गायत्री हसबनीस

सध्याची तरुण पिढी ही स्मार्ट आहे. विविध गोष्टींमध्ये ते स्वत:ला गुंतवून घेतात. कोणी स्टार्टअप सुरू करतं, कोणी यू-टय़ूब चॅनेल तर कोणी अजून वेगळं काहीतरी.. या सगळ्यासाठी आर्थिक गुंतवणूक महत्त्वाची असते. त्यामुळेच ती तरुण पिढीची गरजही झाली आहे. हल्ली कुठल्या ना कुठल्या गुंतवणुकीतून उत्पन्न मिळवण्यावर अनेकांचा भर असतो. बचत, गुंतवणूक, खर्च आणि महागाई या सगळ्यांचाच विचार सध्या तरुण पिढीकडून केला जातो. बजेटच्या निमित्ताने तरुणांनी वेगवेगळ्या पर्यायांद्वारे कशी गुंतवणूक करावी आणि कशा प्रकारे त्याचे कार्य असेल याची माहिती करून घेणे आवश्यक ठरले आहे.

या वर्षीपासून गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. तरुणांमध्ये सर्वात चर्चेचा विषय असतो तो म्हणजे कुठल्या योग्य कंपनीत आपण गुंतवणूक करावी अथवा करू नये? स्टॉक मार्केटसारख्या पर्यायांबद्दलही ते साशंक असतात. अनेकदा पालक त्यांच्या मुलांना कुठेतरी गुंतवणूक करण्याबद्दल सुचवतात. आजच्या मुलांना गुंतवणूक करण्यासाठीचे पर्याय माहिती असतात, परंतु त्याची प्रक्रिया आणि त्यातून मिळणारा लाभ कशा प्रकारे असेल, याबद्दल त्यांना पुरेसे ज्ञान मिळाले नाही तर नुकसानही होऊ शकते. टॅक्स आणि महागाई या दोन गोष्टींचा त्यांना प्रामुख्याने विचार करावा लागतो, पण कुठेही गुंतवणूक करण्यासाठी फक्त टॅक्स रेट किंवा इन्फ्लेशन रेटवर लक्ष ठेवून चालत नाही तर एकूणच आपल्या गरजा लक्षात घेऊन त्यासाठी आपण लघू किंवा दीर्घ कालावधीमध्ये कशा प्रकारे त्यांची आखणी करू शकू या गोष्टींवर विशेष करून लक्ष ठेवले पाहिजे. गुंतवणूक केल्यावर मिळालेल्या नफ्यातून किती टक्के टॅक्स रिटर्न्‍समधून भरावा लागतो?, सरकारचा टॅक्स रेट किती आहे?, सेन्सेक्स निफ्टी यांचे ट्रेण्ड्स काय असतात?, कुठल्या कंपन्या फ्रन्ट लाइन कंपन्या आहेत ज्यात आपण गुंतवणूक करू शकतो? कुठल्या इन्व्हेस्टमेंट कंपन्या चांगला डिव्हिडंड देतात?, असे अनेक प्रश्न सामान्य तरुणांना भांबावून सोडतात. बऱ्याचदा त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो आणि त्यांना भीती वाटते.

तरुणांनी याबाबतीत किती आणि कसं सजग राहावं याबद्दल बोलताना ‘मनी मंत्रा’ या फायनान्शियल अ‍ॅडवाइझ देणाऱ्या कंपनीचे संचालक आणि फाउंडर, स्वत: फायनान्शियल अ‍ॅडवायझर असलेले मुंबईचे विरल भट्ट सांगतात,’’ मिलेनियल इन्व्हेस्टर जी प्रामुख्याने आजची तरुण पिढी आहे ती सर्वात जास्त गुंतवणुकीवर भर देते. बचतीबाबतही ते अधिक जागृत असतात, पण गुंतवणुकीबाबत जेवढी जागरूकता असायला हवी तेवढी ती नसते. याचे कारण गुंतवणूकीबाबतीतील त्यांचे अज्ञान. शॉर्ट टर्म गोल्स घेऊन भविष्याचे नियोजन करता येते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. मी स्वत: असे तरुण गुंतवणूकदार अनुभवले आहेत. जेव्हा आमच्याकडे एखादा तरुण गुंतवणूकदार येतो तेव्हा त्याला सेव्हिंग्सबद्दल खूपच माहिती असते पण गुंतवणुकीबाबत अजिबात नसते. तरीदेखील त्यांना योग्य मार्गदर्शनपर गुंतवणूक करायची इच्छा असते.’’ गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या तरुणांनी आपल्या दैनंदिन गरजांचा विशेष आढावा घ्यायला हवा, यात ट्रॅव्हलिंगपासून गॅजेट्सपर्यंत अनेक आवश्यक गोष्टींचा समावेश होतो. खरंतर नुसत्या गुंतवणुकीवर अवलंबून न राहता तुम्ही सेव्हिंग्सचाही तितकाच विचार करा, असा सल्ला ते देतात. कारण, येथे ७०-३० टक्के विभागणीचे तत्त्व आहे. ते असं की ७० टक्के हे सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट्सकरता आणि ३० टक्के भाग हा खर्चाकरता ठेवायला हवा. त्यातही ७० टक्क्यांपैकी २० टक्के तुम्ही सेव्ह करून ठेवा म्हणजे तुमचे पैसे हे सेव्हिंग अकाऊं टमध्ये किंवा लिक्विडिटी फंडमध्ये ठेवा आणि उरलेला ५० टक्के भाग हा गुंतवणूकीसाठी राखून ठेवा, जो तुमच्या दैनंदिन गरजांसाठी असेल. इनिशियल इन्व्हेस्टमेंट म्हणून हा मार्ग अगदी योग्य आहे, असं विरल सांगतात. थेट स्टॉक मार्के टकडे वळण्यापेक्षा ट्रॅडिशनल पद्धतीने गुंतवणुकीचा विचार अंगीकारा. त्यात तुमचा पैसा किती प्रमाणात लॉक राहील याचाही विचार करायला हवा. म्युच्युअल फण्ड हाही उत्तम पर्याय आहे, मात्र इथे शिरताना टॅक्सेशन, प्रॉडक्ट आणि लिक्विडिटी समजून घ्या. लाँग टर्मचा पर्याय वापरायचा असेल तर मॅच्युरिटी लक्षात घेऊनच गुंतवणूक करा, असा सल्ला ते देतात.

हल्लीच्या तरुणांमध्ये आणखी एक ध्यास दिसून येतो तो म्हणजे नवनिर्मितीचा. पैसे कमवणे हे अंतिम ध्येय असले तरी इनोव्हेशन हा या मार्केटचा अविभाज्य भाग बनला आहे. नोकरी आणि व्यवसाय अशा दोन्ही बाजूंनी सक्षम होत जाणारी आजची तरुण पिढी आपल्या आर्थिक व्यवहाराची पुरेपूर चाचपणी करत असते. मात्र त्यातून त्यांच्यापुढे असणारे गुंतवणुकीचे पर्याय आणि इतर गोष्टींबद्दलचे त्यांचे समज-गैरसमज काय आहेत याबद्दल बोलताना ‘आयटीएम बिझनेस स्कूल’मध्ये फायनान्शियल मार्केट्स विभागाचे साहाय्यक संचालक शरद झा सांगतात, ‘‘आजच्या घडीला सहज शक्यप्राय अशी गोष्ट म्हणजे तरुण उद्योजकांचे वाढते महत्त्व आणि त्यांची वाढती संख्या. कुठलीही नवनिर्मिती करताना एकदम भांडवल गुंतवावे लागतेच. उद्योजकांच्या नेटवर्कमध्ये गुंतवणूक आणि उत्पन्नाची मोठी रेलचेल असते.

आणखी एक गोष्ट जाणवते ती म्हणजे सर्वसामान्य महाविद्यालयीन तरुण, नुकतीच नोकरी सुरू केलेले तरुण, नव्या उद्योगांत उडी मारण्याची ऊर्मी असणारे होतकरू तरुण किंवा कमावती तरुण मंडळी इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक करतात आणि तोटा अनुभवतात. याचे कारण त्यांचे प्रोफेशन कुठलेही असले तरीसुद्धा शेअर मार्केट, इक्विटी मार्केट आणि स्टॉक मार्केटबद्दल त्यांना अपुरी माहिती असते. अनेकदा शेजारीपाजारी, ओळखीतील लोकांशी चर्चा करून मिळवलेला सल्ला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे अशा सल्ल्यांवर पुढचे पाऊल टाकू नये, असा सल्ला ते तरुणांना देतात. नोकरी सुरू केलेल्या तरुणांनी शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्सकडे तर उद्योग सुरू करणाऱ्यांनी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्सकडे विशेषत: लक्ष द्यायला हवे. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे तुमच्या दैनंदिन खर्चाची आणि गरजांची आखणी करून केलेली गुंतवणूक असते ज्यात टॅक्स, खर्च, बचत आणि उत्पन्न अशा गोष्टींचा बारकाईने विचार केला जातो. तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे साधारण तुमच्या तीन-साडेतीन वर्षांच्या उपक्रमांची आखणी करता येते. जिथे महागाईसारख्या गंभीर बाबीवर लक्ष ठेवावे लागते, अशी माहिती शरद झा यांनी दिली.

रिटर्न्‍स, रिस्क आणि गुंतवणूक यांचा परस्परसंबंध असल्याने कुठले पर्याय आपल्यासाठी योग्य आहेत आणि त्या पर्यायांमधला फरक काय हे जाणून घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. त्याबद्दल बोलताना ‘ग्रो’ (Groww) या नवीन पिढीला गुंतवणुकीसाठी तयार करणाऱ्या कंपनीचे सहसंस्थापक आणि चीफ ऑपरेशन ऑफिसर हर्ष जैन यांनी सांगितले की, ज्यांना मीडियम आणि हाय रिस्कमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी दीर्घ कालावधीतून मिळणाऱ्या नफ्यांचा विचार के ला पाहिजे. आणि त्यासाठी म्युच्युअल फण्डमध्ये गुंतवणूक करू शकता. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला चांगले रिटर्न्‍स मिळतील पण म्युच्युअल फण्डमध्ये गुंतवणूकदारांना विविध पद्धतीच्या रिस्क लेव्हलवरती विविध पर्याय असतात. येथे तुम्ही कमी गुंतवणुकीतही विविध पर्यायांचा अवलंब करून घेऊ  शकता, असे त्यांनी सांगितले.

एसआयपीमध्ये गुंतवणूक केली तर दीर्घ काळासाठी ते तुम्हाला लाभदायक ठरतील. आजच्या काळात बऱ्यापैकी पेपर गोल्ड आणि गोल्ड ईटीपीसारख्या पर्यायांचा वापर तरुण गुंतवणूकदारांकडून होतो. तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचा विचार करून घेऊ  शकता ज्यात  ७.९ टक्के इंटरेस्ट आहे. त्यानंतर बॅँक फिक्स डिपॉझिटमार्फत लो-रिस्क गुंतवणुकीसाठी ६-८ टक्के इंटरेस्ट तुम्ही यात कमवू शकता. हा पर्याय तरुणांना बऱ्यापैकी सोप्पा वाटतो. सध्या आता तरुणांना सरकारी योजनांचाही वापर करता येईल. पोस्ट ऑफिस मन्थली इन्कम स्कीमद्वारे स्थिर उत्पन्न तुम्ही एका फिक्स रेटद्वारे कमवू शकता. यामध्ये ७.६ टक्के इंटरेस्ट आहे आणि येथे तुम्ही १,५०० रुपये ते ४,५०,००० रुपये एवढी रक्कम एका अकाउंटमध्ये गुंतवू शकता तर जॉइंट अकाउंटसाठी ९,००,००० रुपयांपर्यंत गुंतवू शकता.

कुठे आणि कशी गुंतवणूक?

*   सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या नियम आणि कायद्यांकडे बारीक लक्ष ठेवा.

*   अल्ट्रा शॉर्ट टर्म म्युच्युअल फण्डचा मार्ग तरुण गुंतवणूकदारांकरिता ट्रेण्डमध्ये आहे. येथे तुम्हाला हाय लिक्विडिटी मिळेल. म्हणजे थोडक्यात पैसे वेळेसाठी मिळू शकतील. बॅंकेत पैसे साठवण्याव्यतिरिक्त तुम्ही अल्ट्रा शॉर्ट टर्म म्युच्युअल फ ण्डमध्ये गुंतवणूक करू शकता.

*   दुसरा पर्याय असा की तुम्ही इक्विटी हायब्रिड बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करू शकता. यातून तूम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्‍स मिळतील आणि तरुण गुंतवणूकदारांसाठी हा योग्य पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला २०-४० टक्के रिटर्न्‍स आहेत. त्यांपैकी २० टक्के हे इक्विटीचे असतात आणि २० टक्के हे डेब्टचे असतात. जशी तुमची यात वाढ होईल तशीच तुमची टक्केवारी इक्विटीसाठी कमी होईल आणि डेब्टसाठी वाढेल. येथे शक्यतो रेटेड बॉण्ड्सवर लक्ष ठेवा.

*   भारत सरकारकडून असलेल्या पब्लिक प्रॉव्हिडंट फण्डचा विचार लाँग टर्म इन्व्हेसमेंट्ससाठी अगदी योग्य आहे. आत्तापासूनच तुम्ही तुमच्या रिटायर्ड प्लॅनचाही विचार करू शकता. विद्यार्थ्यांनी आपला कॉरपस आणि गुंतवणुकीच्या सवयी कशा वाढतील याकडे भर द्यावा.

*   फण्ड मॅनेजर, इन्व्हेस्टमेंट एक्स्पर्ट, रेग्युलेटरी बॉडी, सेबी, फायनान्शियल अ‍ॅडवायझरचा सल्ला घ्या.

*   फायनान्शियल मार्केट्सची माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन कोर्सचाही अवलंब करता येईल.

*   कुठल्याही वेबसाइटचा उपयोग टाळा.

*   सर्वात प्रथम स्टॉक मार्केटकडे वळू नका.

viva@expressindia.com