19 January 2020

News Flash

तरुणाईचे # गृहोद्योग

वॉल पेंटिंग्स, बुकमार्क्‍स आणि वेगवेगळी हँडमेड ग्रीटिंग्स या गोष्टींचा व्यवसाय गेली अनेक वर्षे तेजीत आहे

(संग्रहित छायाचित्र)

विपाली पदे

‘युथ’ म्हटलं की ‘नावीन्यता’ हा शब्द त्यापुढे आपोआप जोडला जातो. काहीतरी सतत भन्नाट करणे, बदलत्या काळानुसार व्यवसाय शोधणे आणि निर्माण करणे हे त्यांचे आवडते ‘उद्योग’. सध्या प्रचलित असलेल्या ‘डू इट यूअरसेल्फ’च्या विश्वात अनेक तरुण-तरुणी स्वत:च्या हाताने भेटवस्तू किंवा तत्सम गोष्टी घरीच बनवताना दिसतात. यूटय़ूब, व्हॉट्सअप आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडीओ बघत काही ना काही नवीन शिकतात. त्यामुळे तरुणवर्ग हा आता दुकानात जाण्यापेक्षा स्वत:त उपजत असणाऱ्या कलेचा वापर करून नवं काही घडवण्याच्या आणि ते छोटय़ा स्तरावर का होईना त्याची विक्री करत उद्योजक म्हणून स्वत:ची प्रतिमा घडवण्यावर भर देतो आहे..

वॉल पेंटिंग्स, बुकमार्क्‍स आणि वेगवेगळी हँडमेड ग्रीटिंग्स या गोष्टींचा व्यवसाय गेली अनेक वर्षे तेजीत आहे. वैदेही मुळ्ये ही अशीच एक मुंबईमधील तरुणी. दहावीमध्ये असताना नेहरू सेंटरमध्ये ती चित्रकलेचे प्रदर्शन बघायला गेली होती. मग चित्रकलेची आवड लागल्यामुळे तिने क्लासदेखील लावला. ‘वन स्ट्रोक पेंण्टिग्स’ हा नवीन आणि इंटरेस्टिंग चित्रकलेचा प्रकार तिने शिकायला सुरुवात केली. तिथे त्यांच्याकडे ती खूप नवनवीन डिझाइन्स, ब्रशचे स्ट्रोक्स शिकली. मग काही काळाने तिने स्वत:च्या विचारांनी नवीन डिझाइन्स बनवून त्याचे बुकमार्क्‍स, ग्रीटिंग कार्ड्स बनवायला सुरुवात केली. वैदेहीच्या या घरगुती उद्योगाला नातेवाईकांकडून, मित्रमैत्रिणींकडून खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि नंतर ती ‘वन स्ट्रोक पेंटिग्स’च्याच आधारे आकर्षक वॉल पेंटिंगही करायला लागली. आता सगळीकडे तिच्या या आगळ्यावेगळ्या कलेला खूप मागणी आहे. ती कायम म्हणते, आर्किटेक्चर करताना जसा वेळ मिळेल तशा मी ऑर्डर्स पूर्ण करत गेले. पण मला खरा आनंद तेव्हा होतो जेव्हा मी माझी कला ग्राहकांच्या घरातील भिंतींवर साकारते. काही तरी हटके शिकून सुरू झालेला तिचा हा प्रवास आता ऑस्ट्रेलिया, सिंगापूरसारख्या परदेशांमध्येही एक मोठे आकर्षण ठरला आहे.

गिरगावची ज्ञानेश्वरी वेलणकर ही सुंदरप्रकारे पणत्या रंगवून घरगुती स्वरूपात त्यांची विक्री करते. सुरुवातीला नातेवाईकांना पणती भेटवस्तू म्हणून द्यावी, अशा विचाराने तिने बाजारातून पणत्या आणून रंगवायला सुरुवात केली. सहज म्हणून सोशल मीडियावर तिने फोटोज टाकले आणि लोकांचा तिला उत्तम असा प्रतिसाद मिळाला. मग तिने घरगुती स्वरूपात पणत्या रंगवून विकायला सुरुवात केली. घरच्या घरी तिने पहिल्यांदा दोनशेच पणत्या विकल्या. यंदाच्या दिवाळीत मात्र तिच्या कामाच्या आधारे तिला जास्त ऑर्डर्स मिळाल्या. या वेळी तिने जवळपास हजार पणत्या विकल्या. स्वत:ची कल्पकता वापरून तिने नवीन रंग तयार केले. प्रत्येक पणतीमधील बारकावे तिने आकर्षकरीत्या भरले. त्यामध्ये खडे, मोती चिकटवून त्यांचे सौंदर्य आणखीन वाढवले. ‘ज्या दिव्यांनी प्रकाश पसरणार आहे तो दिवा लोकांचे आयुष्य उजळवण्याचे एक माध्यम आहे. तो दिवा सुशोभित का नसावा,’ असा विचार करून तिने अजून जोमाने काम केले. आणि त्यामुळे घरगुती प्रमाणात सुरू केलेल्या या दिव्यांना आता परदेशातूनही मागणी आली आहे. म्हणून आता ती परदेशवारीचाही विचार करते आहे.

आजकालच्या जमान्यात ‘हर खुशी के मौकेपर केक तो बनता है’ असा जणू ट्रेण्ड झालाय. याच ट्रेण्डचा विचार करून सुयोग राऊत या तरुणाने सुरुवातीला घरूनच केक्स बनवायला सुरुवात केली. हॉटेल मॅनेजमेंट केल्यामुळे कुकिंग हा एक भाग त्यात होता. आणि आपोआप मग त्याला ओढ लागली ती वेगवेगळे केक बनवून विकण्याची. सुरुवातीला नोकरी सांभाळत त्याने जवळपास चार वर्षे घरून केक बनवले. आणि मग हळूहळू स्वत:चे ‘केक बझ’ नावाचे घरगुती पातळीवरील दुकान सुरू केले. या व्यवसायात आल्यावर त्याचा उद्देश होता तो म्हणजे ग्राहकांना चॉकलेट, पाइनॅपलसारखे काही ठरावीक फ्लेवर खाऊन आलेला कंटाळा घालवायचा. आपण त्यांच्याकरिता नवीन फ्लेवर स्वत: तयार करू या, हा विचार डोक्यात घेऊन त्याने सीझनल केक बनवायला सुरुवात केली. मग न्यू इयर, बर्थडे पार्टीज, रक्षाबंधन, दिवाळी यांसारखे सणवार त्याचबरोबर तरुणांचा लाडका व्हॅलेन्टाइन डे याच्या निमित्ताने तो साधे केक, प्लम केक, चॉक्लेट कुकीज, पेस्ट्रीज, चॉकलेट्स असे प्रकार तयार करू लागला. त्याची खासियत म्हणजे गाजर हलवा, रोज फालुदा, गुलकंद, अंजीर असे टेस्टी फ्लेवर असलेले केक तो बनवतो. ज्याला आता मुंबईभरातून मागणी आहे.

बर्थडे, सणवार आले की पहिला प्रश्न पडतो गिफ्ट म्हणून काय देता येईल. याला उत्तर म्हणजे ठाण्याच्या श्रद्धा बाईत हिने सुरू केलेला स्वत:चा घरगुती व्यवसाय. लहान बहिणीच्या वाढदिवसाला काही तरी अप्रतिम भेट देण्याच्या उद्देशाने सर्वात पहिला अल्बम तिने बनवला. त्या अल्बमचे सर्वानी तोंड भरून कौतुक केले. त्याच वेळेस आपल्याला येणाऱ्या कलेचे व्यवसायात रूपांतर करावे या उद्देशाने तिने ‘क्राफ्टिझम’ची निर्मिती केली. याद्वारे ती विविध कार्यक्रमांनुसार अल्बम, एनव्हलप आणि एक्सप्लोजन बॉक्स आणि डायरीज बनवते. पर्यावरणाचा विचार करून सगळ्या क्राफ्टसाठी सामान वापरले जाते. जेणेकरून आठवणी जपून ठेवण्यासोबतच प्रदूषित घटक कमी करण्यासाठी जागरूकता निर्माण होईल. श्रद्धाच्या मते तिच्या क्लाएंटकडून मिळणारी कौतुकाची थाप आणि चेहऱ्यावरील आनंद हेच तिला आपलं काम पुढे न्यायची प्रेरणा देतात. त्यामुळेच तिला सातत्याने नवीन प्रॉडक्ट डिझाइन करण्याची ऊर्मी मिळते, असं ती सांगते.

हॅण्डमेड गिफ्ट्स आणि गोष्टी बनवण्यासाठी अनेक क्राफ्ट प्रकार आपल्याला बाजारात येताना दिसतात. त्यातीलच एक म्हणजे पेपर क्विलिंग. कल्याणच्या प्रज्ञा तरटे हिला शाळेत असल्यापासून पेपर क्विलिंगचा छंद होता. सुरुवातीला ती फक्त सुट्टीत पेपर क्विलिंग करून बघत असे. पण जसे तिला कळत गेले की आपण यात नावीन्य आणू शकतो. तसतसे तिने हळूहळू या छंदाचे रूपांतर घरगुती व्यवसायात केले. आता ती पेपर क्विलिंगपासून तयार केलेले दागिने, फ्रेम्स, पेपरवेट, बास्केट्स, शो पीस असे विविध गिफ्ट आयटम्स तयार करून विकते. या व्यवसायात तिची बहीण संपदा तिला मदत करत असून आता तिने स्वत:चा ‘संज्ञा’ नावाचा ब्रॅण्ड नुकताच सुरू के ला आहे. या ब्रॅण्डच्या अंतर्गत ती विविध ठिकाणी प्रदर्शनात सहभाग घेते. तिचा हेतू जरी आर्थिक असला तरी त्याहून अधिक तिच्यात असणाऱ्या कलेचा सदुपयोग तिला करायचा आहे. आणि म्हणून पेपर क्विलिंगच्या या क्राफ्टच्या जगात तिला अजून भरभरून काम करायचे असल्याचे ती सांगते.

आपल्यात उपजत असलेले कलागुण लक्षात घेत, त्यावर मेहनत घेऊन नवे काही तरी स्वत:च्या हाताने बनवून ते जगापुढे आणण्याचा हा तरुणाईचा ध्यास वाखणण्याजोगा आहे. नाण्याची एक बाजू आर्थिकतेकडे झुकणारी असेलदेखील. पण तरीसुद्धा आपल्या घरगुती प्रमाणात सुरू केलेल्या या व्यवसायाला ग्राहकांच्या कौतुकाचे पाठबळ मिळावे, या हेतून त्याच्यापैकी अनेकांनी हा प्रवास सुरू केला आहे. कधी कधी तर हे व्यवसाय त्या त्या ठरावीक सणांपुरते, ओकेजनपुरतेही मर्यादित असतात. मात्र या गणितांमध्ये न अडकता जे जे आपल्याला जमते आहे ते न थकता करण्यावर त्यांचा भर असतो. या जिद्दी, सर्जनशील अशा तरुणाईने विकसित केलेले असे अनेक छोटे छोटे ब्रॅण्ड आज आपल्या अवतीभवती दिसून येतात. डिजिटल युगात तर त्यांचे सर्जनशील अविष्कार एका हॅशटॅगच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचतात आणि त्यातूनच त्यांचे हे छोटेखानी गृहोद्योग ठोस आकार घेत आहेत. हे छोटे छोटे प्रयत्न मोठय़ा बदलांना कारणीभूत ठरतात ते याचसाठी.. आणि म्हणूनच ते प्रेरणादायी आहेत.

First Published on November 8, 2019 4:39 am

Web Title: youthful home business abn 97
Next Stories
1 सूर वि संवादी..
2 क्षण एक पुरे! : इतरांना शहाणं करणारा वेडा
3 टेकजागर : खरंच ‘प्रायव्हसी’ उरलीय का?
Just Now!
X