भावनेला सूर गवसले रॅपचे..

भारतात बाबा सहगल, यो यो हनी सिंग, रफ्तार, बादशाह अशा काही रॅपर्सनी रॅप कल्चर आणले.

(संग्रहित छायाचित्र)

भक्ती परब

प्रत्येक काळात तरुणाईवर गारूड करणारी अशी एक गोष्ट असते. संगीताचा विचार करता हिप-हॉप, रॅप संगीताने अनेक पिढय़ांमधील तरुणाईला झपाटून टाकलं आहे. पाश्चात्त्य देशाकडून आलेला हा संगीतप्रकार तरुणाईवर कायम अभिव्यक्तीचं प्रभावी माध्यम म्हणून गारूड करता झाला. मध्यंतरीच्या काळात काहीसा शांत असलेला हा प्रकार फक्त बॉलीवूड संगीतातून ऐकू येत होता. मात्र हे सत्य नाही. मुंबईत आजघडीला २५ हजार अंडरग्राऊंड तरुण रॅपर्स आहेत. हा आकडाच या संगीतकलेचा तरुणांवर किती प्रभाव आहे, याची साक्ष देतो..

भारतात बाबा सहगल, यो यो हनी सिंग, रफ्तार, बादशाह अशा काही रॅपर्सनी रॅप कल्चर आणले. पण ते बॉलीवूडसाठी काहीतरी लाईट म्युझिक या अर्थानेच मर्यादित राहिले. त्यांच्या म्युझिक व्हिडीयोजमध्ये दिसणारा चकचकीतपणा, आलिशान गाडय़ा, ग्लॅमरस मुली यामुळे हे रॅप संगीत जनसामान्यांत रुजले नाही. परंतु एमीनेम नावाच्या प्रसिद्ध अमेरिकन रॅपरपासून प्रेरणा घेऊन भारतात १९९० पासून अंडरग्राऊं ड हिप-हॉप संस्कृती बहरू लागली. या अंडरग्राऊं ड हिप-हॉपमध्ये अनेक रॅपर्स ग्रुप तयार होऊ  लागले. काही स्वतंत्रपणे सराव करू लागले. आपल्याकडे भ्रष्टाचार, दहशतवाद, रोजच्या आयुष्यात भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत. त्यावर या रॅपमधून सहज व्यक्त होता येत असल्याने या माध्यमाशिवाय पर्यायच नव्हता, असे ही रॅपर मुलं सांगतात.

एका विशिष्ट तालाच्या आवर्तनाशी खेळणारं, रचनेची चिंता न करता साकारलेलं शब्द गाणं म्हणजे रॅप! हिप-हॉप रॅपमध्ये शब्दाला प्राधान्य आहे. त्यात शब्दांची तालासोबत चाललेली जुगलबंदी ऐकणाऱ्याला थक्क करते. त्याला स्वतंत्र चाल अशी नसते, पण मागे सुरावटीला एखादं वाद्य किंवा एखादी धून वाजत असते. फास्ट बीटवर रॅप केलं जातं, तसं संथ लयीतील रॅपही पुष्कळदा दिसतं. आपल्याकडे रॅप हे जोरजोरात, जलद ठेक्यावर, घाईघाईत, श्वास न घेता गायचं गाणं, अशी चुकीची समजूत आहे. पण हिप-हॉपमध्ये केवळ शब्दांचा नाद नाही, तर अर्थही फार मोलाचा असतो. त्यामुळे जे रॅप गातात ते मुळात चांगले लिहिणारे असतात. ते जे गातात, ते त्यांनीच लिहिलेलं असतं. हिप-हॉप रॅप हे एक प्रकारचं स्टोरीटेलिंग आहे.

तरुणांचा मोठय़ा प्रमाणावर असलेल्या सहभागामुळेच या रॅप संगीताची दखल वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या रॅप बॅटल स्पर्धा, कॅ फे किंवा लाऊं जमध्ये होणारे रॅप म्युझिक शो यांनी घेतली नसती तरच नवल. हे रॅपर्स नेमक्या कशा पद्धतीने काम करतात ते त्यांच्यातील काही प्रसिद्ध ग्रुपशी बोलून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. टोनी सबस्टीयन या रॅपरचा धारावीतील मुलांचा ग्रुप २०११ च्या आसपास बनला. त्यांची अनेक रॅप गाणी गाजली. या दरम्यान त्याने ‘आई शप्पथ साहेब मी नव्हतो’ नावाचं रॅप गाणं केलं. टोनीने तेलुगू असूनसुद्धा मराठी गाणं गायलं म्हणून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. नंतर तो एम टीव्ही या वाहिनीशीही जोडला गेला होता. त्यानंतर २०१३ मध्ये ‘गली बॉय’ नावाने डिव्हाइन या रॅपरचा ग्रुप प्रसिद्धीच्या झोतात आला. अंधेरीच्या जे.बी.नगर येथे राहणारा व्हिव्हियन फर्नाडिस ऊर्फ डीव्हाईन याने वयाच्या १३ वर्षांपासून माईक घेऊन रॅप गायला सुरुवात केली. २०१३ मध्ये त्याचं ‘ये है मेरा बॉम्बे’ नावाचं गाणं खूप गाजलं, त्यानेच त्याला ओळख मिळवून दिली. तो लोकप्रिय झाला.

त्याच्याचबरोबरीने एमिवे बंटाई नावाचा एक रॅपर आपली ओळख घडवत होता. त्याचं मूळ नाव शाहरुख शेख आहे. त्याने रफ्तारचा डिस्ट्रॅक्ट व्हिडीओ म्हणजे रफ्तारला चिडवणारा व्हिडीओ बनवला. त्यानंतर तो प्रसिद्धीस आला. आता त्याच्या प्रत्येक स्वतंत्र गाण्याला कमीत कमी ५ मिलियन व्ह्य़ूज असतात. आज जिथे जाल तिथे सर्वांच्या तोंडी त्याची गाणी आहेत. २४ वर्षांच्या या मुलाचा स्वत:चा बंटाई स्टुडिओ आहे. हा बंटाई शब्दही त्याच्याच गाण्यातून लोकप्रिय झाला. त्याचं ‘और बंटाई’ नावाचं रॅप गाणं लोकप्रिय झालं. तो मूळचा मुंबईच्या अ‍ॅन्टॉप हिल भागातला. बंटाई शांत आणि हुशार मुलगा होता. २०१० मध्ये ‘एमीनेम’ या रॅपरचं ’नॉट अफ्रेड’ हे गाणं ऐकून त्याला अक्षरश रॅपचं वेड लागलं. तो बारावीमध्ये नापास झाला. घरच्यांनी विरोध केला. मग कालांतराने पाठिंबाही दिला. एकदा तो त्याच्या वडिलांना इंग्रजी रॅप गाणं ऐकवत असताना त्यांनी त्याला हिंदीत रॅप करायला सांगितलं. तेव्हापासून तो हिंदीत रॅप करू लागला. सध्या तो यूटय़ूबवर सेन्सेशन बनलाय, त्याचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत.

नेझी हाही कुल्र्यातला २४ वषार्ंचा मुलगा. त्याचं मूळ नाव नावेद शेख. तो हिंदी, मराठी, उर्दू भाषेत रॅप करतो. आपल्या आसपासची सद्यस्थिती तितक्याच परिणामकारक पद्धतीने मांडण्यासाठी रॅपशिवाय दुसरा कुठलाही प्रकार योग्य नाही, असं तो म्हणतो. आमच्या रोजच्या धडपडीत आम्ही जे काही अनुभवतो तेच आमच्या रॅप गाण्यातून उमटतं असं तो सांगतो. ही मुलं एककीडे स्वत: रॅप सादर करतात, इतर मुलांना शिकवतात, स्वत:चे अल्बम्सही करतात. कुणाल पंडागळे ऊर्फ ‘काम भारी’ हा कांदिवलीत राहणारा १९ वर्षांचा मुलगा, त्याच्याच वयाचा अल्ताफ शेख म्हणजेच रॅपर एम.सी.अल्ताफ हा धारावीतला मुलगा. सध्या हे दोघेही रॅप म्हणून ओळख घडवत आहेत.

कधी राजकीय व्यवस्थेवविरुद्ध बंड, जातपात-धर्म-पंथ-स्त्री-पुरुष असे सगळे भेद विसरून आमचं म्हणणं ऐका. आम्हाला जसे आहोत तसं स्वीकारा, स्वत:ची ओळख घडवण्यासाठी आमच्यापाशी शब्द आणि रॅपचं अस्त्र आहे. आपल्यात संवाद होऊ दे.. अशी एक तळमळ या रॅपर्सच्या शब्दांत दिसते. यात मुलीही मागे नाहीत. दीपा उन्नीकृष्णन ऊर्फ डी. एम.सी. ही कल्याणची रॅपर गर्ल ‘सच बया संगीत से, उसी में मेरी जीत है’ असं म्हणत रॅपरच्या विश्वात आली. आता तिने ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटातील ‘जग्गा जितेया’ या गाण्यात रॅप करून बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळवलाय. तिने तिच्या करिअरला २०१२ मध्ये सुरुवात केली. २४ वर्षांची दीपा या अंडरग्राऊंड हिप- हॉप चळवळीशी जोडलेली आहे. महिला सक्षमीकरण, स्त्री-पुरुष समानता अशा विषयांवर ती रॅपमधून भाष्य करते. आधी रॅप शो करण्यासाठी तिला घरातून परवानगी मिळायची नाही, पण आता तिच्या घरातून तिला पाठिंबा मिळाला आहे. तिच्यासारख्याच अंबरीन ऊर्फ बी गर्ल एएमबी, निरू पाल, सोफिया अश्रफ, बी गर्ल श्वती पिंक अशा काही मुलीही या क्षेत्रात नाव कमवत आहेत.

धारावीतच लहानाचा मोठा झालेला २१ वर्षीय अल्पेश करकरे या सगळ्या रॅपर मुलांचं निरीक्षण करत आला आहे. नेझी वगैरे रॅपर्सचा संघर्ष त्याने जवळून पाहिलाय. तो म्हणतो, गांजा किंवा तत्सम अमली पदार्थांचं सेवन करूनच ही मुलं रॅप करतात, असे काही गैरसमज समाजात आहेत, ते पूर्णपणे चुकीचे आहेत. काही अपवाद सोडले तर अशी असंख्य रॅपर मुलं कुठलंही व्यसन न करता एक कला म्हणून रॅप करतात, असं तो सांगतो. आपल्याकडे वर्षभरात विविध भाषांमध्ये मिळून साधारण २००० चित्रपट प्रदर्शित होतात. प्रत्येक चित्रपटात रॅप साँग असेलच असं नाही. प्रत्येक जाहिरातही रॅपमध्ये असेलच असे नाही, पण तरीही या माध्यमात आता तरुण रॅपर्सना संधी मिळते आहे. रॅप ही एक संस्कृती आहे, पण करिअर म्हणून बघताना त्याबरोबर अजून एखादं टॅलेंट आपल्याकडे हवं. कारण सध्या या क्षेत्रात स्पर्धा खूप आहे, असं अल्पेश म्हणतो.

हिप-हॉपमध्ये बीट बॉक्सिंग, डीजेईंग, ग्रॅफिटी आणि रॅप असे चार प्रकार लोकप्रिय आहेत. असे सांगत रॅपर धवल परब ऊर्फ डेव्हील म्हणाला, त्याने हिप-हॉप रॅप गाणं एमटीव्हीसारख्या चॅनेलवर पाहिलं. एमीनेमचं रॅप ऐकल्यावर त्यालाही वाटलं की मीही हे करू शकतो. त्यावेळी तो त्याचा छंद म्हणून कविता लिहून त्याचेच रॅप करायचा. आता त्याने या कलेला आपल्या करिअरचा आकार दिला आहे. रॅपमध्ये शब्दांना खूप महत्त्व असतं ही बाब त्यानेही अधोरेखित केली. त्याने मुंबईतल्या इतर रॅपर मुलांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट केलं. तिथेच त्यांचा मोठा ग्रुप बनला. ते एकमेकांना भेटू लागले. रॅपवर चर्चा करू लागले. कॉलेजमध्येही त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. आधी काहीजणं रॅपला तुच्छ लेखायचे, पण आता त्यांचा दृष्टिकोन बदलत असल्याचं तो सांगतो.

२२ वर्षीय हृषीकेश जाधव ऊर्फ एम.सी. आझादच्या मते नॉलेजचा प्रसार करणं हे माझं काम आहे, पैसे तर मिळतीलच. त्याचा मराठमोळा ग्रुप असून त्याच्या ग्रुपमधील सगळे रॅपर्स मराठी भाषेतून रॅप करतात. आझादचंही लवकरच रॅपमधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण होणार आहे. अमरावतीमध्ये राहणारा रॅपर मुलगा सौ रब ऊर्फ मूळ नाव त्याचं सौरभ अभ्यंकर. त्याने ‘गली बॉय’ चित्रपटातील ‘ट्रेन साँग’ हा एक ट्रॅक गायला आहे. त्याला अजून एक बॉलीवूड ऑफर मिळाली आहे. अखिलेश सुतार, धर्मेश परमार हे दोघे मराठी आणि गुजराती भाषेतून रॅप करतात. त्यांच्या स्वदेशी या रॅपर चळवळीतून ‘सेव्ह आरे’ हे रॅप गाणं करण्यात आलं. तसंच त्यांनी मेट्रोच्या खोदकामामुळे झालेली दैना रॅपमधून मांडलीय. प्रतीक सावंत, अक्षय मोरे, जॅझी नानू, सुबोध, रॅग्स, अंकित हर्चेकर अशी मुलं मराठी रॅपमध्ये नाव कमावत आहेत.

काही रॅपर्सचे स्वत:चे यूटय़ूब चॅनेल असते. काहीजण एकत्र मिळून म्युझिक व्हिडीओ करतात. तर काहीजण रॅपसोबत सोशल मीडिया मार्केटिंगमध्येही काम करतात, असं रॅपर अंकित सांगतो. हे रॅपर्स आपल्या नावात एम.सी. ही दोन अक्षरे लावतात. त्याला ‘मास्टर ऑफ सेरेमॉनिज’ किंवा ‘म्युझिक कम्युनिकेटर’ म्हणून संबोधलं जातं. मुंबईव्यतिरिक्त पंजाब, दिल्ली, कोलकाता, काश्मीर, बंगलोर या ठिकाणी रॅपर्स मोठय़ा प्रमाणात आपले अस्तित्व दाखवून देत आहेत. सोशल मीडिया, म्युझिक कंपनी, रॅप बॅटल स्पर्धा, रॅप शोज करणं यामधून या मुलांना व्यासपीठ मिळतं आहे. त्यांच्या संघर्षांला आता कलेचं कोंदण मिळाल्यामुळे त्यांची अभिव्यक्ती वाहवा मिळवू लागली आहे. ही रॅपर्स मुलं बहुत हार्ड, बहुत हार्ड हे दोन शब्द वारंवार वापरतात, त्यांच्या संघर्षांचा तो हुंकार आहे. त्यांच्यातील प्रत्येकाच्या भावनेला, आयुष्यातील बऱ्यावाईट अनुभवांना मिळालेलं हे रॅप संगीताचं रूप त्यांना प्राणापेक्षाही प्रिय आहे..

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article about mumbai underground rappers