राधिका कुंटे

मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी या भाषांवरील प्रभुत्वामुळे आणि मेहनतीमुळे तिचं करिअर घडत गेलं. एकेक टर्निग पॉइंट येत गेले आणि तिच्या करिअरला वळणं मिळत गेली. त्यात सर्जनासोबत शैक्षणिक उपक्रमांचा समावेश होत गेला. आपल्या आवडीला पूरक ठरणाऱ्या गोष्टी करताना त्यातल्या संशोधात रमणाऱ्या सायली खरे-वेरुळकरविषयी जाणून घेऊ या.

Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
10 most-in demand jobs roles of 2024
कौशल्य आणि तंत्रज्ञानावर आधारित २०२४ मधील मागणी असणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या…

तिच्या रेझ्युमेवर एक नजर टाकली तर दिसतं की, भाषेची आवड, सर्जनशीलता, मेहनत आणि तंत्रस्नेह हे सायली खरे-वेरुळकरच्या करिअरचे चार भक्कम खांब आहेत. शालेय वर्षांत तिला लागलेली संस्कृत भाषेची गोडी हा तिच्या करिअरमधला पहिला टर्निग पॉइंट ठरला. त्यानंतर आलेल्या अनेक वाकवळणांतून कठोर परिश्रम, जिद्द आणि ज्ञानाची आस या साथींसह सायली पुढेपुढे चालत राहिली. शालेय आणि महाविद्यालयीन संस्कृत विषयासाठी प्रसिद्ध निवेदक आणि लेखिका धनश्री लेले यांचं मोलाचं मार्गदर्शन तिला लाभलं. दहावीला पूर्ण संस्कृतात तिला चांगले गुण मिळाले. धनश्रीताईंचा आदर्श मनोमन ठेवत तिने रुईया महाविद्यालयात कलाशाखेत प्रवेश घेतला आणि पदवीपर्यंत संस्कृतचा हात घट्ट धरून ठेवला. तिथल्या प्राध्यापकांचंही तिला चांगलं मार्गदर्शन लाभलं. मात्र ठरवून वेगळी वाट चोखाळायची असल्याने पदव्युत्तर शिक्षण संस्कृतमध्ये घ्यायचा विचार बाजूला सारून तिने मुंबई विद्यापीठात ‘डिपार्टमेंट ऑफ लिंग्विस्टिक्स’ अर्थात भाषाशास्त्र विभागात प्रवेश घेऊन एम.ए. केलं.

एम.ए.च्या वर्षांत तिच्या प्रबंधाचा विषय होता- ‘व्हर्बल अँड फ्रेझल अ‍ॅग्रीमेंट इन वारली’. त्यासाठी डहाणूमधील वाणगावात वर्गातल्या विद्यार्थ्यांची ६ दिवसांची फील्ड व्हिजिट केली. त्याआधी वारली भाषेची माहिती गोळा केली. मग प्रत्येकाचे विषय निवडले गेले आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मोकळ्या मनाच्या आदिवासींनी विद्यार्थ्यांशी चांगला संवाद साधला. सायली सांगते की, ‘आमच्यासोबत एक टर्किश मुलगा होता. त्याचा आणि माझा विषय वेगळा होता. स्वत:साठी, त्याच्यासाठी प्रश्न विचारणं, त्याची नोंद करणं, त्याला ते इंग्रजीतून समजावणं आणि त्याचे प्रश्न वारलींना विचारणं ही सारी कसरत मला करावी लागली होती. त्यानेही याची जाण ठेवून माझे आभार मानले होते’. हा ७० पानी प्रबंध लेखी द्यायचा होता तशी त्याची तोंडी परीक्षाही होती. त्या परीक्षेत एरवी तटस्थ असणाऱ्या परीक्षकांनी सायलीच्या अभ्यासाचं कौतुक केलं होतं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात; ते असेच असावेत! तिला भाषेच्या आवडीइतकीच तंत्रज्ञानाचीही ओढ होती. त्यामुळे तिने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वगैरेंची माहिती काढली होती. येत्या काळात एखादं अ‍ॅप तयार करता येईल, या विचारांचं बीज तिच्या मनात रुजलं..

पुढच्या वळणावर ‘लायनब्रिज टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेत ती लँग्वेज लीड या पदावर लागली. तिथे मुख्यत्वे गुगल, फिलिप्स, डेल, जेसीबी इंडिया या कंपन्यांच्या विविध भाषिक प्रकल्पांमध्ये भाषिक गुणवत्ता, शैली, स्थानिक भाषेचा वापर, शब्दांची निवड आदीविषयी काम असे. जवळपास वर्षभर या कॉर्पोरेट कंपनीत काम केल्यानंतर आपली सर्जनशीलता पुरेशी कसाला लागत नसल्याची खंत तिला वाटू लागली. ती नैराश्याकडे झुकू लागली होती. त्यामुळे तिने ती नोकरी सोडली. नंतर तीन-चार महिने तिच्या हातात काहीही नव्हतं. मात्र निराशेच्या गर्तेत न सापडता तिने या कालावधीचा उपयोग आणखी शिकण्यासाठी केला. ‘लेट्स टॉक इन्स्टिटय़ूट’चा ‘व्हॉइस अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेंट विथ यूएस अ‍ॅक्सेंट’ हा आठ आठवडय़ांचा सर्टिफिकेट कोर्स तिने केला. अनेकदा आपल्या इंग्रजी संभाषणावर मातृभाषेचा प्रभाव असतो. तो न जाणवू देता तटस्थपणे बोलणं कसं आत्मसात करावं, याविषयीचा हा अभ्यासक्रम बरंच काही शिकवून गेला. दरम्यान, ‘व्हीएमसी एलएलपी’मध्ये ट्रान्सक्रिएशन मॅनेजर म्हणून सायलीला नोकरी लागली. त्यात इंग्रजीचा मराठी अनुवाद तपासणं, कल्चरल रिव्ह्य़ू, व्हॉइसओव्हर आर्टिस्टचं कोऑर्डिनेशन आदी जबाबदाऱ्या तिला निभावायच्या होत्या. मात्र तिच्या भाषिक कौशल्याला फारसा वाव मिळत नसल्याने तिने जेमतेम दोन महिन्यांत ही नोकरी सोडली.

त्या पुढच्या वळणावर येऊन ठेपला ‘आयआयटी मुंबई’चा मानाचा म्हणावा असा प्रकल्प! त्यासाठी फॉर्म भरणं, मुलाखत होणं आणि तिथे नोकरी मिळणं हे एकेक टप्पे पार पडले. तिची ‘प्रोजेक्ट रिसर्च असिस्टंट फॉर लँग्वेज लर्निग प्रोग्रॅम- हिंदी शब्दमित्र (टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाइन)’ या प्रकल्पासाठी निवड झाली. भाषाशास्त्राच्या आधारे हिंदी भाषेसाठी तिने भाषिक विदा (डेटा) गोळा करणं, तळटिपांमध्ये शब्दांचे अर्थ लिहिणं, व्याकरण, वेबसाइटचं टेस्टिंग, फील्ड टेस्टसाठी साहाय्य करणं आदी अनेक कामं केली. ‘हिंदी शब्दमित्र’ (Hindi Shabdamitra) हा ईलर्निग टूलचा (ई साधन) प्रकल्प आयआयटी मुंबईमध्ये आकाराला आला असून ‘सेंटर फॉर इंडियन लँग्वेजेस टेक्नॉलॉजी’ (CFILT)तर्फे २०१६ पासून अमलात आणला गेला आणि त्यासाठी ‘टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड डिझाइन’ (TCTD)तर्फे निधी मिळाला.

हिंदी शब्दमित्र वेब आणि मोबाइलवर बघता येतो. शिक्षकांना भाषा कितीही मनापासून शिकवायची असली तरीही प्रत्यक्ष शिकवताना मिळणारा वेळ, वेळापत्रकाची चौकट, आवाज शेवटच्या बाकापर्यंत पोहोचणं, विद्यार्थीसंख्या, वर्गाचा आकार आणि महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांगणिक बदलणारी आकलनशक्ती असे अनेक अडीअडथळे असतात. मात्र या ई टूलमुळे हे अडथळे पार करता येऊ  शकतात, असं ती सांगते. सध्या सीबीएसई बोर्डाच्या हिंदी भाषेसाठी ते तयार करण्यात आलं आहे. पुढे इतर भाषांसाठीही ते तयार करण्याचा विचार होतो आहे. त्या त्या इयत्तेच्या धडय़ातला शब्द, त्याची व्याख्या, त्याचा वाक्यात उपयोग, समानार्थी शब्द, शब्दाचं लिंग, शब्दाचं वर्णन, शब्दाचा प्रकार, शब्दाचं चित्र आणि आवाजाद्वारे शब्द ऐकायला मिळणं ही या टूलची वैशिष्टय़े आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचं लक्ष अभ्यासावर कें द्रित होईल, वर्गात गडबड-गोंधळ नसेल, शब्द योग्य, सोप्या आणि चांगल्या पद्धतीने समजतील, शब्दांचं आकलन झाल्याने शब्दसंपत्ती वाढेल, अशी माहिती तिने दिली. विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रतिसाद, सूचना लक्षात घेऊन हे टूल अधिकाधिक चांगलं करायचे प्रयत्न झाले आहेत. मूळ हिंदीभाषिकांनीच या टूलमधील शब्दांचे उच्चार केले असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत मूळ हिंदी उच्चार पोहोचले आहेत. विशेषत: दाक्षिण्यात्य भागातील शाळांमध्ये ही गोष्ट अधिक अधोरेखित झाली असल्याचेही तिने सांगितले.

इतकं मोठं शिवधनुष्य उचलायला टीमही तितकीच तगडी हवी. त्यामुळे प्रा. मल्हार कुलकर्णी (ह्य़ुमॅनिटीज अ‍ॅण्ड सोशल सायन्सेस), प्रा. पुष्पक भट्टाचार्य (कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग), प्रा. अनिरुद्ध जोशी (इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर), प्रा. प्रीथी ज्योती (कॉम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग) यांच्यासह हनुमंत रेडकर (रिसर्च इंजिनीअरिंग), सायली खरे (पीएच.डी. स्टुडन्ट अ‍ॅण्ड लिंग्विस्ट), डॉ. नीलेश जोशी (लिंग्विस्ट)आणि चित्रकार राम दास, संतोष दाभोळकर यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. या प्रकल्पासाठी सायलीने दीड वर्ष काम केलं. सायली सांगते की, ‘प्रकल्पात काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. एरवी आपल्या चौकटीतल्या दृष्टिकोनाला वेगळा आयाम कसा द्यावा, हे शिकायला मिळालं. केवळ भाषिक नव्हे तर तांत्रिक अडचणींवरही आम्ही सगळ्यांनी मिळून तोडगा काढला. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे काम करत असल्याचं व्यवधान सतत ठेवावं लागत होतं. याचा उपयोग सहावी ते दहावी या वर्गासाठी आणि प्रौढांसाठीही आहे. अनेकदा एकेका शब्दांवरून आम्ही तासन्तास चर्चा करायचो. आत्ताही आठवतं आहे की, ‘हडबडा जाना’ या क्रियापदासाठी काय चित्र काढावं, हे ठरत नव्हतं. असे शब्दांतले आणि तपशिलातले बारकावे तपासून घ्यायला लागायचे. एकदा अगदी साध्यासुध्या वाटणाऱ्या ‘पीछे’ या शब्दाने आम्हाला कोडय़ात टाकलं होतं. हा दिशादर्शक शब्द पहिली-दुसरीच्या वयोगटातील विद्यार्थ्यांना कसा दाखवावा यावर आमची चर्चा झाली. त्यात अंगठा किंवा हाताने मागे सूचकपणे दाखवणं हा एक पर्याय होता. दुसरा शब्दाच्या उदाहरणाला डोळ्यांसमोर ठेवून चित्र काढणं. हे उदाहरण होतं ‘उसने पीछे मुडकर देखा’.. यात एका मुलाला मागं वळून बघताना दाखवलं. जेणेकरून मुलांना उदाहरण आणि चित्र हे दोन्ही समर्पक वाटतील. त्यामुळे दुसऱ्या पर्यायाची निवड केली गेली’.

या टूलची जवळपास देशभरातल्या शाळांमध्ये चाचपणी के ली गेली. त्यापैकी मुंबई आणि पुण्यातल्या शाळांमध्ये सायलीही हजर राहिली होती. या ई साधनाला विद्यार्थी आणि शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या शाब्दिक आकलनशक्तीमुळे त्यांना प्रश्न खूप पडायचे, मात्र त्यांच्या उत्तरांचा मार्ग सापडत नव्हता. हिंदी शब्दमित्रमुळे भाषिक मैत्रीचं एक दार किलकिलं झालं असून विद्यार्थ्यांनी ते आवडीने वापरलेलं दिसत आहे. कोलकत्त्याच्या जाधवपूर विद्यापीठात ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग’ (ICON)मध्ये ‘हिंदी शब्दमित्र : अ वर्डनेट टूल फॉर एन्हान्सिंग टीचिंग-लर्निग प्रोसेस’ हे पोस्टर प्रेझेंटेशन तिने केलं होतं. पुढच्या टप्प्यात हिंदी शब्दमित्रचं मार्केटिंग कसं करता येईल, यावर तिचा विचार सुरू असून ती बिझनेस मॉडेल बनवायला शिकते आहे. तिला हिंदी शब्दमित्रवर पीएचडी करायची असून त्या दृष्टीने अभ्यासाला सुरुवात झाली आहे.

सायलीच्या मते, ‘या क्षेत्रात येऊ  इच्छिणाऱ्यांना वाचनाची खूप आवड हवी. त्यातून अनेक पूरक गोष्टी कळतात. अनेक गोष्टींचा थेट आपल्या कामाशी संबंध नसला तरी त्यांची माहिती असणं ही चांगली गोष्ट आहे. पुस्तकं वाचायची आवड असेल तर प्रश्न नाही, मात्र ती नसेल तर अभ्यासाशी निगडित व्हिडीओ बघणं, व्याख्यानं, प्रदर्शनांना जाणं, आपल्या क्षेत्रातल्या जाणकारांना ‘ऐकणं-भेटणं’ या गोष्टी करायलाच हव्यात. चौकटीबाहेरचा विचार करायला शिकायला हवं’. या सगळ्यासाठी तिला पालकांचा आणि सासरच्यांचा भक्कम पाठिंबा मिळतो आहे. तिचे पती कौस्तुभ यांची पावलोपावली साथ मिळते आहे. केवळ भाषाच नव्हे तर तिला नृत्याचीही आवड आहे. ती अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची कथ्थक विशारद असून निवेदिता रानडे यांचं मार्गदर्शन तिला लाभलं आहे. झुंबा एलएलसीमध्ये बी १ स्तराचं आणि नकुल घाणेकर यांच्या ‘डिफरन्ट स्ट्रोक्स स्टुडिओज’मध्ये साल्साचं (चौथी लेव्हल) प्रशिक्षणही तिने घेतलं आहे. स्वत:च्या सर्जनशीलतेला जपून, त्याला तंत्रस्नेहाची जोड देत सायली भाषेसाठी झटून काम करते आहे. यशस्वी कारकीर्दीसाठी तिला हार्दिक शुभेच्छा.

विद्यार्थी आणि शिक्षकांचा प्रतिसाद, सूचना लक्षात घेऊन हे टूल अधिकाधिक चांगलं करायचे प्रयत्न झाले आहेत. मूळ हिंदीभाषिकांनीच या टूलमधील शब्दांचे उच्चार केले असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत मूळ हिंदी उच्चार पोहोचले आहेत. विशेषत: दाक्षिण्यात्य भागातील शाळांमध्ये ही गोष्ट अधिक अधोरेखित झाली.

viva@expressindia.com