अश्विनी खांडेकर 
मी अजूनही माझ्या अनेक मित्रमैत्रिणींच्या घरी जात नाही. बर्‍याचदा नवीन लोकांना भेटणं टाळते. आणि एखाद्या नवीन व्यक्तीला भेटायला जायचं असेल, तर घरातून निघण्याआधी दोन-तीन वेळा कपडे बदलणंही माझ्यासाठी नवीन नाही. हे सगळं माझ्यात आत्मविश्वास कमी असल्याने किंवा माझ्या ड्रेसिंग सेन्सवरून समोरचा माझ्याबद्दल काय विचार करेल, याची काळजी आहे म्हणूनही नाही. पण, हो… जजमेंट्स आणि जजमेंटल लोकांमुळे माझ्या मनाला अस्वस्थता वाटते. वैयक्तिक आयुष्यात कदाचित जजमेंट्स काही प्रमाणात टाळता येतात. कोणाला भेटायचं, कुठे जायचं, कोणाच्या मताला किती महत्त्व द्यायचं, हे आपण ठरवू शकतो. अगदीच त्रास होत असेल तर लोक काय विचार करतात याने मला फरक पडत नाही, असं स्वत:ला समजावून सांगू शकतो. पण, ऑफिसमध्ये वावरताना आपण खरंच असं वागू शकतो का?

कामाच्या ठिकाणी कोणी ना कोणी सतत आपल्याला जज करत असतं. वरिष्ठ, बरोबरचे किंवा हाताखालचे सहकारी, क्लाएंट्स हे आपल्याला जज करतात, त्यामुळे कधी कधी कामापेक्षा आपलं रेप्युटेशन काय आहे,  लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, यावर आपण अधिक खल करू लागतो. 

खूप काळ मी जजमेंटकडे ‘बीईंग जज्ड’ याच बाजूने पाहात होते. हळूहळू कामात मोठमोठे निर्णय घ्यायला लागल्यावर एक वेगळी गोष्ट लक्षात आली. जजमेंट घेण्यापेक्षा जजमेंटल असण्याबद्दलचे विचार ही माझी खरी समस्या होती. कारण, कुठल्याही गोष्टीचं, कामाचं जजमेंट आल्याशिवाय आपण महत्त्वाचा निर्णय घेऊ शकत नाही. ही आयडिया पुढे न्यायची का?, माझ्याकडे आलेली माहिती विश्वास ठेवण्यासारखी आहे का? ही समस्या खरंच आत्ताच सोडवणं गरजेचं आहे का? हा धोका पत्करावा का?  ही योग्य संधी आहे का? घडल्या गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया द्यावी का? असे कैक प्रश्न आपल्याला पडतात.

याबाबतीत डेटा मदत करू शकतो. अनुभवातून दिशा मिळू शकते. इतर लोक सल्ले देऊ शकतात, पण शेवटी कुणीतरी कॉल घ्यावाच लागतो. आणि तो कॉल किंवा निर्णय घेण्यासाठी जजमेंट लागतं. खरंतर तुम्ही जितके सीनियर होत जाता, तितके डिसिजन्स घेणं अधिक कठीण होत जातं, कारण आपल्यासमोर येणार्‍या प्रश्नांना चूक किंवा बरोबर अशी सरळ उत्तरं देता येत नाहीत. उत्तर एक्सेल शीटमध्ये असलेल्या डेटामधून आधीच मिळत असेल, तर तिथे जजमेंटची फारशी गरज लागत नाही. पण, जिथे डेटा किंवा माहिती अपूर्ण असते तिथे निर्णय घेताना कसोटी लागते. कारण, निर्णयाला अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही बाबींमध्ये काहीएक धोका आणि काही फायदा असतो. त्यातून निवड एकाच पर्यायाची करावी लागते आणि तिथे जजमेंट हे स्किल म्हणून आवश्यक ठरतं. माझ्या मते, गुड जजमेंटची प्रक्रिया तीन गोष्टींच्या आधारे समजून घेता येईल.

ऑब्झर्वेशन

निर्णय घेण्यासाधी समोर नेमकं काय घडतंय हे आपण नीट पाहतो का? फक्त समोर जे दिसतं आहे ते पाहणं म्हणजे ऑब्झर्वेशन नाही. डिटेल्स लक्षात घेणं, पॅटर्न्स ओळखणं, बदल टिपणं आणि बोलल्या न गेलेल्या गोष्टीही समजून घेण्याचा प्रयत्न करणं. अनेकदा चुकीच्या ऑब्झर्वेशनमुळे चुकीचे निर्णय घेतले जातात.

ॲनालिसिस

ऑब्झर्वेशनमुळे आपल्याला माहिती मिळते, मात्र त्या माहितीचं ॲनालिसिस केल्याशिवाय त्याचा अर्थ उलगडत नाही. हे का घडलं? आपलं काही राहून गेलं आहे का? ही एखादी घटना आहे की तशाच पध्दतीने गोष्टी घडतायेत? आपण काहीच केलं नाही तर काय होईल?  आज आपल्याकडे डेटा, ड़ॅशबोर्ड्स, रिपोर्ट्स आणि एआय जनेरेटेड इनसाईट्स आहेत. पण, खूप माहिती मिळाली म्हणजे आपल्याला चांगला निर्णय घेता येईल असं नाही. तर आपल्याला मिळणार्‍या माहितीतून गोंधळ बाजूला सारून नेमकी वाट दाखवणार्‍या गोष्टी हेरणं म्हणजे जजमेंट आहे असं म्हणता येईल.

डिसिजन मेकिंग

आणि शेवटी येतो सगळ्यात कठीण भाग… कॉल किंवा निर्णय घेणं. आपल्याकडे कदाचित कधीच शंभर टक्के माहिती उपलब्ध नसेल. घेतलेल्या निर्णयाचा परिणाम काय होईल, हेही माहिती नसेल तर कधी घेतलेला निर्णय बरोबर ठरेल किंवा चुकीचाही ठरू शकतो. प्रत्येक वेळी योग्य निर्णय घेणं म्हणजे गुड जजमेंट असं म्हणता येणार नाही. त्या क्षणी आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती, आपला अनुभव आणि समोर असलेल्या परिस्थितीचा संदर्भ या सगळ्यांच्या आधारे शक्य तितका योग्य निर्णय आपण घेतला पाहिजे. म्हणूनच जजमेंटल असणं आणि जजमेंट असणं यात फरक आहे.

जजमेंटल असण्याची सवय आपल्या मनाची कवाडं बंद करू शकते. तर जजमेंट्स किंवा अंदाज आपल्याला निर्णय घेण्यासाठी मदत करतात. कुणीतरी मला जज करतं आहे ही जाणीव आजही अस्वस्थ करत असली तरी आता जजमेंट या शब्दाची तेवढी भीती वाटत नाही. कारण शेवटी कोणीतरी आपल्याला आणि आपण कोणालातरी जज करत राहणार. त्यामुळे जज करणं ही प्रक्रिया थांबणारी नाही, ती थांबवण्याची गरजही नाही. मात्र, जजमेंट घेण्याचं आपलं कौशल्य अधिक प्रभावी कसं होईल हे शिकण्याची खरी गरज आहे.

viva@expressindia.com