शेफ मधुरा बाचल

नोव्हेंबरचा शेफखाना खास आहे. कारण ‘मधुराज रेसिपी’च्या होमशेफ मधुरा मंगेश बाचल या सदरातून संवाद साधणार आहेत. मधुरा गेल्या दहा वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये सक्रियपणे काम करते आहे. तिच्या ‘मधुराज रेसिपी’ या यूटय़ूब चॅनेलमुळे आपण तिला ओळ्खतोच. यूएसमध्ये असताना २००९ साली तिने चॅनेलची सुरुवात केली. बघता बघता १० वर्षांत तिने नवऱ्याच्या साथीने मराठमोळा ब्रॅण्ड स्थापन केला. मधुराची ‘मधुराज रेसिपी’ या नावाने व्हेज आणि नॉनव्हेजची दोन चॅनेल्स आहेत. सोबतच तिचा मराठी पारंपरिक मसाल्यांचा ‘मधुराज रेसिपी मसाले’ या नावाचा उद्योगही आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्म आजच्या घडीला वाढत चाललेला आहे. तरुणांना अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. नोव्हेंबरच्या शेफखान्यात होमशेफ मधुरा आपल्याला वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये असलेलं फूडचं स्थान स्पष्ट करून सांगणार आहे. सोबतच तिच्या रुचकर रेसिपीची लज्जतही असणार आहे. चला तर मग वाट कसली बघताय, थेट जाऊ या आजच्या शेफखान्यात..

तुम्ही अस्सल खवय्ये आहात?  आणि तुम्हाला नुसतंच खायला नाही आवडत तर सर्वाना खाऊ  घालायलाही आवडतं किंवा मग बाहेरचे चटकमटक पदार्थ खायला आवडतात. आणि त्याचं समीक्षण करायला आवडत असेल आणि ती माहिती सर्वांपर्यंत पोहचावी असं वाटत असेल तर यूटय़ूब एक जबरदस्त व्यासपीठ आहे. आजची तरुण मुलं ही आवड एक उत्तम करिअर म्हणून पूर्ण वेळ जोपासू शकतात आणि तेही घर बसल्या.

आज आपण यूटय़ूबवर यशस्वी होमशेफ होण्यासाठी काय करता येईल याची सविस्तर माहिती करून घेऊ या.

सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, आता यूटय़ूबवर हजारो होमशेफ आहेत, मग मी यात वेगळं काय करू शकते, याचा विचार करा. सगळ्यात आधी तुमचं  ल्ल्रूँी काय आहे, कुठला चाहता वर्ग (ज्याला टीजी म्हणजे टार्गेट ऑडियन्स म्हटलं जातं) याचा विचार आणि सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. तुमचा टीजी एकदा फिक्स झाला की कुठल्या प्रकारचा आशय त्यांना भावेल याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण जेवण आणि त्याच्याशी निगडित आवडीनिवडी खूप व्यक्तिनिष्ठ असतात. जो काही पदार्थ आपण बनवत आहोत त्याचं प्रमाण अचूक हवं. आणि जे काही आपण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत ते सर्वांना वास्तविक उपयुक्त ठरलं पाहिजे.

एकदा का तुम्ही काय देणार आहात, यावरचं तुमचं काम पूर्ण झालं की पुढे मोर्चा वळतो ते म्हणजे तांत्रिक बाबींकडे. ‘यू इट विथ युवर आईज फर्स्ट’,  असं म्हटलं जातं. त्यामुळे जे काही आपण शूट करत आहोत त्याचे रंग, त्याचा पोत छान वाटला पाहिजे. म्हणजे पाहता क्षणी तो भावला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरा. तर एक चांगला कॅमेरा असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चांगला प्रकाश हेही गरजेचं आहे. तुम्हाला सुरुवातीला जर लाइटवर पैसे इन्व्हेस्ट करायचे नसतील तर नैसर्गिक प्रकाशातही उत्तम शूट होतं. त्याचबरोबर माईकही चांगला हवा. या अगदी मूलभूत गोष्टी जमा झाल्या की तुम्ही रेसिपी व्हिडीओ शूट करायला सज्ज झालात.

व्हिडीओ बनवून अपलोड झाला की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंबनेल. व्हिडीओजची थंबनेल आकर्षक हवी. त्यानंतर त्याला जे नाव देतो त्यातून साधारण लक्षात आलं पाहिजे की व्हिडीओमध्ये सगळ्यांना काय कन्टेन्ट मिळणार आहे. जाहिरात हाही खूप महत्त्वाचा भाग आहे. त्या व्हिडीओजची जाहिरात होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावरून तुमचा व्हिडीओ कितपत व्हायरल होईल ते ठरतं. सातत्य, नियमितपणाही अत्यंत गरजेचा आहे. कोलॅबरेशन हा एक डिजिटल जगतातला अत्यावश्यक ट्रेण्ड आहे.

मॉनिटायझेशन हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता यात एक प्रमुख स्रोत यूटय़ूबवर येतो. त्यामध्ये बरेच जाहिरातीचे प्रकार आहेत, त्यातून पैसे कमवू शकता. त्याचबरोबर ब्रॅण्ड स्पॉन्सरशिप, तुम्ही तुमची वेबसाईट बनवू शकता. त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. तुमचं स्वत:चं कुक बुक करू शकता. हॉटेल व्यवसाय करू शकता. करू तितकं कमीच.

प्रोटीन बार

साहित्य : १/२ कप खमंग भाजलेले शेंगदाणे, २ चमचे तेल, २ चमचे जवस, १ चमचा तीळ, बदाम २ चमचे, वॉलनट २ चमचे, काळे मनुके २ चमचे

मीठ चिमूटभर, ७ ते ८ सुकं अंजीर, खजूर ४ ते ५, १ कप ओट्स.

कृती : सगळ्यात आधी जवस, तीळ, ओट्स वेगवेगळे भाजून घ्यावेत. खजूर आणि अंजीर मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. जवसाची मिक्सरमध्ये पूड करून घ्यावी. भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये घालून त्यामध्ये २ चमचे तेल घालून पेस्ट करून घ्यावी. आता भाजलेले जिन्नस, खजूर पेस्ट, ओट्स, बदाम, वॉलनट, मनुके आणि चिमूटभर मीठ घालून गोळा करून घ्यावं. एका ट्रेमध्ये थापून २ ते ३ तास सेट करून मग त्याचे बार बनवावे.

प्रोटीनयुक्त मिश्र डाळींचे आप्पे

साहित्य : १/२ कप चणा डाळ, १/२ कप मूग डाळ, १ चमचा तूर डाळ, १ चमचा मसूर डाळ, ४ ते ५ लसूण पाकळ्या, २ ते ३ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली ढोबळी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून, १/४ चमचा हळद, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा जिरं, मीठ चवीपुरतं, १ चमचा इनो, १ चमचा पाणी.

कृती : सर्वप्रथम सर्व डाळी एकत्र करून, साधारण ४ ते ५ तास भिजवून घ्या. डाळी भिजवून झाल्या की त्यातलं पाणी उपसून काढा. भिजवलेल्या डाळी मिक्सरमध्ये घालून, त्यात आलं आणि लसूण घालून वाटून घ्यावं. त्यात सर्व उरलेले जिन्नस घालून मिसळून घ्यावे. अप्पे पात्रात तेल घालावं आणि खुसखुशीत आप्पे चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावेत.

रिच चॉकलेट स्मूथी

साहित्य : ६ बदाम, १ केळी, १ अंजीर, १ चमचा सब्जा, १ चमचा कोको पावडर, १/४ चमचा कॉफी पावडर.

कृती : सर्वप्रथम सब्जा आणि बदाम अर्धा तास पाण्यात भिजवून घ्यावेत. आता भिजवलेला सब्जा आणि बदामची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी. त्यात केळी, अंजीर, कोको पावडर आणि कॉफी घालून पुन्हा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. पौष्टिक शेक तयार आहे.

हाय प्रोटीन इडली किंवा हिरव्या मुगाची इडली

साहित्य : १ कप हिरवे मूग, १/२ कप उडीद डाळ, चवीनुसार हिरवी मिरची-लसूण ठेचा, चवीनुसार मीठ.

कृती : हिरवे मूग आणि उडीद डाळ स्वच्छ धुऊन वेगवेगळी भिजत घालावी. ५ ते ६ तास भिजल्यानंतर दोन्ही डाळी वेगवेगळ्या वाटून घ्याव्यात. आता मिश्रण एका बाउलमध्ये घेऊन रात्रभर आंबत ठेवावे. दुसऱ्या दिवशी त्यामध्ये मिरची, लसूण पेस्ट आणि मीठ घालून मिक्स करावे. आणि इडली बनवून चटणीबरोबर सव्‍‌र्ह करावी.

संकलन : मितेश रतिश जोशी

viva@expressindia.com