‘फेसबुक’वाली लव्हस्टोरी

मी ‘झी मराठी सारेगमप’च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. ‘सारेगमप’मुळे मिळालेल्या या प्रसिद्धी व यशाबरोबरच माझ्या आयुष्याचा सोबतीसुद्धा मला मिळाला

फेसबुक हा आमच्या नात्यातला महत्त्वाचा दुवा ठरला.. गायिका अनघा ढोमसे सांगतीये तिची लव्हस्टोरी!
मी ‘झी मराठी सारेगमप’च्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. ‘सारेगमप’मुळे मिळालेल्या या प्रसिद्धी व यशाबरोबरच माझ्या आयुष्याचा सोबतीसुद्धा मला मिळाला हे सांगितलं तर अनेकांचा विश्वास बसणार नाही!
   त्या(सन २००८)दरम्यान ओर्कुटच्या जोडीला फेसबुक या नव्या माध्यमाची मला ओळख झाली आणि फॅन्सपर्यंत पोहोचण्यासाठी मीदेखील त्याचा आधार घेतला. बरेचसे चाहतेच असल्याने अनोळखी माणसांच्या फ्रेंड रिक्वेस्टही अॅक्सेप्ट केल्या गेल्या! त्यातलंच एक नाव होतं ‘तेजस’चं. तेजस त्योवेळी तळेगावला हॉस्टेलमध्ये राहून शिकत होता आणि शनिवार-रविवारचे ‘सारेगमप’चे रिपीट टेलिकास्ट पाहून त्याला माझं नाव ओळखीचं झालं होतं!
रिक्वेस्ट अॅक्सेप्ट झाल्यावर हाय-हॅलो व अॅप्रिसिएशन करणारे त्याचे मेसेज व त्यावर माझा जेवढय़ास तेवढा रिप्लाय इतक्च काय ते बोलणं! त्यानंतर साधारण वर्षभराने त्याच्या कॉलेजच्या कल्चरल फेस्टिव्हलसाठी गेस्ट म्हणून येता येईल का अशी विचारणा त्याने केली. सगळे डिटेल्स घेऊन मी होकार कळवला आणि त्यानिमित्ताने एकमेकांचे नंबर एक्स्चेंज झाले. पुढे काही कारणाने तो कल्चरल इव्हेंट जरी कॅन्सल झाला तरी आमचे नंबर एकमेकांकडे तसेच राहिले!
अशातच एक दिवस ‘मी मुंबईला परीक्षेनिमित्त येतोय, भेटायला जमेल का?’ असा तेजसचा मेसेज आला. शक्यतो अनोळखी माणसांना आपण डायरेक्ट भेटणं टाळतो. परंतु का माहीत नाही आईशी बोलून मी त्याला ‘आपण भेटू या’ असा होकार कळवला. मग एका संध्याकाळी निर्मल लाइफस्टाइल श्रीनगरच्या सीसीडीमध्ये भेटायचं ठरलं. तो मुंबईत नवीन असल्याने त्याने फोन करून डिटेल्स विचारून आणि खरंच कोणी तरी मुलगीच आपल्याला भेटायला येणारे याची खात्री करून घेतली! (हो, म्हणजे भेटेपर्यंत ही नक्की अनघा ढोमसेच आहे ना? किंवा हे तिचं फेक प्रोफाईल तर नाही ना? अशा अनेक शंका त्याला आल्या होत्या, पण फायनली प्रत्यक्ष मला पाहून त्याचा जीव भांडय़ात पडला!)
आमची पहिली भेट १५-२० मिनिटांतच उरकली, परंतु आम्हा दोघांनाही बोलताना कम्फर्टेबल वाटत होतं हे महत्त्वाचं! दुसऱ्यांदा मात्र मग मी त्याला घरीच लंचसाठी बोलावलं. माझ्या घरच्यांशीही त्याची ओळख झाली. एक्झामनंतर तो पुण्यात आला, पण मेसेज व फोनवरून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतोच.
नंतर एकदा मी खूप आजारी पडले तेव्हा त्याने पाठवलेले ग्रीटिंग्ज-बुके, काळजीचे फोन आणि मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिलेली सरप्राईज व्हिजिट यामुळे आम्ही एकमेकांचे अजून छान मित्र झालो. त्याचा सच्चेपणा मला प्रचंड भावला. दरम्यान तो कामानिमित्त जर्मनीला गेला आणि आमचा मुंबई-पुणे कॉन्टॅक्ट इंटरनॅशनल झाला!
जर्मनीवरून आल्यावर मात्र एक साधारण बदल मला त्याच्या बोलण्या-वागण्यात जाणवू लागला. सकाळ-संध्याकाळ तो पाठवायचा त्या फॉरवर्डेड मेसेजमधून ‘िहट’ दिसायच्या. त्याला एक-दोनदा डायरेक्ट विचारूनही पाहिलं, पण मग तो विषय बदलायचा! एकेदिवशी मात्र मग मीच फोन करून ‘तेजस, डू यू लव्ह मी?’ असं विचारलं. एक मोठ्ठा पॉज घेऊन त्याने ‘येस’ असं उत्तर दिलं आणि मीही तत्काळ माझा होकार कळवून मोकळी झाले.
 त्यानंतर मात्र आम्ही लगेच आपापल्या फॅमिलीजना याची कल्पना दिली. मग सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. लग्नानंतर माझं करिअर, इतर गोष्टी तशाच राहतील, असा विश्वास तेजसने व त्याच्या आईबाबांनी दिला. मग एंगेजमेंट आणि लग्न असे सोपस्कार पार पाडून दीड वर्षांतच मी ‘अनघा ढोमसे’ची ‘अनघा इंगळे’ झाले!
 ‘‘आपल्या लग्नात आपण मार्क झुकेरबर्गचा फोटो ठेवू या, कारण त्याच्या कृपेनेच आपण भेटलोय,’’ असं आम्ही मजेने म्हणायचो. पण ही आगळीवेगळी स्टोरी असल्याने आम्ही व आमच्या फॅमिलीज ने मिळून ह्य़ाचा एक प्रीमॅरेज व्हिडीओ बनवला जो माझ्या ऑफिशिअल फेसबुक अकाऊंटवर पाहता येईल. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात हे ऐकून माहीत होतं, पण त्या फेसबुकवरही बांधल्या जाऊ शकतात, हे मनोमन पटलं. तेजस मरीन इंजिनीअर असल्याने सहा महिने तो घरापासून लांब असतो. त्यामुळे त्या अर्थाने ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिपसुद्धा आहे. पण त्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांना भरपूर मिस करतो व सहा महिन्यांनी नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडतो!
अनघा ढोमसे-इंगळे
(शब्दांकन – भक्ती तांबे)    viva.loksatta@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A facebook love story

ताज्या बातम्या