30 May 2020

News Flash

वसुधैव कुटुम्बकम्

आधी उल्लेख केल्याप्रमाणे आजच्या तरुणांची एक्स्टेंडेड फॅमिली असते.

वैष्णवी वैद्य

आजचा दिवस हा ‘जागतिक कुटुंब दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय परंपरेत कुटुंबसंस्थेला खूप महत्त्व आहे. मुळात ही कुटुंबवत्सल संस्कृती आहे.  विभक्त कुटुंब पद्धतीचा वेगाने प्रसार होत असतानाही आपल्याकडे अजून एकत्र कुटुंब पद्धतच नांदताना दिसते आहे. यात भर पडली आहे ती ‘विस्तारित कुटुंब’ किंवा ‘एक्स्टेंटेंड फॅमिली’ची. भारतात रक्ताच्या नात्यांना जितके महत्त्व आहे तितकेच भावनिक नात्यांनाही. हे विस्तारित कुटुंब म्हणजेच आपले जिवलग मित्र—मैत्रिणी, स्नेही.. ज्यांचा खरंतर आपल्याशी परस्पर संबंध नाही, पण तरीही परिवारातलाच एक भाग असल्यासारखे  हे जिवलग.. सध्या संयमाची परीक्षा पाहणाऱ्या या काळात आपल्या परिवारात, आपल्या माणसांत असणं खूप दिलासादायक आहे. एरवी आपल्या रुटीनमध्ये व्यस्त असणाऱ्या तरुणाईला या परिस्थितीत योगायोगानेच कुटुंबीयांबरोबर वेळ घालवता येतो आहे.

हा टाळेबंदीचा काळ तरुणाईसाठी बहुविधप्रकारे ‘अनुभव’ आहे. जे अगदी वर्कोहोलिक आहेत त्यांना हा शिक्षेसारखा तर ज्यांना स्वत:मध्येच रमायला आवडतं त्यांच्यासाठी पर्वणी आहे. पण सध्या लॉकडाऊनने ‘वर्क फ्रॉम होम’सोबतच ‘वर्क फॉर होम’चासुद्धा ट्रेण्ड आणला असं म्हणायला काहीच हरकत नाही. पदरी पडलेल्या सुट्टीत तरुणाई अगदी आवडीने, मागे पडलेल्या, रखडलेल्या, शिकायचे राहून गेलेल्या घरकामांमध्ये रमताना दिसते. घरात राहून कंटाळा आल्यावर पद्धतशीर वेळ जाणारी जागा म्हणजे ‘स्वयंपाकघर’. रोज व्हॉट्सअ‍ॅप, इ्न्स्टाग्राम आणि फेसबुक स्टोरीजवर चमचमीत पदार्थाचा आपल्याला पूर आलेला दिसतो. या निमित्ताने बॅचलर मुलं—मुली स्वयंपाक शिकताना दिसत आहेत. अनेक तरुण मुलं-मुली आता आपली जेवण बनवायची आवड जोपासत आहेत. घरातली साफसफाई हा नेहमीच एक यक्षप्रश्न असतो. हे कामसुद्धा तरुणाई अगदी आवडीने करते आहे. या निमित्ताने जुने फोटो अल्बम काढून जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि तेवढय़ापुरते का होईना मन प्रसन्न होते असे काही तरुणांचे म्हणणे आहे.

स्वयंपाकासोबतच नव्याने समोर आलेली गोष्ट म्हणजे ‘व्हर्चुअल फॅमिली गेट टुगेदर्स’. सगळ्यांनाच ही बंधनकारक सुट्टी पाळावी लागतेय, मात्र कोणी कोणाला भेटू शकत नाही. म्हणून गुगल डय़ुओ, स्काइप, झूम, हँगआउट्स, व्हॉट्सअ‍ॅप अशा सोशल माध्यमातून फॅमिली व्हिडीओ कॉल्स होताना दिसत आहेत.  डोंबिवलीचा अविनाश देशपांडे सांगतो, ‘सध्या टाळेबंदीमुळे सगळेच घरात आहेत. आम्ही गंमत म्हणून वेगवेगळ्या स्पर्धाचं आयोजन व्हॉट्सअ‍ॅपच्या फॅमिली ग्रुपवर करत असतो. खाद्यस्पर्धेचं आयोजन केलं होतं तेव्हा प्रत्येकाने आपल्या पदार्थाचे फोटो नेमून दिलेल्या परीक्षकाला पाठवायचे. विजेत्यांसाठी आम्ही कुटुंबातील काही जणांनी डिजिटल प्रशस्तीपत्र तयार केलं होतं व आमच्या आजोबांकडून विजेत्यांना गुगल पेवरून कॅश प्राइजसुद्धा दिलं. आता पुन्हा आम्ही गायन स्पर्धेचं आयोजन करणार आहेत ज्यामध्ये आपल्या गाण्याचा ऑडिओ पाठवायचा आहे. तसेच सगळ्यांना जमू शकेल त्या दिवशी व त्या वेळेत आम्ही एकत्र व्हिडीओ कॉल्ससुद्धा करतो’.

पुण्याचा स्वराज सातार्डेकर सांगतो, ‘या मे महिन्यात आमच्याकडे सेलिब्रेशनचे बरेच निमित्त होते. बाबांचा ५०वा आणि आजोबांचा ७५वा वाढदिवस, आई-बाबांचा २५ वा लग्नाचा वाढदिवस. या जंगी सेलिब्रेशनसाठी आम्ही एक मोठा समारंभ ठेवला होता, पण लॉकडाऊनमुळे तो रद्द करावा लागला. तरीही आम्ही व्हर्चुअल सेलिब्रेशन घडवून आणलं, बाबांना त्यांच्या वाढदिवशी आम्ही सरप्राइज म्हणून त्यांच्या मित्रांनी पाठवलेले व्हिडीओज दाखवले. संपूर्ण परिवाराने व्हिडीओ कॉल करून पाच सवाशिणींनी त्यांना ओवाळले. हे केल्यामुळे कार्यक्रम रद्द झाल्याचा जो हिरमोड झालेला तो कमी झाला कारण थोडा वेळ का होईना आम्ही सगळे एकमेकांना त्या दिवशी भेटलो आणि मजा केली’.

सांस्कृतिक क्षेत्रातील अग्रणी समजली जाणारी ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्था असं सांगते की, आमच्या सहा केंद्रांवरील कार्यकर्ते ही आमची एक्स्टेंडेड फॅमिलीच आहे. गेली ४६ वर्षे शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिरात अक्षय्य तृतीयेला साजरा होणारा वर्धापन दिन आम्ही या वर्षी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकत्र जमून साजरा केला.

करोनाशी लढाई हे प्राधान्य आहेच. पण तरीही नेहमीची दिनचर्या बंद होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. त्याने थोडय़ाफार प्रमाणात मानसिक अस्वस्थता येऊ लागली आहे. या नकारात्मक वातावरणात कुठलेही नियम न मोडता रोजचे दिवस आनंदात कसे घालवता येतील हे महत्त्वाचे आहे. आजची तरुणाई या सोशल माध्यमांचा आणि अंगी असलेल्या कलांचा सुयोग्य वापर करून प्रत्येक दिवस हा कुटुंब दिवस म्हणूनच साजरा करते आहे.

मार्चपासून सुरू असणाऱ्या या टाळेबंदीवर अनेक तरुण गंमतीत असंही सांगतात, ‘शाळेनंतर इतक्या वर्षांनी पुन्हा घरच्यांसोबत अनुभवलेली ही उन्हाळ्याची सुट्टीच आहे.’

आधी उल्लेख केल्याप्रमाणे आजच्या तरुणांची एक्स्टेंडेड फॅमिली असते. कॉलेज, शाळा, क्लासमधले मित्र—मैत्रिणी, ऑफिसचे कलिग्स, इतर स्नेही हे आपल्याला घरच्यांसारखेच असतात. या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस किंवा काही निमित्त असेल तर ते सेलिब्रेशनसुद्धा व्हर्चुअली केले जाते आहे. प्रत्येकजण एके क अक्षराची, शब्दाची पाटी घेऊन फोटो काढतात आणि त्या सगळ्या फोटोजचं कोलाज करून शुभेच्छा दिल्या जातात.

या सगळ्या गोष्टींचं तात्पर्य एकच ते म्हणजे एकमेकांपर्यंत पोहोचता न येऊनही कनेक्टेड राहणे. घडय़ाळ्याच्या काटय़ाप्रमाणे चालणारे हे जग आज पूर्णपणे थांबले आहे. वातावरणातला बदल म्हणून वाटणाऱ्या सुट्टीची आता सवय करावी लागणार हे निराशाजनक आहे. यामध्ये भर पाडणारे करोनाचे सावट परिस्थितीमध्ये नकारात्मकता आणते आहे. पण ही संधी म्हणून पाहता असा वेळ आपल्या कुटुंबासोबत आपल्याला नेहमी मिळत नाही असं म्हणत तरुणाई कुटुंबात रमली आहे.

करोनामुळे जणू संपूर्ण देश एक कुटुंबच बनला आहे. या देशातला प्रत्येक नागरिक आज एक जबाबदार सदस्य आहे. या लढाईत स्वत:चा जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडणारेसुद्धा आपलेच कुणीतरी आहेत. हे संयमाचे सगळे दिवस कुटुंब दिवसच आहेत असं समजून आपण जागरूक झालं पाहिजे. खरं कुटुंब तेच असतं जे अडचणींच्या काळातही घराच्या भिंती डगमगू देत नाही, एकमेकांची साथ सोडत नाही. या वर्षीचा कुटुंब दिन आपल्या वैयक्तिक आणि या जागतिक कुटुंबासह जबाबदारीने साजरा करूया.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 4:01 am

Web Title: world family day extended family divided family zws 70
Next Stories
1 सदा सर्वदा स्टार्टअप : स्टार्टअपचे मूल्यांकन
2 अन्नदानातील ‘आनंद’
3 फ फिटनेसचा..
Just Now!
X