राधिका कुंटे

एखाद्याला चक्कर येणं, त्या चक्कर येण्याचं निदान व्हर्टिगो असणं आणि या आजारात सध्या सर्वत्र हजर असणाऱ्या चिंतातुर मनाचा वाटा आहे का हे पडताळणाऱ्या डॉ. देविका गद्रेच्या संशोधनाविषयी जाणून घेऊया.

ती मूळची पार्ल्याची. तिचं शालेय शिक्षण पाल्रे टिळक शाळेमध्ये आणि अकरावी-बारावी (सायन्स) साठ्ये महाविद्यालयात झालं. पुण्याच्या डीईएस महाविद्यालयात साडेचार वर्षांच्या फिजिओथेरपीच्या (भौतिकचिकित्सा) अभ्यासक्रमाची पदवी तिने घेतली. त्यानंतर वर्षभर डॉ. अतुल लोंढे यांच्या क्लिनिकमध्ये ती असिस्टंट होती. दरम्यान, ‘एनएमआयएमएस युनिव्हर्सटिी’ची प्रवेश परीक्षा देऊन तिथे न्युरॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला. एनएमआयएमएसचा नानावटी हॉस्पिटलसोबत सहयोग आहे. तिच्या संशोधनाच्या कामाचे तास नानावटीत असतात. एकूण दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम येत्या तीन महिन्यांत पूर्ण होईल.

पहिल्या वर्षांत फर्स्ट सेमिस्टरनंतर विद्यार्थ्यांना संशोधनाचा विषय निवडायचा असतो. देविका सांगते की,‘‘माझ्या बाबांना झालेला पोझिशनल व्हर्टिगोचा त्रास पाहिला होता. तेव्हा म्हणजे साधारण पंधरा वर्षांपूर्वी व्हर्टिगोविषयी फारशी माहिती आणि जागृती नव्हती. तितकीशी सुलभ आणि सुयोग्य उपचार पद्धती नव्हती. निदान झाल्यावर फिजिओथेरपी आवश्यक असणं आणि त्यातल्या व्यायामाचा सातत्याने येणारा गुण बाबांनी अनुभवला. पदव्युत्तर शिक्षणाचा अभ्यास करताना व्यायामात वापरल्या जाणाऱ्या ‘काऊथ्रोन कूकसे’ या प्रोग्रॅमविषयी मला डॉ. लोंढे यांच्याकडून समजलं. त्यामुळे त्या संदर्भात अधिक वाचन केलं. त्यानंतर डॉ. सबा थावर या माझ्या गाइडशी बोलणं होऊन विषय निश्चित झाला. ‘इडिओकायनासिस’विषयी अवांतर वाचनातील काही लेखांतून समजलं. त्यात अधिक रस वाटला; कारण व्हर्टिगोच्या आजारातून बरं होण्यासाठी रुग्णांची इच्छाशक्ती आणि सकारात्मक दृष्टी असणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे संशोधनाच्या अभ्यासाचा विषय ठरला – कम्पॅरिझन ऑफ कन्व्हेंशनल एक्सरसाइझेस विथ इडिओकायनासिस ऑन बॅलन्स अँड अँग्झायटी इन पेशंट्स विथ बिनाइन पॅरॉक्सिस्मल पोझिशनल व्हर्टिगो. मात्र प्रयोगाचा प्रोटोकॉल सुरू करण्याआधी एथिकल मीटमध्ये विद्यार्थ्यांना एक सादरीकरण करावं लागतं. नैतिकदृष्टय़ा हा प्रयोग योग्य आहे की नाही हे ठरवणारे काही डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टचं मंडळ असतं. त्यांना हे सादरीकरण मान्य झालं तर आम्ही हा प्रयोग करू शकतो, असं ती सांगते.

प्रोटोकॉलनुसार पोझिशनल व्हर्टिगोसाठी काही व्यायामप्रकार सुचवले जातात. तसाच एक प्रोटोकॉल आहे काऊथ्रोन कूकसे. त्यामुळे पोझिशनल व्हर्टिगोची वारंवारता कमी होते किंवा थांबते. तरीही ‘परत चक्कर येईल का, पुन्हा मी पडेन का?’,अशी भीती आणि चिंता पोझिशनल व्हर्टिगोचा त्रास असणाऱ्या रुग्णांच्या मनात असते. ती कमी करण्यासाठी अलीकडे इडिओकायनासिस वापरतात. ती सांगते की,‘‘या उपचारात गोष्टींना कल्पनेने रूप द्यायचं असतं. सध्याच्या तंत्रप्रधान जमान्यात आपण लहानपणीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज विसरलो आहोत. आपण अगदी सहजपणे आंधळी कोशिंबीर किंवा लंगडीसारखे खेळ खेळायचो. तेव्हा तोल जायची भीती वाटली नाही. मात्र या गोष्टी विस्मरणात गेल्याने मेंदूला चालना देतील अशा गोष्टी उरल्याच नाहीत. उदाहरणार्थ- एकेकाळी आपल्याला अनेकांचे लॅण्डलाइन क्रमांक पाठ असायचे. आता बहुतांशी स्वतचा किंवा फारतर घरच्यांचा मोबाइल क्रमांक वगळता बाकीचे संपर्क क्रमांक पाठ नसतात. या गोष्टी लक्षात घेऊन मेंदूला खाद्य पुरवणारी आणि थोडासा विरंगुळा देणारी एक ऑडिओटेप तयार केली आहे. तिच्या साहाय्याने केलेल्या प्रयोगात प्राथमिक निष्कर्ष दिसतो आहे की रुग्णांच्या भीतीची पातळी कमी झाली आहे. या दहा दिवसांच्या प्रोटोकॉलमध्ये आधी आणि नंतर पुन्हा चाचणी केली जाते. या चाचणीत लक्षणीय बदल दिसून येत आहेत. तिने संशोधनासाठी दोन गट तयार केले. एका गटाला काऊथ्रोन कूकसे या प्रोटोकॉलनुसार फक्त व्यायामप्रकार करायला दिले. दुसऱ्या गटाला काऊथ्रोन कूकसे प्रोटोकॉल आणि इडिओकायनासिस असा उपचार दिला. इडिओकायनासिस म्हणजे गोष्टींची कल्पना करणं. यात मानसिक विसावा घेणं महत्त्वाचं असतं. त्याच्या जोडीला असतं योग्य प्रकारे श्वसन करणं आणि शारीरिक समतोल साधणं आणि काल्पनिक गोष्टींचा विचार करणं. त्याचा उपयोग पोश्चर मेंटेन करणं आणि चालताना जाणवू शकतो. आता दोन्ही गटांमध्ये तुलना करून निष्कर्ष काढायचा आहे. प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की, मेंदूला चालना देण्याचा उपाय भीतीवर मात करतो आहे. मुळात पोझिशनल व्हर्टिगोचे रुग्ण कमी आणि या १० दिवसांच्या उपचार पद्धतीला सध्या ३८ रुग्णांचं साहाय्य लाभलं आहे. जुन्या गोष्टींना थोडा उजाळा देऊन आत्ताच्या जीवनशैलीत सामावून घ्यायचा हा प्रयत्न आहे, असे ती सांगते.

व्यायामाच्या निमित्ताने रुग्ण काही दिवस सतत  फिजिओथेरपिस्टच्या संपर्कात राहतात. त्यामुळे आपसूक एक माणुसकीचं बॉण्डिंग तयार होतं आणि रुग्णाला फिजिओथेरपिस्टकडे आपलं मन मोकळं करावंसं वाटतं. ती म्हणते की, ‘सध्या स्ट्रेस लेव्हल अर्थात ताणतणावाची पातळी विविध स्तरांवरची असून ती पोझिशनल व्हर्टिगोमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. या तणावामुळे रोजच्या जगण्यातल्या साध्याशा वाटणाऱ्या कृती करणं अवघड वाटणारं काम होतं. पोझिशन बदलली की चक्कर येते. उदाहरणार्थ- झोपून उठणं. माझ्या संशोधनात रुग्णांचा वयोगट १८ ते ६० वर्षांचा आहे. या सगळ्यांना कमी-अधिक प्रमाणात ताण आहे. ढोबळमानाने निरीक्षण सांगायचं तर १८ ते २४ वयोगटातील रुग्णांची तणाव पातळी ठीक होती. कारण वय लहान आणि जबाबदाऱ्या कमी. ३५ ते ५५ या वयोगटातल्या रुग्णांची ताणपातळी सगळ्यात अधिक असावी. घरातली मुलं-ज्येष्ठांची जबाबदारी आणि स्वतचं करिअर या गोष्टी ताण वाढवणाऱ्या ठरतात. या सगळ्या गटांतल्या रुग्णांचं ब्रेनमॅपिंग केल्याने ताणाची पातळी कळली. त्यातही बरेच बारीकसारीक तांत्रिक तपशील असून त्यामुळे ताणाच्या पातळीतले चढ-उतार कळू शकतात’. तिला प्राथमिक निरीक्षणावरून दिसतं आहे की स्त्रियांना अधिक तणावाचा सामना करावा लागतो. कामाच्या तणावापेक्षाही घरातल्या गोष्टींचा ताण येणं ही गोष्ट ठळकपणं जाणवली. ‘२०२० मध्येही ‘ती’ची घर आणि करिअरमधली ओढाताण संपलेली दिसत नाही. अशा वेळी घरच्यांनी ‘तिला’ समजून घेणं आणि सगळ्या गोष्टींमध्ये समानतेचा मुद्दा प्रत्यक्षात आचरायला हवा. या सगळ्यात समाजमाध्यमं आणि एकूणच सतत ‘ई कनेटिव्हिटी’ असणं हा मुद्दा भरच घालतो आहे. एक रुग्ण परदेशातून सुट्टीसाठी इथं आल्या होत्या. त्यांना पोझिशनल व्हर्टिगोचा त्रास होत होता. त्यांना नानावटीमधल्या या उपचारांबद्दल कळल्यावर त्या थेट इथे आल्या. उपचारांनंतर त्यांचा त्रास पुष्कळच कमी झाला. मात्र फिजिओथेरपीबद्दल आपल्याकडेही बरीच जागरूकता आली आहे, ही गोष्ट जाणवते आहे’, असे ती सांगते.

या संशोधनासाठी तिला नानावटी आणि एनएमआयएमएसच्या सुसज्ज ग्रंथालयांचा चांगला उपयोग झाला. तिच्या मार्गदर्शकांचा सध्या वैद्यकीय क्षेत्रात काय घडामोडी काय सुरू आहेत, हे विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावं, यावर अधिकाधिक भर असतो. त्यामुळे विविध लेखांतून अनेक गोष्टी कळतात. प्रयोगासाठीची उपकरणं नानावाटीमध्ये उपलब्ध आहेत. हे प्रयोग करताना आम्ही विद्यार्थी एकमेकांवर हे प्रयोग करून बघतो आणि मग ते रुग्णांवर करतो. रुग्णांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राध्यान्य दिलं जातं. मला आणि मार्गदर्शकांना वाटलं नव्हतं की पोझिशनल व्हर्टिगोचे तीसहून अधिक रुग्ण या संशोधनासाठी मिळतील. कारण पोझिशनल व्हर्टिगोचा रुग्ण मिळाला तरी दहा दिवस सातत्याने येणं, प्रयोगात पूर्ण सहभागी होणं हे वाटतं तितकं सोप्पं नाही. त्यामुळे रुग्णांची पोझिशनल व्हर्टिगोच्या त्रासातून लवकरात लवकर बाहेर पडायची इच्छाशक्ती आम्हाला दिसली, अशी माहितीही तिने दिली.

देविका कळकळीनं सांगते की, ‘आपण सगळ्यांनी फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. स्वतसाठी वेळ काढता आलाच पाहिजे. त्या वेळात आवडत्या गोष्टी केल्यात तर मानसिक आरोग्यही चांगलं राहील. मन आनंदी राहील. छंद जोपासायला पर्याय नाही. तणाव निर्माण होण्याजोगी परिस्थिती येऊ न देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांकडे पेशन्स अर्थात सबुरी हवी. ‘रुग्णांचं बोलणं ऐकता येणं’ ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. सतत त्याच त्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तरी त्या ‘ऐकता’ आल्या पाहिजेत. त्या सुसंवादातून त्याच्या मनाचा ताण हलका व्हायला मदत होईल, असे देविका सांगते. देविकाला पुढे याच क्षेत्रात काम करायचं आहे. परदेशी जाऊन शिक्षण घेतलं तरी पुन्हा इथं परत यायचं आहे, असा विचार सुरू आहे. अद्याप निश्चित निर्णय झालेला नाही. शारीरिक व्याधी आणि मानसिक ताणातून रुग्णांना बाहेर काढण्याच्या तिच्या या धडपडीसाठी तिचं कौतुक आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.

viva@expressindia.com