नवं दशक नव्या दिशा : बटरफ्लाय इफेक्ट

१९७२ साली गणितज्ञ आणि हवामान अभ्यासक एडवर्ड लॉरेन्झ यांनी ‘बटरफ्लाय इफेक्ट’ ही कल्पना सर्वप्रथम मांडली.

सौरभ करंदीकर viva@expressindia.com
१८०० सालापासून हवामानाचं अंदाजपत्रक नकाशावर उतरवण्यात येऊ लागलं. हवामानाचे असे कागदोपत्री अंदाज पूर्वी घडलेल्या गोष्टी भविष्यात तंतोतंत तशाच घडतील असं धरून केलेले होते, परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही.

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांची आवडीची जागा म्हणजे ‘कुपोला’. स्पेस स्टेशनच्या तळाशी असलेल्या या चिंचोळ्या भागात सात गवाक्षं बसवलेली आहेत. त्यातून झरझर फिरणाऱ्या पृथ्वीकडे पाहत राहणं हा सर्वच अंतराळवीरांचा आवडीचा कार्यक्रम असतो. डोंगर, दऱ्या, वाळवंट, समुद्र आणि त्यावर अंथरलेलं ढगांचं आवरण, चमकणाऱ्या विजा, गोल फिरणारी चक्रीवादळं हे सारं न्याहाळत बसायला कुणाला आवडणार नाही? अशा वेळेस पृथ्वीच्या विविधांगी सौंदर्याबरोबरच एक गोष्ट त्यांना नेहमीच विचारमग्न करते. पृथ्वीच्या प्रचंड गोलाकाराभोवती असलेलं वातावरण मात्र तुलनेने फारच पातळ वाटतं. क्षितिजावर काही मिलिमीटर जाडीच्या वाटणाऱ्या या वायूंच्या थरामुळे मानव जात अस्तित्वात आहे याची जाणीव पाहणाऱ्याला अस्वस्थ करते.

अंतराळातून तलम वाटणाऱ्या या वातावरणात सतत घडणाऱ्या बदलांवर आपलं आयुष्य अवलंबून असतं. ऊन, पाऊस, वारा, थंडी, उकाडा, आद्र्रता इत्यादी गोष्टी आपण ‘आज काय करणार’ पासून ‘या वर्षी पिकांची परिस्थिती काय असणार’ अशा तात्कालिक आणि दूरगामी प्रश्नांची उत्तरं ठरवतात. सतराव्या शतकात बॅरोमीटर आणि थर्मामीटरसारख्या उपकरणांचा शोध लागल्यापासून मानवाने हवामानाचा सांख्यिक अंदाज घ्यायला सुरुवात केली. (हवामानाचा अंदाज चुकण्याचा इतिहासदेखील तितकाच जुना असावा!) १८०० सालापासून हवामानाचं अंदाजपत्रक नकाशावर उतरवण्यात येऊ लागलं. हवामानाचे असे कागदोपत्री अंदाज पूर्वी घडलेल्या गोष्टी भविष्यात तंतोतंत तशाच घडतील असं धरून केलेले होते, परंतु प्रत्यक्षात तसं होत नाही. हवामान असंख्य गोष्टींवर अवलंबून असतं. त्या काळात तरी सर्व स्थितींचा अभ्यास करण्याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं नव्हतं. तरी वातावरणात काहीशी नियमितता होती. त्यामुळे तेव्हाचे अंदाज चुकत असत, परंतु ते चुकण्याचं प्रमाण काहीसं कमी होतं. आज तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे, परंतु पर्यावरणावर मानवनिर्मित आघात होत आहेत आणि त्यामुळे हवामानातील अनियमितता वाढते आहे. थोडक्यात, या ना त्या कारणाने हवामानाचे अंदाज पूर्वीप्रमाणेच चुकत आहेत.

याच कारणामुळे आकाशाला शब्दश: गवसणी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या विज्ञानाच्या या शाखेची आपण नेहमीच हेटाळणी करत आलेलो आहोत. (आपण म्हणजे फक्त भारतीय नागरिक नव्हे. जगभरातील हवामानाचे अंदाजदेखील तितक्याच खात्रीलायकरीत्या चुकत असतात). ‘सतत चुका करूनदेखील पगार मिळतो, अशी एकमेव नोकरी म्हणजे हवामान खात्याची नोकरी’असं विनोदाने म्हणत. त्याच परंपरेतला एक विनोद परवाच व्हॉट्सअ‍ॅपवर वाचला होता, तो असा – हवामान खात्यातला एक अधिकारी उशिरा घरी जायला निघतो. कार्यालयातून बाहेर पडताना तो तिथल्या कर्मचाऱ्याला सूचना देतो. ‘हे बघ, सगळी कागदपत्रं व्यवस्थित आवरून ठेव. आणि हो, जाताना खिडक्या आणि दारं नीट लावून घे. पाऊसबिऊस आला तर प्रॉब्लेम नको. काही भरोसा नाही आजकाल.’

यातील विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवून हवामान पर्यवेक्षण आणि अंदाजपद्धती यातील सत्यस्थिती जाणून घेऊ. आज हवामान खाते इन्सॅट मालिकेतील उपग्रहांकडून मिळणाऱ्या माहितीचा वापर करतं. त्याबरोबर जमिनीवरील यंत्रप्रणाली, वेधशाळेत केली जाणारी मोजमापं यांची सांगड क ॉम्प्युटरच्या साहाय्याने घातली जाते. या माहितीच्या आधारे हवामानाचं आत्ताचं त्रिमिती चित्र तयार केलं जातं. वर्षांनुवर्षे एकत्रित केलेल्या माहितीच्या आधारे नजीकच्या भविष्यकाळात हवामानाचं चित्र कसं असेल त्याचा अंदाज बांधला जातो. थोडक्यात, हवामानाचं चित्र चतुर्मिती बनतं (देशाच्या भूभागावरील वातावरणाची लांबी, रुंदी, उंची आणि काळ).  गेल्या काही दशकांत तंत्रज्ञान विकसित झालंय. मिळणारी माहिती अधिकाधिक अचूक होत चालली आहे. त्या माहितीवर प्रक्रिया करणाऱ्या संगणक प्रणालीदेखील प्रगत झाल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरली जात आहे. हे सगळं असूनदेखील अंदाज चुकताहेत. आणि त्याचं खापर फक्त हवामान खात्यावर फोडणं बरोबर नाही. याला कारण आहे पृथ्वीच्या वातावरणात घडू लागलेले आमूलाग्र बदल.

सध्या जगभरात हवामानातील विषमता वाढू लागली आहे. नुकतीच कॅनडा, फिनलंड, आर्यलड या देशांमध्ये उष्ण तापमानाची अभूतपूर्व लहर येऊन गेली. कॅनडामध्ये तर तापमान ४९ डिग्रीपर्यंत पोहोचलं आणि शंभराहून अधिक बळी गेले! अमेरिकेमध्ये आणि सायबेरियातील टुंड्रा प्रदेशात वणवे पेटले. पश्चिम अमेरिकेत आणि ब्राझीलच्या काही भागात कोरडा दुष्काळ जाणवू लागला. याउलट गेल्या आठवडय़ात चीनच्या झेन्गझाऊ भागात गेल्या ५,००० वर्षांत झाली नसेल अशी भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली. आपल्या कोकणपट्टीतील अतिवृष्टी आणि पिकांचं तसंच मालमत्तेचं झालेलं नुकसान याबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही.

अचानक होणारी ढगफुटी आणि शहरी तसेच ग्रामीण सखल भागात कोणतीही पूर्वकल्पना नसताना येणारे छोटे पूर (फ्लॅश फ्लड्स) २०३० पर्यंत अजून वाढण्याची शक्यता आहे असं ‘इंका’ या भारतीय पर्यावरण बदलावर लक्ष ठेवणाऱ्या संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. याचं मुख्य कारण पृथ्वीच्या वातावरणाच्या सरासरी तापमानात झालेली वाढ. ग्लोबल वॉर्मिग- पर्यावरणाचं सरासरी तापमान वाढणं- हे आता नको तेवढं जाणवू लागलेलं आहे. यामागची कारणं थोडीशी नैसर्गिक पण बहुतांश मानवनिर्मित आहेत हेदेखील सर्वश्रुत आहे. तापमानातील १ डिग्री सेल्शियस वाढ ही ७% अधिक बाष्प हवेत राहण्यास कारणीभूत ठरते. बाष्पाच्या या वाढीची परिणती फ्लॅश फ्लड, मालमत्तेचं नुकसान आणि निरपराधांचे मृत्यू यात होते आहे, ही बाब आपण गांभीर्याने घेतली पाहिजे.

१९७२ साली गणितज्ञ आणि हवामान अभ्यासक एडवर्ड लॉरेन्झ यांनी ‘बटरफ्लाय इफेक्ट’ ही कल्पना सर्वप्रथम मांडली. एखाद्या फुलपाखराने पृथ्वीच्या एका कोपऱ्यात आपले पंख फडफडवले तर त्यामुळे पृथ्वीच्या दुसऱ्या भागात चक्रीवादळ निर्माण होऊ शकेल, अशी ही कल्पना! हे अर्थातच शब्दश: घ्यायचं नाहीये, परंतु छोटे बदल मोठय़ा बदलाला जन्माला घालू शकतात, हा विचार अंतर्मुख करणारा आहे. एके ठिकाणी पर्यावरण प्रदूषित करणारा माणूस दुसऱ्या ठिकाणी होणाऱ्या जीवितहानीला कारणीभूत ठरतो हे चिंताजनक आहे. पूरपरिस्थिती आली की आपण साहजिकच नियोजनाचा अभाव, राज्यकर्ते, हवामान खातं अशा संन्याशांना (काही प्रमाणात) फाशी देतो; परंतु चोर सुटून जातो त्याचं काय?

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Astronauts favorite views from cupola space station zws

ताज्या बातम्या