||  सौरभ करंदीकर

‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मते (वर्ल्ड  हेल्थ ऑर्गनायझेशन) ७० डेसिबलपर्यंतच्या आवाजाने मानवाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ८ तास सतत ८५ डेसिबलहून अधिक आवाज कानावर पडत राहिला तर मात्र तो धोकादायक मानला जातो. आपलं घर हमरस्त्याजवळ असेल तर त्यामुळे आपण या धोक्याच्या कक्षेत येतो. सातत्याने ८५ डेसिबल आवाज ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण आहे असं म्हणता येतं.

Index Sensex falls to 73 thousand level print eco news
नफावसुलीमुळे ‘सेन्सेक्स’ ३५२ अंश माघारी
Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
Forest Recruitment marathi news
वनखात्यातील वनरक्षक भरतीप्रक्रिया; शारीरिक चाचणीत अव्यवस्थेचा आरोप
jayant chaudhary
दहा दिवसांनंतरही रखडतोय RLD चा NDA प्रवेश; भाजपाच्या मनात नेमके काय?

लहानपणी अभ्यासाकडे माझं पूर्ण लक्ष लागलेलं नाही, असं वडीलधाऱ्यांना वाटलं की ‘शरकाराची गोष्ट’ (माहिती असूनसुद्धा कंपल्सरी) ऐकायला लागायची. शरकाराची म्हणजे बाण तयार करणाऱ्या कारागिराची. एका राजाच्या दरबारामध्ये एके दिवशी एका शरकाराला मुसक्या बांधून आणलं जातं. नगररक्षक राजाला म्हणतो, ‘महाराज, परवाच आपण युद्धावरून परत आलात. राजधानीत शिरल्यावर आपल्या विजयाबद्दल मोठी मिरवणूक काढण्यात आली. ती मिरवणूक या शरकाराच्या घरावरून जात असताना याने बाहेर येऊन आपला जयजयकार करणं सोडा, साधी मान उचलून वर बघण्याचीदेखील तसदी घेतली नाही. त्याच्या या अपराधाबद्दल त्याला राजद्रोहाची कठोर शिक्षा करण्यात यावी, महाराज’. ‘काय रे शरकारा?’ राजाने विचारलं, ‘आमच्या विजयोत्सवात तू सहभागी का झाला नाहीस?’ यावर तो शरकार थरथर कापत म्हणाला. ‘क -कसली मिरवणूक महाराज? माझ्या घरावरून अशी कुठलीच मिरवणूक गेल्याचं मला आठवत नाही. मला काहीच ऐकू आलं नाही, मी फक्त माझं काम करत राहिलो’. उभा दरबार आश्चार्यचकित झाला ! ही हिम्मत या सामान्य शरकाराची ! आता राजा काय शिक्षा सुनावतो, याकडे सर्वांचं लक्ष होतं. स्मितहास्य करत राजा म्हणाला, ‘सोडा या शरकाराला. इतकंच नाही तर त्याचा शाही सत्कार करा, त्याला सोन्यानाण्यांनी मढवा आणि त्याला सन्मानाने त्याच्या घरी पोहोचवा’. दरबार स्तब्ध झाला. नगररक्षक काही बोलणार, इतक्यात राजाने त्याला थांबवलं ‘हे पहा, हा शरकार आपल्या सैन्यासाठी बाण तयार करतो. त्याच्या कामात तो इतका एकाग्र असतो की त्याला आसपासचे कुठलेही आवाज ऐकायला येत नाहीत ! असा कारागीर मिळणं आपल्या राज्यासाठी भाग्याचं आहे!’ तात्पर्य: प्रचंड गोंधळात देखील आपलं लक्ष विचलित होऊ देता कामा नये.

हे सगळं ‘ऐकायला’ ठीक आहे, परंतु आपल्या कानांवर आज जे आघात होतात त्यातून मार्ग काढत एकाग्र होण्याची अपेक्षा करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. ‘डेसिबल’ हे आवाजाचं एकक आहे. निसर्गातील काही आवाज, पानांचं सळसळणं, पक्ष्यांची किलबिल इत्यादी २० ते ३० डेसिबल असतात. घरातले सामान्य आवाज ४० डेसिबलपर्यंत जातात. घड्याळाचा गजर, व्हॅक्युम क्लीनर हेअर ड्रायरसारख्या उपकरणांचा आवाज हा ७० ते ९० डेसिबल असतो (जोरजोरात भांडण्याचादेखील). रस्त्यावरचं ट्रॅफिक, रस्ते दुरुस्तीमध्ये वापरण्यात येणारं ड्रिल, सायलेन्सर नसलेल्या मोटरसायकली यांचा आवाज १०० डेसिबलपर्यंत जातो. मिरवणुका, प्रार्थनास्थळावरील आणि उत्सवाच्या मंडपातील लाऊडस्पीकर १०० डेसिबलच्या वर पोहोचतात. काही फटाके, विजा, बंदुकीच्या गोळीचा आवाज किंवा शंभर फुटावरील सायरनचा आवाज १४० – १५० च्या घरात जातो. अर्थात, आपण या आवाजाच्या उगमस्थानाहून जितके दूर तितकी त्या आवाजाची पातळी कमी होते.

‘जागतिक आरोग्य संघटने’च्या मते (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) ७० डेसिबलपर्यंतच्या आवाजाने मानवाला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ८ तास सतत ८५ डेसिबलहून अधिक आवाज कानावर पडत राहिला, तर मात्र तो धोकादायक मानला जातो. आपलं घर हमरस्त्याजवळ असेल तर त्यामुळे आपण या धोक्याच्या कक्षेत येतो. सातत्याने ८५ डेसिबल आवाज ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण आहे असं म्हणता येतं.

ध्वनिप्रदूषणामुळे आपलं आपल्या कामात आणि अभ्यासात लक्ष लागत नाही. इतकंच नाही तर आपला रक्तदाब वाढतो, झोप कमी होऊ लागते, चिडचिड, डोकेदुखी वाढते, इतकंच नाही तर छोट्या छोट्या गोष्टींचा विसर पडू लागतो असं अनेक सर्वेक्षणांमधून दिसून आलेलं आहे. काही व्यक्तींच्या ऐकण्याची क्षमता ध्वनिप्रदूषणामुळे कमी झालेली पाहायला मिळाली तर अनेकांना कायमस्वरूपी बहिरेपणा आला आहे. लहान मुलांचे कान मोठ्यांपेक्षा अधिक संवेदनाशील असल्यामुळे या वयात हा धोका अधिक संभवतो. रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोग या काही अंशी राहणीमानामुळे जडणाऱ्या व्याधी (लाईफस्टाईल डिसीज) मानल्या जातात. त्यामागे असलेल्या अनेक कारणांमध्ये झोपेचं खालावलेलं प्रमाण वाटेकरी असतं. थोडक्यात, आपल्या अनेक व्याधींच्या मुळाशी ध्वनिप्रदूषण असतं याची आपल्याला पुरेशी जाणीव नाही.

ध्वनिप्रदूषणाचं प्रमाण कमी व्हावं म्हणून आपण सामाजिक तसेच वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करू शकतो. ध्वनी लहरी शोषून घेणाऱ्या मॅट आपल्या वाहनांमध्ये बसवता येतात. घराचं इंटिरियर करताना ध्वनी भिंतींवरून परावर्तित होऊ नये, एका खोलीतून दुसऱ्यात जाऊ नये म्हणून उपाययोजना करता येतात. करोनाकाळामध्ये सर्व कुटुंबीय घरातूनच शिक्षण आणि ऑफिसची कामं करत असल्यामुळे या उपाययोजना आज महत्त्वाच्या ठरल्या आहेत. नॉइज कॅन्सलिंग तंत्रज्ञान काहीसं खर्चीक असलं तरी ते असलेले हेडफोन आणि इअरफोन आजूबाजूचे आवाज ३० डेसिबलच्या खाली आणू शकतात.

भारताच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण संस्थेने २००० साली ध्वनिप्रदूषण विरोधात सुमारे एक हजार ते एक लाख रुपयांचा दंड जाहीर केला आहे, परंतु त्यांच्या नियमावलीचा वापर क्वचितच केला जातो. आपला देश उत्सवप्रिय आणि एकंदरच ध्वनीप्रिय आहे हे मान्य करावं लागेल. आपण आपली भक्ती, आपला आनंद, आपला अभिमान चढ्या आवाजात प्रकट केल्याशिवाय स्वस्थ बसू शकत नाही. परंतु आपण हे वाढतं ध्वनिप्रदूषण गांभीर्याने घेतलं पाहिजे, अन्यथा आपल्या आरोग्यावर, क्रियाशीलतेवर आणि आपल्या भावी पिढ्यांच्या संवेदनक्षमतेवर कायमचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

viva@expressindia.com