अवकाशाशी जडले नाते: आयएसएसची गौरवगाथा

‘‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन – आयएसएस’ म्हणजे फक्त मानवाने आतापर्यंत बनवलेली सगळय़ात जटिल संरचना नाही, तर ते आंतरराष्ट्रीय सहकार्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे.

relationship with space

विनय जोशी

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

‘‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन – आयएसएस’ म्हणजे फक्त मानवाने आतापर्यंत बनवलेली सगळय़ात जटिल संरचना नाही, तर ते आंतरराष्ट्रीय सहकार्याचे मूर्तिमंत प्रतीक आहे. एकत्र काम केल्यावर आपण काय साध्य करू शकतो याचे जिवंत उदाहरण आहे.’ कॅनडाचे अंतराळवीर ख्रिस हॅडफिल्ड यांचे हे उद्गार आयएसएसचे महत्त्व अधोरेखित करतात. फुटबॉलच्या मैदानापेक्षा मोठय़ा आकाराचे आणि ४२० टन वजनाचे हे स्पेस स्टेशन ७.६६ किलोमीटर प्रति सेकंद वेगाने पृथ्वीला फेऱ्या मारते आहे. हे भूपृष्ठापासून ३३० ते ४१० किमी उंचीवरून साधारण गोलाकार कक्षेत फिरते. २४ तासांत याच्या १६ पृथ्वी प्रदक्षिणा होतात. स्पेसक्राफ्ट स्टेशनपर्यंत सुरक्षित पोहोचण्यासाठी याची कक्षा ५१.६ अंशांनी कललेली ठेवली आहे. २ नोव्हेंबर २००० पासून गेली २२ वर्षे यात अंतराळवीरांचे वास्तव्य आहे.

स्पेस रेसच्या समाप्तीनंतर अवकाश संशोधनात सहकार्याचे पर्व सुरू झाले. प्रत्येकाने आपले स्पेस स्टेशन उभारण्यापेक्षा अनेक देशांनी एकत्र येऊन एकच स्पेस स्टेशन बनवले तर जास्त व्यावहारिक ठरेल हा विचार सुरू झाला. १९९३ मध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष अल गोर यांनी आणि रशियन पंतप्रधान व्हिक्टर चेरनोमार्डिन यांनी हातमिळवणी करत या जागतिक स्पेस स्टेशनची घोषणा केली. नासा (अमेरिका), रॉसकॉसमॉस (रशिया), जाक्सा (जपान), ईएसए (युरोप) आणि सीएसए (कॅनडा) या प्रमुख संस्था, १६ देश, काही खासगी कंपन्या, अनेक विद्यापीठ या सगळय़ांच्या प्रयत्नातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची कल्पना आकारात येऊ लागली.

या स्पेस स्टेशनच्या प्रचंड आकारामुळे हे स्टेशन तयार करून मग अंतराळात पाठवणे अशक्य होते. त्यामुळे अनेक मिशन्सच्या वारीत याचे सुटे भाग अंतराळात नेऊन तिथे त्याची बांधणी करण्यात आली. २० नोव्हेंबर १९९८ ला स्टेशनच्या बांधकामाची सुरुवात झाली. ‘झार्या’ हे पहिले मोडय़ुल प्रोट्रॉन रॉकेटने अंतराळात दाखल झाले. पुढे त्याला ‘युनिटी’ आणि ‘झ्वेदा’ मोडय़ुल जोडले गेले. नंतर ‘प्रोग्रेस’ या मानवरहित यानातून इतर उपकरणे, खाद्यपदार्थ, इंधन इत्यादी पोहोचवले गेले. अखेर २ नोव्हेंबर २००० ला स्टेशनमध्ये राहण्यासाठी पहिले तीन अंतराळवीर दाखल झाले. त्यांनी चार महिन्यांत स्टेशनच्या यंत्रणांची जुळणी केली. फेब्रुवारी २००१ मध्ये अमेरिकेची डेस्टिनी लॅबोरेटरी स्टेशनला जोडली गेली. २००७ मध्ये ‘हार्मनी’ हे दुसरे, तर २०१० मध्ये ‘ट्रॅंक्विलिटी’ हे तिसरे नोड मोडय़ूल जोडले गेले. अनेक अडचणींना तोंड देत अखेर २०११ मध्ये आयएसएस पूर्णपणे कार्यान्वित झाले आणि तेव्हापासून वैज्ञानिक संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी व्यासपीठ म्हणून ते कार्यरत आहे.

आयएसएस रशियन सेगमेंट आणि यूएस ऑर्बिटल सेगमेंट या दोन मुख्य विभागांमध्ये विभागले गेले आहे. रॉसकॉसमॉसचे ‘झार्या’ (अर्थ : पहाट) हे मोडय़ुल फंक्शनल कार्गो ब्लॉक म्हणून ओळखले जाते. स्टेशनबांधणीच्या प्रारंभिक टप्प्यात झार्याचा उपयोग नियंत्रण केंद्र म्हणून होत होता. ‘झ्वेज्दा’ हे सव्र्हिस मोडय़ुल रशियन विभागासाठी कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून काम करते. ‘पीर्स’ आणि ‘पॉईस्क’ हे रशियन एअरलॉक मोडय़ुल आहेत. ‘रासव्हेट’ या मोडय़ुलचा उपयोग साठवणूक आणि भेट देणाऱ्या स्पेसक्राफ्टच्या जोडणीसाठी होतो. यूएस ऑर्बिटल सेगमेंटमध्ये नासा आणि इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांनी लॉन्च केलेल्या मॉडय़ुल्सचा समावेश होतो. यात युनिटी, हार्मनी आणि ट्रॅंक्विलिटी हे तीन नोड मोडय़ुल असून त्यांना इतर मॉडय़ुल्स जोडले गेले आहेत. अमेरिकेची ‘डेस्टिनी’, युरोपची ‘कोलंबस’ आणि जपानची ‘किबो’ (अर्थ : आशा) या प्रयोगशाळांमध्ये अंतराळवीर विविध प्रयोग करतात. ‘क्वेस्ट’ या एअरलॉक मोडय़ुलमुळे अंतराळवीरांना स्टेशनबाहेर जाऊन स्पेसवॉक करणे शक्य होते. ट्रॅंक्विलिटी नोडला पृथ्वीच्या बाजूने ‘क्यूपोला’ (इटालियन अर्थ घुमट) ही सात खिडक्यांची घुमटाकार वेधशाळा आहे. यातून सतत पृथ्वीचे विहंगम दृश्य दिसत असते. आयएसएसवर ‘कॅनडार्म-२’ आणि ‘जेईआरएमएस’ हे दोन रोबोटिक आर्म आहेत. ‘कॅनडार्म’ या कॅनेडियन स्पेस एजन्सीने तयार केलेल्या यांत्रिक हाताचा उपयोग स्टेशनभोवती सामान आणि उपकरणे हलविण्यासाठी तसेच स्पेसवॉकदरम्यान अंतराळवीरांच्या मदतीसाठी होतो.

इतक्या प्रचंड संरचनेला ऊर्जापुरवठा करण्याचे कार्य दोन्ही बाजूला असलेले सौरपंखे करतात. ९० मिनिटांच्या कक्षेत आयएसएस ३५ मिनिटे पृथ्वीच्या सावलीत जाते तेव्हा स्टेशनला रिचार्जेबल निकेल-हायड्रोजन बॅटऱ्यांपासून ऊर्जा पुरवली जाते. अंतराळातील शून्यवत गुरुत्व, हानीकारक प्रावरणे, वातावरणाचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीत अंतराळवीरांना सुरक्षित ठेवण्यासाठी स्टेशनमध्ये अनेक जीवनरक्षक सिस्टीम आहेत. वातावरण नियंत्रण प्रणालीने स्टेशनच्या आत योग्य दाब, तापमान, आद्र्रता राखत हवा खेळती ठेवली जाते. ऑक्सिजन जनरेशन सिस्टीम ही प्रणाली इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेद्वारे पाण्यापासून ऑक्सिजन तयार करते. ‘झ्वेज्दा’मधील वोझदुख यंत्रणेद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतला जातो. वॉटर रिकव्हरी सिस्टीममध्ये सांडपाणी, बाष्प यांच्यापासून पुन्हा शुद्ध पाणी बनवले जाते.

आयएसएस अनेक अंतर्गत आणि बाह्य कम्युनिकेशन सिस्टीमने सुसज्ज आहे. स्पेस नेटवर्कद्वारे भूस्थिर कक्षेतील उपग्रहांच्या माध्यमातून पृथ्वीवरच्या नियंत्रण केंद्रांशी संपर्क साधला जातो. रशियन सेगमेंट झ्वेज्दावर बसवण्यात आलेल्या लीरा अँटेनाद्वारे रशियन केंद्राच्या संर्पकात असते. स्टेशनला भेट द्यायला येणाऱ्या स्पेसक्राफ्टशी संपर्क ‘सी२व्ही२’ या कम्युनिकेशन सिस्टीमद्वारे होतो. स्थानकाबाहेर काम करणाऱ्या अंतराळवीरांशी यूएचएफ रेडिओने संपर्क साधला जातो. स्पेसक्राफ्टच्या साहाय्याने अंतराळवीर आणि सामान यांची पृथ्वीवरून स्टेशनमध्ये ने-आण केली जाते. रशियाच्या ‘सोयूझ’ आणि ‘प्रोग्रेस’ स्पेसक्राफ्टबरोबरच सध्या खासगी कंपन्यांच्या स्पेसक्राफ्टचादेखील उपयोग होतो. स्पेसएक्सचे ‘क्रू ड्रॅगन’ सात अंतराळवीरांना घेऊन जाऊ शकते. सामान वाहतुकीसाठी नॉर्थरोप ग्रुमनने विकसित केलेले ‘सिग्नस’ आणि स्पेसएक्सचे ‘ड्रॅगन’ ही मानवरहित कार्गो स्पेसक्राफ्ट वापरली जातात.
संशोधन हे आयएसएसचे प्रमुख उद्दिष्ट आहे. पृथ्वीवरील सगळय़ा क्रिया या गुरुत्वाकर्षणाने प्रभावित होत असतात. गुरुत्वाकर्षणामुळे अनेक पदार्थाची रचना बदलते. दोन किंवा अधिक घटक एकत्र तापवून जेव्हा संयुगे बनवली जातात तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे तुलनेने जड पदार्थ खाली आणि हलके वर येतात आणि संयुगांच्या रचनेत दोष राहतात. स्पेस स्टेशनमधील शून्यवत गुरुत्वाकर्षण अनेक पदार्थाच्या निर्मितीसाठी आदर्श अवस्था उपलब्ध करून देते. या स्थितीत बनवलेल्या संयुगात वेगवेगळय़ा घनतेचे पदार्थ बेमालूमपणे मिसळू शकतात. तसेच शून्यवत गुरुत्वाकर्षणात पदार्थ कुठल्याही कंटेनरशिवाय अधांतरीच तापवता येतो. त्यामुळे त्यात इतर भेसळ होत नाही. इलेक्ट्रॉनिक्स, बायोटेक्नॉलॉजी, औषधनिर्मिती, मटेरियल सायन्स अशा अनेक क्षेत्रांतील संशोधन म्हणूनच आयएसएसमध्ये केले जाते. सेमीकंडक्टर हे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा प्राण आहेत. स्पेस स्टेशनवर अत्यंत शुद्ध स्फटिकाचे आणि उच्च गुणवत्तेचे सेमीकंडक्टर बनवणे शक्य होते. इथे बनवलेले मायक्रोप्रोसेसर कॉम्प्युटर आणि इतर गॅझेट्सना सुपरफास्ट बनवू शकतात. अंतराळात बनवलेल्या सोलर सेलची कार्यक्षमता ३० टक्क्यांनी जास्त असते. अंतराळात बनवलेले फायबर ऑप्टिक्स दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवू शकतात. अनेक दुर्धर रोगांशी लढण्यासाठी अधिक कार्यक्षम औषधे अंतराळात निर्माण करता येतात. इलेक्ट्रोफोरेसिस प्रक्रियेत पेशी अलग करताना पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे अडथळा येतो. अंतराळात ही अडचण दूर होत अधिक चांगले संशोधन करता येते. अंतराळात अधिक कणखर मिश्र धातू बनवता येऊ शकतात. भूपृष्ठापासून ४०० किमी उंचीवरून पृथ्वीचे निरीक्षण करत वातावरण, प्रदूषण, हवामान बदल यांचा अभ्यास करता येतो. आयएसएसमध्ये चालणाऱ्या या संशोधनातून भविष्यात नवी तंत्रज्ञान क्रांती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बऱ्याच वेळा रात्री आपल्याला पृथ्वीवरून आयएसएस दिसू शकते. त्याच्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे ते एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे चमकत वेगाने आकाशातून जाते. आयएसएस ट्रॅकरसारख्या अॅपद्वारे आयएसएस दिसण्याची वेळ आणि दिशा याची पूर्वकल्पना मिळू शकते. यापुढे एखाद्या रात्री चमचमत्या आयएसएसला बघताना त्याची ही गौरवगाथा नक्की आठवेल!

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 08:31 IST
Next Story
इंडो-वेस्टर्नचा खणखणाट
Exit mobile version