कुटुंब दिनाच्या निमित्ताने..

वर्षभरानंतर करोनापश्चात जनजीवन पूर्वपदावर आले असताना हा कुटुंब दिन कसा साजरा केला गेला

वैष्णवी वैद्य viva@expressindia.com

१५ मे हा जागतिक कुटुंब दिवस म्हणून साजरा केला गेला. भारतीय परंपरेत कुटुंबसंस्थेला खूप महत्त्व आहे. मुळात ही कुटुंबवत्सल संस्कृती आहे. विभक्त कुटुंब पद्धतीचा वेगाने प्रसार होत असताना आपल्याकडे अजूनही एकत्र कुटुंब पद्धतच नांदताना दिसते आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी व्हर्च्युअल पद्धतीने एकत्र येण्याचे काय काय प्रयोग केले होते. त्याचा आढावाही आपण ‘व्हिवा’मधून घेतला होता. आता वर्षभरानंतर करोनापश्चात जनजीवन पूर्वपदावर आले असताना हा कुटुंब दिन कसा साजरा केला गेला, व्हर्च्युअल भेटीगाठी आजही महत्त्वाच्या वाटतायेत का याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न..

गेल्या वर्षीपर्यंत व्हिडीओ कॉल्समधून साजरे होणारे सण, वाढदिवस, गेट टुगेदरचे कार्यक्रम हा त्या वेळी गाजणारा ट्रेण्ड झाला होता. त्याची सगळय़ांना बऱ्यापैकी सवय झाली होती.

आता सगळं सुरळीत होता होता पुन्हा पूर्वीप्रमाणे एकमेकांच्या आवर्जून भेटीगाठी घेतल्या जातायेत की अजूनही व्हर्च्युअल जगातच तरुणाई रमली आहे याबद्दल उत्सुकता वाटणं साहजिक आहे. करोनाकाळात सगळय़ात अडचणीचा मुद्दा ठरला होता तो लग्न समारंभांचा.. ऑनलाइन लग्न करणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती. थाटामाटात हौशीने ठरवलेल्या लग्नांमध्ये अनेक नवनवीन प्रयोग आणि पद्धती पाहायला मिळाल्या, पण परिस्थिती पूर्वपदावर आली आहे म्हटल्यावर तब्बल दीड-दोन वर्षांनी सगळय़ांची प्रत्यक्ष गाठभेट होणार आणि एकमेकांबरोबर आनंद साजरा करता येणार ही गोष्ट महत्त्वाची ठरली. प्रत्येक सण-समारंभ, लग्न सोहळे दणक्यात साजरे झाले. एकंदरीत व्हर्च्युअल ट्रेण्डचा सगळय़ांनाच हळूहळू कंटाळा येऊ लागला आहे. ज्यांचं अजूनही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे त्यांना कधी एकदा ऑफिस गाठून वर्क सुरू करतो आहे, याची आस लागली आहे. अर्थातच, नोकरी- व्यवसाय किंवा शिक्षणाच्या निमित्ताने होणाऱ्या या एक्स्टेंडेड फॅमिलीला भेटण्याची ओढही तितकीच जास्त असते. त्यामुळे व्हिडीओ कॉलवर एकमेकांना पाहात मीटिंग वा क्लासेस अटेंड करण्यापेक्षा प्रत्यक्ष एकमेकांच्या बरोबरीने गोष्टी कधी करता येतील, याची वाट बघितली जाते आहे. 

सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी समजली जाणारी ‘चतुरंग प्रतिष्ठान’ संस्था असं सांगते की, आमच्या सहा केंद्रांवरील कार्यकर्ते ही आमची एक्स्टेंडेड फॅमिलीच आहे. गेली ४६ वर्षे शिवाजी पार्क येथील उद्यान गणेश मंदिरात अक्षय्य तृतीयेला साजरा होणारा वर्धापन दिन आम्ही गेल्या वर्षी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकत्र जमून साजरा केला होता, मात्र या वर्षी बऱ्याच काळाने हे प्रत्यक्षरूपात करताना खूप आनंद झाला. गेल्या वर्षी व्हर्च्युअल का होईना भेटीचा आनंद असला तरी आपुलकी वाटत नव्हती, जी समोरासमोर बघून वाटते.

आता तर तरुणाई ‘रियुनियन आफ्टर लाँग टाइम’ असंही गेट टुगेदर करू लागली आहे. बऱ्याच तरुणांना कोविडच्या काळातच नवीन नोकरी लागली आहे. त्यांचे काम मुळातच घरात बसून सुरू झाले, त्यामुळे त्यांना नवीन ऑफिस व कॉर्पोरेट लाइफ अनुभवण्याची प्रचंड इच्छा आहे. तर जे विद्यार्थी गेल्या दोन वर्षांत कॉलेजमध्ये प्रवेश करते झाले आहेत आणि घरातूनच शिक्षण घेत आहेत त्यांचीही कॉलेज लाइफ अनुभवण्याची इच्छा शिगेला पोहोचली आहे.

‘पोस्ट कोविड’ शॉपिंग ट्रेण्ड

ठाण्याची जुईली जोशी सांगते, न भेटतासुद्धा सगळे कनेक्टेड होते तरीही मैत्रिणींसोबत भटकणे, खाऊगल्लीत फिरणे, शॉिपगला जाणे हे सगळं मिस करत होते. आता बंधनं संपल्यामुळे मुंबईतल्या सगळय़ा स्ट्रीट शॉपिंगच्या गल्ल्या आम्ही पालथ्या घातल्या. असंही दोन वर्षांत घरात बसून खाण्याचे इतके टुणटुणीत नवनवीन प्रयोग झाले की नवीन कपडय़ांशिवाय पर्याय नव्हता. काहींनी व्हर्च्युअली साजरे केलेले वाढदिवस, समारंभाचे फोटो फ्रेम करून घरात लावले आहेत, जेणेकरून त्या आठवणी कायम राहतील. गेली दोन वर्षे निराशाजनक वातावरणात आनंदीपणे टिकून राहण्यासाठी काय करता येईल याची धडपड सगळे करत होते. व्हर्च्युअली एकमेकांशी कनेक्टेड राहणे हा नाइलाजास्तव स्वीकारलेला मार्ग होता, आता सगळं सुरळीत झाल्यावर मात्र त्यातच अडकून राहणं कोणालाही पसंत नाही. उलट, कुटुंबाचं महत्त्व तरुणाईला नव्याने जाणवलं असल्याने परिवारासोबतचा, एक्सटेंडेड फॅमिलीसोबतचा बाँड अधिकच घट्ट झाला आहे. कोविडच्या काळात जर काही चांगलं घडलं असेल तर कुटुंब अधिक जवळ आलं, असं मत तरुणाई व्यक्त करताना दिसते. गेल्या वर्षी जागतिक कुटुंब अधिक जबाबदारीने साजरा केला गेला होता, या वेळी आपल्या माणसांच्या सहवासात राहून दिलखुलासपणे लुटलेल्या आनंदाच्या क्षणांची जोड आयुष्याला मिळाली आहे.

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about world family day celebration international day of families 2022 zws

Next Story
‘ब्रॅण्ड’ टेल : अ‍ॅलन सोली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी