अनेकांच्या वाचनवाटांची सुरुवात शालेय वयात झालेली असते. त्या वयात वाचलेली अनेक पुस्तकं नकळत व्यक्तिमत्वाला आकार देत जातात. या वाचनवाटा पुढे अधिक रेखीव होत जातात आणि वाचनाची आवड, मातृभाषेविषयी असणारा जिव्हाळा यातून जगणंच समृद्ध होत जातं. अभिनेता, कवी आणि दास्तानगो असणाऱ्या अक्षय शिंपी याच्या वाचनवाटाही काहीशा अशाच आहेत.

‘दास्तानगोई’ हा उर्दूमधील पारंपरिक कथाकथन कलाप्रकार मराठीत रुजविण्यासाठी प्रयत्न करणारा प्रयोगशील कलाकार म्हणून परिचित असलेल्या अक्षयच्या घरात पूर्वीपासूनच वाचनाचं वातावरण होतं. अर्थात, केवळ लहानपणी वाचनाचे संस्कार झाले म्हणून वाचनाची आवड पुढेही जोपासली जाईल असं नाही. पुस्तक वाचन ही आपली गरज आहे, हे अक्षयला जाणत्या वयात प्रकर्षाने लक्षात आले. त्यामुळे छंदापलिकडे जात साहित्य हेच अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून त्याने निवडलं.

शालेय जीवनातील वाचनाच्या आवडीविषयी सांगताना अक्षय म्हणाला की, ‘मी लहान असताना माझ्यासाठी म्हणून आमच्या घरात ‘चंपक’, ‘ठकठक’ आणि ‘चांदोबा’ ही मासिकं यायची. विविध मासिकं आणि वर्तमानपत्रं हा देखील माझ्या वाचनाचा भाग होता. मला अजूनही ‘चांदोबा’चे अंक लक्षात आहेत. त्यातील चित्रं आणि गोष्टींमुळे भान हरपायचं.

आज जेव्हा मी ‘दास्तान’सारखा कलाप्रकार सादर करतो किंवा माझ्याकडे गोष्टी सांगण्याची जी आस आहे त्याचं मूळ कुठेतरी माझ्या लहानपणीच्या वाचनाच्या आवडीत असावं, असं वाटतं. त्यामुळे आजही मला नेहमी वाटतं की गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत.’ घरची मंडळी कायमच अखंड वाचनात असल्याने अगदी ‘तुकाराम गाथा’ किंवा ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाची ओळखही लहानपणीच झाली. माझ्या आजोबांनी त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आजीला वाचनालयाचं सभासदत्व भेट म्हणून दिलं होतं, अशी आठवणही त्याने सांगितली.

वाचनाच्या बाबतीत माझं वाचन शिस्तशीर नाही, हातात जे मिळेल ते वाचायची सवय आहे. असं असलं तरीही मला वाचनाची आस असल्याने मी अगदी रोज काहीतरी वाचत असतो, असं अक्षयने सांगितलं. सध्या तो कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारचं वाचन अधिक करतो. नुकतंच त्याने ‘मानवसृष्टीचा विकासक्रम आणि धर्म’ हे डॉ. योगिता पिंजरकर याचं पुस्तक वाचून पूर्ण केलं.

‘मानवी जीवनात धर्माचे असणारे स्थान तसेच, उत्क्रातींत धर्म ही संकल्पना कशी बदलत गेली अशा विविध मुद्द्यांचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहे. या पुस्तकामुळे धर्माकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन काहीसा विकसित झाला. तसंच, शरद नावरे यांचे ‘प्रसंगोपात : भाग एक आणि भाग दोन’ हे खंड नुकतेच वाचून पूर्ण केले. अनुवाद, मार्क्सचे तत्वज्ञान यांसह विविध विषयांवर नावरे यांच्या पुस्तकात प्रदीर्घ लेख आहेत’ असं त्याने सांगितलं.

कविता हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय. मुळात भाषा हा त्याच्या आवडीचा विषय आहे, असं त्यानं सांगितलं. यात मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या भाषा येतातच, सध्या तो फारसी भाषा शिकतो आहे. त्याचे शिक्षक त्याला या भाषेतील कविता आणि कवींची ओळख करून देतात. त्यामुळे इथेही नवी भाषा शिकताना कवितेत उमटलेली भाषा जाणून घेणं हे त्याला त्या भाषेच्या अधिक जवळ नेणारं वाटतं.

‘प्रत्येक कवीची अभिव्यक्ती निराळी त्यामुळे विविध कारणांसाठी मला विविध कवी आवडत गेले. यात अरुण कोलटकर, नामदेव ढसाळ, अलीकडच्या काळातील तेजस मोडक, महेश दत्तात्रय लोंढे हे कवी माझे आवडते आहेत. त्यांच्या कविता संख्येनं कमी असल्या तरीही ते अत्यंत महत्वाचं संवेदन कवितेतून मांडतात. तसंच, देवीदास सौदागर, प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी आणि दिनकर मनवर यांच्या कवितादेखील मला भावतात, कारण ही मंडळी वेगळं असं काहीतरी कवितेतून मांडू पाहतात. मनवर यांचा ‘पाण्यारण्य’ हा माझा आवडता कवितासंग्रह आहे. पाण्याच्या रूपांचं इतकं वैविध्यपूर्ण चित्रण या काव्यसंग्रहातून कवीनं केलं आहे की वाचकाला विस्मयचकित व्हायला होतं’, असं तो म्हणतो.

कविता या साहित्यप्रकाराविषयी सांगताना, कविता हा अत्यंत महत्वाचा आणि गांभीर्याने हाताळण्याचा साहित्यप्रकार असून कविता म्हणजे तुमच्या जगण्यावर आलेली अनुभवांची साय आहे आणि ती साय फार नाजूक हातांनी उकलावी लागते. त्यामुळे कविता ही जबाबदारीने लिहिली जायला हवी. कविता म्हणजे कवीनं केलेला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हस्तक्षेप असतो. कवी नारायण सुर्वे, शाहीर अमर शेख, नामदेव ढसाळ आणि तुकाराम महाराजांच्या कविता या हस्तक्षेप करणाऱ्या कविता होत्या, असं तो म्हणतो.

अक्षयच्या आवडीच्या पुस्तकांची यादीही फार मोठी आहे. मात्र, या यादीतील काही पुस्तकं आवर्जून वाचायला हवीत, अशी असल्याचं त्याने सांगितलं. यात दिनकर मनवर यांचं ‘झेन्नाच्या कविता’, ‘कनकन्कुद्री तुनतुन्तारी टप्डाटुप्डा’ – विलास पाटील, ‘भूत, वर्तमान आणि स्मृती’ – श्रद्धा कुंभोजकर, ‘शाहीर द. ना. गव्हाणकर समग्र साहित्य’ – संपादिका : डाॅ. पूजा पराग सामंत, ‘माणूस असण्याच्या आठवणी : देवी प्रसाद मिश्र यांच्या अन्यकथा’ या पुस्तकाचे गणेश विसपुते यांनी केलेले मराठी भाषांतर, ‘अब्बूंचे मोदक’ – फारूक एस्. काझी, ‘हिल्लोळ हरवून आतबाहेरचा’ – प्रज्ञा दया पवार, ‘लव्ह अँड रेव्होल्यूशन फैज अहमद फैज अधिकृत चरित्र’ : अली मदिह हाश्मी, मराठी अनुवाद : शेखर देशमुख, ‘आरशात ऐकू येणारं प्रेम’ – फेलिक्स डिसोझा, ‘मिथक मांजर’ – इग्नेशियस डायस आणि विकास पालवे लिखित ‘चकवा’ आदी त्याची आवडती पुस्तकं आहेत. ‘भाषा हे जगण्याचं आणि साहित्याचंही अंग आहे, त्यामुळे भाषा टिकली तर त्यातील साहित्यही टिकेल’ असा विश्वास व्यक्त करतानाच साहित्य वाचनाची गोडी लागावी यासाठी मराठी साहित्यातील अद्भुतरम्य किंवा गूढकथा, तसंच सहज सोप्या कवितांच्या वाचनाने हळूहळू साहित्य वाचनाची सुरुवात करता येईल, असंही त्याने सांगितलं.