02 June 2020

News Flash

सजग व्हा..!

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनेक दिवस, आठवडे काही विशिष्ट गोष्टींसाठीची प्रतीके म्हणून साजरे करत असतो.

|| नाजुका सावंत

जगभरात युवांची संख्या जास्त आहे, भारतात तर त्याची संख्या जास्तीचीच आहे. याचा उपयोग करायला हवा, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा करून घेता यायला हवा अशी ओरड किंवा असा विचार अनेकदा मांडला गेला आहे. परंतु प्रत्यक्षात त्यावर सरकारकडून किंवा व्यवस्थेकडून काम होताना दिसत नाही. आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने दर वर्षी तरुणाईच्या समस्या, त्यांचे कायदे याविषयी चर्चा होते. या वर्षीही तशी चर्चा झाली, मात्र यानिमित्ताने शिक्षण-रोजगाराशी संबंधित आपल्या समस्यांचा ऊहापोह तरुणाईने स्वत:च करायला हवा, त्यासाठी आपल्यासमोरच्या समस्या नेमक्या काय आहेत, हे त्यांनी जाणून घेणे, अभ्यासणे गरजेचे आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण अनेक दिवस, आठवडे काही विशिष्ट गोष्टींसाठीची प्रतीके म्हणून साजरे करत असतो. १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून २००० सालापासून ‘युनायटेड नेशन्स’ या जागतिक संस्थेच्या वतीने साजरा केला जातो. तरुणांच्या समस्यांवर जनजागृती निर्माण व्हावी, त्यासाठी आवश्यक ती धोरणे आखली जावीत, म्हणून या दिवसाला महत्त्व आहे. मुख्यत्वेकरून सांस्कृतिक व कायदेविषयक समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी या दिवसाच्या निमित्ताने युनायटेड नेशन्स दर वर्षी वेगवेगळे विषय थीम म्हणून ठरवते. या वर्षी ‘सामाईक शिक्षण’ या विषयाचा ऊहापोह झाला. या वेळी युवा या शब्दाची रूपरेषा ही ठरलेली असते, ज्या वयापर्यंत अनिवार्य शिक्षण संपते तेव्हापासून नोकरी मिळेपर्यंतचं वय म्हणजे युवा. भारतात वेगवेगळ्या वर्षी युवा म्हणून गणताना वेगवेगळे वयोगट लक्षात घेतले जातात. एक वर्ष १३ ते ३३ तर दुसऱ्या वर्षी १५ ते २९ अशा प्रकारचे गट निश्चित केले जातात. सध्या जगातही एकूणच युवांची संख्या इतर वयातील लोकांपेक्षा जास्त आहे, भारतात तर त्याची संख्या जास्तीचीच आहे. याचा उपयोग करायला हवा, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा करून घेता यायला हवा अशी ओरड किंवा असा विचार अनेकदा मांडला गेला आहे. परंतु प्रत्यक्षात त्यावर सरकारकडून किंवा व्यवस्थेकडून काम होताना दिसत नाही. मात्र, या निमित्ताने शिक्षण-रोजगाराशी संबंधित आपल्या समस्यांचा ऊहापोह तरुणाईने करायला हवा, त्यासाठी आपल्यासमोरच्या समस्या नेमक्या काय आहेत, हे जाणून घेणेही तितकेच गरजेचे आहे.

‘सामाईक शिक्षण’ संकल्पनेचा विचार करताना आपली शिक्षणाची मानसिकता जिला स्वत:चा असा इतिहास आहे, जी नवनवीन धोरणांच्या कचाटय़ात सापडून पार लयाला गेली आहे. त्यातून बाहेर पडून आपण फोफाटय़ात जात आहोत. आज कंत्राटीकरणाचं जाळं भारताच्या प्रत्येक सरकारी संस्थेत घर करून आहे. एकीकडे आपण सर्वात जास्त तरुण मंडळी असणारा देश आहोत ही चांगली गोष्ट आहे म्हणून उर बडवून घेतो तर दुसरीकडे मुबलक प्रमाणात असलेल्या तरुणाईला कं त्राटीकरणाचा रस्ता दाखवतो. अभियांत्रिकी, आरोग्य, बँकिंग, समाजकारण, राजकारण इत्यादी अनेक क्षेत्रांत काम करण्यासाठी शिक्षण घेतलेल्या तरुणांना कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा पगारावर काम करावे लागते आहे, ही परिस्थिती गंभीर आहे. यावर आपण आपली समस्या म्हणून बोललं पाहिजे. यावर बोलणे, प्रश्न विचारणं हे आपल्या अधिकारात आहे. सध्या ‘डेमोग्राफिक डिव्हिडन्ट’ ज्याला ‘लोकसंख्या शास्त्रीय लाभांश’ असं म्हणतात त्याचा फायदा कोणाला होतो आहे, याचा विचार व्हायला हवा. जर तो केला गेला तर ब्रेन ड्रेन वगैरेवर चर्चा करणे सोपे होईल.

आपण या देशाच्या व्यवस्थेतील चुका किंवा त्रुटी, सरकारला प्रश्न विचारण्याबरोबरच आपल्या अंतरंगातपण डोकावून पाहू या. आजची तरुणाई वेगवेगळ्या प्रकारे त्रस्त आहे. मानसिक तणाव, शालेय तसेच महाविद्यालयीन पातळीवर सामोरे जावे लागणाऱ्या स्पर्धा, त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी करावा लागणारा झगडा, आपल्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचे नसलेले स्वातंत्र्य, निर्णय न घेता येणे, या सर्वाचे मूळ हे विचार न करण्यात आहे. अर्थात त्यामध्ये आपली शिक्षणपद्धती हातभार लावत आली आहे. शाळेच्या पुस्तकात धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव हे वाचलेलं तर असतं, पण अनुसरलेलं नसतं. उदाहरणार्थ, आपण मित्रमैत्रिणी निवडताना त्यांची जात, धर्म, रंग, लिंग पाहत नाही पण लग्न करण्याचा वेळी हे पाहिलेच जाते. त्यावर आपलं मत असणं आवश्यक आहे. विचार करणे हा नैसर्गिक हक्कच माणूस म्हणून आपण विसरलो आहोत का?, हा साधा प्रश्न आपल्याला अनेक गोष्टींच्या मुळापर्यंत नेतो. त्यामुळे बदल ही जर उत्क्रांत होण्याची नेसेसिटी आहे तर त्या बदलाचे वाहक होण्यासाठी आपल्याला विचार करून व्यवस्थेला प्रश्न विचाले पाहिजेत. त्यासाठी त्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. आपल्यातीलच मोठा गट इतर हक्कांच्या सोबतच नैसर्गिक हक्काचा म्हणजेच विचार करण्याचा वापर करत नाही हे स्पष्ट आहे.

आजची तरुणाई अगदीच सोशल आहे, पण हे सोशलायजेशन बऱ्याच प्रमाणात आभासी आहे. आपण आपल्याभोवती उभारलेल्या या सोशल भिंती आभासी जगाचं वास्तव आहेत. त्यांचा वापर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी केला जाणे गरजेपोटी चांगलेच आहे. पण त्याचा वापर करून आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर नियंत्रण ठेवले जात असेल असा विचार केला जातो का? अमुक एक गोष्ट तार्किक बुद्धीने विचार केलेली आहे का? बहुमताचा आणि नैतिक मूल्यांचा संबंध असतोच असं नाही. बहुमत असं म्हणतं आहे म्हणून आपण हा विचार स्वीकारावा की स्वत: त्यावर विचार करून स्वीकारावा हे सध्याच्या व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटीच्या युगात आपण करणे गरजेचे आहे. डेविल्स मेजॉरीटीचा भाग व्हायचे की संवादी व्हायचे हे आपण ठरवायचे आहे. सध्या नव्याने उदयाला येणाऱ्या या युनिव्हर्सिटीमधून प्रसारित करण्यात येत असलेले हे मेसेज आपली दिशाभूल तर नाही करत ना? किंवा हे खरं आहे का याचा पडताळा आपण करतो का? सण-उत्सव, संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आपण पर्यावरण पुरकता विचारात घेतली आहे का? मुळात संस्कृती ही बदलत जाणारी किंवा बदलत आलेली गोष्ट आहे हे आपल्याला पटतंय का? संस्कृतीचे पर्यावरणाचे रक्षक बनायचे की काहीही करायचं ते फक्त सामाजिक स्थळांवर दिसण्यासाठी? आपला वापर केला जातो आहे का, आपण अभ्यासू आणि निर्णयक्षम नाही याचा गैरफायदा कोणा दुसऱ्याला आपण नकळतपणे करून देत आहोत का हे सर्वच प्रश्न आजच्या तरुणाईने विचार करण्यासारखे आहेत.

सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग, शेमिंग हे प्रकार आपण थांबवू शकतो. सामाजिकीकरणाच्या बदलत्या काळात तांत्रिक विकासामुळे दोन पिढय़ांतील अंतर कमी झालं आहे हे खरं पण तेही तेवढंच आभासी आहे, त्याला ना संवादाची जोड ना विचारांची. मग आपली संस्कृती पुढे जावी यासाठीचा अट्टहास करावाच लागणार, नाही का? आपल्याला आपल्या हक्कांची माहिती नसणे हीसुद्धा एक समस्या आहे ती अर्थात फक्त तरुणाईच्या बाबतीत नाही तर सर्वाच्याच बाबतीत लागू होते. पण त्या समस्येवरील चर्चा आपल्या हक्कांच्या बाबतीतील जागरूकता दूर करू शकते. तसेच यामुळे आपल्याला माहिती नसताना केवळ कोणीही व्हॉट्सअ‍ॅपवर एक मेसेज पाठवला तर तो आधार मानून आपण आपली कृती करणार नाही. तसंच आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याचीही दक्षता आपण घ्यायला हवी.

सध्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी होणारे झुंडबळी हे अमानवी व असंविधानिक कृत्य असून ते निषेध व्यक्त करण्याजोगे आहेत. आपल्याच वयाच्या तरुण जोडप्यांच्या त्यांच्याच आप्तेष्टांकडून हत्या केल्या जातात तेव्हा आपला समाज घडवण्यासाठी आपण पुढे आलेच पाहिजे. आपल्याकडे मागील अनेक वर्षांत सन्मान हत्यांच्या नावाखाली तरुणांच्या हक्कांचा खून केला जातो आहे. त्यामुळे आपले हक्क माहिती असणे आवश्यक आहे. ‘किस ऑफ लव्ह’ नावाची एक चळवळ काही वर्षांपूर्वी सुरू झाली आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक ठिकाणी किस करणे गुन्हा किंवा चुकीचे नाही हे आपल्या निर्णयातून सांगितले. त्या वेळी त्यावर चर्चा झाली. संविधानावर आधारित पडताळ्यांवरून हा निर्णय देण्यात आला. अशा पद्धतीने तरुणाईला अनेक गोष्टींसाठी कायदेशीर झगडा सुरू ठेवावा लागणार आहे.

खरं तर जोडीदार निवडणं ही फारच वैयक्तिक गोष्ट आहे. पण आपण समाज म्हणून त्याचंही सामाजिकीकरण केलं आहे आणि त्याचं वैयक्तिकीकरण करणंही आपल्याच हातात आहे. समाजाचं उन्नयन होण्यामध्ये आपला तरुण म्हणून मोठा वाटा असतो. त्यासाठी आपल्या प्रश्नांची जाण असायला हवी, त्याचा एक आपला अभ्यास असणं आवश्यक आहे. आपल्याकडे दोन व्यक्ती मग त्या वेगळ्या अंगाच्या, रंगाच्या, धर्माच्या, जातीच्या, असूनही एकमेकांवर  प्रेम करू शकतात ही कल्पना अशाच पद्धतीने घेतली जात नाही. ज्यासाठी आपल्याकडे कायदे आहेत. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार दोन व्यक्ती कोणत्याही जातीधर्माच्या बिरुदाशिवाय लग्न करण्याचा विचार करू शकतात तसेच यामध्ये वैयक्तिक कायदे लागू केले जात नाहीत. आपल्याकडे  ‘लव्ह जिहाद’च्या नावावर अनेक लग्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. स्पेशल मॅरेज अ‍ॅक्टनुसार आपण कायदेशीररीत्या यावर तोडगा काढू शकतो. कोणतीही सरकारी सामाजिक यंत्रणा आपल्याला अडवू शकत नाही. पण स्पेशल मॅरेज अ‍ॅक्ट १९५४ अनुसार आपण अशा प्रकारे लग्न करू शकतो हेच आपल्यापैकी अनेकांना माहितीही नसतं.

तरुणाईला कायमच बोल लावले गेले आहेत, याहीआधी तरुणांनी आपल्याला हवा तो समाज घडवण्याची, त्यासाठी स्वत: परिश्रम घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे ‘चर्चा तर होणारच’ एवढय़ा वाक्यावरच न थांबता ती खरंच केली पाहिजे. कारण या बदलणाऱ्या जगाचा चेहरा आपल्याला पकडता येत नाही आहे. शिक्षण, नोकरी, लग्नापासून ते राजकारण-व्यवस्थेपर्यंतच्या अनेक समस्या तरुणाईच्या अवतीभोवती घोंघावत आहेत. त्यावर मात करण्यासाठी अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे प्रभावी शस्त्र आपल्या हातात आहेत तिचा विचारी वापर करू या! viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2019 3:26 am

Web Title: young generation indian economy government of india akp 94
Next Stories
1 फॅशनिस्टांचा प्रभाव
2 ‘ऑनलाइन स्ट्रिमिंग’चा ओढा!
3 फिट-नट
Just Now!
X