राधिका कुंटे viva@expressindia.com

एकदा मनाशी ठरवलेल्या ध्येयाचा ते साध्य होईपर्यंत पाठपुरावा करणाऱ्या डॉ. गौरव संखे याच्या संशोधनाविषयी जाणून घेऊयात.

आपल्यापैकी अनेकजण अनेकांच्या यशस्वी आयुष्याच्या गोष्टी ऐकतात. बऱ्याचदा ऐकतात आणि सोडून देतात. पण त्या गोष्टी ऐकून त्यातून काही शिकून आपले ध्येय ठरवणारे काही मोजकेच असतात, त्यापैकी एक म्हणजे डॉ. गौरव संखे. त्याचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण ठाण्याला झाले. शालेय वयापासून त्याला विज्ञान आणि गणिताची ओढ होती. तेव्हा तो ‘अप्लाइड सायन्स’च्या क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या उद्योजकांच्या यशोगाथा ऐकत असे. असे यशवंत उद्योजक फक्त स्वत:च संपन्न झाले असे नाही तर त्यांच्या उद्योगांमध्ये रोजगार उपलब्ध झाल्याने अनेकांच्या आयुष्याला आर्थिक उभारी मिळाली. औद्योगिक क्षेत्रातील संशोधन आणि सुधारणा ही बायोफार्मा उद्योगाची मुख्य नस आहे, हे गौरवच्या त्या वेळी लक्षात आले. त्यामुळे त्याने मुलुंडच्या व्ही.जी. वझे महाविद्यालयामध्ये विज्ञानशाखेत प्रवेश घेऊन पुढे बायोटेक्नॉलॉजी या प्रमुख विषयासह पदवी मिळवली.

केळकर कॉलेजमधील शिक्षणादरम्यान तेथील बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. बर्वे आणि झूलॉजी विभागाच्या प्रमुख (स्व.) डॉ. बी. पी. हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने काम केले. संशोधन आणि सुधारणा या क्षेत्रातच पुढील शिक्षण घेण्याबद्दल ते दोघेही सातत्याने त्याच्या मनावर बिंबवत होते. दोन्ही विभागप्रमुखांच्या पाठबळामुळे आणि मार्गदर्शनामुळे तो ‘आविष्कार’ या आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रकल्पामध्ये भाग घेऊ शकला. काविळीवर उँी’्रल्ल्रि४े ें्न४२ हे होमिओपॅथी औषध उपयोगी आहे का, याचा तेव्हा अभ्यास केला.  ‘‘असे संशोधनात्मक शिक्षण हे वर्गात बसून घेतलेल्या शिक्षणापेक्षा मला जास्त शिकवून गेले. साध्या साध्या गृहीतकांची फेरतपासणी करण्यासाठी प्रयोग करणे व त्याच्या फलितासंबंधी विश्लेषण करण्याची मला सवयच लागली’’, असे तो म्हणतो. याच सुमारास केमिस्ट्री विभागातील ऑर्गनिक केमिस्ट्रीच्या प्राध्यापक डॉ. लक्ष्मी रवीशंकर यांनी संशोधन क्षेत्रातील माजी विद्यार्थ्यांशी त्याची गाठ घालून दिली. त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या बहुमोल अनभुवांचे गाठोडे त्याच्यासमोर उलगडले. त्यावरून आपल्याकडच्या केंद्रीय संस्थांमध्ये संशोधन आणि उत्पादन क्षेत्रात भरपूर निधी खर्च करतात. या संशोधन प्रकल्पामध्ये हुशार विद्यार्थ्यांनी आपली बुद्धिमत्ता आणि कल सिद्ध केला आहे, हे गौरवच्या लक्षात आले.

त्यानंतर गौरव भारतातील नामांकित इन्स्टिटय़ूटमधून बायोटेक्नॉलॉजी विषयात पदव्युत्तर शिक्षण  घेण्याच्या ईर्षेने केंद्रीय प्रवेशपरीक्षेच्या तयारीला लागला. तो सांगतो की, ‘‘बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी मिळवेपर्यंत माझ्या पालकांना माझ्या संशोधनविषयक आवडीविषयी काही कल्पना नव्हती. माझ्या मोठय़ा भावाने माझी शैक्षणिक आवड, कल आणि त्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून पालकांना समजावले. त्यामुळे त्यांनी माझ्या मनाप्रमाणे शिक्षण घेण्याची मोकळीक दिली. तरीही जवळपासच म्हणजे मुंबई – ठाण्यातच शिक्षण पूर्ण करावे, असे त्यांनी सुचवले. तेव्हा संशोधनकार्यात शिक्षण देणाऱ्या संस्था देशातील मोठय़ा, वेगवेगळ्या शहरांत आहेत. त्यामुळे गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल त्या संस्थेत प्रवेश घ्यावा लागेल, असे त्यांना मी समजावले. शिक्षणासंबंधी माझी स्पष्ट भूमिका  त्यांना पटली. त्यानंतर मी ‘मास्टर इन बायोटेक्नॉलॉजी’ करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील प्रवेशपरीक्षेच्या तयारीला लागलो. या तयारीचे फलित म्हणजे बायोटेक्नॉलॉजीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षेत देशपातळीवर माझा १३ वा क्रमांक आला आणि नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जे.एन.यू.) ‘मास्टर ऑफ सायन्स इन बायोटेक्नॉलॉजी’ या शाखेत दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी मला प्रवेश मिळाला. केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली उपकरणे, इतर सुविधा आणि संशोधनासाठी सुयोग्य वातावरण ही जे.एन.यू.ची खासियत म्हणायला हवी. मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी जे.एन.यू. आणि तिथल्या बायोटेक्नॉलॉजी विभागाला भेट देतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांत कुतूहल आणि आश्चर्य स्पष्ट जाणवते.’’

जे.एन.यू.मधील त्याचे तत्कालीन प्रा. के. जे. मुखर्जी हे स्वत: केमिकल इंजिनीअर असूनसुद्धा बायोलॉजी हा त्यांचा हातखंडा विषय आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे.एन.यू. स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीमध्ये गौरवने शोधनिबंध सादर केला होता. संशोधनातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्यासाठी फंडामेंटल सायन्स आणि अप्लाइड इंजिनीअरिंग मोलांची भूमिका बजावू शकतात, हे त्याला कळले. म्हणून त्याने बायोटेक्नॉलॉजीमधील अभ्यासाव्यतिरिक्त विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयांना महत्त्व देणाऱ्या संस्थेतच पाच वर्षांचा संशोधनपर पीएचडीचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असा निश्चय केला. अर्थातच, अशी संस्था ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बेंगळुरू’ ही आहे. पण त्यासाठी ‘गेट’ परीक्षा, आयआयएससीची प्रवेशपरीक्षा आणि आयआयएससीमधील इंजिनीअरिंग आणि विज्ञान या विभागातील ज्ञानी प्राध्यापकांच्या समोर मुलाखतीचे दोन टप्पे यशस्वीपणे पार पाडण्याचे दिव्य विद्यार्थ्यांसमोर असते. हे सर्व दिव्य पार पाडून गौरव थिअरेटिकल बायोलॉजीचे प्रा. नरेंद्र दीक्षित आणि बायोलॉजी प्रयोगशाळेतील तज्ज्ञ प्रा. दीपक सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली बायोइंजिनीअरिंग विषयाचा पीएचडी विद्यार्थी म्हणून दाखल झाला. यामुळे त्याला बायोलॉजी आणि इंजिनिअरिंग अशा दोन्ही विषयांच्या एकमेकांतील मिश्रणाचा अभ्यास करता आला. संशोधनासाठी त्याचा विषय होता – क्षयरोगाच्या विषाणूंचा माणसाच्या शरीरात प्रवेश झाल्यानंतर त्या माणसावरील दृश्य परिणामांच्या संकेतांचा अभ्यास करणे. म्हणजे माणसाच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला झाल्यानंतर पेशी आणि विषाणूचे जे शरीरांतर्गत द्वंद्व सुरू होते, त्यामुळे क्षयाच्या संसर्गाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला रोखण्यासाठी धोरण ठरवणे. त्याला बार्सिलोनामधल्या ‘बॅक्टेरियल नेटवर्क २०१७’च्या प्रतिष्ठेच्या जागतिक परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. त्यानंतर युरोपियन युनियन ग्रँटने निवडलेल्या काही युवा संशोधकांमध्ये त्याची निवड झाली. कॅनडामध्ये आयोजित केलेल्या ‘कीस्टोन सिंपोझियम – २०१९’ या जागतिक परिषदेतही ‘सिक्वे स्ट्रेशन ऑफ हिस्टिडिन कायनेझेस बाय नॉन कॉग्नेट रिस्पॉन्स रेग्युलेटर्स : अ नॉव्हेल रेग्युलेटरी मोटीफ इन मायक्रोबॅक्टेरियल टु कम्पोनन्ट सिग्नलिंग सिस्टिम्स ’ याविषयी पोस्टर सादर करण्याची संधी मिळाली. यानंतर बेंगळूरुच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’मधून गौरवने ‘मास्टर ऑफ सायन्स इन इंजिनीअरिंग’ आणि ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इन इंजिनीअरिंग’ या पदव्या यशस्वीपणे संपादन केल्या. 

याच विषयात संशोधन करण्याचे गौरवने ठरवले यामागे काही कारणे आहेत. तो सांगतो की, ‘‘जगभरातल्या क्षयरोगग्रस्त रुग्णांपैकी भारतात सर्वात जास्त रुग्णसंख्या आढळते. काही बरे होतात, काही मृत्युमुखी पडतात. त्यामुळे भारतात या रोगावर गुणकारी औषधाची गरज आहे. सध्या आपल्याकडे मिळणारी औषधे तितकी प्रभावशाली ठरत नाहीत, कारण औषधोपचारांचा कालावधी सहा महिन्यांचा असतो. त्यात त्या रुग्णावर औषधांचे दुष्परिणाम इतके होतात की, त्यामुळे हैराण होऊन रुग्ण औषधे घेणे सोडून देतो. त्यामुळे विषाणूंचा कमी होत आलेला प्रभाव पुन्हा वाढीस लागतो आणि मग पुन्हा त्यावर औषधोपचारांचा गुण येणे कठीण होऊन बसते. हा गुंता सुटता सुटत नाही. हे जाणवल्यावर आणि जवळच्या मित्राच्या जिवलगाबाबत या रोगाचा आणि त्यावरच्या औषधांचा झालेला दुष्परिणाम स्वत: पाहिल्यावर मी याच संदर्भात संशोधन करायचे असे ठरवले.’’

सध्या तो न्यूयॉर्कमधील ‘मेमोरियल स्लोअन केटरिंग कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये संशोधक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. भारतातील श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या कॅन्सरवरील उपचारासाठी हे आवडते रुग्णालय, अशी आपल्याकडे या हॉस्पिटलची ओळख आहे. ‘अनरॅव्हलिंग सिग्नल इंटिग्रेशन इन मायक्रोबॅक्टेरियम बोविस बीसीजी गॉल ब्लाडर कॅ न्सर’हा त्याच्या संशोधनाचा विषय आहे. त्याच्या रिसर्च इन्स्टिटय़ूटचे प्रमुख डॉ. मायकेल ग्लीकमन यांनी गौरवची संशोधनातील गती पाहून ‘सेन्स फास्ट, अ‍ॅडॅप्ट फास्टर’ हा गौरवचा फंडा असल्याचे कौतुकाने नमूद केले. वरिष्ठांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि त्यांच्या कौतुकाच्या चार शब्दांमुळे त्याला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. तो म्हणतो की, ‘‘शास्त्रज्ञ हे सतत ज्ञान – विज्ञानाच्या शास्त्र – कसोटय़ा वापरून त्यांचे काम काटेकोरपणे करतात. त्यांच्याकडून संयम, निरीक्षणशक्ती, मेहनत, दृढ प्रयत्न, धैर्य आणि चिकाटी या गुणांची अपेक्षा असते. त्यामुळे अनभिज्ञ क्षेत्रातही ते विश्वासाने आणि नेटाने प्रवेश करू शकतील. उत्तम विचारमूल्ये उराशी बाळगून एखादा नवीन उद्योग सुरू करण्यासारखेच हे आहे.’’ संशोधन क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा, त्यांच्या अपेक्षांच्या आड  येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा संकल्प त्याने केला आहे. काही काळाने भारतात परतून संशोधन क्षेत्रात स्थिरावायचा त्याचा मानस आहे. गौरवच्या पुढच्या कारकीर्दीसाठी अनेक शुभेच्छा.