‘ब्रॅण्ड’ टेल : जयपोर

भारतीय कारागिरांकडून डिझाइन केलेले कपडे ऑनलाइन माध्यमातून परदेशात पोहोचवायचे हे या ब्रॅण्डचे मूळ स्वरूप होते.

‘ब्रॅण्ड’ टेल : जयपोर
ऑनलाइन फॅशन बाजारपेठेत देशी वा पारंपरिक कपडय़ांसाठी प्रसिद्ध असलेले जे मोजके ब्रॅण्ड्स आहेत, त्या मांदियाळीत ‘जयपूर’ हे नाव उठून दिसतं

रेश्मा राईकवार

सणापासून ऑफिसच्या मीटिंग्जपर्यंत कुठेही मिसमॅच करता येतील, इतके सुटसुटीत सोपे डिझाइन्स आणि फॅब्रिक असलेले कपडे लोकांना खासकरून तरुणाईला हवे असतात. त्यामुळे अतिशय कम्फर्टेबल आणि डिझाइन्स – फॅब्रिकच्या बाबतीत मात्र दिल से हिंदूस्तानी असलेले कपडे हे या ब्रॅण्डचं वैशिष्टय़ आहे.

फॅशन आपल्या मुळांना घट्ट धरून कशी असते, याची प्रचीती देणारे काही ब्रॅण्ड्स आपल्याकडे लोकप्रिय आहेत. देशी फॅब्रिक आणि ड्रेसेस परदेशात विकायचे या कल्पनेने उभा राहिलेला ब्रॅण्ड आज आपल्याच देशात नुसता लोकप्रिय झाला आहे, असं नाही. तर एका मोठय़ा फॅशन समूहाने हा ब्रॅण्ड आपल्या पंखाखाली घेत पारंपरिक ड्रेसेस, डिझाइन्स, कलाकुसर असलेल्या वस्तूंसाठी देश-परदेशातील बाजारपेठ पादाक्रांत करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे.

ऑनलाइन कपडे खरेदी करणाऱ्यांसाठी ‘जयपोर’ हे नाव अपरिचित राहिलेलं नाही. सध्या ऑनलाइन फॅशन बाजारपेठेत देशी वा पारंपरिक कपडय़ांसाठी प्रसिद्ध असलेले जे मोजके ब्रॅण्ड्स आहेत, त्या मांदियाळीत ‘जयपोर’ हे नाव उठून दिसतं. आता या ब्रॅण्डला ‘जयपोर’च नाव का दिलं गेलं? त्यांच्याकडे फक्त जयपूरमधील फॅब्रिक्स आणि डिझाइन्स मिळतात का, असे अनेक प्रश्न सहज पडतात. तर या ब्रॅण्डचा आणि जयपूर शहराचा नावापुरता किंवा त्यांच्या कर्त्यांपुरता काही संबंध असेल की नाही, याचं सहज उत्तर मिळणं थोडं अवघड आहे. कारण वर म्हटल्याप्रमाणे २०१३ साली भारतात आपली सुरुवात करणारा हा ब्रॅण्ड सध्या ‘आदित्य बिर्ला फॅशन अ‍ॅण्ड रिटेल लिमिटेड’ या मोठय़ा समूहाचा भाग आहे. पण पारंपरिक कपडय़ांवर भर देणारा हा ब्रॅण्ड जयपूर येथील फॅब्रिक वा डिझाइन्सपुरता मर्यादित नाही हेही तितकंच खरं..

पारंपरिक फॅशनचा मक्ता मिरवणारा हा ब्रॅण्ड अमेरिकेत जन्माला आला. २०१२ साली अमेरिकेतील लोकांपर्यंत भारतीय फॅब्रिक आणि डिझाइन्स पोहोचवण्याच्या उद्देशाने पुनीत चावला आणि शिल्पा शर्मा जोडीने ‘जयपोर’ या ब्रॅण्डची मुहूर्तमेढ रोवली होती. ई कॉमर्स साइटवर प्रसिद्ध असणारा हा ब्रॅण्ड अस्तित्वात आला तोच ऑनलाइन सेवास्वरूपात.. भारतीय कारागिरांकडून डिझाइन केलेले कपडे ऑनलाइन माध्यमातून परदेशात पोहोचवायचे हे या ब्रॅण्डचे मूळ स्वरूप होते. मात्र परदेशापेक्षा भारतातच पारंपरिक कपडय़ांना जास्त मागणी आहे हे वर्षभरातच लक्षात आल्यानंतर २०१३ मध्ये हा भारतीय ब्रॅण्ड मायदेशात परतला. दिल्ली आणि मुंबईत प्रत्येकी एक आऊटलेट याप्रमाणे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने पारंपरिक, हाताने बनवलेले कपडे, दागिने आणि वस्तू ‘जयपोर’ या ब्रॅण्डमार्फत लोकांपर्यंत पोहोचू लागले. अर्थात, ग्राहकांना या ब्रॅण्डची ओळख प्रामुख्याने कपडय़ांसाठी आणि तेही ई-कॉमर्स साइटच्या माध्यमातूनच झाली. ब्रॅण्डने स्वत:ची वेबसाइटही विकसित केली आणि त्याही माध्यमातून जवळपास ६० देशांमधून भारतीय फॅशन आणि कलाकुसर असलेल्या वस्तूंची, कपडय़ांची विक्री होऊ लागली. पूर्णत: पारंपरिक आणि हॅण्डमेड वा हॅण्डक्राफ्टेड कपडे आणि वस्तू म्हणजे ‘जयपोर’ ही ब्रॅण्डने कमावलेली ओळख त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी महत्त्वाची ठरली.

पारंपरिक फॅशनचा दिवसेंदिवस वाढत चाललेला आग्रह आणि त्यासाठी लोकप्रिय असणारा ब्रॅण्ड या दोन्ही गोष्टी ‘आदित्य बिर्ला फॅशन अ‍ॅण्ड रिटेल लिमिटेड’सारख्या भारतीय फॅशन बाजारपेठेतील मोठय़ा समूहाला ‘जयपोर’मध्ये गवसल्या. तोवर लुई फिलीप, पीटर इंग्लंड, व्हॅन ह्युजनसारखे मोठमोठे ब्रॅण्ड्स या समूहाने विकत घेतले होते. अगदी ‘पॅन्टलून’सारखा तरुणाईच्या गळय़ातला ताईत असलेला ब्रॅण्डही समूहाकडे असताना पारंपरिक फॅशन बाजारपेठेत आपली ओळख नाही ही गोष्ट त्यांना सतावत होती. अखेर ती ओळख ‘जयपोर’ने पूर्ण केली. १११ कोटी रुपये मोजल्यानंतर हा ब्रॅण्ड ‘आदित्य बिर्ला फॅशन अ‍ॅण्ड रिटेल लिमिटेड‘मध्ये समाविष्ट झाला. सध्या मुंबई, दिल्ली, बंगळूरू, पुणे, कोची, त्रिवेंद्रम अशा मोठमोठय़ा शहरांमध्ये असलेले दहाहून अधिक स्टोअर्स आणि प्रामुख्याने ई-कॉमर्सच्या माध्यमातून या ब्रॅण्डचे जाळे देशभर विखुरले आहे. पारंपरिक गोष्टी आपल्या ब्रॅण्डच्या माध्यमातून एकत्र आणणं, एकाच ठिकाणी पारंपरिक आणि नवतेचा मिलाफ असलेल्या वस्तू, कपडे ग्राहकांना उपलब्ध करून देणं हा या ब्रॅण्डचा उद्देश आहे. त्यामुळे फक्त ब्रॅण्डच्या स्वत:च्या लेबलअंतर्गत बनवलेल्या गोष्टीच इथं उपलब्ध आहेत असं नाही. तर काही उत्तम डिझाइनर्स, स्वतंत्रपणे आणि छोटय़ा स्तरावर असलेल्या कारागिरांनाही ब्रॅण्डने आपलं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. हातमागावरचे कपडे, पारंपरिक कलाकुसर असलेले विविध भारतीय फॅब्रिकचे कपडे, दागिने, होम डेकोरच्या वस्तू, पितळेच्या भांडय़ांपासून ते चांदीच्या दागिन्यांपर्यंत भारतीय कला-संस्कृतीची छाप असलेल्या गोष्टी या ब्रॅण्डअंतर्गत उपलब्ध आहेत.

फिर भी दिल है हिंदूस्तानी..

कम्फर्ट हा शब्द सध्या फॅशनच्या बाबतीत परवलीचा ठरला आहे. जडबंबाळ डिझाइन्स नकोत की भारीभरकम फॅब्रिक्स नको. सहज कुठेही परिधान करता येतील, सणापासून ऑफिसच्या मीटिंग्जपर्यंत कुठेही मिसमॅच करता येतील, इतके सुटसुटीत सोपे डिझाइन्स आणि फॅब्रिक असलेले कपडे लोकांना खासकरून तरुणाईला हवे असतात. त्यामुळे अतिशय कम्फर्टेबल आणि डिझाइन्स – फॅब्रिकच्या बाबतीत मात्र दिल से हिंदूस्तानी असलेले कपडे हे या ब्रॅण्डचं वैशिष्ठय़ आहे. आपल्या प्रत्येक प्रांतातून आलेले कपडे, नक्षीकाम, पिंट्र्स यातलं वैविध्य आणि त्यातून काही नवं साधण्याचा प्रयत्न त्यांच्या प्रत्येक कलेक्शनमधून केलेला पाहायला मिळतो. चिकनकारी, ब्लॉक पिंट्रिंग, हॅण्डक्राफ्टेड ब्रास डेकोर, टेम्पल ज्वेलरी, रबरी एम्ब्रॉयडरी हरएक प्रकारात जुनं ते नवं हा ध्यास घेऊन सादर केलेलं कलेक्शन इथं पाहायला मिळतं. त्यामुळे कधी केरळातील कासावू साडीला विविध जरीकामाची जोड देत फेस्टिव्ह कलेक्शनसाठी डिझाइन केलेले कुर्ते स्वर्णमसारख्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतात. तर खास उन्हाळय़ासाठीच्या सुटसुटीत कपडय़ांकरिता चिकनकारीचे मलमल, कॉटनचे कपडे आणि पेस्टल रंगातलं कलेक्शन पाहायला मिळतं. पुरुषांसाठी कलमकारी डिझाइन्सचे शर्ट्स आणि कुर्त्यांचं खास कलेक्शन आहे. तर खास महाराष्ट्राच्या पैठणीवरची नक्षी मश्रु वा हिमरु सिल्कवर उतरवत केलेलं कलेक्शनही ‘जयपोर’ ब्रॅण्डने उपलब्ध करून दिलं आहे.

देश असो वा परदेश, सगळीकडे भारताच्या विविध प्रांतातील संस्कृती आणि परंपरांचा वारसा सांगणाऱ्या फॅब्रिक्स-डिझाइन्सचे कपडे, तीच कलाकुसर अंगावर घेऊन मिरवणाऱ्या होम डेकोरच्या वस्तू फॅशनेबल करण्यावर ब्रॅण्डचा भर आहे. गेल्या काही वर्षांत देशातच पारंपरिक कपडय़ांवर जोर दिला जातो आहे. पारंपरिक कपडे, कलावस्तूंना खूप मोठय़ा प्रमाणावर मागणी आहे. जे जे अभिजात ते ते नव्या माध्यमातून लोकांसमोर आणताना सर्वार्थाने भारतीय ब्रॅण्ड हीच ओळख आपल्याला जपायची आहे, पुढे न्यायची आहे असं सांगणारा हा ब्रॅण्ड फॅशन बाजारपेठेत म्हणूनच अव्वल ठरला आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मन:स्पंदने : गोळय़ांचा मामला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी