वैशाली शडांगुळे

लग्न हा जगभरातला प्रसिद्ध आणि परवलीचा शब्द. त्यामुळे या सोहळ्याभोवती मोठय़ा प्रमाणात खाद्यसंस्कृती, पर्यटनसंस्कृती, अलंकार, वस्त्रं, परंपरा यांचा संगम पाहायला मिळतो. डेस्टिनेशन वेडिंग असेल तर वैविध्यपूर्ण लग्नसोहळे आणि त्यातली फॅशन मात्र लक्षात राहते. जगभरात लग्न आणि फॅशनचे ठोकताळे बांधले गेले आहेत. गेल्या वर्षभरात प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वं विवाहबद्ध झाली. या लग्नसोहळ्यांमधून फॅशन आणि त्याचं महत्त्व वेगाने बदलल्याचं लक्षात येतं. मेघन मार्कल आणि प्रिन्स हॅरी यांचा विवाह, निक जोनास-प्रिंयका चोप्रा, दीपिका-रणवीर ते इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा शाही विवाह असे अनेक सेलेब्रिटींचे विवाहसोहळे झाले. त्यातून तेव्हा लग्नसमारंभ आणि फॅशन जागतिक स्तरावर कुठे आहे याचा अंदाज बांधता येतो. लग्नसराईच्या निमित्ताने गाऊन, लेहेंगा-चोली, दागदागिने, रंग आणि फॅब्रिक यामध्ये ग्लोबली नक्की कसे बदल होताहेत हे या वेळी आपण जाणून घेऊ या..

जगभरात रॉयल लुक किंवा रॉयल वेडिंग्ज हे खूप प्रसिद्ध असतात आणि ते फॉलो केले जातात. जर ग्लोबली आपण लग्नाची फॅशन पाहिली तर आपल्याकडेही लग्नाच्या बाबतीत विदेशी फॅशन जास्त फॉलो होताना दिसते आहे. भारतात उत्तरेकडून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून ते पश्चिमेपर्यंत लग्नाच्या नानाविध परंपरा बऱ्याच वर्षांपासून आहेत, पण आज ग्लोबली आपल्या पारंपरिक फॅशनमध्येच विदेशी फॅशन जास्त अ‍ॅडॉप्ट केली जात आहे. आपल्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाइलमध्येही वेस्टर्न लुकचे मिश्रण झालेले आहे. ट्रेडिशनल गाऊन आज लग्नात सर्रास वापरले जातात. भारताबाहेर ब्राइड लग्नात गाऊनच परिधान करते. आपल्याकडे लग्नात परंपरेनुसार साडी नेसली जाते, परदेशात साडी हा प्रकार तसा वर्ज्य आहे. सोशल मीडियावरून सामान्य परदेशी नागरिक विविध देशांतील पारंपरिक लग्नसोहळे फॉलो करताना आपण पाहतो मात्र त्याचा अर्थ त्यांची लग्नातली फॅशन बदलली असा होत नाही, तो एक प्रयोगच असतो. लग्नाची फॅशन ग्लोबल होते ती दोन संस्कृतींचा मिलाफ म्हणजे देवाणघेवाण झाल्यावर. याचं सोपं उदाहरण म्हणजे आपल्याकडे किती तरी वेळा महाराष्ट्रीय लग्नात पंजाबी लग्नसमारंभातील पद्धती फॉलो केल्या जातात. अगदी वेस्टर्न पद्धतीने लग्न करणारेही आपल्याकडे अनेक जण आहेत. त्यामुळे फॅशन आणि कल्चरची देवाणघेवाण आपसूकच होते. त्यातून ब्रायडल वेअरमध्ये वैविध्य येतं, ट्रेण्ड सेट होतात. आता हा देशांतर्गत होणारा फॅशनबदल म्हणता येईल. ग्लोबली पाहिलं तर आपण आजकाल बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी स्वीकारतो. त्यामुळे देशी, विदेशी कोणत्याही पद्धतीची फॅशन लग्नसोहळ्यात दिसली तरी त्याचा स्वीकार केला जातो. निक जोनास आणि प्रियंका चोप्राचा लग्नसोहळा दोन्ही संस्कृतींच्या आधारे पार पडला. आपल्या पद्धतीने झालेल्या लग्नात निक आणि त्याच्या कुटुंबीयांनी भारतीय लेहेंगा, ट्रेडिशनल कुर्ता, जूते, साडी सर्व काही ग्रेसफुली कॅ री केलं. तर पाश्चिमात्य पद्धतीच्या लग्नात प्रियांका आणि तिच्या कुटुंबीयांनी गाऊन, सुट्स परिधान केले. अशा प्रकारे दोन संस्कृतींचा मिलाफ होतो तेव्हा त्याबरोबरीने येणारी फॅशनसुद्धा सहज स्वीकारली जाते. एकमेकांच्या परंपरा सांभाळत आत्मविश्वासाने फॅशन आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सहजतेने होताना दिसते. आपल्याकडे लग्नसमारंभात अनेक प्रयोग केले जातात. साडीचा ड्रेस, गाऊन किंवा वनपीस बनवला जातो आणि ट्रेडिशनल वेअर म्हणून आपण तो परिधान करतो. कधी त्यावर ट्रेडिशनल जॅकेट, स्कार्फ, ओढणी अशा गोष्टींची जुळवाजुळव केली जाते. रॉयल वेडिंग होतात तेव्हा लाँग ट्रेडिशनल गाऊनचा वनपीस किंवा ब्रायडल गाऊन्सचा लिलाव करणे असे प्रयोग जागतिक स्तरावर केले जातात. त्यामुळे रिसेलिंग म्हणा किंवा रिसायकलिंग म्हणा रियूज करण्यावर सगळ्यांचा भर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न आणि त्यातल्या फॅशनची ‘लेगसी’ असते. जशी आपल्याकडे पिढय़ान्पिढय़ा असलेली एकच साडी घरी येणारी नवीन सून लग्नात परिधान करून ती परंपरा जपते, त्या पद्धतीने परदेशातसुद्धा ही प्रथा आहे. यातून परंपराही जपली जाते तर दुसरं पारंपरिक वस्त्रं पुन्हा वापरली जातात. ही एक निव्वळ जपणूकच नाही तर ती एक सवय आहे. आपल्याला जशी रिसायकलिंगची सवय आहे तशी परदेशातही आहे. साडीचा सूट करून आपण इतरांना भेट देतो तेव्हा अशा पद्धतीने नवं रूप दिल्यास फॅशनची देवाणघेवाण होते आणि लग्नातली वस्त्रपरंपराही ग्लोबल होते.

दुसरी गंमत म्हणजे आपल्याकडे मेंदी, हळद, संगीत, रिसेप्शन या चार सोहळ्यांना बरंच महत्त्व असल्याने त्या त्यानुसार वैविध्यपूर्ण फॅशन करता येते. मराठी लग्नात तर तीन साडय़ा बदलाव्या लागतात. लग्नाच्या स्थळांमध्येही डेस्टिनेशन वेडिंगपासून ते गावात घरीच मांडवात लग्न करण्यापर्यंत अनेक पर्याय आहेत, त्यानुसार पुन्हा फॅशनची गणितं बदलतातच. परदेशात लग्नसोहळे चर्चमध्येच होत असल्यामुळे व्हाइट गाऊ न हा त्यांचा पारंपरिक पोशाखच लग्नात परिधान केला जातो. त्यांच्याकडे पर्याय कमी आहेत. तर आपल्याकडे विविध पर्याय असल्याने ईशान्य-पूर्वेच्या आणि पाश्चात्त्य लोकांना आपली फॅशन जास्त आवडते आणि त्यांच्याकडून ती (ट्रेडिशनल) फॅशनभारतात आल्यावर फॉलो केली जाते. त्यांच्याकडे एक व्हाइट गाऊ न खूप लाखमोलाचा असतो. तो तयार करण्यापासून ते परिधान करण्यापर्यंत एक वेगळीच धुंदी असते. त्या फॅब्रिकच्या निवडीपासून ते त्या ड्रेसवरच्या एम्ब्रॉयडरीपर्यंत खूप डिझायनर्स काम करतात. ती प्रक्रिया खूप मोठी असते जरी तो ड्रेस आपल्याला कितीही साधा वाटत असला तरी.

सुरुवातीला नुसतंच ड्रेस डिझाइंनिंगवर नाही तर फॅब्रिक डिझाइनिंगवरही जास्त भर दिला जातो.  मी स्वत: आधी माझे फॅ ब्रिक्स डिझाइन करते आणि मगच पूर्ण गार्मेट रेडी करते. हेच तत्त्व जेव्हा लग्नसमारंभात लग्नाची स्टोरीलाइन किंवा टॅग असतो तेव्हा आधी डिझायनर फॅब्रिकतयार करतो आणि मग पूर्ण ड्रेस कसा दिसेल ते फायनल होते. जसं प्रियांका चोप्राच्या व्हाइट गाऊनच्या फॅब्रिकवर ‘डिसेंबर’ असे कोरले होते, जो स्टोरी टॅग होता कारण डिसेंबर महिना या दोघांसाठी खूप महत्त्वाचा होता आणि त्याच महिन्यात त्यांचे लग्न झाले, ही गोष्ट त्या गाऊनशी जोडली गेली. गाऊनच्या फॅब्रिकबरोबरत्याची लांबी, स्केल, एम्ब्रॉयडरी, डिझाइन, स्टाइल आणि लुक निश्चित केला जातो. त्यातही पुन्हा ड्रेसचा लुक कसा हवाय, कोणाचे लग्न कसे होणार आहे अशा बाबी समजून घेऊन आऊटफिट डिझाइन केले जाते.

ग्लोबली विचार करता लग्नाची फॅशन ही जगातील टॉपमोस्ट फॅशन आहे. प्रत्येक देशात लग्नातील फॅशन महत्त्वाची ठरते. चायनीज, जॅपनीज, इंडियन, युरोपियन, अमेरिकन वेडिंग फॅशनही सध्या जास्त ट्रेण्डसेटर आहे. पश्चिमेकडे कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांसारख्या देशामध्ये वेडिंग कल्चर हे जवळपास सारखेच आहे, पण चायनीज, मलेशिया, इंडोनेशिया, इंडिया वगैरे देशात परंपरा वेगळी आहे. आपल्याच देशात विविधता खूप आहे आणि तरी हळूहळू फॅशनही एकसंध होत आहे.

फॅशनच्या दृष्टीनेआपण शेजारील राष्ट्रांचा विचार करतो तेव्हा फॅशनही एकसारखी असते किंवा मिश्र असते. लग्नाच्या पद्धती एकवेळ वेगवेगळ्या असतील पण फॅशनआणि ड्रेसिंग सेन्स, ड्रेस कोड एकसारखे मिक्स झालेले असतात किंवा एकाच पद्धतीचे असतात. दक्षिण भारतीय फॅशनआणि श्रीलंकेतील फॅशनएकाच पद्धतीची आहे, दिल्लीकडील भाग पाहिला तर लडाख, काश्मीर, नेपाळ येथील संस्कृती ही चायनीज फॅशनकडे झुकणारी आहे. तर आसाम, बंगाल, ईशान्येकडील राज्यांच्या फॅशनमध्ये एकसारखेपणा दिसतो. जपान हा देश एका टोकाला आहे तर ऑस्ट्रेलिया एका टोकाला आहे. तिकडे एक वेगळा अनुभव येतो. श्रीलंकेवरून पुढे गेलात तर सिंगापूर, बाली येथील देवळं आणि तिथे होणारे लग्नसमारंभ, त्यांची फॅशन एक आहे. या भागात ब्रोकेड साडय़ा, जरीच्या साडय़ा तसेच केशरचनेवर गजरे, वेणी ही फॅशन एकसारखी दिसून येते. सीमेवरील भूमीकडे फॅशन, लग्नसोहळे हे आपल्यासारखेच असतात. कारण हे सगळे भाग पूर्वी भारतातच होते. भारतात पारंपरिक सौंदर्य, प्रथा-फॅशन यांची मुळं जपण्याचं आणि संवर्धन खूप मोठय़ा प्रमाणावर केलं जातं. तसंच ते ग्लोबली होत असल्याने वेडिंग फॅशनही समृद्ध होते आहे हे निश्चित!

शब्दांकन : गायत्री हसबनीस

viva@expressindia.com