|| मितेश रतिश जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बार्बेक्यू मिसळची चव चाखल्यावरही माझ्यातला फुडी आत्मा काही तरी चमचमीत खाण्यासाठी उडय़ा मारत होता. म्हणून मी गेलो ठाण्यातील ‘कोकणी हौस’ या रेस्टॉरंटमध्ये. संपूर्ण कोकण किनारपट्टीवरचे वाटणघाटण करून केलेले इथले पदार्थ निव्वळ जिव्हातृप्ती देतात.

आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे तलावांच्या शहरात म्हणजेच ठाण्यात. या ठाणे शहराला खूप मोठा इतिहास आहे. पहिली आगगाडी बोरीबंदर ते श्री स्थानक (म्हणजे आताचे ठाणे) येथे धावली. ऐतिहासिक किल्ले, तलाव, प्राचीन ब्रह्मदेव मूर्ती, कौपिनेश्वर मंदिर अशा अनेक ऐतिहासिक खुणा येथे पाहायला मिळतात. अशा या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वरदान लाभलेल्या ठाण्यात पिढय़ान्पिढय़ा जिव्हातृप्ती देणारे अड्डे आहेत. जसे की, मामलेदारची मिसळ, कुटिरोद्योगचे पीयूष, कुंजविहारचा वडापाव वगैरे वगैरे. नावं घेऊ  तितकी कमीच.

प्रत्येकाची इथे आपापली खासियत आहे. ठाणे शहराचं जाळं मोठय़ा प्रमाणात पसरलंय. इथे चौकाचौकात काहीतरी हटके खायला मिळतं. अशीच हटके खाबूगिरी करण्यासाठी मी भेट दिली वंदना बस स्थानकाच्या नजीक असलेल्या ‘कोकणी हौस’ या हॉटेलला. शेफ पराग जोगळेकर यांच्या संकल्पनेतून हे हॉटेल उभं राहिलं आहे.

मासे, भात आणि नारळ म्हणजे कोकणी खाद्यसंस्कृतीचा आरसा मानला जातो, असा सर्वसाधारण समज आहे; पण भाज्या, भात आणि नारळ हे समीकरणही या कोकणात तेवढंच लोकप्रिय आहे. याची प्रचीती मला या हॉटेलला भेट दिल्यावर आली. हॉटेलच्या नावातच कोकण हा शब्द असल्याने आपसूकच मेनुकार्डमध्ये मासे अग्रस्थानी आहेत. पण सात्त्विक भाज्यासुद्धा हटके नावांनी व चाबूक चवीत पेश केल्या आहेत. खानपानाची सुरुवात सूपपासून करण्यासाठी मी मेनुकार्ड चाळलं. तर इथे सूपची जागा शोर्बाने घेतली होती.

लसुणी पालक शोर्बा, मकई शोर्बा, कोळंबी टोमॅटो शोर्बा, बोंबील धनिया शोर्बा अशा नावांतली श्रीमंती चवीत आहे का? हे अनुभवण्यासाठी मी मकई शोर्बा आणि कोळंबी टोमॅटो शोर्बा ऑर्डर केला. मसाल्यांचे योग्य मिश्रण, त्यात कोळंबीचे तुकडे आणि खूप उत्तम शिजवलेलं सूप यामुळे मी कोळंबी टोमॅटो शोर्बाच्या प्रेमात पडलो आहे. शोर्बाचा आस्वाद घेत असतानाच टेबलाची शान वाढवायला स्टार्टर आले.

मुगाचे कुरकुरे, मालवणी बटाटेवडे, कोळंबी भरलेले पापलेट, भाजक्या अळिंब्या, कोळंबी भरलेले बोंबील. चारही पदार्थाची चव सुंदर होती. पण मला मुगाचे कुरकुरे आणि कोळंबी भरलेले बोंबील अधिक आवडले.  प्रत्येकाने एकदा तरी या डिश चाखायलाच हव्यात. माझी खाबूगिरी रंगलेली असतानाच मी हॉटेलच्या माहौलकडे नजर फिरवली. उत्तम सजावट, एका बाजूला छोटंसं मद्यालय, त्यात रंगीबेरंगी मद्याच्या लखलखणाऱ्या बाटल्या, खांबांवर लटकवलेली तांब्या-पितळेची भातुकली, एका सलग भिंतीवर ओळीत ठेवलेली तांब्या-पितळेची भांडी पाहून मन कु ठेतरी नॉस्टॅल्जिक होतं. या माहौलने हॉटेलच्या नावाला न्याय दिला आहे. कारण हॉटेलमध्ये प्रवेश केल्यापासूनच कोकणात आल्याचा भास सतत होतो. इथल्या खिडक्यांची ठेवणही कोकणातल्या घरातल्या खिडक्यांसारखी आहे.

भरपूर कांदा, लसूण आणि खोबरं हे कोकणातल्या शाकाहाराचं त्रिसूत्र अनुभवण्यासाठी मी मेनकोर्समध्ये ओल्या नारळाच्या शहाळ्याची भाजी आणि भाकरी मागवली. नारळाचं पाणी प्यायल्यावर त्यातली रसदार मलई नेहमीच खात आलो होतो, पण त्याची भाजी खाण्याचा हा पहिलाच योग होता. एक आगळीवेगळी भाजी आणि त्याची विलक्षण चव अनुभवल्याचं समाधान मिळालं. कोकणातल्या पारंपरिक नॉनव्हेज खाद्यपदार्थाची रेलचेलसुद्धा इथे अनुभवायला मिळते. जसे की, भाजकी कोंबडी हिरवा मसाला, कोंबडी फ्राय मसाला, कोळंबीची गस्सी, मोरीचं मटण, बांगडय़ाचं तिखत, पापलेट गस्सी वगैरे वगैरे. सोलकढी पिऊन ढेकर दिल्याशिवाय जेवणाची सांगताच होत नाही म्हणून मी शेवटी सोलकढी मागवली खरी, पण तो काही जेवणाचा शेवट नव्हता. कारण पारंपारिक मिष्टान्न वाट पाहात होते. मनगण, रताळ्याची खीर, सुकरुंडे, तांदळाच्या शेवया आणि नारळाचं दूध या सर्व गोड पदार्थानी जेवणाला चार चाँद लावले. बरं, इथली प्रत्येक डिश किमान ११० ते कमाल ३७५ रुपयांच्या आतबाहेर आहे. त्यामुळे खिशालाही फार चाट लागत नाही आणि काहीतरी वेगळं आणि उत्तम खाल्ल्याचं समाधानही मिळतं. त्यामुळे कोकणी खाण्यापिण्याची हौस पुरवून घ्यायची असेल तर मस्ट ट्राय कोकणी हौस.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on konkani haus restaurant abn
First published on: 07-02-2020 at 01:25 IST