गाणारी अ‍ॅप्स..

अलीकडे गाणारी आणि आपल्याला गायला लावणारी अनेक अ‍ॅप्स आपल्या मोबाइलमध्ये किलबिल करू लागली आहेत.

|| भक्ती परब

अलीकडे गाणारी आणि आपल्याला गायला लावणारी अनेक अ‍ॅप्स आपल्या मोबाइलमध्ये किलबिल करू लागली आहेत. त्यामुळे आपला मोबाइल हा गाणारा मोबाइल झाला आहे. त्यातील गाणाऱ्या अ‍ॅप्सची ही सैर २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने..

हिरवंगार माळरान, मोठाली झाडे, आजूबाजूला मुलं बागडत आहेत. झाडावर पक्षी किलबिल करत आहेत. काही घरं त्या ठिकाणी आहेत. मुलांच्या बागडण्यात पशुपक्षीही सामील झाले आहेत. बाजूने नदी वाहते आहे. गाण्याचे सूरही ऐकू येत आहेत. झाड हे सगळं पाहतंय जणू तेही गाणारं झाड असावं. गाणाऱ्या झाडाची अशी काहीशी संकल्पना साहित्यातून आपल्याला परिचयाची आहे. पण अलीकडे गाणारी आणि आपल्याला गायला लावणारी अनेक अ‍ॅप्स आपल्या मोबाइलमध्ये किलबिल करू लागली आहेत. त्यामुळे आपला मोबाइल हा गाणारा मोबाइल झाला आहे. त्यातील गाणाऱ्या अ‍ॅप्सची ही सैर २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने..

‘माझे जीवनगाणे’ पासून ते ‘माझे जगणे होते गाणे’ अशी अनेक गीतं आपण गाण्यामध्ये भावनिकरीत्या किती गुंतलो आहोत, याची साक्ष देतात. गायला येवो अगर न येवो, काहीसं कुणासारखं तरी गुणगुणता आलं तरी चालेल, पण गाणं म्हटलं पाहिजे, असं प्रत्येकाला वाटतं. चालता चालता अचानक कुणी गुणगुणताना दिसलं की नकळत आपल्या मनात येतं याला खूप आनंद झाला असणार किंवा तल्लीन होऊन कुणी गाताना दिसलं तर आपल्यालाही आनंद होतो, आपण ऐकतच राहतो. आनंद आणि गाणं हे समानार्थीच शब्द असल्याची प्रचीती गाण्याच्या सान्निध्यात आपल्याला येते. मात्र असं असलं तरी प्रत्येकाला गाणं शिकता येत नाही किंवा तितक्याच विश्वासाने गाणं गाता येत नाही. अशा वेळी मोबाइलमध्ये दररोज नव्याने भर पडत असलेल्या गाण्याच्या अ‍ॅप्सची मोलाची मदत होते आहे.

मोबाइलचा भारतात बऱ्यापैकी प्रसार झाला तेव्हा मोबाइलवर रेडिओ ऐकणारी मंडळी आजूबाजूला दिसायची. त्याची जागा आता अ‍ॅप्सनी घेतली आहे. तरीही मोबाइलमध्ये रेडिओचे स्थान पुसले गेले नाही, तो आहेच. कारण रेडिओ स्टेशन बदलताना अचानकपणे आपल्या आवडीचं गाणं लागणं, ही मजा अजूनही त्यात आहे. अ‍ॅपल म्युझिक, यूटय़ूब म्युझिक, अ‍ॅमेझॉन प्राइम म्युझिक, साऊंड क्लाऊड, सावन, गाना, गूगल प्ले म्युझिक, विंक, जिओ म्युझिक ही काही गाणी ऐकण्याची अ‍ॅप सध्या तरुणाईत लोकप्रिय आहेत.

अ‍ॅपल म्युझिक हे अ‍ॅप त्याच्या वापरकर्त्यांना पर्सनलाइज्ड संगीतानुभव देतं. तुम्हाला कुठल्या संगीतकाराचं, गायकाचं किंवा कुठल्या प्रकारचं गाणं ऐकायचं आहे, त्यानुसार या अ‍ॅपमध्ये गाणी ऐकता येतात. याची साऊं ड क्वॉलिटी उत्तम आहे. एखाद्या सोशल नेटकर्किंग साइटप्रमाणे संगीतकार आणि गायकांची कुठली नवीन गाणी आली आहेत, हे कळण्यासाठी यातील कनेक्ट हा पर्याय निवडता येतो.

‘इससे सत्ता नहीं मिलेगा’ अशी जाहिरात करणाऱ्या अ‍ॅमेझॉन प्राइम म्युझिकमध्ये अ‍ॅपल म्युझिकप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारचं संगीत ऐकता येतं. भारतीय चाहत्यांसाठी साऊंड क्लाऊड हे एक वेगळं म्युझिक अ‍ॅप आहे. यामध्ये तुम्ही स्वत: गायलेल्या गाण्यांची लायब्ररी बनवू शकता. तसेच तुमच्या आवडत्या गायकांच्या गाण्याचीही लायब्ररी करू शकता. संगीतकारांनी, गायकांनी स्वतंत्रपणे केलेली गाणीही इथे ऐकता येतात. हे अ‍ॅप फ्री म्युझिक स्ट्रिमिंग सव्‍‌र्हिस देतं. एखाद्या होतकरू गायकासाठी हा अतिशय जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे. एखादा नवोदित गायक त्याची सहा तास एवढय़ा कालावधीची गाणी इथे कुठल्याही शुल्काविना रेकॉर्ड करू शकतो. इथे गाणी ऐकताना तुम्हाला एखाद्या गायकाची स्वतंत्र संगीतरचना ऐकायला मिळू शकते, हा संगीत दर्दीसाठी सुखद अनुभव ठरतो.

‘सावन’ आणि ‘गाना’ ही भारतीय अ‍ॅप्स बॉलीवूड संगीतासाठी प्रसिद्ध आहेत. तर ‘गूगल प्ले म्युझिक’ हे गूगलच्या सर्व सेवांचे चाहते असलेल्या यूझर्सना त्यांच्या आवडीप्रमाणे गाणी ऐकण्याची सुविधा देतं. जिओ यूझर्ससाठी जसं ‘जिओ म्युझिक’ अ‍ॅप आहे. तसंच भारती एअरटेलची मालकी असलेलं ‘विंक’ हे भारतीय अ‍ॅप एअरटेल यूझर्ससाठी फ्री आहे. या अ‍ॅपवर गाणी ऑफलाइन शेअर करता येतात. फिटनेस फ्रीक मंडळी आणि नियमित वर्कआऊट करणारी मंडळी यांची गरज लक्षात घेऊन वर्कआऊ ट करता करता गाणी ऐकण्याचा एक पर्यायही या अ‍ॅपमध्ये देण्यात आला आहे. तसंच वर्कआऊटसाठी वेगळी प्लेलिस्टही तुम्ही करू शकता. गाणं ऐकण्यासाठी या काही अ‍ॅप्सबरोबर ‘स्पॉटीफाय’, ‘यूटय़ूब म्युझिक’, ‘स्टार मेकर’ अशी काही वेगळी अ‍ॅप्सही गूगल प्लेवर उपलब्ध आहेत. ‘स्पॉटीफाय’ हे अ‍ॅप भारतात लाँच झालं त्याला टक्कर देण्यासाठी ‘यूटय़ूब म्युझिक’ हे अ‍ॅप यूटय़ूबने १२ मार्च २०१९ रोजी भारतात लाँच केलं. संगीत ऐकणारा, संगीतावर प्रेम करणारा आणि संगीताची निर्मिती करणारा भारत हा सोन्याची खाण आहे. त्यामुळे भारतीय संगीतवेडय़ा मंडळींना त्यांच्या आवडीनुसार आणि त्यांना हव्या तशा पद्धतीने संगीत उलपब्ध करून देण्यासाठी धडपड करणाऱ्या या अ‍ॅप्सच्या निर्माणकर्त्यांनी भारतीयांची नस बरोबर ओळखली आहे. यातूनच पुढे तुम्ही स्वत: तुमचं गाण्याचं टॅलेंट दाखवा, असं आवाहन करत ‘स्टार मेकर्स’सारखी कित्येक अ‍ॅप्स दाखल झाली आहेत.

माणसाला कधी कधी स्वत:च गुणगुणायला आवडतं. कुणाला गाण्याचे शब्द भावतात, कुणाला चाल भावते, कुणाला त्याच्या आवडत्या गायक- गायिकेचे गाणे गाऊन बघायचे असते. अशा वेळी ‘कराओके सिंगिंग’ हा पर्यायही अनेकांना आवडतो. त्यासाठी ‘स्टार मेकर’सारखी अ‍ॅप आपल्या दिमतीला आहेत. तसंच तुम्हाला वाद्ये शिकायची असतील तर इन्स्ट्रमेंटल अ‍ॅप्सही आहेत. परंतु या गाणाऱ्या अ‍ॅप्सची खरी मजा तर अजूनच पुढे आहे. आपल्याला एखाद्या गाण्याचा मधलाच तुकडा आवडतो. तेवढाच एडिट करून त्याची रिंगटोन ठेवावी असं वाटतं. तसंच एखाद्या आवडत्या व्यक्तिरेखेची बॅकग्राऊंड टय़ून आपल्याला आवडलेली असते आणि ती आपल्याला रिंगटोन म्हणून ठेवायची असते. पण फक्त त्यातलं म्युझिकच हवं असतं, गाण्याचे बोल नको असतात. अशा वेळी एडिटिंग आणि मिक्सिंगचं फीचर असणारी अ‍ॅप्स आपली ही हौसही पुरी करतात. ‘एमपी३ कटर अ‍ॅण्ड रिंगटोन मेकर अ‍ॅप’ यासारख्या काही अ‍ॅप्सच्या मदतीने आपल्याला एडिटिंग आणि विविध गाण्यांतील विविध भाग हव्या त्या फॉरमॅटमध्ये करून घेता येतो.

आपलं गाणं म्हणण्याची आवड जोपासणाऱ्या या अ‍ॅप्सबरोबरच आपल्याला गाणं शिकवणारी अ‍ॅप्सही आली आहेत. नुकतंच समीर सुदामे यांनी ‘कोमल गंधार’ नावाचं अ‍ॅप काढलं. या अ‍ॅपमध्ये तुम्ही शास्त्रीय संगीत शिकू शकता. रियाझ करू शकता. गाणं शिकण्याची आवड असलेल्यांसाठी अशी संगीत शिकवणारी ही अ‍ॅप्स फायदेशीर ठरतात. ‘गूगल प्ले’वर गेलात तर तिथे म्युझिक हा विभाग सिलेक्ट केल्यावर सध्या कुठली म्युझिक अ‍ॅप्स लोकप्रिय आहेत, कुठली अ‍ॅप्स वापर करण्यासाठी यूजर फ्रेंडली आहेत, हे कळू शकेल.

मनोरंजन आणि मीडियाचं क्षेत्र भारतात झपाटय़ाने वाढत आहे, त्यामध्ये संगीताचा वेगळा वाटा आहे. चीननंतर सगळ्याच बाबतीत मोठी बाजारपेठ म्हणून भारताकडे पाहिलं जातं, हे सर्वज्ञात आहेच. पण सध्या संगीत ऐकणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका नंतर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या नसानसात संगीत भिनलेलं आहे. हे संगीत आपल्या रोजच्या रहाटगाडग्यात दिलासा देतं. फक्त मोबाइलला हात लावण्याचा अवकाश, गाणारी अ‍ॅप्स तुम्हाला संगीतातला आनंद भरभरून वाटण्यासाठी सज्ज आहेत. किती ऐकाल आणि किती एक्सप्लोअर कराल, हे तुमच्या हाती आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Best music apps

Next Story
१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट