गायत्री हसबनीस viva@expressindia.com

एकीकडे पिढय़ान्पिढय़ा तरुणाई ही हिंदी गाणी गुणगुण्यात आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय संवाद अस्खलित पाठ करण्यात रमलेली आपण आजपर्यंत पाहत आलो आहोत. शाळेत हिंदी भाषेचा गोडवा लागण्यामागे हिंदी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांप्रमाणे चित्रपटीय गाणी आणि संवादांचाही खूप मोठा वाटा राहिला आहे. आज हिंदी कविता आणि हिंदीतील कवी – कवयित्री हे तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्याबद्दल तरुण पिढीला आदरही आहे. तर दुसरीकडे प्रत्येक गल्ली बोळात, चौकाचौकात आणि कॉलेज कॅम्पसमध्ये तरुण मुलामुलींच्या भाषेतही एक अनोखा ‘स्वॅग’ आला आहे. एकमेकांशी बोलताना अनौपचारिक पण हलकेफुलके विनोद करत एका वेगळ्या अभिनिवेशात आजची पिढी बोलताना दिसते. आणि त्यासाठी हमखास हिंदी भाषेचा आधार घेतला जातो. एकमेकांशी बोलताना हिंदीतच बोलण्यावर तरुणाईचा जोर वाढू लागला आहे.

मित्रामित्रांमध्ये हिंदी भाषेत बोलण्याचे वाढलेले प्रमाण हे प्रभावातून आलेले आहे असे दिसते. तो प्रभाव मित्रमंडळींकडून, हिंदी चित्रपट, वेब मालिकांमुळे पडतो आहे. आपल्या आजूबाजूला हिंदी भाषेचा वापर वाढत चालल्यामुळेही तरुणाई या भाषेचा सर्रास वापर करताना दिसते आहे. हिंदीत बोलल्यामुळे त्यांच्यातील संवादात काही एक वेगळी गंमत येते आहे का?, हिंदी भाषा वापरल्याने संवाद हा काही प्रमाणात सोप्पा होतो आहे का?, असे काही प्रश्न पडतात. त्यावर महाविद्यालयीन तसेच नोकरी-व्यवसाय करणाऱ्या तरुणतरुणींची मतं जाणून घेतली असता एकू णच कनेक्ट होण्यासाठी हिंदी भाषेचं माध्यम जास्त सोपं ठरत असल्याचं मत त्यांनी व्यक्त के लं. हिंदीत संवाद साधल्याने मैत्रीत जवळीक निर्माण व्हायला वेळही लागत नाही, उलट मैत्रीचे नाते दृढ होते. त्यातून कॉलेज ग्रुप असेल तर सगळ्यांना फार लवकर जोडणाऱ्या हिंदी भाषेत संवाद साधणं सोपंही वाटतं आणि त्यामुळे मैत्रीही पटकन जुळून येते. कामाच्या ठिकाणीही इंग्रजीबरोबर हिंदीच सर्रास बोलली जाते असंही मत अनेकांनी व्यक्त के लं आहे.

मुंबईची तन्वी भट्ट सांगते, प्रत्येक भाषा खूप स्पेशल असते. मुंबईमध्ये रहात असल्याने आपली मातृभाषा ही प्रथम नंतर हिंदी ही सर्वात प्रामुख्याने बोलली जाणारी भाषा आहे. याशिवाय माझ्या मते, मुंबई एक मेट्रोपॉलिटन शहर असल्याने इथे देशाच्या विविध राज्यातील लोक कामानिमित्त, शिक्षणानिमित्त येऊन स्थायिक झाले आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात लोकांशी हिंदीमध्ये जास्त प्रमाणात संवाद होतो आहे. हिंदीमध्ये संवाद केल्याने एकजुटीची भावना वाढीस लागते असाही काहींचा अनुभव आहे. हिंदी भाषेत बोलताना मला खूप कम्फर्टेबल वाटतं, शिवाय बोलायलाही भाषा सोपी आहे. एकीकडे सर्व भाषेच्या मित्रमंडळींसमवेत हिंदी बोलणं तर आपसूकच होतं. तर आपल्या आजूबाजूची लोकं जरी दुसऱ्या राज्यातली असली तरी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलताना एक आपुलकी वाटते आणि ती माणसं आपल्याला अनोळखी वाटत नाहीत, असं तन्वी सांगते.

पुण्याला कॉलेजमध्ये शिकत असलेली एक मैत्रीण तिचा असाच एक अनुभव सांगते, मी पुण्यात शिकत असले तरी आधी मी मुंबईत शिकत होते. तिथे आमच्या मित्रमंडळींमध्ये हिंदी भाषा जास्त बोलली जाते. तेव्हा माझ्यातही बदल होत गेला. आपण ज्या मित्र- मैत्रिणींशी बोलतोय ते मराठी किंवा इतर बोलीभाषा बोलणारे असले तरी हिंदी आम्हा सगळ्यांना कनेक्ट करत होती. त्यामुळे तो एक इझीनेस तयार झाला होता. कुठे भेटलो तरी ‘क्या कैसी हैं?’ असं ऐकायला मिळायचंच. आता पुण्यात शक्यतो मराठी नाहीतर इंग्रजी वापरतो त्यामुळे इथे कशी आहेस?, हाय डय़ूड! असे शब्द कानावर पडतात. म्हणजे मराठीत बोलताना वाईट वाटतं असं मुळीच नाही. उलट यात तर खूप गोडवा आहे आणि तीच आपुलकीची भावना आहे जी हिंदीतही आहे. पण कॉलेजमधील हिंदी गेले दोन वर्षे मिस करते आहे. माझ्या काही खास मित्रांशी बोलताना मी हिंदी व मराठी दोन्ही भाषा वापरते, पण तेही कुठे मस्त फिरायला गेल्यावर. मित्रांशी आधीच एक घट्ट बॉण्ड असल्याने भाषा स्विच होते आहे हे जाणवतही नाही, असं ती सांगते. तर हिंदी ही आजकालच्या संभाषणात सगळीकडेच कॉमनली बोलली जाते, कारण ती मल्टिकल्चर आहे, असं दीक्षा देसाई ही तरुणी सांगते.  तिच्या मते, मुंबईसारखी शहरे जिथे जिथे आहेत तिथे हे चित्र तरु ण पिढीतच काय, सगळीकडेच पहायला मिळतं. मुंबईत वेगवेगळ्या प्रांतातले आणि संस्कृतीचे लोक  आहेत. मित्रमैत्रिणींमध्येही हिंदी खूप कन्व्हिनियंट आहे, कारण पुन्हा तेच की भिन्न संस्कृती आणि वेगवेगळ्या प्रांतातील मित्रमैत्रिणींशी रोजच्या रोज संवाद साधायचा असतो. अशा ग्रुपमध्ये सगळ्यांनाच हिंदी येत असल्याने त्या भाषेत बोलणं सोपं जातं. हिंग्लिशचाही ट्रेण्ड गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी रुजलेला आहे. प्रॉपर हिंदी बोलण्यापेक्षा मुंबईय्या हिंदी भाषा जास्त बोलली जाते, असं निरीक्षणही दीक्षाने नोंदवलं. युथ कल्चरचा भाग असलेले स्टॅण्ड-अप कॉमेडी, कवितांचे कार्यक्रम यातूनही हिंदी भाषेचा होणारा सर्रास वापर होत असल्याने त्याचाही प्रभाव तरुणाईवर पडला आहे.

हिंदी भाषेत बोलणं सहजसोपं आहे असं तरुण पिढी म्हणते, पण तरीही आपापल्या बोलीभाषेची ओढ कोणीही विसरत नाही. आता तर बरीच तरुण मंडळी विविध भाषाही शिकताना दिसतात, त्यामुळे भाषेचं स्थान हे नातं जोडण्यासाठी, मैत्री जोडण्यासाठी किती महत्त्वाचं आहे हेच हिंदी-हिंग्लिश भाषेच्या वाढत्या वापरावरून अधोरेखित होतं आहे.