तेजश्री गायकवाड

सुरुवातीच्या काळात फक्त महिला आणि पुरुष यांच्यासाठी काही ठरावीक डिझाइनची घडय़ाळं बाजारात होती. हळूहळू हातावर घालायची ही घडय़ाळं फक्त वेळ सांगण्यापुरती मर्यादित राहिली नाहीत.

घडय़ाळ म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कितीही नाही म्हटलं तरी आपलं आयुष्य त्या टिकटिकवरच चालतं. सुरुवातीच्या काळात फक्त महिला आणि पुरुष यांच्यासाठी काही ठरावीक डिझाइनची घडय़ाळं बाजारात होती. हळूहळू हातावर घालायची ही घडय़ाळं फक्त वेळ सांगण्यापुरती मर्यादित राहिली नाहीत. आता घडय़ाळ हे एक प्रकारचं फॅशन स्टेटमेन्ट झालं आहे. स्मार्ट फोन्स आल्यावर काही प्रमाणात का होईना हातावरची घडय़ाळं काही काळ मागे पडली होती, परंतु आता त्यांनी दमदार कमबॅक केलं आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत वेगवेगळ्या पद्धतीच्या घडय़ाळांचा प्रचंड बोलबाला आहे. अशाच काही ट्रेण्डी घडय़ाळांचा हा आढावा.

पुन्हा एकदा रेट्रो : आधीच्या काळात ज्या पद्धतीची, डिझाइनची घडय़ाळं होती तो ट्रेण्ड पुन्हा एकदा आला आहे. मोठा टिपिकल ब्राऊन आणि काळ्या रंगाचा बेल्ट, मोठय़ा गोल आकाराचं डायल हे डिझाइन पुन्हा एकदा लोकांच्या पसंतीस उतरतं आहे. ही घडय़ाळं अगदी कोणत्याही प्रकारच्या आउटफिटवर, कोणत्याही प्रसंगी तुम्ही सहज कॅरी करू शकता. बेल्ट ब्राऊन आणि काळ्या रंगाचे असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या रंगांच्या कपडय़ावर तुम्ही ही घडय़ाळं घालू शकता. ही रेट्रो घडय़ाळं ब्राऊन आणि काळ्या रंगात जरी असली तरी अजून रंगही यात उपलब्ध आहेतच.

ब्रेसलेट घडय़ाळ : घडय़ाळ हे फक्त वेळ बघण्यापुरतं न राहता फॅशनचा भाग असल्यामुळे अनेक महिला ब्रेसलेट् घडय़ाळाला पसंती देतात. हे घडय़ाळ स्टेटमेन्ट ज्वेलरी म्हणून महिलावर्ग सहज मिरवतात. अशी घडय़ाळं जास्तीत जास्त ऑफिस आउटफिटवर, पार्टी वेअरवर पेअर केली जातात. ही घडय़ाळं सिल्वर, गोल्ड, रोझ गोल्ड, काळा, फिकट निळा अशा रंगांमध्ये उपलब्ध आहेत. एखाद्या ब्रेसलेटप्रमाणे रूप असलेल्या या घडय़ाळाला वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे खडे, मोती लावलेले असतात. याची रचना  बाकीच्या घडय़ाळाप्रमाणे नसते. हे घडय़ाळ घालण्याची पद्धतही कडय़ासारखीच असते.

फिटनेस घडय़ाळ : ही घडय़ाळं फिटनेस बॅण्ड म्हणून जास्त प्रसिद्ध आहेत. गेल्या काही वर्षांपासून माणसांची लाईफस्टाईल पुरती बदलली आहे आणि सध्या फिटनेसला आलेल्या महत्त्वामुळे ही घडय़ाळं जास्त ट्रेण्डमध्ये आली आहेत. करोना काळात वर्क फ्रॉम होम करताना प्रत्येकाच्या फिटनेसवर विपरीत परिणाम झाला आहे, त्यामुळे सध्या प्रत्येकजण फिटनेसकडे लक्ष देताना दिसतो आहे. म्हणून लोकांचा या घडय़ाळाकडे कल जास्त वाढला आहे. ही घडय़ाळं तुम्हाला खाण्याची, पाणी पिण्याची, तुम्ही किती पावलं चाललात इथपासून ते पुरेशी झोप घेण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची वेळोवेळी आठवण करून देत असतात. सुरुवातीला फक्त काळ्या रंगात आणि आयताकृती आकारात आलेली ही घडय़ाळं आता चौकोनी, गोलाकार अशा आकारात उपलब्ध आहेत. तसेच निऑन, लाल, हिरवा, निळे असे एकदम ट्रेण्डी रंगही आता यात सहज उपलब्ध आहेत.

स्मार्ट घडय़ाळ : फिटनेस बॅण्ड आणि स्मार्ट घडय़ाळ हे दोन्ही प्रकार एकच आहेत असा अनेकांचा समज आहे, पण दोघांमध्ये बऱ्याच प्रमाणात फरक आहे. फिटनेस बॅण्ड हे सगळ्यात जास्त फिटनेस संदर्भातील फीचर असलेलं घडय़ाळ आहे. तर स्मार्ट घडय़ाळांमध्ये जणू तुमचा संपूर्ण फोनच वसलेला असतो. फोनवरती येणारे मेसेज, कॉल आणि अजून बरेच फीचर तुम्ही या स्मार्ट घडय़ाळांवर वापरू शकता. या घडय़ाळ्यांमधेही अनेक डिझाइन्स सहज उपलब्ध आहेत.

अ‍ॅनालॉग घडय़ाळ : हा  घडय़ाळांचा सर्वात पारंपरिक अर्थात जुना प्रकार आहे. हा प्रकार एवढा कॉमन आहे की बहुधा आपण आपल्या घरात, आपल्या शाळेत आणि जवळजवळ सगळ्याच ठिकाणी जाताना या घडय़ाळांना पसंती देतो. टिपिकल सिल्वर आणि गोल्ड रंगाचा स्टील किंवा लोखंडी धातूचा बेल्ट याला असतो. याचे डायल गोल आणि मोठे असते, परंतु आता हे बेसिक फीचर तसेच ठेवून ही घडय़ाळं बाजारात आली आहेत.

हायब्रीड घडय़ाळ : यांच्या नावातच हे घडय़ाळ कसं आहे हे समजतं. हा प्रकार म्हणजे दोन प्रकारांचं मिश्रण आहे. एलसीडी स्क्रीन आणि बाकीचा लूक अ‍ॅनालॉग घडय़ाळाप्रमाणे असतो. ही घडय़ाळं एकदम क्लासिक लुक देतात. स्मार्ट घडय़ाळाप्रमाणे ही घडय़ाळं स्मार्ट फोनला कनेक्ट होऊ शकतात. ऑफिसपासून ते अगदी रोजच्या वापरासाठीसुद्धा ही घडय़ाळं महिला व पुरुष वापरतात.

viva@expressindia.com