– अश्विनी खांडेकर
बदल हा कायम असतो आणि जर आपण बदलाच्या त्या प्रवाहाबरोबर पुढे गेलो नाही, तर आपण मागे पडू शकतो. कारण हा बदल आधीपेक्षा खूप वेगाने होतो आहे. मी दुसऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल नव्हे तर सध्या एकच चर्चा असलेल्या कृत्रिम प्रज्ञा (AI) तंत्रज्ञानाबद्दल बोलते आहे. ऑफिसमध्ये दररोज टीमबरोबर बोलताना, काम करताना मला एखाद्या तरी नवीन एआय टुलविषयी माहिती मिळतेच, जेणेकरून आणखी काही काम भरभर करणं सोपं होईल.
आपल्या रोजच्या कामात होणारा एआयचा वापर हा आता गरजेला उपयोगी पडणारा मित्र इतका मर्यादित राहिलेला नाही, तर एआय हा जणू आपला जोडीदार असावा इतकं ते तंत्रज्ञान आपल्या अंगवळणी पडलं आहे. सेकंडरी रिसर्च असो, विशेष माहिती, आकडेवारी किंवा तुलनात्मक तपशील या सगळ्यासाठी आपण सर्च इंजिनपेक्षा सहजपणे एआय टुल वापरण्यावर भर देतो, त्यामुळे एआय आपल्याला अगदी दररोज गरजेचं असतं, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.एआय तंत्रज्ञानामुळे फक्त आपलं जग बदलत नाही आहे, तर आपल्या देशाचं भविष्यही बदलतं आहे. या तंत्रज्ञानामुळे कॉर्पोरेट कंपन्यांच्या कामाच्या स्वरूपातही वेगाने बदल होतो आहे. आज भारतात जवळपास ३० ते ३५ टक्के इंडस्ट्रीजमध्ये एआयचा वापर सुरू झाला आहे आणि हे प्रमाण अजून वेगाने वाढतं आहे. चॅट जीपीटीमुळे एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आणि काहीही शोधण्यापासून ते सगळ्याच प्रकारची माहिती शोधण्यासाठी चॅट जीपीटी हे साधन ठरलं. पण, हे सगळं इथवरच थांबणार आहे का? तर नाही. ही फक्त सुरुवात आहे. आणि आपण जर या बदलाबरोबर स्वत:ला जुळवून घेतलं नाही, तर आपलीच बदली होण्याची शक्यता अधिक… कारण, एआय वापरता येणं हे आता अतिरिक्त कौशल्य राहिलेलं नाही, तर त्याकडे अत्यावश्यक कौशल्य म्हणून पाहिलं जाऊ लागलं आहे.
एआयबद्दलच्या सुरुवातीच्या चर्चा ऐकताना मला नाही म्हटलं तरी थोडं आश्चर्य वाटायचं. लोक कुकिंग रेसिपीजपासून ते सोशल मीडिया स्ट्रॅटेजी, रिसर्च आऊटपुट सगळ्याच गोष्टींसाठी एआय टुल्स वापरू लागले. नवीन पिढी हे सगळं इतक्या कम्फर्टेबली स्वीकारते आहे, यात मला काही अडचण वाटत नव्हती, पण त्या सगळ्यात मी कुठेतरी मागे पडते आहे असं वाटत होतं. एआय समजून घेण्याची सुरुवात कुठून, कशी करायची हेच कळत नव्हतं. आणि आजूबाजूला पाहिलं तर प्रेझेंटेशन्स पटकन तयार होत होती, इन्फॉर्मेशन चुटकीसरशी मिळवली जात होती, काहीही हवं असेल तर त्याचं उत्तर अगदी चटकन समोर असायचं. या सगळ्या बदलाशी मी जुळवून घेऊ शकेन की मागे पडेन? हा प्रश्न मला सतावत असायचा. नेमके त्याच वेळी ऑनलाईन क्रॅश कोर्सेस मदतीला धावून आले. एआयची फक्त तोंडओळख असेल आणि तुमचं काम आणखी सोपं आणि जलद व्हावं म्हणून कोणती एआय टुल्स उपयोगी पडतील हे समजून घ्यायचं असेल तर वीकेंडला थोडा वेळ काढून हे एआय संदर्भातले ऑनलाईन कोर्सेस करा. त्यातून कोणकोणती एआय टुल्स सध्या ट्रेंडिंग आहेत, त्याचा वापर कसा करायचा हे तुम्हाला समजून घेता येईल. रोजच्या कामात हळूहळू हे टुल्स वापरून पाहण्याचा सराव केलात तर ते लवकर आत्मसात करता येतील.
दुसरी गोष्ट म्हणजे एआयबद्दलच्या चर्चांपासून दूर राहू नका. सुरुवातीला अशा गप्पांमध्ये आपल्याला यातलं काही कळत नाही असं वाटून तुम्हाला संकोच वाटेल, पण हळूहळू तुम्हाला नवनवीन टुल्सची माहिती मिळत जाईल आणि तुम्हीही त्याचा शोध घ्याल. सोशल मीडियावर एआय संबंधित काही इन्फ्लुएन्सर्सना फॉलो केलंत, तरी तुम्हाला त्यातले नवीन ट्रेंड्स, बदलती परिस्थिती समजून घेता येईल. जनरेटिव्ह एआय़ ही एकाअर्थी एआयमुळे येऊ घातलेल्या क्रांतीची सुरुवात आहे. भारतात सध्या एआय तंत्रज्ञान वेगाने फोफावतं आहे. अनेक कंपन्यांमध्ये प्रोसेस ऑटोमेशन, ॲक्युरेसी वाढवणं, डिसिजन मेकिंग अशा विविध कारणांसाठी एआयचा वापर केला जातो आहे. हेल्थकेअर, फायनान्स, रिटेल, टेक्नॉलॉजी अशा जवळपास सगळ्याच अगदी सरकारी आणि खासगी सेवांमध्येही एआयचा वापर होतो आहे. अनेक ठिकाणी एआयचा उपयोग करून घेणाऱ्यांसाठी निश्चित कामाच्या संधी तयार केल्या जात आहेत. त्यामुळे अजूनही तुम्ही एआयबद्दल काहीच माहिती घेतली नसेल, तरी फार उशीर झालेला नाही. लवकरात लवकर एआय आणि त्याचा तुमच्या कामातला उपयोग याविषयी समजून घेतलं तर कंपनीच्या ध्येयधोरणांबरोबर तुम्हाला अधिक वेगाने जुळवून घेता येईल.
अर्थात, एआय तंत्रज्ञानाचा प्रचंड वेग आणि वाढतं महत्त्व लक्षात घेऊन ते आत्मसात करणं गरजेचं असलं तरी एआय हे एक साधन आहे, त्याचा वापर करून आपल्या कामाच्या प्रक्रियेत बदल होतील पण त्याचं मूळ स्वरूप बदलणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे तुमची स्वत:ची विचार प्रक्रिया, सर्जनशीलता आणि चिकित्सक दृष्टिकोन याला एआय तंत्रज्ञानाची जोड देऊन काम केलं तर तुम्हाला निश्चित यश मिळेल.
