यंगिस्तानच्या राज्यातल्या फिटनेसच्या दुनियेत सध्या ‘झुंबा’या दोन शब्दांनी भारीच जादू केल्येय. झुंबाची सध्या सॉलिड क्रेझ आहे नि तो हिट होतोय. झुंबा या व्यायाम प्रकाराची सुरुवात अलबटरे पेरेझ या कोलंबियन नृत्य कलाकारानं केली. एकदा शिकवायला सुरुवात करण्याआधी एरोबिक्सची सीडी विसरल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्या वेळी त्यानं लॅटिन म्युझिकची सीडी लावली. त्या सीडीवर त्यानं डान्स स्टाइल एरोबिक्सचा क्लास घेतला. तेव्हापासून झुंबाची सुरुवात झाली.
 झुंबा गोल्ड, झुंबा टोनिंग, अ‍ॅक्वा झुंबा आदी झुंबाचे प्रकार आहेत. पुण्याच्या ‘सोलारिस फिटनेस वर्ल्डच्या ब्रँच मॅनेजर आभा नवरे म्हणतात की, ‘हा एक्झरसाइज करताना चार नवीन लोक भेटतात. म्युझिकवर नवीन काही तरी शिकायला मिळतं. सायकॉलॉजिकल रिफ्रेशमेंट होते. फायनली तो डान्स फॉर्म असतो. त्यामुळे डान्स आवडतो, त्यांना हा व्यायामही आवडतो. बहुतांशी मुलींना मुळात डान्स आवडतो. मग त्या डान्स फॉर्ममधल्या एक्झरसाइजची निवड करतात. हा रिगरस वर्कआऊट आहे. यात कॅलरीज बर्न होतात.’
 झुम्बा एक्झरसाइजसाठी शॉर्ट पॅण्ट टाइट्स्, स्कर्ट-लेगिंग्ज असे कम्फर्टेबल ड्रेस घालणं आवश्यक असतं. या अटायरमुळे लॅटिन अमेरिकन फिल येतो. ‘ऊर्जा आर्ट स्टुडिओच्या ऊर्जा देशपांडे- नरवणकर म्हणतात की, ‘डान्सकडे लोक फिटनेसच्या दृष्टीनं बघतात, तेव्हा काही वेळा वाद-विवाद होतात. डान्स ही एक कला आहे. माझा डान्स स्टुडिओ असल्यानं मी त्या दृष्टीनं त्याकडं पाहते. इथं डान्स शिकायला अधिकांश लोक येतात. हल्ली योगापेक्षा झुंबाला प्राधान्य दिलं जातंय.’