22 September 2020

News Flash

तन-मनसे ‘व्हेगन’

युरोप, अमेरिकेसारख्या देशात व्हेगन जीवन पद्धतीचा मोठय़ा प्रमाणात प्रचार होताना दिसतोय.

प्रियांका वाघुले

आपल्या मनासारखा, आपल्याला हवा तसा आहार करणं ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट असते. मुळातच असं म्हटलं जातं, ‘माणूस पोटासाठी जगत असतो’. त्यामुळे आपल्याला हवं तसं, हवं ते खाण्याची इच्छा अगदी प्रत्येकाला असते. खरा आनंद हा चमचमीत खाण्यात विशेषत: मांसाहारात आहे, असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. अशावेळी आपल्यापुरतं शाकाहारी आहारपद्धती स्वीकारून शांत न बसता शाकाहारी बनणे हीच जीवनपद्धती मानून त्याप्रमाणे जगणाऱ्यांचे प्रमाण हळूहळू वाढते आहे. ‘वेगन’ लाईफस्टाईल स्वीकारणे म्हणजे फक्त शाकाहारी आहारपद्धती नाही. त्यापलीकडेही तो एक विचार व्हावा लागतो आणि त्यातून कृती घडत जाते, सांगतायेत लेखिका-अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी..

व्हेगन होणं हा माझा स्वत:चा निर्णय होता. आणि हा निर्णय मला खरंच आनंद देतो, असं मधुगंधा सांगते. मुळात मी जन्मापासून शाकाहारी होते. पुढे समजण्याच्या वयात आल्यावरही आपलं शाकाहारीपण टिकवून ठेवणं मला योग्य वाटलं म्हणण्यापेक्षा शाकाहारीच राहायला हवं हे ठामपणे वाटलं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मला मुळातच प्राण्यांबद्दल प्रेम, आपुलकी वाटत होती. त्यामुळे त्यांना आपल्या जेवणात, आहारात सामावून घेणंच माझ्या बुद्धीबाहेरचं होतं, असं तिने सांगितलं. प्राण्यांबद्दल प्रेम रुजले तेही एका घटनेतून.. असं ती म्हणते. आमच्या शाळेच्या मागे असलेल्या जागेत डुकरांना पकडून आणलं जायचं आणि तिथे त्यांना कापलं जायचं. असंच एकदा आम्ही वर्गात असताना त्या माणसांनी तिथे एका डुकराला आणलं आणि पकडून त्याला कापलं. हे सगळं होत असताना आपला जीव वाचवण्यासाठी त्या डुकराचा सुरू असलेला प्रयत्न, त्याचं जिवाच्या आकांताने ओरडणं ऐकून मला असहाय वाटत होतं. पुढे मला अचानक, कधीकधी त्या आवाजाचा भास व्हायचा आणि माणूस स्वत:च्या पोटासाठी प्राण्यांना त्रास देतो याची चीड यायची. आपल्या हाताला थोडंसं कापलं तरी आपण विव्हळतो. इथे तर केवळ चवीची भूक भागवण्यासाठी त्यांना कापलं जातं, हे मनाला न पटणारं होतं. त्या प्रसंगानंतर मुळात शाकाहारी असलेली मी पुढे स्वत:चे निर्णय घेण्याइतपत कळती झाल्यावरही कधी मांसाहार करण्याची वासना मनात निर्माण होऊ  दिली नाही, असं तिने सांगितलं.

नंतर मी ‘अर्थलिंक’ नावाची डॉक्युमेंटरी बघितली. ज्यात माणसाच्या समोर वाढला जाणारा मांसाहारी पदार्थ बनवण्यासाठी त्यामागे प्राण्यांच्या जिवाचा कसा खेळ केला जातो. किती मोठय़ा प्रमाणात त्यांच्या जिवाची हानी होते, हे पाहिलं. तेव्हा आपण मांसाहार करणं आवश्यक आहे का?, असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. आणि त्याचं उत्तर ‘अजिबात गरजेचं नाही’ असं मिळालं. तेव्हा माझा निर्धार पक्का झाला, असं तिने स्पष्ट केलं. पण मग फक्त मांसाहार टाळला म्हणजे प्राण्यांची हत्या थांबणार नाही हेही लक्षात आलं. चामडय़ाची पर्स, चप्पल, जॅकेट, बेल्ट्स या वस्तू बनवण्यासाठी देखील प्राण्यांना बळी पडावं लागतं. त्यामुळे फक्त शाकाहारी न होता ‘व्हेगन’ असणं मला जास्त गरजेचं वाटलं. आपल्या आहारात समावेश नसला तरी आपल्या दैनंदिन जीवनातील वस्तूंमध्येसुद्धा अशा प्रकारच्या वस्तूंचा समावेश नसणं गरजेचं आहे, असं ती सांगते. प्राण्यांचं दूध हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पृथ्वीवर माणूस हा एकमेव प्राणी असा आहे जो इतर प्राण्यांचं दूध पितो. आणि त्यावर खरा हक्क असलेल्या त्या प्राण्यांच्या बाळांना मात्र ते दूध मिळत नाही. त्यामुळे दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहार हे तात्त्विकदृष्टय़ाही चांगले नाही आणि पचनास जड असल्याने शरीरासाठीही ते योग्य नाही, असे तिने स्पष्ट केले. व्हेगन लाईफस्टाईलमध्ये या सगळ्याचा विचार क रावा लागतो. हे पदार्थ टाळून माणसाने पिकवलेलं जे अन्न आहे तेच खाणं योग्य आहे, असंही ती म्हणाली. शाकाहारी असल्याने माझी शारीरिक क्षमता कमी किंवा दुर्बल आहे, असाही काही फरक पडलेला नाही. मी इतरांप्रमाणे नियमितपणे व्यायाम करते. प्राणायाम, योगासने, ध्यानधारणा मी नियमित करत असल्याने माझा आरोग्याचा प्रश्न उद्भवला नाही, असे मधुगंधा सांगते.

व्हेगन लाईफस्टाईल स्वीकारणे शक्य नाही कारण शंभर टक्के तसे वागता येणार नाही या विचाराने अनेक जण त्याचा विचारच करत नाहीत. मात्र लाईफस्टाईल म्हणून नव्हे तर काही गोष्टी बदलण्यासाठी निश्चित प्रयत्न आपण करू शकतो. चामडय़ाच्या वस्तू वापरण्याचे प्रमाण कमी करावे, मिठाईमध्ये दुग्धजन्य पदार्थ शक्यतोवर टाळावे. मी स्वत: व्हेगन असले तरी कधी चुकून बासुंदी खाण्याचा योग्य आला की तो मी एखादवेळेस टाळत नाही. पण ते एखाद्याच वेळेस. माणसानेच माणसाच्या हितासाठी, गरजेसाठी अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. चामडय़ाला पर्याय म्हणून कृत्रिम चामडे तयार केले आहे. त्याचा आपण आपली हौस भागवण्यासाठी वापर करू शकतो. त्यामुळे कमीतकमी या वस्तूंचा वापर टाळणे आता शक्य झाले आहे. व्हेगन होणं ही माझी निवड आहे. कारण कोणत्याही प्राण्यांच्या जिवाची हत्या माझ्यासाठी होऊ  नये, असं मला वाटतं. प्रत्येक जिवाला जगण्याचा हक्क आहे आणि त्यामुळे आपल्या आनंदासाठी प्राण्याला त्रास देणं मला मान्य नाही. या एका कारणासाठी मला माझा व्हेगन होण्याचा निर्णय योग्य वाटतो, असेही तिने सांगितले. ‘चि. व ची. सौ. कां.’मधील कथेला याचा संदर्भ असल्याने हा सिनेमा पाहिल्यावर त्या निमित्ताने अनेक जणांनी व्हेगन जीवनपद्धती स्वीकारल्याचे सांगितले. जे ऐकून मला खूप आनंद झाला. पुणे-मुंबईसारख्या विविध शहरांमध्ये व्हेगन खाद्यपदार्थाची हॉटेल्स उभी राहिली आहेत. अशा ठिकाणी आहारात प्राणिज पदार्थ अजिबात नसलेले अन्न ग्राहकांना सहज उपलब्ध होते, अशी माहिती तिने दिली.

युरोप, अमेरिकेसारख्या देशात व्हेगन जीवन पद्धतीचा मोठय़ा प्रमाणात प्रचार होताना दिसतोय. प्राण्यांवर प्रेम आहे, प्राणी आवडतात, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते आपल्या कृतीतून देखील दिसणं गरजेचं असतं. कारण माणसावर होणाऱ्या अत्याचारांची नोंद आपल्याला करता येते, पण प्राण्यांवर होणाऱ्या या अत्याचारांच्या किती आणि कशा नोंदी कराव्यात आणि त्या माणसाच्याच विरोधात कराव्यात का?, हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. याचा वेळीच विचार करून व्हेगन जीवन पद्धती शक्य तितकी अवलंबावी, असा आग्रहही तिने धरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2019 4:39 am

Web Title: writer actress madhugandha kulkarni talk about vegan lifestyle
Next Stories
1 क्षण एक पुरे!  तेजसचा सॅफ्रन प्रवास
2 टेकजागर : तंत्रजागराला या!
3 फिट-नट : चिन्मय उद्गीरकर
Just Now!
X