पुस्तक नव्हे – ‘मोबाईल अ‍ॅप’

साहित्याला नवीन युगात नवनवी माध्यमं खुली झाली आहेत. पुस्तकं आता चक्क मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसिद्ध व्हायला लागली आहेत.

‘तरुण पिढी मराठी साहित्यापासून दूर गेली आहे, मराठीचं काही खरं नाही’ अशी ओरड नेहमीच केली जाते. आजच्या मराठी भाषा दिनी थोडी वेगळी बाजू मांडायचा हा प्रयत्न..

साहित्याला नवीन युगात नवनवी माध्यमं खुली झाली आहेत. पुस्तकं आता चक्क मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसिद्ध व्हायला लागली आहेत. अनिकेत समुद्र या  ब्लॉगलेखकाची ‘अलवणी’ नावाची मराठी दीर्घकथा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली आणि आजवर पन्नास हजारांहून अधिक लोकांनी हे पुस्तक आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून घेतलंय. सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून पुण्यात नोकरी करणाऱ्या अनिकेतचे या नवीन माध्यमाविषयीचे विचार.
पुस्तक  छापण्याऐवजी मोबाईल अ‍ॅपद्वारे  प्रसिद्ध करण्याच्या आमच्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. हजारो लोकांनी ई-मेलद्वारे कथा आवडल्याचं कळवलं, त्यात  एक मराठी चित्रपट निर्माताही होता. मराठी साहित्याच्या विकासासाठी आता नवोदितच नाही तर प्रथितयश लेखकांनीही इ-साहित्याचा मार्ग चोखाळायला हरकत नाही.

इंटरनेटचं युग अवतरलं आणि साहित्य मुद्रणाला एक नवीन दिशा सापडली, ब्लॉगच्या रूपाने. एक मोफत आणि वापरायला सुटसुटीत व्यासपीठ या इंटरनेटने नवोदित साहित्यिकांना उपलब्ध करून दिलं.
नवनिर्मित साहित्य क्षणार्धात जगाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला पोहोचवणाऱ्या या व्यासपीठाने लेखकांना भुरळ घातली आणि नवनवीन ब्लॉगचा काही महिन्यांतच सुळसुळाट झाला. बहुतांश ब्लॉग हे ‘स्वांत-सुखाय’ स्वरूपाचे असले तरी काही लेखकांनी या ब्लॉगच्या रूपाने नवीन साहित्यनिर्मितीसुद्धा सुरू केली.
मीसुद्धा अशाच एका प्रयत्नात माझा ब्लॉग तयार केला. पहिल्यांदा काहीही लिहीत गेलो आणि हळूहळू जाणीव झाली की, आपण बरं लिहू शकतो. वाचकांच्या भरघोस प्रतिक्रिया मिळत गेल्या आणि लिखाणाचा हुरूप वाढला. अशातच काही तरी वेगळं करावं म्हणून एक २५-३० पानांची छोटी कथा लिहून ब्लॉगवर प्रसिद्ध केली. ‘एबीपी माझा’तर्फे आयोजित या स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ट मराठी ब्लॉग म्हणून माझा ब्लॉग गौरवला गेला आणि मला टी.व्ही.वर झळकायची संधी मिळाली. काही महिन्यांतच ब्लॉगच्या वाचकांची संख्या लाखांच्या घरात पोहोचली. ब्लॉगच्या माध्यमातून अनेक लोकांशी संपर्क झाला. माझा ब्लॉग हीच माझी ओळख बनली.
vv04एव्हाना संगणकाबरोबरच आपले मोबाइलही स्मार्ट झाले होते. अशातच साहित्य चिंतन (डॉट)कॉमचे संस्थापक आणि माझ्या ब्लॉग वाचकांपैकी एक चेतनकुमार अकर्ते यांनी एक अभिनव कल्पना सुचवली की, ब्लॉगवर लिहिलेल्या मराठी गोष्टी ‘मोबाइल-अ‍ॅप’च्या माध्यमातून वाचकांना उपलब्ध करून द्यायच्या. अर्थात हे अ‍ॅप सर्वानाच बनवता येतं असं नाही. त्यासाठी संगणकाचं आणि त्यासाठी लागणाऱ्या प्रोग्रॅमिंगचं ज्ञान आवश्यक असतं, जे माझ्याकडे नव्हतं. परंतु  चेतनने हे अ‍ॅप बनवायची तयारी दर्शवली आणि मार्गातला मोठ्ठा अडसर दूर झाला. ब्लॉगवरच लिहिलेली आणि वाचकांच्या प्रचंड पसंतीस उतरलेली ‘अलवणी’नामक मराठी भयकथा आम्ही निवडली. अर्थात आम्ही दोघंही वेगवेगळ्या शहरांत राहणारे, एकमेकांचा चेहराही न पाहिलेले. माझ्या कथेचा गैरवापर झाला तर? आपल्याच नावावर लावून ती कथा व्यावसायिक कारणांसाठी वापरली तर? किंवा इतरत्र छापून आणली तर वगैरे साचेबद्ध प्रश्नांना फाटा देऊन एक प्रकारचा आंधळा विश्वास ठेवला आणि मग ई-मेलच्या माध्यमातून मी माझी कथा त्याला पाठवून दिली आणि चेतन कामाला लागला.
बोटाच्या मोबाइलच्या स्क्रीनला झालेल्या स्पर्शाने पुस्तकाची पानं उलटली जातील असा ‘फिल’ आम्ही त्या अ‍ॅपला दिला, अक्षरांचा आकार कमी-जास्त करण्याचा, अक्षरांचा रंग बदलण्याची सुविधा दिल्याने हे अ‍ॅप सुटसुटीत झालं. एखादं पान ‘बुकमार्क’ करणं, हव्या असलेल्या पानावर एकदम जाणं वगैरे पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिले. ‘अलवणी’चं अ‍ॅप गुगल प्लेवर मोफत उपलब्ध आहे. https://play.google.com/store  यावर ‘अलवणी’ किंवा ‘अनिकेत समुद्र’ किंवा ‘मराठी कथा’ या नावाने शोधल्यावर आमचं हे पुस्तक वाचकांना डाऊनलोड करायला उपलब्ध होऊ लागलं.

डेटा प्लॅन फारसा खर्ची पडू नये म्हणून  हे पुस्तक साधं आणि सुटसुटीत ठेवण्यावर आम्ही भर दिला. मोबाइलवर फक्त अ‍ॅण्ड्रॉइड नामक ऑपरेटिंग-सिस्टीम असली की पुरेसं आणि एकदा डाउनलोड केल्यावर वाचक ते ‘ऑफलाइन’ही वाचू शकत होते. मोबाइलवर ‘डेटा-प्लानच’ नाही तेसुद्धा आपल्या मित्र-मैत्रिणींच्या मोबाइलमधून हे पुस्तक ‘ब्ल्यू-टुथ’ नामक प्रणालीच्या साहाय्याने आपल्या मोबाइलवर उतरवून घेऊ शकत होते.

अर्थात यामधून कुठल्याही अर्थप्राप्तीची अपेक्षा आम्हाला नव्हती. त्यामुळे हे पुस्तक आम्ही मोफत उपलब्ध करून द्यायचं ठरवलं. पण निदान ते ‘मोबाइल-अ‍ॅप’ बनवण्याचा खर्च निघावा म्हणून या अ‍ॅपला जाहिरातींची जोड दिली आणि त्यातून मिळणारा पैसा अर्धा-अर्धा वाटून घ्यायचं ठरलं.
—-
आमचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी ठरला. आजवर पन्नास हजारहून अधिक लोकांनी हे पुस्तक आपल्या मोबाइलवर उतरवून घेऊन वाचलं. अ‍ॅपच्या रेटिंगमध्ये वाचकांनी त्याला पाचपैकी ४.४ चांदण्या दिल्या. शेकडो नव्हे, हजारो लोकांनी मला ई-मेलद्वारे पुस्तक आवडल्याचा अभिप्राय कळवला. इतकंच नव्हे तर नुकत्याच एका मराठी-चित्रपट निर्मात्यानेसुद्धा संपर्क करून यावर एक चित्रपट बनवण्याचा मानस व्यक्त केला.
—-
या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद पाहून पाठोपाठ ‘मास्टर-माइंड’ आणि ‘मेहंदीच्या पानावर’ या माझ्या इतर दोन कथासुद्धा आम्ही ‘मोबाइल-अ‍ॅप’ बनवून या संकेतस्थळावर मोफत उपलब्ध करून दिल्या. हेतू केवळ हाच की, आपल्या परीने थोडंफार जमून आलेलं मराठी साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं आणि तेसुद्धा मोफत.
हे सर्व शक्य झालं ते केवळ या नवीन तंत्रज्ञानामुळे. केवळ काही सेकंदांमध्ये डाऊनलोड होणारं हे पुस्तक आज हजारो मोबाइलमध्ये विराजमान आहे याचा मला जाज्वल्य अभिमान आहे.
जग बदलत आहे, अधिक वेगवान होत आहे. प्रत्येक साहित्य हे मुद्रित स्वरूपात आणि माफक किमतीत उपलब्ध करून देणं कदाचित दिवसेंदिवस कठीण होत जाईल. ज्या सहजतेने आणि वेगाने हे ई-साहित्य वाचकांपर्यंत पोहोचू शकतं त्याला तोड नाही. मला वाटतं, मराठी साहित्याच्या विकासाकरिता नवीन, हौशी लेखकांबरोबरच प्रथितयश लेखकांनीसुद्धा ई-साहित्याचा हा मार्ग चोखाळायला हरकत नाही.
लेखक – अनिकेत समुद्र
ब्लॉगचा पत्ता – http://manaatale.wordpress.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Alavani marathi long story on mobile app