चित्रपट – मालिकांपासून ते अगदी निवेदनापर्यंत स्वत:ची वेगळी ओळख आणि शैली निर्माण करणारा कलाकार म्हणजे अभिजीत खांडकेकर. कायम प्रयोगशील असणार्या आणि चौफेर मुशाफिरी करणार्या अभिजीतच्या आयुष्यात पुस्तकांना वेगळं असं स्थान आहे, अगदी लहानपणापासूनच पुस्तकं त्याच्या जडणघडणीचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. ‘वाचन हे तुम्हाला माणूस म्हणून समृद्ध करतं. वाचनामुळे तुमची वैचारिक बैठक तयार होते. तसंच, तुमच्या एकदंरीतच विचारसरणीवर तुम्ही वाचलेल्या पुस्तकांचा प्रभाव असतो’, असं अभिजीत म्हणतो.
तुमचं क्षेत्र कोणतंही असो किंवा तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवायची असो, वाचन हे गरजेचं आहे. भले त्याचं माध्यम निराळं असेल तरीही चालेल. मग किंडलपासून ते अगदी ई-बुक्सपर्यंत कुठल्याही माध्यमातून वाचा, पण तुम्ही वाचलेला प्रत्येक तुकडा तुम्हाला समृद्ध करत जातो, असं तो ठामपणे सांगतो. अभिजीतला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. ‘लहानपणी मी कायम वाचनात रमलेला असायचो. माझं बालपण मराठवाड्यात गेलं. मला आठवतं की मी फार लहान असतानाच माझी अक्षरांशी ओळख झाली होती आणि त्यामुळे भाषेशी गट्टीही आपसूकच जमली. आमच्या घरी सगळ्यांनाच वाचनाची आवड असल्याने नकळतच मला वाचन आवडत गेलं आणि पुढे कधीतरी त्या आवडीचं रूपांतर छंदात झालं. हा छंद इतका होता की घरात अगदी सर्वत्र पुस्तकं ठेवलेली असत. कोणत्याही खोलीत वगैरे गेलं तर तिथलं पुस्तक उचलून वाचायला बसता येत असे,’अशी आठवण त्याने सांगितली. पुढे त्याचं कुटुंब नाशिकला राहायला आलं, मात्र त्याची वाचनाची आवड कायम राहिली. त्याचा पुस्तक वाचनाचा वेगही प्रचंड आहे. याबद्दलही त्याने एक आठवण सांगितली. ‘आम्ही नाशिकला राहायला आल्यानंतर मी तिथल्या वाचनालयात जाऊ लागलो. आणि तिथून वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तकं मी वाचण्यासाठी घरी आणायचो. माझा वाचनाचा वेग अधिक असल्याने माझं वाचून झालं की मला ते पुस्तक बदलण्याची घाई असायची आणि माझ्या बहिणीचं आणि आईचं ते पुस्तक वाचून झालेलं नसे. मग माझ्या वडिलांनी माझा वाचनाचा वेग पाहून मला दुसर्या वाचनालयाचं सभासदत्व मिळवून दिलं’, असं त्याने सांगितलं.
अभिजीतला विज्ञान कथा वाचायलाही आवडतात. ‘आकाशाशी जडले नाते’ हे डॉ. जयंत नारळीकर यांचं पुस्तक त्याने आणि त्याच्या मित्रांनी मिळून खरेदी केलं होतं आणि मग प्रत्येकाने ते आपल्या सोयीनुसार वाचून पूर्ण केलं होतं, असं त्याने सांगितलं. वाचन आपल्या व्यक्तित्त्वाला घडवतं, असं त्याचं मत आहे. तो म्हणतो, ‘तुम्ही काहीही वाचा, अगदी वर्तमानपत्रं, मासिकं किंवा पुस्तकं. तुम्ही जे वाचलं आहे ते केव्हाही वाया जात नाही. ते तुम्हाला पुढे कधीतरी उपयोगी पडतं.’ महाविद्यालयात शिकत असताना त्याला सैन्यदलात जायची फार इच्छा होती. अशा वेळी दैनंदिन घडामोडी माहीत असणं फार गरजेचं होतं. त्यावेळी त्याने ‘द वीक’, ‘रीडर्स डायजेस्ट’, ‘मनोरमा इयर बुक’ अशी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. अभिजीत म्हणतो, ‘या वाचनामुळे माझ्यात सगळ्यात मोठा बदल कुठला झाला असेल तर, पूर्वी मी केवळ मनोरंजनासाठी पुस्तकं वाचायचो. पण, दैनंदिन घडामोडींवरची पुस्तकं वाचायची सवय झाली, त्यानंतर मी हळूहळू ज्या पुस्तकातून आपल्याला अवांतर माहिती मिळेल, अशी पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि मग मी विविध प्रकारचं साहित्य वाचू लागलो. त्याचा फायदा असा झाला की कितीतरी विषयांवर मी माझ्या वडिलांशी सहज चर्चा करू लागलो. आपण जेव्हा विविध विषयांवर वाचन करतो तेव्हा अगदी कोणत्याही वयोगटातील व्यक्तींशी आपण सहज चर्चा किंवा गप्पा मारू शकतो’.
सध्या अभिजीत ‘दंशकाल’ ही हृषीकेश गुप्ते लिखित कादंबरी वाचतोय, तसंच ‘तत्त्वभान’ हे लेखक श्रीनिवास हेमाडे यांचं पुस्तकही तो वाचत आहे. यात तत्त्वज्ञान खर्या आयुष्यात कसं वापरावं हे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्याने या पुस्तकाविषयी बोलताना सांगितलं. तो मनोरंजन क्षेत्रात आल्यापासून कामाचे व्याप आणि इतरही धांदलीत त्याचं वाचन काहीसं कमी झालं. त्याला प्रवासाचीही आवड आहे. सुरुवातीला जेव्हा त्याला कामामुळे इतर कुठेही प्रवास करणं शक्य होत नसे. अशा वेळी तो प्रवासवर्णनं वाचून आनंद मिळवत असे. यात पु. ल. देशपांडे तसंच, डॉ. मीना प्रभू यांच्या पुस्तकांचा समावेश असायचा. पुलंच्या शैलीविषयी सांगताना तो म्हणाला, ‘मी पुढे जेव्हा लंडनला भेट दिली तेव्हा असं लक्षात आलं की पु. ल. देशपांडे यांनी लंडनवर किती चपखल लिहिलं आहे. त्यांची अफाट निरीक्षण शक्तीही आपल्याला त्यांच्या साहित्यातून जाणवते.’ याचबरोबर आत्मचरित्र हा साहित्यप्रकारही त्याला भावतो. यात प्रसिद्ध कलाकारांची आत्मचरित्रं वाचायला त्याला आवडतात. सचिन पिळगावकर यांचं ‘हाच माझा मार्ग’, दादा कोंडके यांचं ‘एकटा जीव’ यांसह काही आत्मचरित्रं अभिजीतने वाचली आहेत. याव्यतिरिक्त कृष्णात खोत लिखित ‘रिंगाण’, नंदा खरे यांचं ‘अंताजीची बखर’, गिरीश कुबेर यांचं ‘अग्रलेख’ तसंच ‘एका तेलियाने’ ही अभिजीतची काही आवडती पुस्तकं आहेत.
मनोरंजन क्षेत्रात किंवा अगदी एक उत्तम निवेदक म्हणून जर कारकीर्द घडवायची असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही, असं अभिजीतचं ठाम मत आहे. कोणत्याही कार्यक्रमाचं निवेदन करत असताना तुम्हाला वाचलेल्या पुस्तकांचे अनेक संदर्भ सहजच आठवत जातात. पुस्तकांमुळे तुम्हाला वेगळ्या काळाची किंवा एखाद्या व्यक्तीविषयीची कितीतरी नवी माहिती मिळते. मी आशा भोसले यांची एकदा मुलाखत घेतली होती. त्यावेळीही मी यांच्याविषयी जे वाचलं होतं त्याचा फायदा मला मुलाखत घेताना झाला. मनोरंजन क्षेत्रातील जितेंद्र जोशी, अश्विनी शेंडे अशा इतरही कलाकारांशी साहित्य-कविता यावरील गप्पा या आनंददायी असतात, असं त्याने सांगितलं. ना. धों. महानोर, शांता शेळके, गुरू ठाकूर ही काही त्याची आवडती कवी मंडळी आहेत. बुक कॅफे किंवा पुस्तकांची दुकानं दोन्हीकडे अभिजीत रमतो. ‘पृथ्वी कॅफे’ हा त्याचा आवडता कॅफे आहे. मॉल आणि इतर ठिकाणी असणार्या पुस्तकांच्या दुकानात प्रादेशिक भाषांची पुस्तकं फार कमी असतात, मात्र मराठी पुस्तकंही अशा ठिकाणी अभावानेच पाहायला मिळतात, असं त्याने सांगितलं. अशा ठिकाणी मराठी पुस्तकांची संख्या कमी असल्याबद्दल त्याने खंत व्यक्त केली.
कलाक्षेत्रात व्यग्र असणारा अभिजीत वाचनही शिस्तीने करतो. त्यासाठी एखादं पुस्तकं वाचायला घेतलं की त्याची पृष्ठसंख्या आणि दररोज किती पानं वाचायची याचं गणित लक्षात घेऊन तो वाचन करतो. जुनी पुस्तकं, त्यावर लिहिलेला मजकूर किंवा कुणी कुणाला ती केव्हा भेट दिली आहेत, असे उल्लेख तो अगदी रमून वाचतो आणि मग कुणीही त्याला पुस्तक भेट म्हणून देत असेल तर त्यावर आवर्जून तो त्यांच्याकडून नाव आणि तारीख घालून घेतो. अशा आठवणी आपल्याकडे कायम राहतात. पुस्तकं वाचताना त्या आनंद देतात, असं त्याचं मत आहे. पुस्तकं ज्ञानही देतात आणि मनोरंजनही करतात. पुस्तकं तुम्हाला एका जागी बसून जग फिरण्याचा आनंद देतात. तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला एका वेगळ्या जगाची सफर
