11 December 2017

News Flash

ऐ दिल हैं मुश्कील..

शहरी लाइफस्टाइलला सरावताना काय अडचणी येतात, कुठले संघर्ष करावे लागतात.

लोकसत्ता टीम | Updated: May 27, 2016 1:50 AM

शिक्षणासाठी, नोकरीसाठी.. थोडक्यात उज्ज्वल भविष्याचं स्वप्न घेऊन अनेक तरुण मोठय़ा शहरांच्या वाटा धरतात. नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा हाच काळ आणि नव्या शहरात स्वत:ला अजमावून बघण्याचाही हाच काळ.. आपल्या कोषातून, गावकडच्या सुरक्षित वातावरणातून मोठय़ा शहरात येताना, शहरी लाइफस्टाइलला सरावताना काय अडचणी येतात, कुठले संघर्ष करावे लागतात, कधी एकटेपणा सलतो, तर कधी न्यूनगंड वाढतो. या सगळ्याशी झगडत मुंबईत आपलं स्वतंत्र अस्तित्व तयार करू पाहणाऱ्या तरुणींचा प्रवास त्यांच्याच शब्दांत..

स्वप्ननगरीच्या छायेत
चित्रा कोळसूलकर
2

‘मला अभिनेत्री व्हायचंय..’ माझी ही इच्छा घरी बोलून दाखवली तेव्हा सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. कारण आमच्या कोकणातल्या घरातलं वातावरणच तसं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खारेपाटण या छोटय़ाशा गावात एकत्र कुटुंबात माझा जन्म झाला. लहानपणापासूनच अभिनयाची मला भारी आवड. म्हणून शाळा, कॉलेजला असताना अनेक नाटय़, नृत्य स्पध्रेत
सहभाग घ्यायचे. बक्षीसही मिळायची. कुटुंबात माझ्या अभिनयाचं तोंडभरून कौतुकही व्हायचं तेव्हा. आपसूकच अभिनेत्री व्हायची इच्छा मनात घर करत गेली. पण घरी सांगितलं तेव्हा – अभिनय, नृत्य या गोष्टी शाळेतल्या स्पध्रेपुरत्याच बऱ्या. त्याचा करिअर म्हणून विचारसुद्धा करायचा नाही असा आदेशच मला घरून मिळाला. त्यानंतर अभिनयाचं नावही मी कधी घरात काढलं नाही. दिवस जात गेले. माझी बारावीची बोर्डाची परीक्षा येऊन ठेपली. यादरम्यान आमच्या संपूर्ण कुटुंबाला हादरवून टाकणारी घटना घडली. बाबांचं अचानक अपघाती निधन झालं. झटक्यात आमचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. या दु:खातून सावरायला खूप वेळ लागला. तेव्हा मोठय़ा भावाने संपूर्ण घराची जबाबदारी घेत विस्कटलेल्या घराला सांभाळून घेतलं. या सगळ्यात माझं अभिनेत्री व्हायचं स्वप्न कुठे तरी विरून गेलं.
बारावीनंतर मी फार्मसीला अ‍ॅडमिशन घेतली. शिक्षण सुरू असताना काही मराठी चित्रपटसृष्टीतले लोक माझ्या संपर्कात आले. छोटय़ामोठय़ा भूमिकांसाठी ऑफर येऊ लागल्या. शिक्षण सुरू असलं, तरी त्यात आनंद नव्हता. समाधान नव्हतं. अभिनयाची इच्छा काही केल्या मनातून जात नव्हती. तेव्हा घरी येऊन मोठय़ा धाडसाने पुन्हा एकदा जाहीर केले की, मला अभिनेत्रीच व्हायचंय आणि त्यासाठी मी मुंबईला जाणार. घरातून प्रचंड विरोध झाला. ‘आपण साधी माणसं आहोत. डिग्री मिळवून चांगलीशी नोकर बघ आणि सेटल हो..’ असं घरून सांगण्यात आलं. अथक प्रयत्न करून घरच्यांची मनधरणी केली. माझ्याकडून किती तरी वचनं घेत अखेर मला मुंबईला जायची परवानगी मिळाली. हुश्श! .. वाटलं की आता तरी मी माझ्या करिअरला सुरुवात करू शकेन.
मी अभिनेत्री व्हायला मुंबईला जातेय म्हटल्यावर गावातल्या काही ‘हितचिंतकांनी’ अभिनय क्षेत्राविषयी त्यांची मतं मांडायला सुरुवात केली. ‘अभिनयाच्या क्षेत्रात कितीही नाव, पसा असला तरीही कुठल्या नजरेने त्या अभिनेत्रीकडे बघितलं जातं.. सामान्य मुलीनं या क्षेत्रात तेही असं एकटं मुंबईला जाणं चांगलं नाही..वगैरे वगरे’ अशा एक ना अनेक गोष्टी सांगत माझ्या घरच्यांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाला. पण माझ्या कुटुंबाचा माझ्यावर असलेला विश्वास आणि पािठबा ठाम होता. शेवटी सगळे विरोध, अडथळे पार करत माझ्या अभिनेत्री बनण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि लागलीच मुंबईची वाट धरली. आता मनासारखं काम करता येईल, असं वाटलं. पण खरा संघर्ष तर पुढेच होता.
मुंबईसारख्या महानगरात एकटी आल्यावर या शहराच्या विस्ताराची, इथल्या गर्दीची धडकी भरली. मुंबईत आल्यावर ताईकडे नालासोपाऱ्याला राहायला लागले आणि दादरला एका अ‍ॅिक्टगच्या कोर्सला अ‍ॅडमिशन घेतली. अ‍ॅिक्टगच्या क्लासचा माझा पहिला दिवस. घरातून निघतानाच नव्‍‌र्हसनेस होता. गावी असताना अगदी जवळ जरी जायचं असलं तरी दादा सोडायला यायचा. इथे नालासोपारा ते दादर एकटीने प्रवास करायचाय. तेही लोकलने या विचारानेच मला खूप टेन्शन आलं. ताईने तसा प्रवास नीट समजावून सांगितला होता. तरीही कुठलीही गोष्ट पहिल्यांदा करताना वाटायची तेवढी भीती वाटलीच. क्लासला पोचले आणि तिथले एकूण वातावरण पाहून अवाक झाले. तिथे मी सोडले तर जवळपास सर्वच मंडळी मुंबईची. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं, त्यांचा ड्रेसिंग सेन्स, मेकअप, केसांची ठेवण सगळंच आजच्या फॅशन ट्रेण्डप्रमाणे होतं. त्या तुलनेत मी किती तरी मागे होते. अगदी गावाकडची वाटत होते. मला आठवतं.. क्लासच्या पहिल्या दिवशी मी पंजाबी ड्रेस घालून गेलेली एकमेव माझ्या वयाची मुलगी होते. बाकी सगळ्या मुली मॉडर्न लुकमध्ये होत्या. खरं तर जाणवायला नको, पण कुठे तरी कमीपणा जाणवायला लागला. न्यूनगंडाची एंट्री झालेली होती तर!
तेव्हा वाटलं की, मुंबई आपल्यासोबत नाही तर आपल्याला मुंबईसोबत आणि इथल्या संस्कृतीसोबत अ‍ॅडजस्ट व्हावं लागणार आहे. न्यूनगंडाला आधी हद्दपार करावं लागणार आहे. अभिनेत्री होण्यासाठी माझ्या राहणीमानात, व्यक्तिमत्त्वात योग्य ते बदल करणं आवश्यक होतं. ते मी केले.. अर्थातच घरची शिकवण आणि संस्कार लक्षात ठेवून. अ‍ॅिक्टग क्लासेसदरम्यान दिग्गज कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून मला मिळालेली महत्त्वाची शिकवण म्हणजे – अभिनेत्रीचं सौंदर्य महत्त्वाचं, पण हे सौंदर्य तिच्या अभिनयातून दिसायला हवं.
आज मुंबईत येऊन वर्ष होतंय. रोज नवा दिवस असतो, रोज नवी ऑडिशन देऊन कुठला एखादा चांगला रोल मिळवण्याची धडपड सुरू असते. प्रत्येक ऑडिशन जीवनातला एक नवा रोल शिकवून जाते. मुंबईत रोज जगण्यासाठीचा संघर्ष असतो. अपयशातून येणारी निराशा असते, पण तरीही मनाला समाधान असतं की, ही धडपड माझ्या आवडीचं काम करण्यासाठी आहे. सुरुवातीला परक्या वाटलेल्या या मुंबईनं मला केव्हा आपलंसं केलं कळलंसुद्धा नाही.
(शब्दांकन – रेणुका शेरेकर)

मुंबईत जगताना..
रेणुका शेरेकर
1

लहानपणापासूनच नवनवीन लोकांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची आवड होती. मग याच आवडीचं रूपांतर करिअरमध्ये करण्याचं ठरवलं आणि माझा पत्रकार बनण्याचा प्रवास सुरू झाला. वाणिज्य शाखेतून पदवी घेतल्यानंतर या क्षेत्रात शिरण्याची धडपड सुरू झाली. पत्रकारितेचं शिक्षण मुंबईतच घ्यायचं हे ठरवलं होतं. मुंबईतल्या एका जुन्या नामांकित महाविद्यालयात ‘मास कम्युनिकेशन स्टडीज’मध्ये प्रवेश मिळवला. अमरावतीसारख्या तुलनेने शांत, निवांत, कमी गर्दीच्या शहरातून मुंबईसारख्या वेगवान, कॉस्मोपोलिटन शहरात जाण्याचं दडपण माझ्या आणि माझ्या कुटुंबांच्या मनावर होतंच. पण ध्येय गाठायचे असेल तर हवी असते इच्छाशक्ती आणि कम्फर्ट झोन सोडायची तयारी. मग या सोयीच्या, आरामदायी जीवनाला निरोप देत मनात नवीन शहरात राहण्याची स्वप्न (आणि थोडी भीती घेऊन)स्वप्ननगरी गाठली.
या मोठय़ा शहरातली मोठी समस्या म्हणजे घराची. मग त्यासाठी टेक्नोलॉजीचा, इंटरनेटचा वापर करत बऱ्याच वेबसाइट्स, अ‍ॅप्सच्या माध्यमातून घराचा शोध सुरू झाला. माझ्या बजेटमध्ये असणारं, किमान गरजा पुरवणारं, सुरक्षित राहण्याचं ठिकाण मला मिळालं. दक्षिण मुंबईतल्या कॉलेजपासून ते तसं दूर होतं, पण आमच्या अमरावतीच्या हिशेबानं दूर. मुंबईकरांसाठी ते जवळचं होतं, हे नंतर मला कळलं आणि पटलं. मुंबईत आयुष्यात पहिल्यांदाच जातेय म्हणून भाऊ सोडायला आला होता. तो जसा मला सोडून गावी परतला तसं मनात धस्सं झालं. आता फक्त मी होते, माझी स्वप्नं होती आणि या अनोळखी शहरातली अनोळखी माणसं होती.
माझ्या फ्लॅटवर आम्ही चार मुली राहायचो. उत्तर प्रदेश, गोवा, कोकण आणि विदर्भातली मी अशा चार प्रांतांतून आलेल्या आम्ही मुली. प्रत्येकीची संस्कृती, राहणीमान, रुटीन अगदीच भिन्न. दारूचं नावंही माझ्या घरी वज्र्य आहे. असं असताना इथे आल्यावर मात्र दारूच्या बाटल्या सर्रास नजरेस पडायच्या. सुरुवातीला त्याचा धक्का बसला होता. पण शेवटी ज्याच्यात्याच्या सवयीचा तो भाग असतो आणि हे शहर असं चांगलं-वाईट, खरं-खोटं सगळ्याला सामावून घेणारं हे कळल्यावर त्या धक्क्याचं काहीच वाटलं नाही. इथल्या लोकांच्या न पटणाऱ्या सवयींकडे दुर्लक्ष करीत आणि चांगल्या सवयी आत्मसात करीत मुंबईत माझ्या करिअरच्या संघर्षांसाठी मी सज्ज झाले.
मुंबईविषयी जितकं कुतूहल होतं, त्यापेक्षा किती तरी जास्त मनात भीती होती. भीती कसली? तर इथल्या माणसांच्या गर्दीची, बहुभाषिक आणि मॉडर्न लोकांची, मोठमोठय़ा इमारतींची, सतत धावणाऱ्या लोकलची आणि एकाच वेळी त्या लोकलमधे चढू पाहणाऱ्या त्या हजारो लोकांची. गावी असताना स्वत:च्या गाडीने थाटात फिरणारी मी कधी या लोकलमधे प्रवास करायला शिकले, गर्दीत घुसायला शिकले हे काही कळलंसुद्धा नाही. छोटय़ा शहरातून मुंबईत येताना बरेच न्यूनगंड मनात बाळगून होते. मग तो भाषेचा असो किंवा दिसण्याचा आणि राहणीमानाचा. मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे इंग्रजीत बोलण्याची सफाई अजिबात नाही. त्यात एका जेश्युएट कॉलेजमधे शिकत असल्यामुळे इंग्रजीचं दडपण यायचंच. माझ्या कॉलेजमधे भारतभरातले विद्यार्थी पत्रकारितेचे शिक्षण घ्यायला आलेले. त्यांची आíथक, सामाजिक, वैचारिक पाश्र्वभूमी किती तरी वेगळी. ती समजून घेण्याची मजाही वेगळीच असायची.
घरातून मिळणाऱ्या मर्यादित पैशांमधे घराचे भाडे, जेवणाचा, प्रवासाचा खर्च भागवणं म्हणजे तारेवरची कसरतच. मुंबईत राहत असताना प्रकर्षांने मिस केलेली एक गोष्ट म्हणजे ‘घरचं जेवण’. वडापाव पोटाला आधार देत असला तरी मायेची भूक काही केल्या भागत नाही. दिवसभर धडपडणाऱ्या जिवाला विसावा देतो तो इथला समुद्र.. सततची स्पर्धा, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नवनवीन आव्हानं पेलत असताना नराश्य आलं की, मला आणि माझ्यासारख्या कित्येकांना आधार मिळतो तो समुद्राच्या सान्निध्यात. मुंबईत एकटी राहत असताना फारशी असुरक्षितता कधी जाणवली नाही. रात्री-अपरात्री फिरताना कधी भीती वाटली नाही हे मात्र खरं. मुंबईविषयी आणखी एक आकर्षण म्हणजे इथल्या नाइटलाइफचं! पत्रकारितेच्या प्रोजेक्टचा एक भाग म्हणून रात्रीची मुंबई पाहण्याचा योग आला. तो झगमगाट पाहिला तसं दिवसभर धावणाऱ्या या नगरात फुटपाथवर का असेना पण निवांत झोपी जाणारी माणसंही मी पाहिली.
इथे भेटलेली चांगली माणसं जिव्हाळा देऊन गेली आणि वाईट माणसं अनुभव, धडा. आता वर्षभरात मन आणि जीवन या स्वप्ननगरीत स्थिरावलंय. अमरावतीहून इथे येताना मनात असलेली भीती गेलीय. मनाला संकुचित विचारांतून बाहेर काढत व्यापक नजरेतून बघायला मुंबईनं शिकवलंय. कित्येकांच्या स्वप्नांचा प्लॅटफॉर्म बनलेली ही नगरी माझ्याही स्वप्नांना नक्कीच आकार देईल याचा मला विश्वास आहे.

First Published on May 27, 2016 1:50 am

Web Title: youngsters living alone in metro cities for education and job