बुकटेल : बकुळा

काही लेखकांनी नवरा-बायको यांच्या नात्याला कल्पकतेने मांडले तर काहींनी सत्य घटनांचं गोष्टीत रूपांतरण केलं. 

(संग्रहित छायाचित्र)
विपाली पदे

नातं ही संकल्पना भारतीय परंपरेत अगदी जुनी आहे. मग हे नातं आई-मुलाचं असो, बहीण-भाऊ  यांच्यातलं असो किंवा नवरा-बायकोमधलं असो. प्रत्येक नात्याला आपल्या आयुष्यात वेगळं स्थान आणि महत्त्व असतं. यातीलच एक नातं म्हणजे नवरा-बायकोचं. दिसायला कितीही सोप्पं असलं तरी ते निभावताना दोघांचीही तारांबळ उडते. संसाराच्या रामरगाडय़ात कधी हे दोघं एकमेकांना साथ देतात तर कधी आपापसांतील मतभेदांमुळे दुरावले जातात. अशा या नात्यावर आजपर्यंत विविध भाषांमध्ये अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. काही लेखकांनी नवरा-बायको यांच्या नात्याला कल्पकतेने मांडले तर काहींनी सत्य घटनांचं गोष्टीत रूपांतरण केलं.

भारतीय साहित्यात खूप कमी नावं अशी आहेत ज्यांची पुस्तकं सर्वत्र वाचली गेली आणि ती माणसं भारताबाहेरदेखील त्यांच्या नवनिर्मित साहित्यामुळे ओळखली जात आहेत. त्यातील एक नाव म्हणजे सुप्रसिद्ध लेखिका आणि ‘इन्फोसिस’सारख्या मोठय़ा कंपनीच्या प्रमुख सुधा मूर्ती. सुधा मूर्ती यांनी कन्नड आणि इंग्रजी भाषेत आजवर असंख्य पुस्तकं लिहिली. सहज सोप्या भाषेत त्यांनी विविध प्रकारचे विषय वाचकांच्या समोर मांडले. साधारण त्यांनी ४० च्या आसपास पुस्तकं लिहिली.

त्यांनी नवरा-बायकोच्या या अजब नात्यावर आधारित ‘जेन्टली फॉल्स द बकुला’ नावाचं सुंदर पुस्तक लिहिलं आहे. बकुळा या पुस्तकाच्या नावातच खरं गमक आहे. श्रीकांत आणि श्रीमती हे दोघेही एकमेकांचे शेजारी कर्नाटकातील हुबळी इथे राहात असतात. पण ग्रामीण समाजात वावरताना जसे दोन शेजाऱ्यांमध्ये मतभेद असतात तसेच या दोघांच्या कुटुंबामध्येदेखील असतात. श्रीकांत आणि श्रीमती दोघेही अगदी शाळेपासूनच हुशार आणि महत्त्वाकांक्षी असतात. रोज एकमेकांना बघत असल्यामुळे एकमेकांना जाणून घ्यायची त्यांची ओढ वाढत जाते. आणि पुढे त्यांच्यातले प्रेम हळूहळू उमलते ते वेशीवरच्या ‘बकुळी’च्या झाडाखाली. काही काळानंतर त्यांच्या कुटुंबात मतभेद असूनही ते लग्न करतात. आणि श्रीकांतच्या आय.आय.टी.मधल्या मोठय़ा नोकरीसाठी मुंबईला शिफ्ट होतात. श्रीमती ही मुळात श्रीकांतपेक्षा जास्त हुशार असते, पण ती श्रीकांतच्या म्हणजेच आपल्या पतीच्या प्रगतीसाठी स्वत:चं करिअर सोडण्याचा निर्णय घेते, परंतु तिला हे माहिती नसते की असं केल्याने तिला तिच्याच महत्त्वाकांक्षांचाच विसर पडतो आहे. नंतर तिच्या जुन्या प्राध्यापकाशी तिची गाठभेट होते. त्या भेटीनंतर झालेल्या बदलातून ती तिच्या जीवनाचं विश्लेषण करते आणि तिने स्वत:च घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. यातून सुरू होणारा तिचा शोध आणि मग स्वत:मध्येच दडलेल्या त्या राजहंसाला जगण्याची नवीन उमेद देण्याची तिची प्रक्रिया यात आहे.

ही कथा अगदी साधी-सोपी आहे. आणि केवळ दोन मुख्य पात्रांवरच यात लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. हे पुस्तक मुख्यत: श्रीमती, तिचं जीवन, तिची निवड आणि श्रीकांत यांच्यापेक्षा तिच्या निर्णयांविषयी आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आजही श्रीमती तिच्यासारख्या बऱ्याच भारतीय महिलांचा चेहरा बनली आहे ज्यांनी संकोच न करता, मागेपुढे न पाहता केवळ आपल्या नवऱ्यासाठी आपल्या स्वप्नांवर पाणी सोडलं आहे.

सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरात घडणाऱ्या घटना आणि त्याचं चपखल चित्रण आपल्याला सुधा मूर्ती यांच्या लिखाणात बघायला मिळते. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या आजूबाजूला हे सगळे घडताना पाहिलेलं आहे. त्यांच्या लिखाणाचं सौंदर्य हे त्यांच्या साधेपणामध्ये आहे. त्या कुठलंही पात्र रंगवताना तिथली ठिकाणं आणि संस्कृती यांच्या अनुषंगाने लिहितात. नवरा-बायको यांच्यामध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमुळे पडलेलं अंतर हे चित्र समाजात अनेक ठिकाणी बघायला मिळतं. खरं तर तीन दशकं आधी लिहिलेली ही कथा आहे, मात्र तरीही या कथेतील वास्तव आणि आजचं वास्तव यात तिळमात्र फरक नाही याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. इतकं  या कथेतील चित्रण, त्यात आलेले बदलत्या जीवनशैलीचे संदर्भ हे आजच्या काळाशीही जोडलेले आहेत.

थोडक्यात काय, बकुळीच्या झाडाखाली सुरू झालेला या दोघांचा प्रवास हा किती सुगंधी असला तरी जेव्हा ते फूल खाली पडून कोमेजतं तसंच आपल्याच सुंदर म्हणून विणलेल्या नात्यातला फोलपणा जेव्हा कळून येतो तेव्हा ते नातं आपोआप कसं गळून पडतं याचं चित्रण या कथेत केलेलं आपल्याला दिसते. आणि म्हणूनच आत्ताच्या मुला-मुलींनाही ही कथा आपलीशी वाटते, आपल्या जगण्याशी, प्रेमभावनेशी निगडित वाटते.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bakula by sudha murti book review abn