‘‘लोकांना स्क्रीन इतकी का आवडते आहे की ते तहानभूक विसरून त्यातच गुंग होतात?’’ ७० च्या दशकात अमेरिकन समाजात टेलिव्हिजन झपाट्याने लोकप्रिय होऊ लागला होता, तेव्हा जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेल्या जेरी मॅन्डर यांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्याचं प्रमुख उत्तर होतं ‘कंटेंट’. अनेक वर्षांच्या अनुभवातून त्यांना टीव्हीचा समाजावर होणारा सूक्ष्म पण खोल प्रभाव जाणवला आणि त्यांनी याविषयी जनजागृतीचा मार्ग स्वीकारला. ‘फोर आर्ग्युमेंट्स फॉर द एलिमिनेशन ऑफ टेलिव्हिजन’ या आपल्या प्रसिद्ध पुस्तकात त्यांनी अधोरेखित केलं की, टीव्ही हे फक्त मनोरंजनाचं साधन नसून मानवी विचारशक्ती, नातेसंबंध आणि सामाजिक जाणिवांवर प्रभाव टाकणारं माध्यम आहे.
आज पाच दशकांनंतर टीव्हीऐवजी मोबाइल आहे, पण प्रश्न तोच आहे आणि उत्तरही तेच ‘कंटेंट’. चॅटिंग, कॉलिंग किंवा गेमिंग यापलीकडे पाहिलं, तर मोबाइलचा बहुतांश वापर ‘कंटेंट’भोवतीच फिरताना दिसतो. कुणी रील्स स्क्रोल करतंय, कुणी यूट्यूबवर पॉडकास्ट ऐकतंय, तर कुणी फेसबुकवरील पोस्ट्स वाचतंय. ही नवी ‘कंटेंट संस्कृती’ आता आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग झाली आहे. फरक इतकाच की, पूर्वीपेक्षा आजच्या काळातील कंटेंटचं स्वरूप, गती आणि प्रभाव अनेक पटींनी वाढले आहेत.
काही वर्षांपूर्वी कंटेंट म्हणजे टीव्हीवरील कार्यक्रम, बातम्या, मालिका हे सर्व काही ठरावीक वेळी, ठरावीक संस्थांमार्फत लोकांपर्यंत पोहोचत आणि घरातले सगळे मिळून ते बघत. आजच्या डिजिटल जगात कंटेंटचं स्वरूप पूर्णत: बदललं आहे. आता प्रत्येकाची स्क्रीन, बघितला जाणारा कंटेंट वेगळा. कंटेंट बनवणं आता ठरावीक लोकांची मक्तेदारी न राहता कोणालाही स्वत:चं विचारविश्व, कलागुण किंवा दैनंदिन अनुभव जगासमोर मांडता येतात.
यूट्यूबवरील विविध विषयांवरील माहितीपर किंवा मनोरंजक व्हिडिओ, ओटीटीवरील वेब सीरिज, पॉडकास्ट्स, सोशल मीडियावरील पोस्ट्स, मिम्स हे सर्व डिजिटल कंटेंटचे लोकप्रिय प्रकार आहेत. यातील सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणजे इंस्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉर्ट्ससारखे शॉर्ट-फॉर्म व्हिडीओ. मेटा इंडियाने देशातील ३३ शहरांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार तब्बल ९७ टक्के भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांपैकी ९२ टक्के लोकांची पहिली पसंती इंस्टाग्राम रील्सना आहे.
इतका प्रचंड कंटेट आजच्या काळातील नवे कथाकथनकार म्हणजेच सध्या भारतात असलेले ३५ ते ४५ लाख कंटेंट क्रिएटर्स बनवतात. कंटेंट क्रिएटर संस्कृतीचा सर्वात मोठा सकारात्मक पैलू म्हणजे स्व-अभिव्यक्तीच्या सहज संधी. प्रत्येकाला आपलं मत, कला, अनुभव, कल्पना जगासमोर मांडण शक्य झालं आहे. एखादा तरुण गिटार वाजवत स्वत:चे कव्हर सॉन्ग अपलोड करतो, एखादी गृहिणी पारंपरिक पाककृती शेअर करते. रील्स अपलोड करा आणि काही वेळात हजारो लोकांपर्यंत पोहोचा. यासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
मनोरंजन एवढाच कंटेंट निर्मितीचा उद्देश नाही. अनेक क्रिएटर्स या माध्यमाचा उपयोग ज्ञानवाटपासाठी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रभावीपणे करत आहेत. नवीन टेक्नॉलॉजी, इतिहास, पर्यावरण, आरोग्य, विज्ञान, आर्थिक साक्षरता अशा अनेक विषयांवरील सखोल माहिती सोप्या आणि आकर्षक पद्धतीने आज इन्फोग्राफिक रील्स, यूट्यूब शॉर्ट्स किंवा पॉडकास्ट्सद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते. अनेक क्रिएटर्स सामाजिक भान जपत जनजागृतीसाठी या माध्यमाचा प्रभावी वापर करत आहेत.
२०२५ मध्ये ‘रिसर्चगेट’वर प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, भारतातील इंस्टाग्रामवरील पर्यावरण-जागरूक क्रिएटर्सच्या रील्समुळे शहरांतील तरुणांच्या पर्यावरणपूरक सवयींमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंटेंटमध्ये आता स्थानिक भाषेतून, आपल्या गावांचं, खाद्यासंस्कृतीचं, परंपरांचं आणि सणांचं सौंदर्य जगासमोर मांडलं जातं आहे. कुणी कोकणातील रम्य जीवन दाखवतंय, कुणी अहिराणी बोलीतून खळखळून हसवतंय. नाशिकचे मिसळ जॉइंट्स असोत, अहिल्यानगरमधले अनवट किल्ले असोत की विदर्भातील अपरिचित मंदिरे, या सगळ्या रील्समधून भारताचा खरा, स्थानिक आणि जिवंत चेहरा डिजिटल जगात दिसू लागला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कंटेंट निर्मिती आता आवडीपलीकडे करिअरची नवी दिशा ठरू लागली आहे.
अनेक ब्रँड्स मोठ्या सेलिब्रिटींपेक्षा स्थानिक आणि विश्वासार्ह कंटेंट क्रिएटर्ससोबत कोलॅबरेशन करतात, कारण हे क्रिएटर्स आपल्या फॉलोअर्ससोबत अधिक जवळचं, विश्वासाचं नातं निर्माण करतात. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून ब्रँडचा संदेश अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचतो. पण अर्थात या सकारात्मक गोष्टींसोबत काही नवी आव्हानं आणि समस्यादेखील निर्माण होत आहेत. इन्फ्लुएंसर आणि फॉलोअर्स दोघांच्याही मानसिकतेवर त्याचा ठसा उमटताना दिसतो आहे. कंटेंट क्रिएटर्सच्या दृष्टीने सतत ‘रिलेव्हंट’ राहण्याचा दबाव हा आज सर्वात मोठं आव्हान बनला आहे. प्रेक्षकांच्या बदलत्या अपेक्षा, नवनवीन ट्रेंड्स आणि अल्गोरिदमचं गुंतागुंतीचं गणित या सगळ्याशी जुळवून घेण्यासाठी रोज काही तरी नवीन, वेगळं आणि आकर्षक पोस्ट करणं ही एक न संपणारी शर्यत बनली आहे.
लाइक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या शर्यतीत टिकून राहण्याच्या प्रयत्नात अनेक क्रिएटर्सना वारंवार मानसिक थकव्याला सामोरं जावं लागतं. अनेकांसाठी ‘रील’ हेच ‘रिअल लाइफ’ बनून जातं. सतत वाढत्या आकड्यांचा दबाव, अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने होणारी चिडचिड आणि २४ तास ऑनलाइन राहण्याची गरज या सगळ्यामुळे तणाव, अस्वस्थता आणि थकवा वाढतो. लोकप्रियता वाढली की टीकेचं प्रमाणही वाढतं, पण कधी कधी ही टीका व्यक्तिगत स्तरावर घसरते. अनेक कंटेंट क्रिएटर्सना नकारात्मकता, द्वेषपूर्ण कमेंट्स आणि सायबरबुलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा या सगळ्याची परिणती चिंता आणि नैराश्य यात होते. इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याच्या नैराश्यात एप्रिल २०२५ मध्ये २४ वर्षीय इन्फ्लुएंसर मिषा अग्रवालने आत्महत्या केली. हे उदाहरण डिजिटल जगतातील मानसिक दडपण किती तीव्र असू शकतं, याचं धक्कादायक दर्शन घडवतं.
याच घोडदौडीत बऱ्याचदा अनेकांचं भान हरपतं आणि कंटेंटचा दर्जा खालावतो. ‘‘घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणं। येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत।’’ प्रसिद्धीच्या हव्यासावर हा खरं तर टोमणा. घडा फोडा, कपडे फाडा, गाढवावर बसलं तरी चालेल, पण प्रसिद्ध व्हा… असं सुभाषितकाराने उपहासाने म्हटलं असलं तरी आज अनेक कंटेंट क्रिएटर्स हे शब्दश: घेतल्यासारखं वागताना दिसतात. कंटेंट म्हणून चित्रविचित्र हावभाव, सुमार विनोद, बॉडी शेमिंग, द्वेषकारक भाषा, शिव्या असं काहीही चालतंय.
गेल्या महिन्यात नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हेगारीचं उदात्तीकरण करणाऱ्या अनेक कंटेंट क्रिएटर्सना तुरुंगाची हवा खायला पाठवलं.
माहितीपर कंटेंट बनवणाऱ्या क्रिएटर्सनी खरं तर ‘अभ्यासोनि प्रकटावे’ ही समर्थांची उक्ती मूलमंत्र मानायला हवी. कारण माहितीचं आकर्षण जितकं मोठं, तितकी जबाबदारीही मोठी. पण सबसे तेज माहिती देण्याच्या नादात अनेक जण विषयाचा सखोल अभ्यास न करता, वरवरची किंवा अर्धवट माहिती देताना दिसतात. इतिहास, धर्म, आरोग्य किंवा विज्ञान अशा संवेदनशील विषयांवर कधी कधी चक्क चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवली जाते. काही क्रिएटर्स या खोट्या प्रसिद्धीच्या नादात स्वत:लाच सेलिब्रिटी समजू लागतात. हळूहळू ते खऱ्या आयुष्यापासून दूर जात आभासी जगातच जगू लागतात. प्रसिद्धीच्या ओघात अनेक क्रिएटर्स नकळत आपलं वैयक्तिक आयुष्य सगळ्यांसमोर मांडू लागतात. यातून घर, कुटुंब, नाती अगदी भावनासुद्धा ‘कंटेंट’ ठरतात.
ज्यांच्यासाठी हा इतका घाट घातला जातो, त्या आपण प्रेक्षकांवरही या ‘कंटेंट संस्कृती’चे परिणाम उमटू लागले आहेत. इन्फॉर्मेशन ओव्हरलोड हा त्यातील एक प्रमुख परिणाम आहे. इतका कंटेंटचा भडिमार होतो की शेवटी आपण काय पाहिलं, हेच आठवेनासं होतं. कंटेंटच्या मोहात सतत रील्स स्क्रोल करत मेंदू शिणवणं ही अनेकांसाठी नित्याची सवय बनली आहे. पण यातून होणारा ब्रेनरॉट ही गंभीर समस्या बनते आहे. जेरी मॅन्डर यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवलं आहे की, खरं तर जाहिरात हाच टीव्हीचा मुख्य कंटेंट आहे. लोकांनी जाहिराती पाहाव्यात म्हणून त्यांच्या दोन जाहिरातींच्या मध्ये इतर कार्यक्रम पेरलेले असतात. आजच्या इन्फ्लुएंसर कल्चरमध्येही अनेकदा हाच प्रकार दिसून येतो.एखाद्या प्रॉडक्टचं प्रमोशन करण्यासाठी त्याला अनुरूप कंटेंट खास तयार केला जातो. मनोरंजनाच्या आडून मार्केटिंग होतं आणि फॉलोअर नकळत ग्राहक बनतो.
आपल्या विचारांवर, आवडीनिवडींवर आणि निर्णयप्रक्रियेवर कंटेंटचा नकळत होणारा परिणाम ही आजची एक महत्त्वाची बाब बनली आहे. अगदी पाणीपुरी कुठली खावी, कोणता फोन घ्यावा, मत कुणाला द्यावं अशा छोट्या ते मोठ्या निर्णयांवरही कंटेंटचा प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागला आहे. प्रसिद्ध इन्फ्लुएंसर हे आजच्या तरुणाईचे नवे आदर्श ठरू पाहत आहेत. या माध्यमातून मिळणारी प्रसिद्धी आणि त्यातून येणारा पैसा पाहून अनेक तरुणांना हे एक आकर्षक करिअर वाटू लागलं आहे. पण या चकाकीमागचे खाचखळगे, अस्थैर्य आणि धोके लक्षात न घेता यात उतरणं किंवा यासाठी आयुष्याची पायाभरणीची वर्षं खर्ची घालणं हे अनेक वेळा धोक्याचं ठरू शकतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कंटेंट क्रिएटर आणि कन्टेन्ट व्ह्यूअर दोघांनीही जबाबदारीचं भान आणि शहाणीव राखणं ही आजच्या डिजिटल युगाची गरज बनली आहे. क्रिएटर्सनी आपल्या प्रत्येक पोस्टचा, व्हिडीओचा किंवा रीलचा कुणावर तरी परिणाम होत असतो याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. अभ्यास करणं, माहितीची सत्यता तपासणं, अपमानास्पद भाषा, द्वेषपूर्ण विचार टाळणं ही नैतिक जबाबदारी ठरते. दुसरीकडे, प्रेक्षकांनीही नेटवर असणारं सगळंच पाहण्याची गरज आहे का? हा विचार करायची गरज आहे. इंस्टाग्रामवर सध्या तब्बल एक अब्जांहून अधिक रील्स आहेत. एखाद्याने दररोज अगदी हजार रील्स पाहायचे ठरवले तरी हे रील्स संपवायला सुमारे २७४० वर्षं लागतील! तोपर्यंत अब्जावधी नवीन रील्स तयार झाले असतील. त्यामुळे किती आणि काय पाहावं याचा विवेक गरजेचा. अख्खं जग कंटेंटदिवाणे असलं तरी कंटेंटपायी वेडं व्हायचं की योग्य कंटेंट पाहून शहाणं हे ज्याने त्याने ठरवावं!!
viva@expressindia.com
