article about popular marathi actress sayali sanjeev zws 70 | Loksatta

क्लिक पॉईंट : ‘गौरी’ ते ‘इंद्रायणी’

अभिनयाच्या क्षेत्रात रूढ अर्थाने प्रशिक्षित नसलेली सायली अजूनही स्वत:ला या क्षेत्रातली विद्यार्थिनी म्हणते.

क्लिक पॉईंट : ‘गौरी’ ते ‘इंद्रायणी’
अभिनेत्री सायली संजीव

वेदवती चिपळूणकर

‘काहे दिया परदेस’मधून घराघरांत पोहोचलेली ‘शिव’ची गौरी अर्थात अभिनेत्री सायली संजीव. ‘मन फकिरा’, ‘झिम्मा’ अशा चित्रपटांमधून तिच्या वेगळय़ा धाटणीच्या भूमिका सर्वानी पाहिल्याच आहेत. आताच्या तिच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या शंतनू रोडे दिग्दर्शित चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आणि सायलीच्या ‘इंद्रायणी’चं सर्वाकडून कौतुक होतं आहे. अभिनयाच्या क्षेत्रात रूढ अर्थाने प्रशिक्षित नसलेली सायली अजूनही स्वत:ला या क्षेत्रातली विद्यार्थिनी म्हणते.

सायलीने अभिनयाची सुरुवात एकांकिकेपासून केली. पु. ल. देशपांडे महाकरंडक स्पर्धेत सायलीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय असे पुरस्कार मिळाले होते. सायली सांगते, ‘२०१३ साली मला नाशिकमधून या स्पर्धेत हे पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे मला असं वाटलं की, मला थोडं काही तरी येतंय, जमतंय. पण माझं फॉर्मल शिक्षण हे राज्यशास्त्र या विषयात झालं आहे आणि आता मी त्यातच मास्टर्ससुद्धा करते आहे. तोच माझा बॅकअप प्लॅनही होता. अजूनही माझा बॅकअप प्लॅन तोच आहे’, असं सांगताना इंडस्ट्रीतील आर्थिक स्थैर्याबद्दल ती स्पष्टपणे मत मांडते. ‘माझं वैयक्तिक मत हे आहे की, प्रत्येकाने बॅकअप प्लॅन ठेवलाच पाहिजे. आता इंडस्ट्रीमध्ये असलेल्या अनेक सीनियर कलाकारांचेही इतर प्लॅन्स आणि इतर कामं आहेतच. अनेक कलाकारांचे रेस्टॉरंट्स् आहेत, काही जण फॅशन आणि स्टायिलग क्षेत्रात आहेत, तर काही जण अजूनही एका बाजूला नोकरी करतात. हे क्षेत्र इतकं अनिश्चित आहे की आर्थिक सातत्य ठेवायचं असेल, स्थैर्य हवं असेल तर काही वेळा काही प्रमाणात इतर कामांची मदत होते. मात्र माझ्याकडे काम नाही असं सुदैवाने कधी झालं नाही’, असं ती सांगते. सायलीने एकांकिकेनंतर अभिनयाकडे करिअर म्हणून पाहायला सुरुवात केली.

‘काहे दिया परदेस’ या मालिकेने सायलीला लोकप्रियता मिळाली. आजही अनेक प्रेक्षक तिला ‘गौरी’ म्हणूनच ओळखतात. सायली म्हणते, ‘मला माझ्या कॅरेक्टरच्या नावाने ओळखलं गेलेलं आवडतं. ‘काहे दिया परदेस’ला इतकी वर्ष होऊन गेल्यावरही प्रेक्षक माझं ते नाव लक्षात ठेवतात, मला त्या नावाने ओळखतात, ही माझ्यासाठी खूप कौतुकाची गोष्ट आहे. आता ‘गोष्ट एका पैठणी’ची यातून इंद्रायणी ही ओळखसुद्धा हळूहळू निर्माण होईल, होतेय आणि तीही मला आवडतेय. यालाच मी कौतुकाची थाप समजते’. ही थाप म्हणजे आपण या क्षेत्रात जे काही करतोय ते योग्य करत आहोत, योग्य दिशेने आपली वाटचाल होते आहे आणि प्रेक्षकांना आपले काम आवडते आहे हे यातून आपल्याला समजतं असं ती सांगते. 

प्रेक्षकांनी नेहमी सायलीला पसंती दिली आहे, मात्र तिच्या करिअरमध्ये कोणतेच कठीण प्रसंग आले नाहीत असंदेखील नाही. ती सांगते, ‘काहे दिया परदेस’ या मालिकेच्या आधी मी एक ऑडिशन दिली होती. दुसऱ्या दिवशी शूटिंग सुरू होणार होतं आणि मला आदल्या दिवशी रात्री सांगितलं गेलं की उद्या येऊ नकोस. आणि त्यात मला नाही घेतलं. त्या वेळी मला एकदा असं वाटलेलं की जाऊ दे मला नाही करायचं हे, मी परत जाते. एकदा प्रयत्न करून पाहिला, आता सोडून देऊ या. पण मी सोडून नाही दिलं आणि नव्याने दुसरीकडे प्रयत्न केले आणि ‘काहे दिया परदेस’ मला मिळाली. संयम आणि प्रामाणिकपणा असेल तर पुढे जाता येतं हे माझं मला यातून समजलं. एखादी गोष्ट अपेक्षेप्रमाणे घडली नाही, तरीही जर संयम टिकून असेल तर सेटबॅक बसत नाही आणि आपण काम करायला पुन्हा तयार होतो. मला माझ्या एका कलाकार मैत्रिणीने हे नुकतंच सांगितलं की त्या वेळी मला आयत्या वेळी सीरियल नाही करायची सांगितल्यावरसुद्धा मी ते धरून नाही ठेवलं ही खूप महत्त्वाची गोष्ट होती.’ सायली सांगते की, जितक्या लवकर तुम्ही निगेटिव्ह गोष्टीवरून मूव्ह-ऑन कराल तितकं लवकर नवीन गोष्टीवर लक्ष केंद्रित करता येतं.

मनोरंजन क्षेत्रात नव्याने धडपडणाऱ्या सर्वासाठी सायली सांगते, ‘मला माझ्या बाबांनी सांगितलं होतं की तुम्ही लोकांशी जसं वागाल तसं लोक तुमच्याशी वागतात. तुम्ही चांगलं वागलात तर लोकही तुमच्याशी चांगलंच वागतात. याचाच अनुभव मी इंडस्ट्रीमध्ये घेतला. मराठी इंडस्ट्रीमध्ये तरी सगळे नातेसंबंध टिकून राहतात. इंडस्ट्रीने एकदा आपलंसं केलं की ती तुम्हाला कधीच त्रास देत नाही, तुम्हाला दु:ख होईल असं काही करत नाही. या क्षेत्राबद्दल लोकांचे अनेक गैरसमज आहेत, मात्र ते तसं नाहीये. तुम्ही इंडस्ट्रीवर प्रेम करायला लागलात की इंडस्ट्रीही तुम्हाला भरभरून प्रेम देते.’  मराठी मनोरंजन क्षेत्रातल्या अनुभवांबद्दल बोलताना सायली मनापासून क्षेत्राचे आभार मानते आणि स्वत:ला भाग्यवानही समजते. viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 03:30 IST
Next Story
कायद्याचं बोला