रिकल्चरविषयी सांगतो, ‘विशेषत: जिथे जागा कमी असते तिथे या नवीन तंत्राचा चांगला उपयोग होतो. त्यातून उत्पादन तर घेता येतेच, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या शेतीविषयक ज्ञानात चांगलीच भर टाकता येते. नवीन पिढीच्या मनातदेखील त्यामुळे जिज्ञासा निर्माण होते, त्याची परिणती समाजात शेतकी प्रवृत्ती रुजविण्यासाठी आणि वृद्धीसाठी होईल. मुंबईत आजकाल ताज्या भाज्या मिळणे अतिशय कठीण झाले आहे.’ अशा परिस्थितीत अर्बन अ‍ॅग्रिकल्चर हा उत्तम पर्याय असल्याचे तो म्हणतो.

गावागावांत जी शेतं आपल्याला पाहायला मिळतात त्यांना आडवी किंवा सपाट जमिन लागते. लांबी, रुंदी आणि खोली अशा त्याच्या तीन बाजू असतात. व्हर्टिकल गार्डनमध्ये लांबी, रुंदी आणि उंची अशा तीन बाजू असणार आहेत. एकावर एक जसे आपण इमारतींचे मजले बांधतो तसाच काहीसा हा व्हर्टिकल गार्डनचा प्रकार आहे. जिथे बाल्कनी, गॅलरी किंवा अंगण उपलब्ध आहे आणि जर थोडा वेळ ऊन येत असेल तरी आपल्याला व्हर्टिकल शेती करता येईल. घराची दिशा जर पूर्व-पश्चिम असेल तर त्याचा चांगला उपयोग आपल्याला या व्हर्टिकल गार्डनसाठी करता येईल. हे गार्डन सुरुवातीला करताना नेमकी त्यात कोणती झाडे लावावीत यावर दिव्येश म्हणतो, ‘सुरुवातीला फुलझाडे आणि भाज्या तुम्ही लावू शकता. पालक, मेथी, लाल माठ, शेपू, चुका यांसारख्या पालेभाज्या, कोथिंबीर, मिरची, आलं, पुदिना यांसारख्या हिरव्या मसाल्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आणि वांगी, भेंडीसारख्या फळभाज्या आपण व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून घरी वाढवू शकतो. शहरी भागात सध्या या गार्डनचे प्रमाण वाढते आहे.’ दुबई, सिडनी, सिंगापूर, तैपई, बोगोटा या शहरांमधील ‘व्हर्टिकल गार्डन’ची मोहिनी भारतीयांवर मोठय़ा प्रमाणत पडली आहेत. व्हर्टिकल गार्डन घरी करण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यात घरातील तापमान बाहेरील तापमानाच्या प्रमाणात सुमारे ३ डिग्री कमी असते. घरातील हवेत गारवा राहतो. आजकाल तरुणाई वैविध्य शोधू पाहत आहे. अशांसाठी व्हर्टिकल गार्डन ही संकल्पना पूर्णपणे नवीन आणि चांगली आहे. तुम्ही तुमच्या घरातील पडदे म्हणजेच व्हर्टिकल गार्डन असं समीकरण करू शकता, असं दिव्येश म्हणतो.
अपूर्वा, सरगम, दिव्येश, स्नेहा, डॉ. श्रीकांत असे वसुंधरेचे आजचे अनेक तरुण शिलेदार पृथ्वीवर नवचैतन्याची निर्मिती करू पाहत आहेत, तर काही वसुंधरेतील गुढतेचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा या शिलेदारांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ‘व्हिवा’ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.

First Published on April 19, 2019 12:10 am

Web Title: world earth day 2019