एखादी शांत संध्याकाळ, हातात चहाचा कप, मस्त वारा येणारी खिडकी आणि एखादं आवडतं पुस्तक… कोणाला नको असतो असा वेळ? दिवसभराच्या कामांच्या मध्ये थोडा थोडा वेळ शांतपणासाठी काढावा, किंबहुना तो मिळावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण तो अनेकांना मिळतच नाही. रोज नाही तर कधीतरी एकदा निवांत बसावं आवडेल ते करत किंवा खरं तर काहीच न करता बसावं, असंही अनेकांना वाटतं, पण त्यांना तसं करताच येत नाही. गेल्या काही दशकांत आयुष्य इतकं फास्ट झालंय की सतत काहीतरी करत राहावं लागतं, शिक्षण घेताना सोबत इतरही काहीतरी शिकत राहावं लागतं, नोकरी करताना अपस्केल करावं लागतं, हायर पोझिशनला गेल्यावर चोवीस तास जबाबदारी घेत राहावं लागतं आणि या सगळ्यात ‘निवांतपणा’ हळूहळू हरवून जातो.
सगळ्यांच्याच मनात असलेली एखादी निवांत संध्याकाळ, एखादा निवांत दिवस, आताची पिढी जाणूनबुजून आणि ठरवून निवडताना दिसते. जॉब करत असली, सगळी कामं सांभाळत असली, घरच्या जबाबदाऱ्याही घेत असली, तरी स्वतःसाठी, स्वतःच्या शांतपणासाठी वेळ काढणं या पिढीला जमतं. किंबहुना त्यांनी ती गरज ओळखून जमवून घेतलं आहे. आपल्या अजी-आजोबांच्या पिढीकडे थोडा निवांतपणा, मनाचा शांतपणा होता. आपल्या आई- बाबांच्या पिढीने सतत काम, काम आणि काम या चक्रात अडकून त्यांचं आयुष्य घालवलं. मनाला हवा तसा शांतपणा त्यांना कधी मिळाला नाही. हेच बघत बघत मोठे झाल्याने असेल कदाचित पण आताची पिढी स्वतःला प्राधान्य देते.स्वतःचा निवांतपणा शोधताना खरंतर अनेक अडचणी येणारी ही आताची पिढी आहे. कारण त्यांच्या मेंदूला, मानसिकतेला हे बरेचदा समजत नाही की आपल्याला शांतपणाही तितकाच गरजेचा आहे. सतत काहीतरी करत राहिलं म्हणजेच आपला दिवस चांगला गेला, उपयोगी ठरला, प्रॉडक्टिव्ह झाला असं वाटत राहणाऱ्या तरुणाईला ‘काहीही न करणं’ यातलं सौंदर्य आणि त्याचे फायदे समजून घेणंच अवघड जातं आहे. कळलं तरी वळत नाही, अशा परिस्थितीत स्वतःला देण्यासाठीच्या वेळाचा, शांतपणाचा शोध चालू आहे. निवांत राहायचं म्हणजे काय करायचं? काहीच नाही करायचं, म्हणजे काय करायचं, हेही ज्यांना शिकवायला लागेल अशी ही तरुणाई ‘आर्ट ऑफ नथिंगनेस’ शिकते आहे, स्वतःच्या बाबतीत अमलात आणते आहे. जितकी मेंदूला कामाची गरज असते, चालनेची गरज असते, तितकीच त्याला आरामाचीही गरज असते. त्याशिवाय, पुढचं काम करायला तो पूर्णपणे तयार होऊ शकत नाही. हे वैज्ञानिकदृष्ट्या पटल्याने असेल कदाचित, पण आपल्याला वाटत नसला तरी मेंदूला निवांतपणा देणं गरजेचं आहे हे हळूहळू त्यांच्याही लक्षात येत आहे.
आपल्या मेंदूला कोणत्याही कामात गुंतून राहण्यासाठी एनर्जीची गरज असते. आपण सतत काहीतरी करत राहिल्याने त्याला सतत ‘फाइट ऑर फ्लाइट’ या ॲक्टिव्ह मोडमध्ये राहावं लागतं. आपण आता कितीही माणूस झालेलो असलो, तरी मेंदूचा एक भाग अजूनही स्वतःच्या सेफ्टीचा विचार करतो. तो भाग संपूर्ण मेंदूला ‘अलर्ट’ मोडवर राहायला भाग पाडतो. आपली झोप झाली नाही, आपल्याला कामातून वेळच मिळाला नाही, डोक्यातून अतिमहत्त्वाचे विचार गेले नाहीत, विचारांना ब्रेक लागला नाही, तर मेंदू कायम बिझी राहतो. काहीतरी काम आहे, काहीतरी करायचं आहे, कधीही इमर्जन्सी येऊ शकते, अशा झोनमध्ये मेंदू असताना तो अतिशय थकतो. हेच सलग काही तास, काही दिवस, काही आठवडे, काही महिने सुरू राहतं आणि मग एक दिवस मेंदू इतका थकतो की तो दिवस ‘ब्लँक’ होऊन जातो. हाच दिवस टाळण्यासाठी आताची तरुणाई आधीपासून प्रयत्न करते आहे. वेळोवेळी छोटे छोटे ब्रेक घेऊन, स्वतःच्या मेंदूला आवश्यक असलेला शांतपणा देण्याचा प्रयत्न मनापासून केला जातो आहे.मनाला थकवा वाटेल तेव्हा कामातून आवश्यक तेवढा ब्रेक घेऊन, कोणतेही दुसरे फिरायचे, पार्टीचे, ॲडव्हेंचरचे प्लॅन्स न करता घरात बसून ‘काहीही न करता’ तो वेळ घालवण्यातलं सौंदर्य या पिढीला हळूहळू समजायला लागलं आहे. ‘आर्ट ऑफ डुइंग नथिंग’मधलं कौशल्य मिळवलं की मनाला खरा शांतपणा मिळेल आणि भविष्यातली अस्वस्थता कमी होईल.
