पर्पल लिप्स, केप आणि थोडीशी बंडखोरी..

कान्स २०१६ चे फॅशनजगाचे दरवर्षी काही मोजक्या इव्हेंट्सकडे बारकाईने लक्ष असते.

कान्स २०१६ चे फॅशनजगाचे दरवर्षी काही मोजक्या इव्हेंट्सकडे बारकाईने लक्ष असते. कान्स फिल्म फेस्टिव्हल हा त्यापैकी एक. कानच्या रेड कार्पेटवर अवतरणाऱ्या सेलेब्रिटी कोणत्या डिझायनरचे ड्रेस आणि सूट घालतात, त्यांचा मेकअप कसा असतो यावरून पुढच्या हंगामाचा ट्रेण्डही ठरवला जातो. गेली १५ र्वष ऐश्वर्या राय बच्चनच्या निमित्ताने तिथे नियमितपणे भारतीय चेहरा झळकतोय. लॉरिएल पॅरिसची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसीडर म्हणून ती दर वर्षी कानला जाते. तिच्या बरोबरीने गेली काही र्वष सोनम कपूरही तिथल्या रेड कार्पेटवर झळकते आहे.

यंदाच्या ६९ व्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्याची ‘कानवारी’ची पंधरा र्वष साजरी झाली. तिनेही तिच्या रेड कार्पेट लुकमध्ये भरपूर प्रयोग केले. त्यातल्या काहींची भरपूर चर्चा झाली. इतकी की, ऐश्वर्याची जांभळी लिपस्टिक ट्विटरवर ‘टॉप ट्रेण्डिंग’मध्ये होती. ऐश्वर्याचा पहिला रेड कार्पेट अपिअरन्स सोनेरी रंगाच्या, नजाकतीने विणलेल्या तिच्या गाउनने गाजवला. लाल रंगाची लिपस्टिक त्यावर उठून दिसली. दुसरा लुकदेखील सोनेरी- गुलाबी रंगाच्या स्लीव्हलेस गाउनमुळे गाजला. गेल्या रविवारी ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या ऑफ शोल्डर – बाडरेट स्टाइलचा गाउनमध्ये अवतरली.2

पण तिच्या पेस्टल कलरच्या, नाजूक भरतकाम केलेल्या त्या ड्रेसपेक्षा तिच्या जांभळ्या लिपकलरनं लक्ष वेधून घेतलं. काही जणांनी ‘बोल्ड फॅशन स्टेटमेंट’ म्हणून याचं कौतुक केलं, तर अनेकांनी ‘फॅशन डिझ्ॉस्टर’ म्हणून ऐश्वर्याला नावं ठेवली. ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्या मानाने सोनम कपूरने यंदा रेड कार्पेट लुक तसा साधाच ठेवला. साडीपासून प्रेरणा घेतलेला तिचा पांढरा शुभ्र राल्फ – रुसोचा गाउन होता. लांबलचक अंगरख्यासारखा केप हेच या गाउनचं वैशिष्टय़. त्यावर सोनमची गुलाबी रंगाची लिपस्टिक उठून दिसत होती. एकंदरीत रंगीत मेक-अप यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये ड्रेसपेक्षा वरचढ ठरला, असंच म्हणावं लागेल.

1अनवाणी बंडखोरी
‘मनी मॉन्स्टर’ या चित्रपटाच्या निमित्ताने रेड कार्पेटवर अवतरलेली हॉलिवूड अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सने व्हिंटेज स्टाइलचा ऑफ-शोल्डर ब्लॅक गाउन घातला होता. तिच्या गळ्यातला पाचूचा खडा चमकत होता आणि लक्ष वेधून घेत होता. तिच्या या ‘रॉयल लुक’ची चर्चा झाली ते तिच्या अनवाणी येण्याने. फॉर्मल ड्रेसिंगचे अलिखित नियम स्त्रियांनी हिल्स घालून येणं बंधनकारक असल्याचं सांगतात. त्यात हा तर रेड कार्पेट इव्हेंट. इथे हे फॅशनचे नियम पाळलेच पाहिजेत, असा काहीसा माहौल. गेल्या वर्षी फ्लॅट्स घालून आलेल्यांना या फेस्टिव्हलला प्रवेश नाकारला होता. त्याविरोधात आवाज उठवायला आणि फॅशनची ही अवास्तव बंधनं मोडून काढायच्या उद्देशाने ज्युलिया रेड कार्पेटवर अनवाणी आली, असं म्हणतात. तिची ही बंडखोरीदेखील फॅशन स्टेटमेंट म्हणून गाजली!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aishwarya rai and sonam kapoor in cannes festival

ताज्या बातम्या