चित्रपट आणि नाटकात दिसणारा नवा चेहरा म्हणजे अभिनेत्री साजिरी जोशी. सूत्रसंचालक म्हणूनही ती अनेकांना परिचित आहे. नवे प्रयोग आणि नव्या माध्यमातून स्वत:ला आजमावणारी ही अभिनेत्री एक उत्तम वाचकही आहे. प्रत्येक पुस्तक आपल्याला वेगळ्या विश्वात घेऊन जातं. आपण वाचलेलं पुस्तक आणि त्यातून मिळालेला अनुभव हा पूर्णपणे आपला स्वत:चा असतो, कारण एखादं पुस्तक वाचताना आपल्या मनात जे विश्व तयार होतं, ते दुसर्‍या कुणाच्या अनुभवापेक्षा वेगळंच असतं. हीच पुस्तक वाचनाची सर्वात सुंदर गोष्ट आहे, असं तिने सांगितलं. कोणत्याही भाषेशी मैत्री करायची असेल तर वाचन हवंच, असंही तिचं मत आहे.

साजिरीला अगदी लहानपणापासूनच पुस्तक वाचनाची आवड आहे. तिच्या घरात असंही वाचनाचं वातावरण होतंच. यामुळे तिला आपसूकच वाचनाची गोडी लागली असं तिने सांगितलं. शाळा-महाविद्यालयात असताना तिने भरपूर पुस्तकं झपाटल्यासारखी वाचून काढली होती. पुस्तकांमुळे घडणारा मोठा बदल म्हणजे आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अधिक समृद्ध आणि वेगळा होतो, असा तिचा स्वत:चा अनुभव आहे. तसंच, पुस्तकांमुळे आपली आपल्या स्वत:शीही उत्तम मैत्री होते. यामुळे आपले दृष्टिकोन आणि आपल्या भावना याबाबतही हळूहळू स्पष्टता येत जाते, असंही ती पुढे म्हणाली.

मधल्या काळात साजिरीचं पुस्तक वाचन कमी झालं होतं. यासाठी तिने गेल्यावर्षीपासून पुन्हा ठरवून वाचनाला सुरुवात करत काही सवयी स्वत:ला लावून घेतल्या आहेत. सोबत पुस्तक घेऊनच ती घराबाहेर पडते, त्यामुळे प्रवासात किंवा अगदी चित्रिकरणाच्या मधल्या वेळेतही तिला सहज वाचन करता येतं. प्रत्येकाची पुस्तक वाचनाची घरातील एक जागा ठरलेली असते. किंवा ठरावीक ठिकाणीही आपल्याला पुस्तकं वाचायला आवडतात. साजिरीची पुस्तक वाचनासाठी सगळ्यात आवडती जागा म्हणजे मुंबईची लाईफलाईन ‘लोकल’. तिला लोकल ट्रेनमध्ये पुस्तकं वाचायला फार आवडतात. याविषयी सांगताना ती म्हणाली, ‘ट्रेनमध्ये वाचनाचा एक वेगळाच अनुभव असतो. अगदी गर्दीतही पुस्तकं आपल्याला एकाग्रता शिकवतात.’ तिला ट्रेनमध्ये पुस्तकं वाचायला इतकं आवडतं की अनेकदा ती बाहेर कुठं जायचं असेल तर कारने प्रवास न करता मुद्दामहून ट्रेनने प्रवास करत पुस्तक वाचनाचा आनंद घेते.
साजिरी सध्या व. पु. काळे यांचं प्रसिद्ध ‘पार्टनर’ पुस्तक वाचते आहे. तिच्या आवडणार्‍या लेखकमंडळींच्या यादीत वपु आहेतच. ‘१३८’ या मिताली जोशी यांच्या नाटकात साजिरीनं भूमिका साकारली आहे. या नाटकाच्या निमित्ताने साजिरीला समाज, प्रेम आणि भावना यावर अधिक वाचायचं होतं. तेव्हा तिनं निवडलं ते बेल हुक या प्रसिद्ध अमेरिकन लेखिकेचं ‘ऑल अबाऊट लव्ह’ हे पुस्तक. ‘जशा चित्रपटांमधील व्यक्तिरेखा लक्षात राहतात, तशाच पुस्तकांमधील व्यक्तिरेखाही माझ्या लक्षात राहतात. आणि मी अभिनय क्षेत्रात काम करत असल्याने एखादी भूमिका साकारताना त्याची खूप मदत होते’, असं ती म्हणते. वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करायलाही तिला आवडतं. यात अनेकदा जवळचे मित्रमैत्रिणी किंवा अगदी चित्रिकरणाच्या वेळी काही सहकलाकारांशीही पुस्तकांवर चर्चा होतात, असं तिने सांगितलं. अभिनेत्री क्षिती जोग, अभिनेता सिद्धेश धुरी आणि साजिरी यांनी एका सिरीजमध्ये एकत्र काम केलं होतं. तेव्हा भेट म्हणून एकमेकांना दिलेली पुस्तकं आणि वाचनावर रंगलेल्या गप्पांची आठवण तिने सांगितली. पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, व. पु. काळे, शंकर पाटील आणि सुधा मूर्ती ही तिची काही आवडती लेखक मंडळी आहेत, असं तिने सांगितलं. तसंच, जे. के. रोलिंग यांची हॅरी पॉटर पुस्तक मालिका, ‘द डायरी ऑफ अ यंग गर्ल’ हीसुध्दा तिची काही आवडती पुस्तकं आहेत.

पुस्तकं खरेदी करणं आणि पुस्तकं भेट देणं हेही साजिरीला आवडतं. यातही बुक सेलमध्ये मिळणारी जुनी पुस्तकं खरेदी करण्याकडे तिचा कल असतो. ती म्हणते, ‘बुक सेलमध्ये अशी अनेक जुनी पुस्तकं असतात जी कधी कुणी कुणालातरी भेट दिलेली असतात. आणि अनेकदा त्यावर छानसा संदेश लिहिलेला असतो. मी एकदा अरुंधती रॉय यांचं ‘दि गॉड ऑफ स्मॉल थिंग्स’ हे पुस्तक असंच एका बुक सेलमधून घेतलं होतं. त्या पुस्तकावर लिहिलं होतं, ‘जे कुणी हे पुस्तक घेईल त्यांच्यासाठी…’ ते वाचून मला छान वाटलं होतं. अशी संदेश लिहिलेली जुनी पुस्तकं तिला आवडतात, कारण ती भेट देताना त्यामागे एक खास भावना असते. तिने लहानपणी वाचलेली आणि तिच्याकडे असणारी अशी काही पुस्तकं ती आवर्जून ओळखीतल्या लहान मुलांना देते.

पुस्तक वाचनाविषयीच्या काही सवयींना तिने छेद देत नव्या सवयी स्वत:ला लावून घेतल्या. याविषयी सांगताना ती म्हणाली, ‘अनेकदा एखादं पुस्तक आपण वाचायला घेतलं की कधीतरी ते आपल्याकडून अगदी सावकाश वाचलं जातं. अनेकांना अशी सवय असते की एक पुस्तक वाचायला घेतलं आहे तर तेच पुस्तक वाचायला हवं. कधीकधी ते पुस्तक वाईट नसतं, मात्र आपल्याला त्यावेळी ते आवडत नसतं. अशावेळी त्या पुस्तकाचं वाचन थांबवून दुसरं पुस्तक वाचायला घेणं यात चुकीचं काही नाही. आपण पुन्हा काही काळाने त्या पुस्तकाकडे वळतोच. तर अनेकदा पुस्तक खरेदी करताना किंवा बुक कॅफेमध्ये एखादं छानसं पुस्तक हाती लागतं आणि मग वेळ कसा जातो ते कळत नाही’. असं पुस्तक वाचन आनंद देणारं असतं, असंही तिने पुढे सांगितलं. याबाबत तिने एक किस्सा सांगितला, ‘एकदा सांताक्रूझला क्रॉसवर्डमध्ये मी आणि माझी मैत्रीण वरदा आम्ही गेलो होतो. तिथे आम्ही दोघीही ‘बटर’ ही असाको युझुकी या जपानी लेखिकेची कादंबरी वाचत बसलो होतो आणि ती वाचताना दीड तास कसा निघून गेला हे कळलंच नाही. आणि मग ती कादंबरी इतकी आवडली की आम्ही दोघीनींही ती खरेदी केली आणि मग पुढे आमच्या त्यावर चर्चाही झाल्या’.

‘वाचनाने शब्दकोश वाढतो तसंच आपण जी भाषा बोलतो त्या भाषेशी मैत्री होते. आणि याचा फायदा आपल्याला लिखाणासाठीही होतो. आपण जर नियमित वाचत असू तर आपल्याला हवी तशी लेखनशैली आपण विकसित करू शकतो’, असं ती म्हणते. तुम्ही किती पुस्तकं वाचता हे महत्वाचं नसून तुम्ही पुस्तक वाचनात सातत्य ठेवता हे महत्वाचं असल्याचं साजिरीने अधोरेखित केलं.

viva@expressindia.com