प्रत्येकाच्या आयुष्यात पुस्तकांचं एक वेगळं स्थान असतं. कुणाला ती सतत सोबत लागतात तर काही जण सवडीने पुस्तकं वाचतात. काहींची वैचारिक जडणघडण पुस्तकांमुळे होते आणि मग पुस्तकांशी त्यांची अगदी घट्ट मैत्री होते. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वाचलेली किंवा खरेदी केलेली पुस्तकं ही जणू आपल्या स्थित्यंतराचीही साक्षीदार असतात. चित्रपट, नाटक आणि मालिका अशा विविध प्रातांत मुशाफिरी करणारा अभिनेता सुयश टिळक याचेही काहीसे असेच मत आहे. माझ्यासाठी पुस्तक ही फक्त कपाटात ठेवायची वस्तू नाही. एखादं पुस्तक आपण वाचून संपवतो, पण त्यातला एखादा विचार आपल्याबरोबर अनेक वर्षं राहतो. त्यामुळे माझा पुस्तकसंग्रह म्हणजे खरंतर माझ्या आयुष्यात भेटलेल्या अनेक विचारांचा आणि माणसांचा संग्रह आहे, असं सुयश सांगतो.

चित्रीकरण, नाटकाचे दौरे, प्रवास आणि इतर व्यवधानं यातून वेळ काढून दिवसभरात काही वेळ वाचन करायचं, अशी शिस्त सुयशने स्वत:ला लावून घेतली आहे. तो म्हणतो, ‘माझ्यासाठी वाचन हे ‘वेळ मिळाला तर करायचं’ अशी गोष्ट नाही आहे. आपण कितीही व्यग्र असलो तरीही आपल्या आवडत्या गोष्टींसाठी आपल्याला वेळ काढावा लागतो. त्यामुळे मी दिवसभर कितीही कामात असलो, तरीही काही वेळ आवर्जून वाचनासाठी देतो. मग कधी दिवसभराच्या प्रवासात किंवा रात्री झोपण्यापूर्वी मी वाचन करतो तर काही वेळा पुस्तक हातात घेऊन दोन पानं वाचण्यापेक्षा एखादा विचार दिवसभर मनात घेऊन फिरणं हा देखील माझ्यासाठी वाचनाचाच भाग असतो. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करायलाही त्याला आवडतं. एखादं पुस्तक वाचून झाल्यावर त्याबद्दल बोलावंसं वाटतं. विशेषत: एखादा विचार किंवा प्रसंग मनात अडकून राहिला असेल तर तो कुणाबरोबर शेअर करावासा वाटतो. मनोरंजन क्षेत्रात आपण सतत माणसांना आणि त्यांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे साहित्यावरच्या चर्चा अभिनयासाठीही खूप उपयोगी पडतात. एखाद्या पुस्तकातून मिळालेल्या विचारामुळे कधी कधी एखाद्या भूमिकेकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. अनेकदा सहकलाकारांशी अशा साहित्यिक चर्चा होतात तेव्हा त्या आनंददायी असतात. मात्र, अशा चर्चा प्रत्येकवेळी होतीलच असंही नाही,’ हेही तो सांगतो.

सुयश नाटक आणि चित्रपट विषयावरील पुस्तकांचं वाचनही करतो. तो म्हणतो, ‘अभिनय करणं म्हणजे केवळ संवाद पाठ करून त्याचं सादरीकरण करणं नाही. एखादी व्यक्तिरेखा साकारताना त्यात अनेक गोष्टी समजून घेणं हे ओघानं आलंच. आणि त्यासाठी वाचनाचा खूप उपयोग होतो. कारण माणूस कसा वागतो, त्याच्या कृतीमागे काय कारणं आहेत, त्याचा भूतकाळ काय आहे, त्याची भीती काय आहे हे समजून घेणं फार महत्वाचं असतं. मनोरंजन क्षेत्रात काम करणार्‍यांनी नाटक आणि चित्रपट या विषयांवरील पुस्तकं जरूर वाचली पाहिजेत. मात्र, याचबरोबर मानसशास्त्र, सामाजिक विषयांवरील पुस्तकं किंवा अगदी विविध कला प्रकारांवरील पुस्तकं आदी विषयांवरील वाचनही गरजेचं आहे, असं मला वाटतं’. अभिनेता म्हणून घडत असताना सुयशला वाचनामुळे माणसांविषयीचे विविध पैलू समजत गेले. माणसांच्या अनुभवावर आधारित साहित्याचं वाचन हे एखाद्या अभिनेत्याला समृद्ध करतं, असं त्याचं मत आहे. यासाठी तो विविध क्षेत्रातील व्यक्तींची आत्मचरित्रं वाचतो. उत्तम अभिनेता म्हणून आपल्याला आपली कारकिर्द घडवायची असेल तर आपल्याकडे वाचन आणि निरीक्षण ही कौशल्यं हवीत. ही कौशल्यं केवळ तुम्हाला अभिनेता म्हणून घडवत नाहीत एक चांगला माणसू म्हणूनही घडवतात, असं तो म्हणतो.

सुयश सध्या ‘मॅन्स सर्च फॉर मीनिंग’ हे व्हिक्टर फ्रँकल यांचं पुस्तक वाचतो आहे. ‘सध्या माझं वाचन वेगवेगळ्या दिशांनी सुरु आहे. फ्रँकल यांचं पुस्तक मला फार भावलं. माणूस अत्यंत कठीण परिस्थितीतसुद्धा आयुष्याला अर्थ कसा देऊ शकतो, याबद्दल ते पुस्तक खूप खोलवर विचार करायला लावतं. माझी स्वत:ची वाचनाची अशी एक आवड आहे. आणि यात माणसाचं मानसशास्त्र, निसर्ग आणि स्वत:ला समजून घेणार्‍या पुस्तकांकडे माझा ओढा असतो. माझ्यासाठी चांगल्या पुस्तकाची व्याख्या फार सोपी आहे. जे पुस्तक तुम्हाला स्वत:शी संवाद साधायला लावतं. ते चांगलं पुस्तक’, असं आपण मानत असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. मराठीतील काही पुस्तकं सुयशच्या मनाच्या फार जवळची आहेत. यात पु. ल. देशपांडे यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ हे पुस्तक त्याला विशेष आवडतं. आतापर्यंत त्याने अनेकदा हे पुस्तक वाचलं असलं तरीही अजूनही त्याला हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं. माणसांकडे पाहण्याची, त्यांच्या स्वभावातलं सूक्ष्म सौंदर्य टिपण्याची पु. लं.ची नजर मला खूप आवडते, असं तो सांगतो. तसंच, वि. स. खांडेकरांचं ‘ययाती’ देखील त्याचं आवडतं पुस्तक आहे. माणसाच्या इच्छा, महत्त्वाकांक्षा, मोह आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न यांचा खूप खोलवर विचार त्यात आहे. आणि हेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे, असं त्याला वाटतं. निसर्गाविषयी सुयशला विशेष जिव्हाळा आहे. व्यंकटेश माडगूळकर यांचं ‘बनगरवाडी’ हे पुस्तक त्याला विशेष भावतं. निसर्ग, माणसं आणि ग्रामीण जीवन यांचं इतकं जिवंत चित्रण त्यात आहे की ते वाचताना आपण त्या जगाचा भाग होतो, असं तो म्हणतो. दुर्गा भागवत याचं ‘ऋतूचक्र’ हे पुस्तकही त्याचं आवडतं आहे. याचं कारण म्हणजे हे पुस्तक निसर्गाकडे केवळ एक दृश्य म्हणून न पाहता, त्याच्याशी एक नातं निर्माण करायला शिकवतं, असं त्याचं मत आहे. त्याच्या आवडत्या पुस्तकांच्या यादीत एलिझाबेथ गिल्बर्ट यांच्या ‘इट प्रे लव्ह’ या पुस्तकाचाही समावेश आहे.

प्रवासात असताना पुस्तकं वाचणं हा सुयशचा आवडता उद्योग. मग विमान किंवा रेल्वे असा कोणताही प्रवास असो किंवा अगदी एखाद्या जंगलात मुक्काम असेल तर अशा निवांत क्षणी पुस्तक वाचण्याची एक वेगळीच मजा असते, असं तो सांगतो. प्रवासात असताना एखादा छानसा बुक कॅफे किंवा अगदी पुस्तकाचं दुकान दिसलं तर मी थोडा वेळ का असेना पण थांबतो. विशेषत: परदेशात एखाद्या छोट्या शहरात, एखाद्या शांत रस्त्यावर एखादं जुनं पुस्तकांचं दुकान दिसलं की तिथे काही वेळ रेंगाळण्याची इच्छा होते. मला अशा जागा आवडतात जिथे पुस्तकं ही केवळ विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू नसतात, तर त्या जागेचा एक भाग असतात. एखादा कोपरा, कॉफीचा मग आणि हातात पुस्तक यापेक्षा साधा आणि सुंदर विरंगुळा काय असू शकतो? असंही सुयशने सांगितलं. मुंबईतील जुन्या पुस्तकांच्या दुकानांना भेट द्यायलाही त्याला आवडतं. त्याच्यासाठी पुस्तक नवं किंवा जुनं आहे हे फारसं महत्वाचं नसून ते आपल्याला काय देतं हे फार महत्वाचं आहे. जुनी पुस्तकं, त्यावरच्या खुणा, आधीच्या वाचकांनी केलेल्या नोंदी यातून त्या पुस्तकाला एक वेगळचं महत्व प्राप्त होतं, असं तो सांगतो.

सुयशच्या घरी देखील त्याचा असा स्वत:चा पुस्तकांचा संग्रह आहे. माझ्याकडे असणारा पुस्तकांचा संग्रह हा फार नीटनेटका किंवा विषयानुरुप असा मांडलेला नाही. माझ्या संग्रही असणारी पुस्तकं ही माझ्या आयुष्यातील वेगवेळ्या टप्य्यांचा एक प्रकारचा जणू नकाशाच आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मी कोणत्या साहित्य प्रकारात किंवा पुस्तकांमध्ये अधिक रमलो होतो, हे माझ्याकडील पुस्तकांच्या संग्रहावरून एखाद्याला सहज कळून येईल, असं त्याने सांगितलं. एखादा लेखक साहित्यनिर्मिती करताना नेमकी काय प्रक्रिया होत असते, एखादं पात्र त्याला कसं सुचतं किंवा पुस्तकातील एखादा प्रसंग हा त्यांच्या आयुष्यातील नेमक्या कोणत्या अनुभवावरून आला असेल या सगळ्याविषयी त्याला कुतूहल वाटतं. यासाठी काही लेखकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारण्याची त्याची इच्छा आहे. पुस्तकं आपल्याला अनेक प्रकारे समृद्ध करतात म्हणून वाचन गरजेचं आहे. मी काही पुस्तकं एकदा वाचली आहेत. काही पुन्हा पुन्हा वाचत असतो, काही पुस्तकं वाचायची आहेत. पण, माझ्याकडे असणार्‍या सगळ्या पुस्तकांना भावनिक मूल्य आहे, असं सुयश सांगतो.
viva@expressindia.com