अभिषेक तेली, लोकसत्ता

सध्या हिवाळा सुरू असून कडाक्याच्या थंडीमुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा जाणवू लागला आहे. पहाटेच्या धुक्यामध्ये सारं काही हरवत जातंय आणि शरीराला ऊब देण्यासाठी कोवळं ऊन हवंहवंसं वाटतं आहे. कपाटात पडून असलेले उबदार कपडे आणि टपरीवरचा वाफाळलेला चहा सर्वाना खुणावतो आहे. गार वाऱ्यांमुळे सर्द झालेली तरुणाई सध्या शेकोटीच्या निमित्ताने एकवटते आहे. मग कुठं गप्पांचा फड रंगतोय, तर कोणी गाणं-बजावणं यात दंग झाले आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि कोकणपट्टय़ात ठिकठिकाणी शेकोटीबरोबरच खास थंडीतल्या गरमागरम खाद्यपदार्थावर कधी एकत्र घरी जमून नाही तर बाहेर कॅम्पच्या निमित्ताने एकत्र येत ताव मारला जातो आहे..

How Sugar Effects On body can digestive cookie make you fat
बिस्किटाच्या पुड्यात किती साखर असते? क्रीम, गोडाची व चटपटीत बिस्किटांची निवड करताना काय बघावं?
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त

स्वप्ननगरी मुंबई म्हटलं की चटकन डोळय़ांसमोर येतो तो म्हणजे अथांग समुद्रकिनारा, चमचमीत वडापाव आणि तमाम मुंबईकरांची जीवनदायिनी असलेली लोकल. एरवी उन्हाने बेहाल होणाऱ्या मुंबईकरांना थंडीतला गारवा हा दिलासाच ठरतो. त्यामुळे थंडीचा मौसम मुंबईकरांच्या थोडा अधिक जिव्हाळय़ाचा. घडय़ाळाच्या काटय़ावर चालणाऱ्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून उसंत मिळवण्यासाठी मुंबईकर तरुणांची पहिली पसंती असते ती मरिन ड्राइव्हला. सायंकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी इथं गर्दी जमत जाते आणि मग रात्रभर इथं तरुणाईचा एकच कल्ला पाहायला मिळतो. थंडगार वारे अंगाला झोंबत असल्याने मरिन ड्राइव्हवर सायकलवरून फिरणाऱ्या गरमागरम चहा व कॉफीची हमखास ऑर्डर दिली जाते. दक्षिण मुंबईतील चर्चगेटच्या खाऊगल्लीत शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची रेलचेल पाहायला मिळते. येथे मेक्सिकन पाणीपुरी, पावभाजी, चॉकलेट वॉफल सॅन्डविच, चिकन काठी रोल, अंडय़ापासून तयार केलेल्या विविध पदार्थावर सध्या थंडीच्या दिवसांत एकत्र ताव मारला जातोय. दादरमध्ये शिवाजी पार्क आणि रुईया कॉलेज नाक्यावरील तंदुरी मोमोज खायलाही तरुणाईची तोबा गर्दी होते. कॉलेज संपल्यानंतर मुंबईकर तरुणाईची पावलं ही हमखास वडापाव स्टॉल्स आणि चहाच्या टपरीकडे वळतात. थंडीच्या दिवसांत वसई-विरार या भागांत राईच्या तेलात पोहे परतून आणि चिकन टिक्काचे तुकडे टाकून बनवलेला ‘भुजिंग’ हा मांसाहारी पदार्थ लोकप्रिय आहे.

प्रसिद्ध शेफ अमोल राऊळ म्हणतात, ‘मसालेदार असे पदार्थ खाण्यासाठी हिवाळा हा अतिशय उत्तम ऋतू आहे. माझा स्वत:चा हिवाळय़ातील आवडता खाद्यपदार्थ म्हणजे मिरी आणि लवंगीपासून बनवलेला कोरा चहा. यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि आपण तंदुरुस्तही राहतो.’ पुणे तिथे काय उणे असं नेहमीच म्हटलं जातं. पुणेरी पाटय़ा जितक्या भन्नाट, तितक्याच पुणेकरांच्या खायच्या तऱ्हाही वेगळय़ा.. कडाक्याच्या थंडीतही सध्या पुण्यातील फग्र्युसन कॉलेज रोडवरची मस्तानी, आइस्क्रीम व फालुदा खाण्यासाठीची गर्दी काही ओसरलेली नाही. कॉलेज सुटल्यानंतर मटण रस्सा, चिकन रस्सा थाळी, तांबडा व पांढरा रस्सा अशा पदार्थावर ताव मारण्यासाठी पुण्यातील तीन ते चार पारंपरिक खाणावळींमध्ये जायचे तरुणाईचे प्लॅन्स सध्या ऑन आहेत. पुण्यातील थंडी आणि तिथल्या खाबुगिरीबद्दल शेफ विशाल कोंडाळकर सांगतात, ‘पुण्यात या दिवसांत घरोघरी तिखट व चमचमीत ‘खर्डा’ हा भाजलेली हिरवी मिरची, आलं, लसूण, खोबरं, पांढरे तीळ, चुलीवर भाजलेल्या कांदा व टोमॅटोपासून बनवला जातो. तर स्नायूंसाठी फलदायी ठरणारी पांढऱ्या तिळाची बर्फीसुद्धा बनवली जाते. याशिवाय, शरीरात उष्णता निर्माण करणाऱ्या पायासूप आणि मटण रस्सा पावलाही तरुणाईची पसंती मिळते.’ पुणे परिसरातील लवासा आणि पावना तलावाच्या ठिकाणी महाराष्ट्रातील विविध शहरांमधून तरुणाई कॅम्पिंगसाठी दाखल होते.

एरवी रांगडेपणासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकरही यंदा थंडीत गारठले आहेत. घरोघरी बेसनाचा झुणका, ज्वारीची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा चाखला जातोय. जोडीला कोल्हापूरकरांची ओळख असलेला तांबडा व पांढरा रस्सा तर आहेच. याशिवाय, मुगाची अस्सल कोल्हापुरी मसाल्यांपासून तयार केलेली मिसळ खाण्याचे प्लॅन्सही बनविले जात आहेत. पन्हाळा परिसर, रंकाळा तलाव आणि मंगळवार पेठेतील खाऊगल्ल्यांमध्ये तरुणाई गर्दी करते आहे. शेफ महेश जाधव म्हणतात, ‘कोल्हापूरला थंडी खूप पडते आणि रात्री ती वाढत जाते. यामुळे शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त असं खर्डा चिकन व सुकं मटण इथं खाल्लं जातं.’ 

डोळय़ांचं पारणं फेडणारा निसर्ग आणि भरपेट चवीचं खाणं या दोन्ही गोष्टी कोकणात भरपूर आहेत. सध्या थंडीच्या दिवसांमध्ये कोकणात घरोघरी शरीरात ऊर्जा निर्माण करणारे िडक, मेथी, हलीमचे लाडू, सफेद व काळय़ा तिळाची पोळी, चिक्की आणि लाडू बनवले जात आहेत. कोकणात समुद्रकिनारी माशांचा लिलाव होतो. त्यामुळे तिथं फिरायला जाणारी तरुण मंडळी समुद्रकिनारीच छोटीशी चूल बनवून त्यावर कौलं किंवा काठय़ा ठेवतात. यावर मीठ व मसाला लावलेले मासे भाजले जातात आणि मग त्याचा मनमुराद आस्वाद घेतला जातो. कुडाळ तालुक्यातील निवती बीच, मालवण बीच आदी विविध ठिकाणी हे दृश्य हमखास पाहायला मिळतं. कुडाळ येथे राहणारे शेफ भावेश म्हापणकर म्हणतात की, ‘सध्या कोकणात प्रचंड थंडी पडली आहे. यामुळे ऊब मिळण्यासाठी शेकोटय़ा पेटवल्या जात आहेत आणि मग त्यातील निखाऱ्यावर गोड रताळी भाजून खाल्ली जातात. बटाटय़ासारखी चव असणारी ‘कणगी’ही भाजून खाल्ली जाते.’

‘नागपुरातही गोंडचे लाडू, ड्रायफ्रूट्स टाकून गव्हाच्या पिठाचे लाडू, तर गव्हाचे पीठ, तूप, गूळ टाकून गोड पराठाही बनवला जातो. याचसोबत काजू टाकून गुळाचा भात बनवला जातो’, असं शेफ निकिता केवलरमानी सांगतात. नागपुरात घरोघरी पदार्थामध्ये खास थंडीत येणाऱ्या हिरव्या लसणाचा वापर केला जातो. तर नागपुरातील तरुणाई एकत्र बाहेर फेरफटका मारायला गेल्यावर विविध फ्लेवर्समधील गरमागरम दुधाचाही आस्वाद घेते.

कडाक्याची थंडी आणि पोपटीवर ताव..

सध्या तरुण मंडळी बाहेर फिरायला अथवा कॅम्पिंगला गेल्यावर ‘पोपटी’ हा पदार्थ स्वत: तयार करून खातात. हा पदार्थ प्रामुख्याने कोकणात बनवला जातो. सुक्या गवताने शेकोटी पेटवली जाते आणि त्यावर मातीचे गोलाकार मडके ठेवतात. नैसर्गिक चव येण्यासाठी मडक्याच्या आत हिरवा पालापाचोळा आणि केळीची पानं लावली जातात. मग त्या मडक्यात तेल, चिकन, शेंगा, अंडी, बटाटे, मीठ आणि वेगवेगळे मसाले टाकले जातात. माळरान किंवा शेतीच्या ठिकाणी पोपटी बनविली जात असेल तर त्या ठिकाणच्या भुईमुगाच्या शेंगासुद्धा टाकल्या जातात. हे सर्व पदार्थ व्यवस्थित शिजल्यानंतर मडक्यातील पोपटी केळीच्या पानात रिकामी केली जाते आणि सगळे मिळून त्याचा आस्वाद घेतात. या वेळी अंताक्षरी, विविध गाणी आणि खेळ यांची जोडही दिली जाते. तरुणाईकडून कॅम्पिंग आणि पोपटीचा बेत हा प्रामुख्याने आठवडय़ाच्या शेवटी शनिवार व रविवारी आखला जातो. viva@expressindia.com