क्षण एक पुरे! : ‘कोकम ट्री’ जोपासणारी जोडगोळी

शहरापासून दूर असणाऱ्या गावामध्ये त्यांना कामाला माणसं मिळणं कठीण गेलं.

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

त्या दोघींची लहानपणापासूनची घट्ट मैत्री.. शाळेपासून एका वर्गात असलेल्या त्या दोघी बारावीपर्यंत कॉलेजमध्येपण एकत्रच होत्या.. नंतर त्यांनी वेगवेगळी प्रोफेशन्स निवडली आणि त्यांच्या करिअरचे मार्ग वेगळे झाले. आपापल्या करिअरमध्ये प्रगतीच्या एका टप्प्यावर असताना दोघींनीही सेटल्ड करिअर सोडून नवी सुरुवात करायचा निर्णय घेतला आणि नोकऱ्या सोडल्या. केवळ नोकऱ्याच नाही, तर त्यांनी मुंबईसुद्धा सोडली. रायगड जिल्यातील ‘लोणेरे’ या गावी आजीने तयार केलेल्या सेंद्रिय फळबागेचं रूप त्यांनी पालटलं आणि आपल्या नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवल्या. ही मैत्रिणींची जोडी म्हणजे स्नेहा महाशब्दे आणि अनुजा फडके. करिअरमध्ये जम बसत असताना नोकरी सोडून, लोकांच्या मते ‘रिटायरमेंटनंतरचे प्लॅन्स’ असणारी एक संकल्पना खरी करून दाखवण्याच्या ऊर्मीने काम करणाऱ्या या दोघी मैत्रिणींनी पश्चिम घाटाच्या निसर्गाकडून प्रेरणा घेत त्यांच्या ‘एक्सपिरिएन्शियल होम स्टे’चं नाव ठेवलं ‘द कोकम ट्री’!

‘आम्ही दोघीच जणी खूप ठिकाणी फिरलो आहोत’ अनुजा म्हणते, ‘ठिकठिकाणी फिरताना कंबोडिया, थायलंड वगैरे ठिकाणची हॉस्टेल ही संकल्पना आम्हाला खूप आवडली होती. वेगवेगळ्या देशांमधून आलेले पर्यटक तिथे राहतात, एकमेकांशी गप्पा मारतात, चर्चा करतात, अनुभव शेअर करतात. तसं हॉस्टेल मुंबईत सुरू करावं अशी आमची इच्छा होती. मात्र मुंबईतील जागांचे भाव आणि संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचा एकंदरीतच खर्च परवडण्याच्या बाहेर होता. त्या वेळी आजीच्या लोणेऱ्याच्या घराची आठवण झाली. तिने तिथे एकटीने राहून सेंद्रिय पद्धतीने फळबाग तयार केली होती. त्याबद्दल आम्हाला कौतुक होतं, कुतूहल होतं आणि तिथे राहायलाही आम्हाला आवडायचं. त्यावरून आम्हाला ही ‘होम-स्टे’ची कल्पना सुचली.’ लहानपणापासून मुंबईच्या दादरसारख्या गजबजलेल्या ठिकाणी राहिल्यामुळे शांततेची ओढ साहजिकच दोघींनाही होती. वेगळं काहीतरी करून पाहण्याची इच्छा आणि उत्साह या गोष्टी दोघींकडेही पुरेपूर होत्या. आपापल्या प्रोफेशनमध्ये स्थिरावल्यानंतर ते प्रोफेशन सोडून नवीनच काही करून दाखवण्याची जिद्द आणि हिंमत दोघींकडे होती. त्यातूनच या ‘द कोकम ट्री’चं रोप बहरू लागलं.

स्नेहा म्हणते, ‘मी आर्किटेक्ट आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर सात ते आठ वर्ष व्यवस्थित मी कामही केलं. अनुजाने रुईयामधून बीएस्सी स्टॅटिस्टिक्स आणि नंतर मुंबई युनिव्हर्सिटीमधून एमए इकॉनॉमिक्स केलं होतं. तिने डेटा अ‍ॅनालिस्ट म्हणून सहा वर्ष फ्रॅक्टल अ‍ॅनालिटिक्स नावाच्या कंपनीमध्ये आणि नंतर दोन वर्ष मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून डेलॉइटमध्ये काम केलं होतं. आम्ही दोघीही आपापल्या क्षेत्रात व्यवस्थित सेटल झालो होतो आणि चांगली प्रोग्रेससुद्धा करत होतो. मात्र हेच कायम करत राहावं असं कुठेतरी वाटत नव्हतं. पुढे जाऊन काहीतरी वेगळं करावं अशी इच्छा होतीच. कोकम ट्रीच्या माध्यमातून ती इच्छा पूर्ण होते आहे.’

शाळेत असल्यापासून एकत्र असणाऱ्या अनुजा आणि स्नेहाने जेव्हा आपापल्या नोकऱ्या सोडून नवीन व्यवसाय उभा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना एकमेकींशिवाय दुसरं कोणी दिसलंच नव्हतं. ‘मी एकटीने नवीन सुरुवात करायची असा विचार स्वप्नातसुद्धा मी कधी केला नसता, कारण मला तो जमलाच नसता. अनुजा माझ्यासोबत आहे हे गृहीत धरूनच हा सगळा विचार करायची हिंमत मी केली. एकटीने मी यातलं काही करू शकलेच नसते, प्रॅक्टिकलीसुद्धा नाही आणि मानसिकरीत्यासुद्धा नाही!’, स्नेहा त्यांच्या बॉण्डिंगबद्दल सांगत होती. अनुजाच्या मते दोघींकडे वेगवेगळी स्किल्स आहेत. जे तिला येत नाही ते स्नेहाला येतं आणि जे स्नेहाला कठीण वाटतं ते तिला स्वत:ला जमतं. ‘दोघींनी बारावीनंतर वेगवेगळ्या क्षेत्रांत शिक्षण घेतल्यामुळे कदाचित आमच्याकडे वेगवेगळे स्किलसेट्स आहेत. याच गोष्टीचा आम्हाला सगळ्यात जास्त फायदा झाला’, असं अनुजा म्हणते. ‘जिग्सॉ पझल’सारख्या एकमेकींच्या उणिवा भरून काढणाऱ्या आणि एकमेकींना पूरक ठरणाऱ्या या त्यांच्या मैत्रीमुळे आणि पार्टनरशिपमुळे हे स्वप्न बघितलं गेलं आणि प्रत्यक्षात उभं राहिलं.

दोघींच्याही घरच्यांनी त्यांना अगदी खंबीर पाठिंबा दिला. इतर बाहेरच्या किंवा ओळखीच्या लोकांची समजूत म्हणजे ‘रिटायरमेंटनंतरचे उद्योग आत्ताच करतायेत’ किंवा ‘यातून कितीसे पैसे मिळणार’ अशीच होती. मात्र घरच्यांच्या भक्कम आधारामुळे या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करणं दोघींना शक्य झालं. लहानपणापासूनच्या मैत्रिणी असल्यामुळे त्यांचा मित्रमैत्रिणींचा ग्रूपही एकच आहे आणि मोठा आहे. त्यातल्या सगळ्यांची क्षेत्रं वेगवेगळी आहेत. त्या मित्रमैत्रिणींनीही दोघींना सपोर्ट केला आणि प्रत्यक्षात मदतही केली. शहरापासून दूर असलेल्या एका गावी आवश्यक ते सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यात आणि त्याची संपूर्ण मॅनेजमेंट करण्यात त्यांच्या मित्रांनी त्यांना मदत केली. स्नेहा म्हणते, ‘आमच्या दोघींच्याही गरजा कधीच आर्थिकदृष्टय़ा फार मोठय़ा नव्हत्या. एखादी विशिष्ट गाडी घ्यायचं स्वप्न आमचं कधीच नव्हतं. कदाचित त्यामुळेच असेल, पण आमच्या सव्‍‌र्हायवलचा फार काही प्रश्न नव्हता. व्यवसाय म्हणून तो सक्षम करण्यासाठीची आर्थिक गरज ही व्यवसायाची होती, वैयक्तिक नव्हती. त्यामुळे मुंबई सोडून जाणं आणि या व्यवसायातून कॉर्पोरेटपेक्षा चार पैसे कमी मिळणं या आम्हाला समस्या वाटल्याच नाहीत.’

शहरापासून दूर असणाऱ्या गावामध्ये त्यांना कामाला माणसं मिळणं कठीण गेलं. मात्र यामुळे शक्य तितकं स्वावलंबी होण्याचा प्रयत्न झाला आणि आता बरीचशी कामं आम्ही स्वत:च करतो, उदाहरणार्थ इलेक्ट्रिकची सगळी कामं स्नेहा स्वत:च करते, असं अनुजा सांगते. अनेक ठिकाणी फिरल्यामुळे आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्यात स्वत:ला आवडलेल्या गोष्टी यामुळे आपल्याकडे येणाऱ्या लोकांच्या काय अपेक्षा आणि गरजा असू शकतात याचा अंदाज यायला दोघींना मदत झाली. लहानपणी गावी बघितलेली फळांची झाडं वगळता शेतीचा गंधही नसणाऱ्या आर्किटेक्ट आणि डेटा अ‍ॅनालिस्ट अशा दोघी मिळून आता ‘द कोकम ट्री’च्या परिसरात भाज्या पिकवतात, शेतीचे लहानमोठे प्रयोग करतात, मडकी घडवतात, येणाऱ्या गेस्ट्सची व्यवस्था पाहतात, त्यांना होस्ट करतात आणि वेळ पडल्यास घरातलं इलेक्ट्रिक आणि प्लम्बिंगसुद्धा करतात. या दोघींच्या मशागतीने ‘द कोकम ट्री’ असंच बहरत राहो.

आपण हिंमत करत नाही तोपर्यंत आपल्यात आत्मविश्वास येत नाही. पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पॅशनने काम केलं तर पैसे आपोआप येतील. ज्या ठिकाणी आपली घुसमट होते तिथे तसंच जीव गुदमरून काम करत राहण्यापेक्षा मोकळा श्वास घेणं कधीही चांगलं !

-स्नेहा महाशब्दे

वेळ, पैसा आणि शक्ती या तीन गोष्टी तुमच्या इच्छापूर्तीचे आधार आहेत यावर माझा विश्वास आहे. लहानपणी आपल्याकडे पैसा नसतो, तरुणपणी वेळ नसतो आणि म्हातारपणी शक्ती नसते. यातल्या लहानपणाच्या आणि म्हातारपणाच्या काळात आपल्याला अनुक्रमे पैसा आणि शक्ती मिळवताही येणार नसतात. त्यापेक्षा तरुणपणी थोडा पैसा आणि भरपूर शक्ती असताना थोडा वेळ काढला तर आपलंच आयुष्य सुंदर होईल.

– अनुजा फडके

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Article on kokum tree saver sneha mahabarade anuja phadke