देवकी पंडित यांची वैविध्यपूर्ण गायकी ऐकून त्यामागचा स्वरविचार समजून घ्यायला आलेल्या श्रोत्यांना व्हिवा लाउंजच्या शब्दमैफलीतून खूप काही मिळालं. हा स्वरविचार गाण्याकडे, संगीताकडे बघण्याची एक नवी, प्रगल्भ दृष्टी देऊन गेला, अशी श्रोत्यांची सर्वसाधारण प्रतिक्रिया होती. देवकीताईंचा गाण्याचा ध्यास, सुरांची श्रीमंती, गुरूंविषयीची आदरभावना तरुणाईलाही खूप काही सांगून गेली. शब्दमैफलीचा शेवट देवकीताईंच्या स्वरातील ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ने झाला तेव्हा उपस्थित प्रत्येक संगीत रसिक भारावल्या मनानंच परतला. उपस्थितांपैकी काही तरुणाईच्या प्रतिक्रिया..

* अनुजा इनामदार
देवकीताईंची गाण्याविषयीची पॅशन मनाला भिडली. स्वर आणि आवाज यांना गृहीत धरून अतिगायनामुळे त्या तीन वर्षे गाऊ शकल्या नाहीत. त्या काळाचा त्यांनी संगीताचे इतर बारकावे शिकण्यासाठी उपयोग करून घेतला, हे ऐकून खूपच प्रेरणा मिळाली. रियाज-साधना-गुरू ही त्रिसूत्री प्रसिद्धीपेक्षा महत्त्वाची आहे, हे शिकायला मिळालं. फ्युजन म्हणजे काय ते कळलं. एक सुज्ञ श्रोता होणं कसं गरजेचे आहे हेही समजलं.

* मिताली जैतापकर

या कार्यक्रमामुळे शास्त्रीय संगीताचा गाभा किती खोल आहे ते कळलं. अभिजात संगीत कसं अजरामर आहे, ते शिकणं किती महत्त्वाचं आहे. केवळ एक चांगला श्रोता होण्यासाठीही संगीताची जाण कशी आवश्यक आहे हे कळलं. आपण कितीही मोठे झालो तरी पाटी कोरी ठेवून जे जे नवीन शिकता येईल ते शिकावं, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. सतत काही तरी नवीन शिकत राहण्याचा त्यांचा स्वभाव दिसला. इतक्या मोठय़ा होऊनदेखील नियमित रियाजात खंड न पाडता संगीताचा त्यांनी घेतलेला ध्यास अचंबित करणारा आहे.

* शमिका भिडे
माझ्या गाण्यातल्या ‘आयकॉन’ला व्हिवा लाउंजच्या निमित्ताने प्रत्यक्ष अनुभवता आलं. देवकीताईंचे स्वरानुभव फारच छान होते. देवकीताईंचं गाणं, त्यांचे विचार नेहमीच मार्गदर्शक असतात. आजच्या अस्थिर जगात आणि चंचल वयात गाण्याकडे लक्ष कसं केंद्रित केलं पाहिजे आणि गाण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे याबाबत फार छान विचार आजच्या व्हिवा लाउंजमधून मिळाले. गाण्यात काही करायचं असेल तर गाण्याचं आपल्या जीवनातील स्थान आणि त्याला दिलं जाणारं महत्त्व नक्की काय असावं हे जाणण्यासही फार मदत झाली. कोणत्याही साच्यात न बसवता एक कलाकार म्हणून अष्टपैलू व्हा, कोऱ्या पाटीप्रमाणे राहून इतरांकडून कलेचे धडे घ्या, हा संदेश यातून आम्हाला मिळाला. त्यांनी दिलेले सल्ले आम्ही नक्कीच अवलंबण्याचा प्रयत्न करू.

* विशाल शेडगे

सध्याच्या रिमिक्सच्या जमान्यातसुद्धा संगीत क्षेत्रात अनेकांचा आदर्श असणाऱ्या देवकी पंडित यांना प्रत्यक्ष बघता आलं, त्यांच्याशी संवाद साधता आला. सुरांची श्रीमंती म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण या कार्यक्रमात देवकी पंडित यांच्या रूपाने पाहायला मिळालं. कोणालाही जर सुरेल आवाज लाभला असेल तर स्वत:चा कंठ कसा जपावा याबद्दलचं मार्गदर्शनही त्यांच्याकडून मिळालं. देवकी पंडित यांनी सांगितलेले सूरमय अनुभव माझ्यासोबतच इतरांनाही फायद्याचे ठरतील यात शंकाच नाही. या कार्यक्रमाची सुरुवात जितकी सुरेख होती तितकीच सुरेल सांगताही झाली. देवकी पंडित यांना थेट ऐकण्याचा अनुभवही वेगळाच होता.

* प्राची छत्रे

टी. व्ही.वर दिसणाऱ्या देवकी पंडितांना प्रत्यक्षात बघायला मिळणं, ऐकायला मिळणं हाच मनाला तृप्त करणारा अनुभव होता. आपल्याला काय झेपतं ते ओळखून त्यानुसार तयारी करावी हे त्यांनी सांगितलं. संगीताचे सगळे फॉर्म गाऊन बघायला हरकत नाही आणि कलाकार अष्टपैलू असला पाहिजे हे देवकीताईंना ऐकून पटलं. कलाकार कसा असावा, परफॉर्मन्स केव्हा होतो याबद्दल अगदी स्पष्ट विचार यातून मिळाले. सूर हा श्वासाचा शृंगार आहे, हे देवकीताईंनी उद्धृत केलेलं वाक्य अगदी खरोखर भावलं.

* स्वरांगी मराठे

आजचा व्हिवा लाउंजचा कार्यक्रम फारच छान होता. आम्हा नवीन पिढीच्या गायक होऊ पाहणाऱ्या मुलांसाठी हा कार्यक्रम खूप शिकवणारा होता. काही गैरसमज, काही शंका देवकीताईंबरोबरच्या आजच्या संवादामधून दूर झाल्या. आमचा मार्ग योग्य आहे का, आम्ही कुठे चुकत तर नाही ना, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली. आमची रियाजाची पद्धत, संगीतसाधनेला दिला जाणारा वेळ, प्राधान्यक्रम या सगळ्या गोष्टींबद्दल स्पष्टपणे त्या व्यक्त झाल्या. त्यामुळे मनात असलेल्या अनेक शंकांची उत्तरं मिळाली.

* सोनल आचरेकर

कोणत्याही कलाकाराने किती नम्र असावं हे देवकी पंडितांच्या बोलण्यातून व वागण्यातून जाणवलं. गुरूपुढे कसं केवळ शिकण्याच्या भावनेनंच जावं, हे त्यांच्या अनुभवातून कळलं. आपण कायम विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून शिकत राहिलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या तेवढय़ाच आत्मीयतेने गातात, तेवढीच मेहनत घेतात आणि पर्टिक्युलर असतात ही शिकण्यासारखी गोष्ट आहे.
(शब्दांकन : सायली पाटील, वेदवती चिपळूणकर
छाया : सम्जुक्ता मोकाशी, मानस बर्वे)
viva.loksatta@gmail.com