मितेश रतिश जोशी

बेरोजगार इंजिनीअर्स या विषयावर आपण सोशल मीडियावर अनेक मीम्स पाहात असतो. या माध्यमातून इंजिनीअर्सची खुलेआम खिल्ली उडवली जाते. इंजिनीअरिंग क्षेत्रात उच्चशिक्षण घेऊनही मनाजोगती नोकरी न मिळण्याच्या या कठीण काळात अनेक इंजिनीअर तरुणांनी पुढे येत, वेगळी वाट निवडण्याचे धाडस दाखवले. वडे विकण्यापासून कॅफे चालवण्यापर्यंत अनेकविध हटके क्षेत्रात नाव कमावणाऱ्या या तरुणांनी आपल्या व्यवसायाच्या नावात ‘इंजिनीअर’ हा शब्द आवर्जून जोडला आहे. इंजिनीअरिंगची वाट सोडल्यानंतरही त्यांना नव्या व्यवसायात इंजिनीअर हा उल्लेख का बरं महत्त्वाचा वाटतोय? यात व्यवसायवृद्धीचं काही गिमिक आहे की.. 

Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
pune, Young Man Arrested, Raping College Girl, Threatening with girl obscne Video, Pune Police Investigate, girl attempted suicide, crime in pune, pune news,
धक्कादायक : मोबाइलवर चित्रफीत काढून महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार; तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

आपल्या देशात असाही एक काळ होता जेव्हा इंजिनीअर्सना समाजात उच्च स्थान होते. आजही आहे, पण त्या वेळी या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या तुलनेने कमी होती. मधल्या काळात या क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आले आणि इंजिनीअर्सची संख्या झपाटय़ाने वाढली. मात्र प्रचंड पैसा खर्च करून, मेहनतीने अभ्यासपूर्वक इंजिनीअरिंगची डिग्री हातात पडल्यानंतरही बेरोजगार असलेली इंजिनीअर तरुणाई हा कायमच मजेचा विषय म्हणून दुर्लक्षिला जातो आहे. सध्या जगभरात इंजिनीअरिंगचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या संस्था आणि विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. दरवर्षी मोठय़ा संख्येने इंजिनीअर्स तयार होत आहेत. मात्र त्या तुलनेत नोकरी-व्यवसायाच्या संधी फारशा नसल्याने त्यांचे समाजातील स्थान कमी होताना दिसते आहे. नोकरी नाही म्हणून पगार नाही आणि समाजात पत नाही, हे दुष्टचक्र भेदून पुढे जाण्यासाठी वेगळाच मार्ग निवडणारे अनेक इंजिनीअर तरुण सध्या आजूबाजूला आहेत. त्यांचा मार्ग जरी वेगळा असला तरीही त्यांनी ‘इंजिनीअर’ या शब्दाची साथ सोडलेली नाही. याचेच एक उदाहरण म्हणजे पुण्यातील ‘इंजिनीअर वडेवाले’. ऋषिकेश गावंडे पाटील या केमिकल इंजिनीअर असलेल्या तरुणाने सुरू केलेली ही भन्नाट कल्पना.

मुळचा संभाजीनगरचा असलेला ऋषिकेश पुण्यात चांगल्या पगाराची नोकरी करत होता, पण त्याच्या कामातून त्याला आनंद मिळत नव्हता. शिफ्ट डय़ुटीला कंटाळलेल्या ऋषिकेशला कायमच फूड लाइन खुणावत होती. टाळेबंदीच्या आधी त्याने नोकरीला रामराम ठोकला आणि वडापावच्या व्यवसायात पदार्पण केले. १९ फेब्रुवारी २०२० रोजी त्याने पुण्यात बाणेर येथे ‘इंजिनीअर वडेवाले’ची सुरुवात केली. टाळेबंदीची झळ सोसून सुरू केलेल्या या उद्योगाच्या आता पुणे शहरात एकूण आठ शाखा आहेत. वडापावचा आणि इंजिनीअरिंगचा काहीही संबंध नसताना ‘इंजिनीअर वडेवाले’ हे नाव द्यावंसं का वाटलं? यावर आपले विचार सांगताना ऋषिकेश म्हणाला, ‘एक इंजिनीअर म्हणून या व्यवसायात काय लॉजिक लावता येईल?, असा विचार केला असता माझ्या मनात आलं की, पारंपरिक आडनाव देऊन व्यवसायात उडी टाकली तर भरारी घेण्यासाठी काही वर्ष जाऊ शकतात. ‘इंजिनीअर वडेवाले’ या नावावर तेवढी मेहनत घ्यावी लागणार नाही. लोक कुतूहलाने येतील. माझा प्रवास समजून घेतील व आपोआप मी या व्यवसायात भरारी घेऊ शकेन, असं वाटल्यानेच ‘इंजिनीअर वडेवाले’ हे नाव व्यवसायाला दिल्याचं त्याने सांगितलं. हे नावच माझ्यासाठी आयुष्याला खूप मोठी कलाटणी देणारं ठरलं, असं तो सांगतो.

इंजिनीअर असलेला सलूनवाला इन्स्टाग्रामवर सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. पवन क्षीरसागर असं या तरुणाचं नाव असून तो शिक्षणाने प्लास्टिक इंजिनीअर आहे. मूळचा संभाजीनगरचाच असलेल्या पवनच्या घरी केशकर्तन हाच मूळ व्यवसाय केला जातो. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या पवनचे आयुष्य बदलले ते ‘डिस्पोजेबल इरेजर’मुळे. हैदराबादला डिप्लोमा पूर्ण करून घरी आल्यावर चांगल्या पगाराची नोकरी करण्याआधी या इरेजरचं मार्केटिंग करण्याची जबाबदारी पवनने घेतली होती. त्यानिमित्ताने वेगवेगळय़ा सलूनमध्ये जाऊन त्याचं मार्केटिंग तो करत असे. हे मार्केटिंग करत असताना तासन् तास सलूनमध्ये त्याला बसावं लागत होतं. तिथे बसून वेगवेगळय़ा स्टायलिस्टचं काम सुरू असताना त्यांचं निरीक्षण करण्याचा छंदच त्याला जडला होता जणू.. त्यांच्या कामाचा पवनवर प्रभाव पडला. केसांना स्टाईल देणं हीसुद्धा एक कला आहे. जी मुळातच आपल्या घरात आहे, मग कशाला इंजिनीअरिंगच्या डिग्रीवर नोकरी शोधत बसा. त्यापेक्षा आपण याच क्षेत्राकडे वळू आणि आपला उदरनिर्वाह चालवू, असा विचार पवनने केला. एकदा हा विचार पक्का झाल्यानंतर त्याने इरेजरच्या मार्केटिंग जॉबला रामराम ठोकला आणि सलून क्षेत्रात पदार्पण केले. ‘इंजिनीअर सलूनवाला’ या नावाची कल्पना मनात कशी आली?, याबद्दल बोलताना तो म्हणतो, ‘‘मी हैदराबादला शिक्षण घेत असताना तिथले शिक्षक व मित्र मला ‘ए सलूनवाला’ या नावाने हाक मारायचे. त्यांना माहिती होतं आमचं गावी सलून आहे. त्यामुळे मला ते तशी हाक मारायचे. शिक्षणाने इंजिनीअर व पेशाने सलूनवाला या दोन्हीवरून मी माझं स्वत:चं बारसं करून घेतलं.’’ ‘इंजिनीअर सलूनवाला’ हे नाव देताना मला कुठेही माझ्या इंजिनीअरिंगमधील डिग्रीची खिल्ली उडवायची नाही किंवा या शिक्षणाला कुठेही कमीपणा द्यायचा नाही, असं तो सांगतो. मी पहिल्यापासूनच गावी हा परंपरागत सलूनचा व्यवसाय करत बसलो असतो आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले नसते तर मी कदाचित केवळ एक छोटेखानी सलून चालवत बसलो असतो. इंजिनीअरिंगच्या शिक्षणाच्या निमित्ताने जग फिरून आलो, त्यातून आलेल्या शहाणपणामुळे आज माझ्या सलूनच्या चार शाखा महाराष्ट्रात आहेत. इंजिनीअरिंगकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा बदलायला हवा, असेही तो नमूद करतो. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरी करायची हा चौकटीतला विचार बदलायला हवा, असंही पवन सुचवतो. तो इन्स्टाग्रामवर वेगवेगळय़ा रिल्स बनवून सौंदर्यवृद्धीच्या टिप्सही देत असतो, ज्या केवळ ‘इंजिनीअर सलूनवाला’ या नावामुळे चांगल्याच व्हायरल होत आहेत.

एकीकडे ‘इंजिनीअर’ हे नाव जोडून वेगळय़ाच व्यवसायात पडलेल्या तरुणांची कथा आहे. तर दुसरीकडे इंजिनीअरिंगचे शिक्षण घेऊनही आवडीने एखाद्या नव्याच व्यवसायात ठरवून उतरलेल्या तरुणाईचीही अनेक उदाहरणं आजूबाजूला पाहायला मिळतात. पुण्यातील तळेगाव जवळ इंदोरीमधील अश्विन अरुण काशीद आणि केतकी अरुण काशीद या इंजिनीअर बहीण-भावांनी चक्क शेतीची वाट निवडली. अश्विन हा सिव्हिल इंजिनीअर आहे तर बहीण केतकी ही इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअर आहे. शिक्षणाने इंजिनीअर असलेल्या या काशीद भावंडांना शेतीत विशेष आवड निर्माण झाली ते वडील अरुण काशीद यांच्यामुळे. मावळ परिसरातील इंदोरी येथे ते ऊस, टोमॅटो आणि भातामध्ये पारंपरिक शेती करायचे. आपण यापेक्षा वेगळं करावं अशी या भावंडांची इच्छा होती. काही वर्षांपूर्वी त्यांच्या आईने फुलशेती केली होती, हे दोघांना जुने फोटो बघून लक्षात आले. त्यापासूनच प्रेरणा घेऊन अश्विनने सोनचाफा शेतीविषयी माहिती मिळवली आणि सोनचाफा शेती करायचा निश्चय केला. तीन वर्षे वाढीची सोनचाफ्याची रोपं आणून काशीद भावंडांनी शेतीला आरंभ केला. दिवसरात्र मेहनत करून अखेर सोनचाफ्याला फुलं आणि जगात करोना एकदम आला. त्याचा थेट फटका या इंजिनीअर शेतकरी भावंडांना बसला. सणाचे दिवस असूनही टाळेबंदीमुळे बाजारपेठा बंद होत्या. फुलं बहरत असताना दररोज हजारोंच्या संख्येने फुलांचा सडा पडायचा. असंच आठ महिने सुरू होतं. त्यात चक्रीवादळ आलं आणि झाडं उन्मळून पडली. त्यांना पुन्हा रुजवण्यासाठी सर्व परिवार एकवटला. टाळेबंदीमुळे लाखोंचं नुकसान या भावंडांनी सहन केलं, पण दोघांनी हार मानली नाही. कसे मानतील? इंजिनीअर शेवटी! करोना सरला, टाळेबंदी उठली तशी चाफ्याची मागणी वाढली. आता दोघेही रोज साडेतीन हजार फुलांची विक्री करत आहेत, लाखोंचा नफा कमवत आहेत. अश्विनला फोटोग्राफीची तर केतकीला पेंटिंगची आवड आहे, पण आता दोघांचीही आवड एकच झाली आहे ती म्हणजे फुलशेती. अश्विन त्याच्या इंजिनीअर जमीनदार मित्रांना वेळोवेळी शेतीचं महत्त्व सांगून या क्षेत्राकडे वळवण्याचा प्रयत्नदेखील करतो आहे.

पुण्यातल्या ‘किओस्क कॅफे’ची कॉफी सध्या तरुणाईच्या पसंतीत पहिल्या नंबरला आहे. या कॅफेची सुरुवात करणारे तरुण शिलेदारसुद्धा ‘फिरून फिरून गंगावेश’ या म्हणीप्रमाणे इंजिनीअरिंग करून या क्षेत्रात आले आहेत. संग्राम, सावन आणि नीलेश या तीन आयटी इंजिनीअर असलेल्या तरुणांनी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून कॉफी कल्चरमध्ये पदार्पण केले. हे तिघेही कॉलेजमधील मित्र. ज्या फॅन्सी नावाखाली आपण महागडी कॉफी पितो, ती तेवढी महाग बनत नसूनही अवाच्या सवा किमतीला विकली जाते. आणि तरुण मुलं नाहक त्यावर पैसे घालवतात, हे त्यांच्या लक्षात आलं. त्या फॅन्सी कॉफीहून उत्तम चवीची कॉफी तयार करून आपण कमी किमतीत विकूयात, असा या मित्रांनी ध्यास घेतला आणि त्यावर कामाला सुरुवात केली. पहिल्यांदा त्यांनी नोकरी संभाळून काम केलं. नंतर कामाचा आवाका बघता तिघांनीही नामांकित कंपनीतील नोकरी केवळ या कॉफीच्या उद्योगासाठी सोडली. आनंदाची बाब म्हणजे नोकरी सोडताना कोणाच्याच घरच्यांनी त्याविरोधात अवाक्षर काढले नाही. घर पाठीशी उभे असल्याने खंबीर मानसिक आधार त्यांना मिळाला. पुढे त्यांनी ‘किओस्क’ या नावाने कॅफे सुरू केला आणि बघता बघता चोखंदळ पुणेकरांनी या कॉफीला इतका उदंड प्रतिसाद दिला की, वर्षभरात या कॅफेच्या एकूण २१ शाखा पुणे शहरात व उपनगरात सुरू झाल्या. नुकतंच मुंबईत प्रभादेवी व विलेपार्ले इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संग्राम सांगतो, ‘‘आयटीमध्ये नोकरी करत असताना मिळालेले अनुभव कॅफे चालवताना खूप उपयोगी ठरतात. ज्याप्रमाणे ‘डॉमिनोज पिझ्झा’च्या जगभर शाखा आहेत, पण त्याच चवीचा पिझ्झा सगळय़ा शाखांमध्ये मिळतो. तो का मिळतो? कारण ते एकच प्रोसेस, एक एसओपी फॉलो करतात. त्यामुळे त्या एकाच चवीकडे खवय्ये आकर्षिले जातात. आपल्याकडे महाराष्ट्रात ही प्रोसेस फॉलो केली जात नाही. मुख्य शाखेत मिळणाऱ्या पदार्थाची चव इतर शाखांमध्ये मिळेलच याची शाश्वती नाही. आम्ही ही प्रोसेस आयटीत असल्यामुळे फॉलो करतो आहोत. हे ऑपरेशन्स आम्हाला आयटीत काम केल्यामुळे समजले.’’ हे तिघे जरी इंजिनीअर कॉफीवाले या पाटीखाली कॉफी विकत नसले तरीही ते इंजिनीअर असूनही कॅफे चालवतात, याची माहिती लोकांना असल्याने तशा चर्चा खवय्यांमध्ये रंगतात.

शेवटी इंजिनीअरिंग हेही निर्मितीचंच शास्त्र आहे, त्यामुळे क्षेत्र कितीही नवं-जुनं असो नवनिर्मितीच्या प्रेमात असलेली तरुण मनं कुठल्याही बंधनात अडकून पडत नाहीत. ते कल्पकतेला शास्त्रशुद्ध शिक्षण- अनुभवाची जोड देत आपले मार्ग शोधतात, यशाचंही इंजिनीअरिंग त्यांना अचूक जमतं आहे, यात शंका नाही.

viva@expressindia.com