|| भक्ती परब

२७ मार्च हा ‘वर्ल्ड थिएटर डे’ म्हणून साजरा केला जातो. तरुणाईच्या दृष्टीने विचार करता महाविद्यालयीन काळातच एकांकिकांमध्ये रमणारी तरुण फळी पिढय़ा दर पिढय़ा घडत असते. आज नाटय़-चित्रपट-मालिका क्षेत्रात स्थिरावलेले अनेक तरुण कलाकार, दिग्दर्शक, लेखक हे अशाच पद्धतीने एकांकिका, प्रायोगिक नाटक करत करत पुढे गेले आहेत. या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने या तरुण नाटय़कर्मीनी नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांचे अनुभव, जगभरातील नाटकांचा प्रवाह आणि आपण तरुणांनी नाटकातून नेमकं काय शोधायला हवं, अशा अनेक मुद्दय़ांवर आपली मतं ‘व्हिवा’कडे व्यक्त केली आहेत..

आता मातीतलं नाटक एक्सप्लोअर करायला हवं   – अद्वैत दादरकर

मी सुरुवात केली तेव्हा फक्त नाटक करायचं डोक्यात होतं. मला हेच आवडतं, हेच जमतं, याच माध्यमातून मी चांगला व्यक्त होऊ  शकतो. त्यामुळे फक्त नाटकच करायचं हा दृष्टिकोन होता. पण हळूहळू जबाबदाऱ्या वाढत जातात, तसा दृष्टिकोन थोडासा बदलतो. नाटकातून जे समाधान मिळतं ते इतर कुठल्याही माध्यमातून मिळत नाही, पण आर्थिक गरज म्हणून इतरही माध्यम एक्स्प्लोअर करत गेलो. नाटकाची जशी गंमत आहे, तशी प्रत्येक माध्यमाची गंमत आहे. त्यातली गंमत कळत गेली आणि माझा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक झाला. फक्त नाटक करत राहिलो असतो, तर अनेक माणसं, त्या माध्यमातल्या शक्यता किंवा त्या माध्यमातलं आपण नाटकात काय आणू शकतो, या कल्पना कधी सुचल्याच नसत्या. पिढीनुसार जसा बदल घडतो तसा रंगभूमीतही बदल व्हायला हवा असं मला वाटतं, आता तंत्रज्ञानाचा वापर नाटकात खूप व्हायला लागलाय. ट्रीटमेंटचा वेगळ्या प्रकारे वापर होतो. सिनेमॅटिक पद्धतीचं सादरीकरण होऊ लागलंय.

माझ्यावर ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव होता, ते मी नेहमी नाटकात आणण्याचा प्रयत्न करत राहिलो. मी सुरुवात केली तेव्हा व्हिज्युअल्सचा खूप प्रभाव होता. त्यामुळे तेव्हा मी माझी नाटकं व्हिज्युअली छान होतील याकडे लक्ष द्यायचो. मॉब मला जास्त आवडायचा. नाटक नेत्रदीपक करण्यावर माझा भर असायचा. चमत्कृती, गिमिक्स नाटकात असायची. हळूहळू गिमिक्स म्हणजे काय कळलं मग नाटकातील खरेपणाकडे प्रवास सुरू झाला. मग काही इंग्लिश नाटकं पाहिली. नॅशनल थिएटर जास्त बघायला मिळालं तेव्हा मला आपल्या देशातल्या नाटक सादर करण्याच्या किती शैली आहेत, हे कळलं. वामन केंद्रेंना असिस्ट केलं तेव्हा स्टाइलाइज नाटक काय हे पहिल्यांदा कळलं. फोक थिएटर आपल्या रंगभूमीत कसं आलं ते कळत गेलं. असे अनेक प्रभाव माझ्यावर होत गेले. आणि जेव्हा मी एका बाजूला व्यावसायिक नाटक करत होतो. त्या वेळेस ब्रॉडवेचंही ‘द फॅ न्टम ऑफ दी ओपेरा’ नाटक जाऊन बघितलं. तेव्हा जाणवलं की हे आपल्याकडे अशक्य आहे. आपल्साकडची थिएटर्स तशी बांधली गेलेली नाहीत. त्यामुळे क्रिएटिव्हली व्हिज्युअल्सचा विचार करू शकता, पण तुम्हाला ते मानवी नेपथ्यातून किंवा मॅन्युअली करता येऊ शकतं. त्यांच्याकडे ऑटोमॅटिक होणाऱ्या गोष्टीपण खूप आहेत, ती थिएटर्स तशी बांधली गेली आहेत. आपल्याकडे दिग्दर्शकांची कल्पनाशक्ती अफाट आहे, पण त्यापद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. तशा पद्धतीचे लाइट्स आपल्याकडे नाहीत. त्यामुळे ब्रॉडवे स्टाइल नाटक आपण करू शकत नाही. पण त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या मातीतलं फोक थिएटर आपण एक्सप्लोअर केलं पाहिजे. फोक थिएटर त्यांना आणता येणार नाही, ते आपल्याकडेच असल्याने आपल्या मातीतलं नाटक एक्सप्लोअर करण्यावर भर दिला पाहिजे.

आजच्या तरुण पिढीकडे जबरदस्त कल्पना आहेत. आजची तरुण पिढी एकांकिका, प्रायोगिक नाटक या सगळ्याकडे वळते पण तेवढय़ा प्रमाणात तरुण प्रेक्षक आपण तयार करू शकलो नाही आहोत. कदाचित त्यांना आवडते विषय नाटकात येत नसतील, पण तरुण प्रेक्षकांनी नाटकाकडे वळायला हवं.

बिनधास्तपणे प्रयोग सादर झाले पाहिजेत – आलोक राजवाडे, अभिनेता-दिग्दर्शक

माझ्या सुदैवाने मला जागर, समन्वय आणि आसक्त या पुण्याच्या नाटय़संस्थांमध्ये काम करायला मिळालं. या तीन संस्थांमध्ये मी शिक्षण घेत असताना नाटक करत होतो. शाळेत असताना जागरबरोबर नाटक करत होतो, त्यानंतर आसक्त आणि समन्वयबरोबर महाविद्यालयात गेल्यावर काम करू लागलो. नाटक करत असताना स्पर्धेपेक्षा नाटकाचं महत्त्व अधिक होतं. नाटकाची गोडी मला संस्थांनी लावली. समन्वयमध्ये शशांक शेंडे, किरण यज्ञोपवीत यांनी, आसक्तमध्ये मोहित टाकळकरसारखा दिग्दर्शक असेल, यांच्यामुळे नाटकाची गोडी लागली. तिन्ही संस्था प्रायोगिक नाटक करणाऱ्या संस्था होत्या आणि नाटकातील प्रयोगमूल्यांना त्यांनी जास्त महत्त्व दिलं. पुढे जाऊन अतुल पेठेंबरोबर मी ‘आषाढातील एक दिवस’ नाटक केलं तेव्हा कळलं की नाटक हे जगण्याशी निगडित आहे. नाटक आणि आपलं यांचं नेमकं नातं काय आहे, ते अतुल पेठेंबरोबर काम करताना समजलं. नाटकांशी जोडले गेल्यावर आपण नेमके कोण आहोत, याचं भान येत जातं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण तेव्हा आपल्याला प्रश्न पडत असतात आणि प्रश्न पडल्याने आपण स्वत:ला ओळखायला लागतो. त्यामुळे माणूस म्हणून जास्त समृद्ध होतो. माझा धर्मकीर्ती नावाचा मित्र आहे. तो आणि मी मिळून असा विचार केला होता की आजच्या काळातले विषय घेऊन नाटक करायचं. समाजकारण, राजकारण आणि तत्त्वज्ञान हे विषयसुद्धा आपल्या जगण्याचे भाग आहेत. ते नाटकात आणत आजच्या काळाच्या वास्तवाशी जवळ जाण्याचा प्रयत्न आम्ही दोघांनी लेखक-दिग्दर्शक म्हणून केला. ‘नाटक कंपनी’ ही संस्था आम्ही सुरू केली तेव्हासुद्धा विचार हाच होता की आपल्याला जे वाटतायेत ते विषय मांडता यायला हवेत. यातून प्रसिद्धी मिळेल हा हेतू नव्हता. विषयाची निवड आणि मांडणी बिनधास्तपणे करत आलो आहोत. ही मला प्रायोगिक नाटक करण्याची स्ट्रेन्थ वाटते. मला वाटतं तरुणांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की नाटक हे चित्रपट किंवा मालिकांमध्ये काम करण्यासाठी पहिली पायरी नाही. नाटक हे स्वतंत्र माध्यम आहे. या माध्यमाचा अभ्यास करणं आवश्यक आहे. हे जिवंत माध्यम आहे.  नाटकात कल्पनाशक्तीला वाव मिळतो. तर या गोष्टी आत्मसात करण्यासाठी नाटकाचा अभ्यास आवश्यक आहे. मला वाटतं मराठी रंगभूमी कायमच सशक्त रंगभूमी आहे.  नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर होणं, आणि नाटक नावाच्या माध्यमाचा रिच वाढवणं या गोष्टी आपण करायला हव्यात. जास्तीतजास्त ठिकाणी प्रयोग होणं आणि नाटकावर चर्चा होणं आवश्यक आहे. कारण अलीकडे चर्चा व्हच्र्युअल होतात. त्या प्रत्यक्ष घडायला हव्यात आणि अधिकाधिक बिनधास्तपणे प्रयोग सादर व्हायला हवेत, असं मला वाटतं.

आवडीने नाटक शिका – मानसी जोशी, अभिनेत्री

मी खूपच क्लीअर होते की मला नाटकात काम करायचं आहे. नाटक सादर करताना पाहून मी गुंग होऊ न जायचे. माझ्यासाठी नाटक म्हणजे मेडिटेशन असायचं. आपणही नाटक करायला पाहिजे. आपल्याला वाटतं तितकं ते सोपं नसतं. माझं सुरुवातीचं नाटक होतं, ‘लग्नकल्लोळ’. ते नाटक परेश मोकाशी दिग्दर्शित करायचा. तो मला सांगायचा की हे वाक्य असं करायचं आहे, तू असं कर, पण मला ते कळायचं नाही. मी खूपच नवीन होते. मग तो सांगायचा तू बाजूला बस. मी दुसऱ्या कलाकाराला सांगितल्यावर तो कसं करतोय ते बघ आणि मग तसं कर. एखाद्या वाक्याचा किती परिणाम होतो हे तेव्हा कळत नव्हतं. पण मी हळूहळू शिकत गेले. ‘जादू तेरी नजर’ हे सुयोगचं नाटक करत होतो. हे नाटक गाऊन आणि नाचून सादर करायचं होतं. मी जास्त संगीत नाटकं केली आहेत. मला या नाटकासाठी मयुर वैद्य यांनी दिलेल्या स्टेप्स खूप हेवी होत्या. तेव्हा सादर करताना धाप लागायची, पण ते सादर करताना मजा यायची. ‘संगीत देवबाभळी’मध्येही मी गाते, पण तो अनुभव वेगळा होता.

मराठी रंगभूमीसारखं मी गुजराती रंगभूमीवरही काम केलं आहे. तिथे बोल्ड विषय स्वीकारले जात नाहीत, तिथे कॉमेडी विषयांना प्राधान्य दिलं जातं. अभिनय करायचा असेल तर नाटकाशिवाय पर्याय नाही. नाटक हा अजरामर प्रकार आहे, विविध अंगानी समृद्ध करणारं असं हे नाटक आहे, त्यामुळे आवडीने नाटकाकडे वळा. रोज नव्या गोष्टी इथे शिकता येतात.

नाटक करून पाहा..- मुक्ता बर्वे, अभिनेत्री

मी नाटकात काम करायचं आहे, हे ठरवूनच नाटकात आले होते. बरेचसे कलाकार शाळा-महाविद्यालयांत नाटक-एकांकिका करत असतात, मग नाटकांकडे वळत असतात. पण मी नाटक शिकायचं म्हणूनच ‘ललित’ संस्थेमध्ये गेले होते. मी फार गांभीर्याने नाटकाकडे पाहात होते. त्यामुळे नाटक मी सातत्याने केलं. गेले एक वर्ष फक्त मी नाटक केलेलं नाही. या नाटकाच्या आवडीमुळेच थिएटर स्टुडंट टू थिएटर प्रोडय़ुसर असा प्रवासही मी केला आहे.

मी ‘फायनल ड्राफ्ट’सारखं नाटक केलं, ‘देहभान’सारखं नाटक केलं. विविध विषयांना प्राधान्य देणारी अशी नाटकं केली. त्यानंतर मला स्वत:ला वाटलं की आपण स्वत: काही विषय मांडायला हवेत, तांत्रिकदृष्टय़ा चांगलं काही मांडायला हवं त्या टप्प्यावर मी निर्माता झाले.

नाटक ही सिरिअस आणि रेअर आर्ट आहे. आपण खूप नशीबवान आहोत, की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची नाटकं होतात. व्यावसायिक, प्रायोगिक अशा अनेक प्रकारच्या परंपरा असलेलं मराठी थिएटर आहे. रंगभूमी हा आपला पाया आहे. सतीश आळेकर, विजया मेहता, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड, वामन केंद्रे, विजय केंकरे यांच्यासारख्या मोठय़ा व्यक्तिमत्त्वांना जवळून बघता-भेटता आलं. शेवटी तुम्ही काय शिकता हे तुमच्यावर अवलंबून असतं. ही वेगळी आर्ट आहे, पण नाटक करून बघा. नाटकामुळे तुम्ही माणूस म्हणून घडता. त्यादृष्टीने नव्या पिढीने पाहावं, नवे प्रयोग करून पहावे, वेगळी नाटकं बघावीत.

कुठल्याही क्रेझसाठी नाटकात येऊ  नका – ऋतुजा बागवे, अभिनेत्री

एकपात्री स्पर्धा, एकांकिका स्पर्धा अशा स्पर्धामधून माझी सुरुवात झाली. तो स्पर्धाचा काळ माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा काळ होता. त्यानंतर मी प्रायोगिक नाटकांकडे वळले. तिथे मला जबाबदारीची जाणीव झाली. त्यानंतर मी व्यावसायिक नाटकांकडे वळले. ‘गोची प्रेमाची’, ‘गिरगाव व्हाया दादर’ आणि त्यानंतर ‘अनन्या’ अशा व्यावसासिक नाटकांत मी काम केलं. यावेळी मला जाणवलं की नाटकात काम करताना स्पर्धा आहे. त्यासाठी खूप अभ्यास केला पाहिजे, परिपूर्ण झालं पाहिजे, तर आपण या स्पर्धेत टिकू शकतो. मग मी त्या दृष्टीकोनातून नाटकाकडे पाहायला लागले. मी इतरांची नाटकं पाहायला लागले. रंगभूमी हा माझ्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. मी शेवटपर्यंत नाटकाशी जोडलेली राहणार आहे.

‘अनन्या’ या नाटकाचा प्रत्येक प्रयोग करताना शिकायला मिळतं. प्रत्येक वेळी मला तयार राहावं लागतं. काही चुकलं तर सांभाळून घेत सादर करावं लागतं. रोज नव्याने अनन्या सापडत जाते. तरुण पिढीने नाटकाकडे वळताना होमवर्क केला पाहिजे. आपण जिथे काम करणार आहोत, तिथली थिअरी माहिती असणं गरजेचं आहे. त्यांनी उत्तमोत्तम नाटकं पाहिली पाहिजेत. व्यावसायिक आणि प्रायोगिक दोन्ही प्रकारची नाटकं पाहिली पाहिजेत. आपली सादरीकरणाची तयारी करणं, कार्यशाळांमधून शिकणं, मग स्पर्धेत उतरलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रवास केला पाहिजे. कुठल्याही क्रेझसाठी नाटकातील अभिनय क्षेत्रात येऊ  नये. तेवढी जबाबदारी, डेडिकेशन आणि कमिटमेंटने काम करायला उत्सुक असाल तर नाटकाककडे वळलंच पाहिजे.

प्रायोगिक रंगभूमीवर चांगले प्रयोग होतात, पण व्यावसायिक रंगभूमी चौकटीत अडकल्यासारखी वाटते मला. दहातली दोन ते तीन नाटकं फक्त वेगळी असतात. इतर नाटकं एकसारखी असतात. आउट ऑफ द बॉक्स जाऊ न विचार करणं गरजेचं आहे. रंगभूमी प्रगल्भ आहे, पण ती व्यावसायिकतेकडे जाताना क्रिएटिव्हली अजून विचार व्हायला पाहिजे. आणि ते तरुण मंडळी करू शकतात, असं मला वाटतं.